Saturday, November 1, 2014

ताज्या क्षणिका – सत्तेचा आनंद, नागपुरी संत्रा आणि टोल







सत्तेचा आनंद



नाक कान डोळे
ठेवा सर्व बंद

गुपचूप चिडीचूप

  सत्तेचा आनंद





नागपुरी संत्रा



नागपुरी संत्रा

पहा कसा बहरला

लवकरच कळेल

गोड आहे कि कडू.



टोल प्रश्न



गादीवर बसतात

  सत्ताधारी झाला

प्रश्न टोलचा

झाडावर टांगला.

Sunday, October 26, 2014

दिवाळी -वैचारिक क्षणिका


चाईनीज बॉम्ब
जोरात फुटला
कानाचा परदा
कुणाचा हो फाटला.

फटाक्यांचा धूर
आकाशी दाटला
खोखलत-खोखलत
कुणाचा प्राण गेला.

आधी केली साफ -सफाई
मग पसरविला कचरा
दिवाळीचा सण मोठा
असा साजरा केला.

Saturday, October 25, 2014

फटाक्याचा आनंद (लघु कथा)


रस्त्याच्या एका बाजूला मोठे-मोठे  बंगले आणि दुसर्या बाजूला झोपडपट्टी. महानगरातले सामान्य दृश्य. दहा वर्षाचा चिन्या अशाच एका झोपडट्टीत रहात होता. इतर लहान मुलांसारखे  त्यालाही दिवाळीत अनार, चरखी इत्यादी उडविण्याची इच्छा होती. त्याच्या बाबानी एक छोटे से पिस्तुल त्याला दिवाळीसाठी घेऊन दिले होते. दिवस भर टिकल्या उडवून  तो बोर झाला. संध्याकाळी आकाशात उडणारे राकेट इत्यादी पाहून आपले बाबा आपल्यासाठी अनार इत्यादी फटाके आणू शकत नाही. आपण गरीब आहोत. ही जाणीव त्याला बोचू लागली. तो उदास झाला. 

चिन्या आत कशाला बसला आहे, बाहेर ये, समोरचा कोठीवाला मोठा अनार उडविणार आहे. बाबांचा आवाज ऐकून चिन्या बाहेर आला.  कोठी समोरच्या रस्त्यावर एका माणसाने अनार उडविला. एक उंच मोठा  रंग-बिरंगी कारंजा आकाशात चमकला. काय मजा आली ना! बाबांनी विचारले. चिन्या म्हणाला, कसली मजा, मी थोडी ना अनार उडविला आहे. चिन्या, बघ समोरच्या पोरांनी कश्या टाळ्या पिटल्या आणि उड्या मारल्या. त्यांनीही अनार उडविला नाही. बाबा समजावणीच्या सुरात म्हणाले. त्यांनी नाही पण त्यांच्या नौकराने उडविला नं,  चिन्या उतरला.  "तसे असते तर फक्त नौकराला आनंद मिळाला असता, त्या मुलांना नाही."  चिन्या काहीच बोलला नाही. बाबा पुढे म्हणाले, हे बघ चिन्या, मोठे लोक, राजा-महाराजे, शेट स्वत: काहीच करत नाही. त्यांचे नौकर त्यांच्यासाठी काम करतात. समज हा नौकर आपल्यासाठी अनार उडवितो आहे, बघ काय मजा येईल. चिन्याला म्हणाला बाबा म्हणजे तो आपला नौकर आहे, असं समजायचे. तेव्हड्यात चिन्याचे लक्ष समोर गेले. बाबा, तो नौकर पुन्हा अनार उडविणार आहे. त्या नौकर कडे पाहत, चिन्या ओरडला "ए नौकर हमारे लिये अनार उडाव". लाल, निळ्या, पांढऱ्या रंगांच्या छटा आकाशात पसरल्या. चिन्याने आनंदाने टाळ्या पिटत उड्या मारल्या.  चिन्याच्या चेहऱ्यावर हास्य पाहून, त्याच्या बाबांच्या डोळ्यांत पाणी तरळले.

Thursday, October 23, 2014

दिवाळीच्या फुलझड्या


चंचला कमळा ती
हातातुनी निसटली
दिव्यांच्या उजेडात
कमळावर स्वार झाली

पीएम इन वेटिंग सारखा
सीएम इन वेटिंग राहिला 
कोकणचा राजा 
आज ही उपाशी राहिला 

अंधार दूर झाला 
वनवास आज संपला 
आज वोट पाउलांनी  
सत्ता घरात आली  

धनुष्य बाणाचा नेम
कसा काय चुकला?
शकुनी पास्यानी
दगा कसा दिला.


Monday, October 6, 2014

इमानदार माणूस आणि त्याचा झाडू



काल झाडू विकत आणायला गेलो. भाव विचारला. दुकानदाराने चक्क ५० रुपये मागितले. एका टुकार झाडू साठी ५० रुपये. दुकानदाराला जाब विचारला. तो म्हणाला आजकाल झाडू के अच्छे दिन आएं हैं, डिमांड बढ़ गई है. डिज़ाइनर झाडू चाहिये तो १०० रुपये में मिलेगा. फोटू खिंचाने के काम आएगा. मी तर चाटच झालो. आता काय म्हणणार ५० रुपये मोजून झाडू आणला.

खरंच, गेल्या वर्षी एका इमानदार माणसाने हातात झाडू घेतला होता. तो सर्वांना म्हणाला त्याच्या हातातला झाडू चमत्कारी आहे, या झाडूने तो सर्व भ्रष्टाचार स्वच्छ करणार. झाडू लावत-लावत त्याने भ्रष्टाचार रुपी कचरा गोळा केला आणि तो इंद्रप्रस्थ नगरीच्या सिंहासन जवळ पोहचला. पाहतो तर काय सिंहासनाचा एक पाया तुटलेला. त्याने गोळा केलेला भ्रष्टाचार रुपी कचरा त्या पायाच्या खाली ठेवला आणि सिंहासनावर बसला. भ्रष्टाचार वैगरेह विसरून गेला आणि चमत्कारी झाडू ही अडगळीत ठेऊन दिला. काही महिने राज्य केल्यावर त्याला चैन पडेनासे झाले. दिवसा उजेडी हस्तिनापूरचे स्वप्न दिसू लागले. त्याने सिंहासन सोडले आणि सैन्य घेऊन हस्तिनापूरच्या दिशेने प्रयाण केले. परंतु चतुर द्वारकेच्या कृष्णाने त्याचा डाव हाणून पडला. आता इमानदार माणसाची स्थिती ‘धोबी का कुत्ता घर का न घाट का’ सारखी झाली. इंद्रप्रस्थी परतल्यावर त्याला अडगळीत ठेवलेल्या चमत्कारी झाडूची आठवण आली. पण त्याला झाडू सापडला नाही.

इकडे द्वारकेच्या राजाने झाडू पळविला या चमत्कारी झाडूने देशातला सर्व कचरा स्वच्छ करेन असे त्याने जनतेस म्हंटले आणि जनतेला ही कचरा स्वच्छ करण्याचे आव्हान केले. आता राजाच जर रस्त्यावर झाडू मारण्यास उतरणार तर नेता अभिनेता, खेडाळू का मागे राहणार.  नेते, अभिनेते सर्व हातात  झाडू घेऊन  कचरा स्वच्छ करण्यास रस्त्यावर उतरले.  अडगळीत पडलेला झाडू आता मोठ्या-मोठ्या लोकांच्या बैठकीत पोहचला. तेंडल्या ही क्रिकेट बेट सोडून सकाळी-सकाळी झाडू हातात घेऊन रस्ते स्वच्छ करताना दूरदर्शन वर दिसू लागला. तेंडूलकर सारखा रोल मोडेल जर हातात झाडू घेईल तर मोठ्या मोठ्या कंपन्या ही झाडूच्या बाजारात उतरतील, हे आलंच. सकाळी सकाळी दूरदर्शन वर विज्ञापनात हातात झाड़ू घेउन  सलमान खान म्हणत आहे,

तेरी गली, मेरी गली से साफ क्यों?
गली को चमकाये, लिवर ब्रांड झाडू.

माधुरी स्टायल स्माईल करत एक हिरोईन म्हणत आहे,

माधुरी के दातों की तरह चमकाए
आपके मोहल्ले को, चमको ब्रांड झाड़ू.

बेचारा इमानदार माणसाच काय झालं. इमानदार माणूस या घडी  कपाळावर हात ठेऊन विचार करीत आहे, गादी गेली, झाडू गेला ...

एकच होता झाडू
तो ही त्याने पळविला
आता स्वच्छ करू कसा
भ्रष्टाचार रुपी कचरा.

पण आता त्याच्या शब्दांवर पुन्हा लोक विश्वास ठेवतील का? 

Wednesday, October 1, 2014

कांदा / क्षणिका


कांद्या उगविणारा शेतकरी असो, ग्राहक असो वा व्यापारी, सरकारच्या नित बदलत्या नितींमुळे, सर्वांनाच नुकसान होते


शेतकऱ्याला      रडवितो     कांदा
ग्राहकाला         लुबाडीतो   कांदा
व्यापारीला       फसवितो   कांदा
नेत्यांना  मात्र   हसवितो    कांदा 

Monday, September 22, 2014

विचारपूस करणारे आत्मीय (?) सहकर्मी



जवळपास तीन  महिन्यापूर्वी एस्कॉर्ट हॉस्पिटल मध्ये हृदयाची बाय पास सर्जरी झाली होती. प्रदीर्घ सुट्टीनंतर आज प्रथमच कार्यालयात गेलो. आजारी माणूस ठीकठाक होऊन परतल्यावर त्याची विचारपूस करायची आपल्यात पद्धत आहेच.  साहजिकच आत्मीय (?)  सहकर्मींचे फोन हे येणारच किंवा ते भेटायला तरी येतीलच. मी ही तैयार होतोच. पहिला फोन सुनीलचा आला. हा ही एक औलिया आहे आणि त्याच माझ्यावर अत्यंत स्नेह आहे. फोनवर जोरदार आवाजात म्हणाला, पटाईत कसा आहे?  मी म्हणालो मस्त आहे. तो म्हणाला, काही लाज नाही वाटली तुला,  धर्मराजाने पुन्हा धक्का देऊन परत पृथ्वीवर फेकले याची. अरे, तुझ्या सारख्या नालायक, निखट्टू आणि कवी माणसाला  स्वर्गात एन्ट्री मिळणे शक्यच  नाही.  नरकात रहाणार्यांनी ही म्हंटले असेल, पटाईतची कविता  ऐकण्यापेक्षा कढईत उकळल्या गेलेलं बरे. शेवटी बेइज्जत होऊन पुन्हा पृथ्वीवर परत यावे लागले. चांगलीच नाक कापलीस तू. काळिमा लावला तोंडाला.  आता तरी  सुधरून जा. पुढच्यावेळी स्वर्गात किंवा नरकात कुठेतरी तंबू गाड.

तुम्हीच सांगा काय म्हणावे अश्या मित्राला, मी हॉस्पिटल मधून सही सलामत आल्याचे याला दुखच जास्ती. मी ही त्याला चोख उत्तर दिले, हरामखोरा, तुझ्या सारखे स्नेही ज्याचे आहे, त्याला नरकात पाठवायची काय गरज, म्हणून धर्मराजाने मला पृथ्वीवरच तुझ्या सारख्या मित्रांच्या संगतीत नरकवास भोगायला परत पाठविले आहे, 

त्याला निरुत्तर केले न केले, शर्मा भेटायला आला. येताच त्यांनी प्रेमानी आलिंगन दिले (धृतुराष्ट्र सारखे). यार, वापस क्यों आया, मेरी सारी मेहनत पर पानी फेर दिया तूने. (परत कशाला आला, माझ्या मेहनतीवर पाणी टाकले). मी विचारले ते कसं? तो म्हणाला, आम्हाला वाटलं, या वेळी तू निश्चित  वर जाणार. सर्वांनी मला शोकसभे साठी भाषण तैयार करण्याचा आग्रह केला. आपल्या अंतरात्म्याला मारून, मोठ्या मेहनतीने शोकसभे साठी भाषण तैयार केले. मी म्हणालो, यात अंतरात्म्याला मारण्यासारखे काय? तो म्हणाला भाषणात, तू किती छान आहे, मनमिळाऊ आहे, सज्जन आहे, सर्वांशी किती-किती  चांगले वागतो, तुला काय माहित, त्यात किती- किती खोटी प्रशंसा केली आहे तुझी.  शिवाय, तू गेल्याच आम्हाला किती दुख झाले, असे ही त्यात म्हंटले आहे. आता बोल, एवढे सर्व खोट बोलण्यासाठी अंतरात्म्याला मारावेच लागेल न. मी म्हणालो, एका अर्थी बरंच झाल. तुला खोट बोलावे नाही लागले. पण काळजी करू नको, तुझी मेहनत वाया नाही जाऊ देणार,  तू मेहनतीने तैयार केलेल्या भाषणाची एक प्रत मला दे.  जर कधी तू अचानक वर गेलास तर तुझ्या साठी होणाऱ्या शोक सभेत मी तूच तैयार केलेले भाषण वाचेल, बेहिचक खोट बोलेल, ते ही कपाळावर आठी न आणता. त्या साठी नरकात जावे लागले तरी राजीखुशी जाईल. 

संध्याकाळी कार्यालय सुटायच्या आधी माझा एक जुना मित्र भेटायला आला, येताच म्हणाला, पटाईत, त्या दिवशी मला दुपारी कळले, तू हॉस्पिटल मध्ये आहे, सर्व म्हणत होते, या वेळी काही खंर नाही.  पण मला पूर्ण विश्वास होता, तुला काही ही होणार नाही. एकदम ठनठनीत बरा होऊन तू परत येणार.   मी म्हणालो, तू पहिलाच मित्र आहे ज्याला मी ठीक झाल्याचा आनंद आहे. तो म्हणाला  छे!छे! आनंद वैगरेह काही नाही,  मी सर्वांना म्हणायचो  पटाईत  अस्सल ब्राह्मण आहे, आपल्या  सर्वांची  तेरवी जेवल्याशिवाय कसा मरणार, हा! हा! हा!  मी म्हणालो, खंरच, तू माझा खरा मित्र आहे, बाकी कुणाबद्धल आता सांगू शकत नाही, पण तुझ्या तेरावीला निश्चित जेवायला येईल. 

असे हे माझे अफलातून प्रेमळ सहकर्मी. 

टीप: नावे  काल्पनिक आहे. 

Sunday, September 21, 2014

स्वामी त्रिकाळदर्शी उवाच: कलियुगातील समुद्र मंथन


स्वामी त्रिकाळदर्शी आपल्या आश्रमात गहन विचारात ध्यानमग्न अवस्थेत होते अचानक त्यांनी डोळे उघडले. वेळ न गमावता मी विचारले, बाबा, कसला विचार करता आहात?  बाबांच्या चेहऱ्यावर मंद हास्य पसरले, ते म्हणाले बच्चा, समुद्र मंथन सुरु आहे, अमृत कुंभ कुणाला मिळणार याचाच विचार करीत होतो.  मी म्हणालो, बाबा फार पूर्वी सत्ययुगात समुद्र मंथन झाले होते, आज तर कलयुग आहे. बाबा म्हणाले, काळ बदलला तरी देव आणि दानवांचा संघर्ष हा चिरंतर आहे. मी विचारले, तो कसा काय? बाबा म्हणाले, बच्चा मतपेटी म्हणजे सुमेरू पर्वत जिचा मथण्यासाठी वापर होईल. जनता म्हणजे वासुकी नाग, ज्याला देव आणि दानव दोन्ही मिळून पिळून काढतील. 

मी म्हणालो बाबा, आपण काय म्हणत आहे, मज अज्ञानीला काहीच बोध होत नाही. शिवाय या घटीला देव कोण, दानव कोण, मित्र कोण, शत्रू कोण काहीच कळत नाही आहे. बाबा म्हणाले, बच्चा, तुला ठाऊकच असेलआकाशात, पाताळात आणि पृथ्वी तिन्ही लोकांत दानवांचे वेगवेगळे राजे असतात. अमृत वाटण्याच्या अधिकार ज्याच्या कडे राहिलं तोच राक्षसांचा राजा, राक्षसेंद्र ठरेल. समुद्र मंथनाच्याआधी राक्षसेंद्र कोण, हे ठरणे गरजेचे. तिन्ही लोकांत देवतांची संख्या भारीच, कुणी पर्वतांचे देवता, कुणी जलाचे, कुणी जंगलांचे, कुणी वृक्षांचे, प्रत्येकाला अमृतात वाटा पाहिजे. या शिवाय कित्येक दानव देवतांचे रूप घेऊन केवळ अमृतासाठी राहू-केतू प्रमाणे यंदा ही देवगणात शामिल झाले आहेत. देवतांचे दोन प्रमुख देवता शिव आणि विष्णू दोन्ही स्वत:ला जगाचे उद्धारक समजतात. या कलयुगात समुद्र मंथनातून निघणारे विष पचवायला शिव तैयार नाही त्याला ही अमृतकुंभ पाहिजे. यक्ष, गंधर्व, भूत-पिशाच सारख्यांनी ही आपला वेगळा मोर्चा तैयार केला आहेत. ऐन वेळी ज्या देवता किंवा राक्षसाला अमृतकुंभ मिळण्याची संभावना दिसेल, त्यांची ते मदत करतील, म्हणत बाबा थांबले. 

मी पुन्हा विचारले, बाबा आपण सर्वज्ञानी आहात, एक सांगा अमृतकुंभ कुणाला मिळेल? बाबा म्हणाले बच्चा, सत्ययुगाप्रमाणे जो देव आणि दानव मोहिनी रूप धारण करण्यात यशस्वी होईल, तोच अमृतकुंभाच अधिकारी ठरेल म्हणत स्वामी त्रिकाळदर्शीनी डोळे बंद केले आणि ते पुन्हा ध्यानमग्न झाले. माझ्या समोर दृश्य तरळले, देव-दानव वासुकी नागाच्या मिळेल त्या अंगाला पकडून समुद्र मंथन करीत आहेत, वासुकी नागाचे हाल-हाल होत आहेत. रागाने बेफाम झालेला हा नाग कुणाला डसेल, काहीच सांगता येत नाही. पण एक मात्र खंर, अमृत कुणाला ही मिळो. पिळवणूक ही वासुकी नागाचीच होणार शिवाय त्याला नाग असल्यामुळे अमृत ही मिळणार नाही, विष पचविणेच त्याच्या नशिबी येणार.   



Wednesday, September 17, 2014

मोठा माणूस जन्मत: मोठा असतो???


मोठा माणूस जन्मत: मोठा असतो. त्याला मोठे व्हावेच लागते. आईच्या गर्भात असतानाच त्याला पुढे भविष्यात तो मोठा होणार याची जाणीव असते. बालपणी अन्य कार्ट्यांंप्रमाणे हातवारे करत माकडाप्रमाणे तो उड्या मारत नाही. कधी मोठ्यांच्या नकला करत खदाखदा हसत नाही. कधी आपल्या बहिणीची शेपटी ओढून तिला त्रास देत नाही. भविष्यात आपण उदा: मोठे कवी किंवा लेखक बनणार असू तर आपले जीवन लोकांसमोर आदर्श राहिले पाहिजे म्हणून तो  कधीच खोड्या करीत नाही. बालपणापासूनच सदैव धीर गंभीर चेहरा करून वावरणे त्याच्या नशिबी.भविष्यात त्याच्या लेखनावर चिंतन करणाऱ्या चिंतातूर अति शहाण्यांना शब्दांचा कीस काढून किंवा शीर्षासन करून अर्थ लावण्याची पाळी येऊ नये  म्हणून  काही बोलण्याआधी प्रत्येक वाक्याच्या  प्रत्येक शब्दाचे चिंतन मनन करूनच आपल्या मुखातून शब्द बाहेर फेकीत असे.  लिहितानाही तोलून-मोलून लिहित असे. त्याला माहित असते, त्याने गमंत म्हणून ही काही हलंक-फुलंक लिहील, उदा: 

माझा शेजारचा पोरगा, सावळा ग बाई. 
कान्हा सारखा, खोडकर ग बाई. 
काळीज त्याचे, काळेकुट्ट ग बाई. 
लबाडाने माझे, सर्वस्व लुटले ग बाई. 
माझी मी आता, राहिले ना  ग बाई.

तर भविष्यातले समीक्षक यातून  ही अध्यात्म इत्यादी शोधून काढतील. म्हणून तो असले हलके-फुलके लेखन बालपणापासूनच करीत नाही. खंरच मोठे लोक बालपणा पासून असे वागले आहेत का?

खंर म्हणाल तर कुठला ही मोठा माणूस बालपणा पासून मोठा होत नसतो. तो ही सामन्यांसारखाच असतो. महात्मा गांधी  चष्मा आणि काठी सहित जन्मले नव्हते. जीवनाच्या दीर्घ प्रवासानंतर त्यांना हे स्वरूप प्राप्त झाले. एका  सामान्य घरातला खोडकर आणि चहा विकणारा आज देशाचा पंतप्रधान झाला आहे. भविष्यातल्या राजनीतिक समीक्षकाने त्यांचे बालपण वेगळ्या चष्म्याने पाहू नये म्हणजे मिळविले.    

नदीला समुद्राचे स्वरूप प्राप्त करण्यासाठी हजारो मैलाचा प्रवास करावा लागतो, पर्वत, घाटी, मैदान आणि समुद्राला मिळताना प्रत्येक टप्प्यात तिचे स्वरूप वेगळे असते. त्याच प्रमाणे कवी असो वा लेखक त्यांना ही या प्रवासातून जावे लागते. त्यांच्या प्रत्येक लेखनातून समुद्रा सारखा धीर-गंभीरता शोधण्याचा प्रयत्न मूर्खपणाच. टवाळा आवडे विनोद या धर्तीवर ते ही हलंक-फुलंक, विनोदी लिहू शकतात. असो.



Sunday, September 7, 2014

सरडा- काही क्षणिका काही म्हणी


महाराष्ट्रात सरड्यांचे अच्छे दिन आलेले आहे, सरडे या झाडावरून त्या झाडावर उडी मारीत आहे. 

(१)

जेंव्हा त्यांच्या झाडावर होता
तेंव्हा सरडा भ्रष्टाचारी होता.

जेंव्हा सरडा अमुच्या झाडावर आला
आमच्याच सारखा इमानदार झाला.

(२)

जिभेच्या स्वाद पायी
मधुर फळांची मैत्री जोडी.

अहंता स्वत:ची  त्यागुनी
सरडा झाला रंगनिरपेक्षी.


काही म्हणी:

  1. जिथे सरडा, तिथे सत्ता
  2. उंदीर आणि सरडा, बुडते जहाज सोडती
  3. सरडा येई घरा, तोच दिवाळी दसरा
  4. सरड्याचे अनुकरण करा, सत्तेचे सुख भोगा.

Saturday, September 6, 2014

रस्त्यावर वाहन चालविणारे



त्या दिवशी सुनीलला भेटायला त्याच्या घरी गेलो. बिछान्यावर पडलेला होता. डाव्या पायाच्या मांडीत लोखंडी रॉड टाकलेली होती. त्याला विचारले, कसं झाले हे सर्व. तो म्हणाला, तुझ्या सारख्या नियम पाळणाऱ्या एका मूर्ख माणसामुळे ही पाळी आली. मी म्हणालो, साला स्पष्ट बोल कि काय म्हणायचं आहे ते. उगाच माझ्या डोक्यावर खापर नको फोडू?  तुला माहितच आहे, बाईक चालविताना मी  ट्रफिकचे कुठलेच नियम-कायदे पाळत नाही. किक मारल्या बरोबर बाईक हवेत उडाली पाहिजे तरच चालविण्यात मजा. त्या रात्री घरी परतताना असेच हवेत उडत जात होतो. एका ट्रफिक सिग्नल वर लाल बत्ती होती. नेहमीप्रमाणे पर्वा केली नाही. दुसर्या बाजूने येणाऱ्या बाईक ने चक्क मिठी मारली. कदाचित त्या गाढवाला दिल्लीत बाईक कशी चालवावी हे कळत नसावे. अरे हिरवा दिवा झाला तरी काय झाले, सुसाट वेगाने जाणार्या बाईकला रस्ता दिला पाहिजे,  एवढे तरी त्याला माहित असायला पाहिजे. त्यानी ब्रेक मारायला पाहिजे होता. आता भोगत असेल आपल्या कर्मांचे फळ म्हणत तो जोरात हसला. आपल्या कष्टापेक्षा दुसर्याचे कष्ट पाहून हसणारा असा हा औलिया. या माणसाला काय म्हणावे मलाच कळेनासे झाले.

रस्त्यावर वाहन चालकांच्या तीन श्रेणी आहेत. पहिल्या श्रेणीतले वाहन चालक ट्रफिकच्या सर्व नियमांचे पालन करतात. रस्ता रिकामा असला तरी कधी चुकूनही लाल बत्ती क्रास करीत नाही. पोहचायला उशीर झाला तरी त्यांना चालते. समर्थांच्या अखंड सावधान असावे  या उक्तीवर  त्यांचा विश्वास असतो. स्वत:च्या चुकीने असे वाहन चालक क्वचितच दुर्घटना ग्रस्त होतात. बाकींना सुनील सारख्या वाहन चालकांच्या कर्माचे फळे भोगावे लागतात.

दुसर्या श्रेणीतल्या वाहन चालकांच्या मनात कायदा, कानून नियम यांची भीती असते. पण गंतव्य स्थळी लवकर पोहचण्या करता संधी साधून ट्रफिक नियमांची उपेक्षा करतात. कुणी पाहत नाही पाहून लाल बत्ती क्रास करतात. कधी ट्रफिक पोलीस वाल्याने अडविले तर काय द्या वर त्यांचा विश्वास असतो.  देवावर सव्वा रुपया टाकला कि देव क्षमा करतोच. गांधी छाप कागद पोलिसांच्या हातावर ठेऊन सुटका करण्याच्या प्रयत्न करतात. मुंबईचे ट्रफिक पोलीस या बाबतीत इमानदार असतील, पण दिल्ली ट्रफिक पोलीसवाले नोट ही खिशात टाकतात आणि घरी चालान ही पाठवून देतात. नमकहराम कुठले. त्याना पाहून लोकांना गुंडाळणाऱ्या बंगाली बाबांची आठवनणयेतेच.

तिसर्या श्रेणीचे वाहन चालक सुनील सारखे असतात. त्यांच्या मते नियम, कायदे- कानून यांचे पालन करणारे लोक मूर्ख/ मागासलेले असतात. ट्रफिक पोलीसला पाहून शक्यता बाईक थांविणार नाही आणि कधी थांबवावी लागली तर लगेच उगाच हुज्जत (भांडण) घालायला सुरवात करतील.  त्यांच्या वर विना कारण शरीफ (?) लोकांना त्रास देण्याचा आरोप करतील. शिकायत करण्याची धमकी देतील किंवा तो मी नव्हेच असे दाखवतील. त्रासून ट्रफिक पोलीसवाला अधिकांश वेळी चालान न कापता त्यांना सोडून देतो.  

रस्त्यावर वाहन कसे चालवावे हा ज्याच्या-त्याच्या व्यक्तिगत प्रश्न आहे. फक्त एकच बाब विचार करण्याची आहे, आपल्याला गंतव्य स्थळी सुरक्षित पोहोचायचं आहे का?


स्वामी त्रिकाळदर्शी म्हणतात ज्याला या कथेचा अर्थ समजेल तो आयुष्यात कधीच दुर्घटनेचा शिकार होणार नाही. 

Thursday, September 4, 2014

स्वामी त्रिकाळदर्शी उवाच: पुरोगामीस्य किम् लक्षणं?



आश्रमात बाबा ध्यानमग्न बसलेले होते, अचानक त्यांनी डोळे उघडले, क्षणाचा ही बिलंब न करता मी प्रश्न विचारला, स्वामीजी  मनात एक शंका आहे. स्वामी  त्रिकाळदर्शी: काय शंका आहे बच्चा? मी: स्वामीजी  पुरोगामी कोण असतो, त्याची लक्षणे काय?  स्वामी त्रिकाळदर्शींच्या चेहऱ्या एक हास्याची लहर पसरली, ते म्हणाले बच्चा, समोर  वडाचे झाड बघ, झाडाच्या डाव्या अंगाला एक वाळकी फांदी दिसते आहे न. मी म्हणालो होय, स्वामीजी.  स्वामी  त्रिकाळदर्शी: त्या फांदीला पुरोगामी फांदी असे म्हणतात. मी त्या वाळक्या फांदी कडे बघितले,मला काहीच कळले नाही. मी पुन्हा प्रश्न केला, स्वामीजी  मी अज्ञ बालक आहे, आपल्या गूढ वाक्याच्या अर्थ स्पष्ट करावा.  स्वामी  त्रिकाळदर्शी म्हणाले, बच्चा, ती वडाची वाळकी फांदी स्वत:ला वडाच्या झाडाचा अंग मानीत  नाही.  ती वडाच्या झाडाचा तीव्र द्वेष करते. म्हणून तिने  फांदीवर  लागणार्या पानांना झटकून दिले. मी मध्येच टोकले, का स्वामीजी ? स्वामी  त्रिकाळदर्शी म्हणाले,  हिरवी पानें झाडासाठी प्राणवायू तैयार करतात, प्राणवायू झाडाला न मिळावी हाच तिचा हेतू. ही गोष्ट वेगळी कि झाडापासून मिळणारे सर्व पोषक तत्व ही फांदी शोसते.  मी म्हणालो, बाबा हे तर विचित्र आहे. मनात एक प्रश्न आला, म्हणून विचारतो, ही फांदी सर्व झाडांचा द्वेष करते का?  स्वामीजींच्या चेहऱ्यावर पुन्हा मंद मुस्कान पसरली, ते म्हणाले, बच्चा, ही फांदी फक्त ती ज्या वडाच्या झाडावर आहे, तिचा द्वेष करते, पण शेजारच्या घराच्या कुंपणावर लागलेल्या बाभळीच्या झाडाची ती सदैव प्रशंसा करते.  पुरोगामी आहे म्हणून, मागच्या जन्मी काही पाप केले असेल म्हणून वडाची फांदी झाले असे तिला नाही वाटत. पण आपण एखाद्या दुर्घटनेमुळे वडाची फांदी झालो असे तिला वाटते. मी पुन्हा स्वामीजींना पुन्हा प्रश्न विचारला, स्वामीजी, झाडावर एखादे संकट आले, पुरात झाड बुडाले वैगरेह? स्वामीजी म्हणाले, अशा वेळी झाडाची मुळे मातीला घट्ट पकडून झाडाला पडण्यापासून वाचविण्याचे प्रयत्न करतात, झाडाचे इतर अंग ही उदा. फांद्या ही मुळांना भरपूर प्राणवायू पोहचवून त्यांची ताकद वाढवितात. पण पुरोगामी फांदी असे काहीच करत नाही, ती केवळ विचार करते, पूर का आला, हे झाड का वाचले, पडले का नाही इत्यादी.  एखादा NGO सेमिनार साठी पेपर तैयार करतो तसेच. पण स्वामीजी, जरं, वडाचे झाड पडले तर, झाडा बरोबर फांदीचे अस्तित्व ही नष्ट होईल, हे तिला कळत कसें नाही. स्वामीजी पुन्हा जोरात हसले व म्हणाले, बच्चा तिला जर हे कळले असते तर ती पुरोगामी  कशी झाली असती? क्षणभर आ! वासून मी  स्वामीजींना  बघत राहिलो,  स्वामीजींना  पुढचा प्रश्न विचारणार, पण स्वामीजी डोळे मिटून पुन्हा ध्यानमग्न झाले होते.

Monday, September 1, 2014

वरुण राजाला साकडं



श्रावण सगळा सरला
टिपूस नाही पडला.
बळीराजाच्या अश्रूंनी
धरती जळून गेली.

साकडं घातल इंद्राला
वरुणराजा धावत आला  
वादळ फोडून पाऊस बरसला.

गुरं-ढोरं पुरात गेली वाहून
पीक सगलं खलास झालं
बळीराजाच नशीब फुटलं.

वरुण राजा
तू तर देव आकाशाचा
का वागतो लहरी सारखा?
गत जन्मांच्या कर्मांचा
का हिशोब घेतो आता?

झाल्या चुका माफ कर
कृपा कर पामरांवर
साकडं घालतो तुझ्या चरणी
पुढच्या वर्षी तरी
पाऊस पाड नेमान.



  

Friday, August 29, 2014

गणपती पूजेच्या मागची अवधारणा


आज गणेश चतुर्थी, आज बाप्पा आपल्या घरी येतात. १० दिवस आपण बाप्पाची पूजा अर्चना करतो. अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाचे विसर्जन करतो. आपण बाप्पाची पूजा का करतो या मागची अवधारणा काय? हा प्रश्न मनात येतोच. 

गणपती किंवा गणाध्यक्ष याचा अर्थ गणांचा अधिपती सोप्या शब्दात म्हणावे तर कुळ, जाती, बिरादरी, राज्याचा किंवा देशाचा प्रमुख म्हणजे गणपती ज्याला जनतेने आपले प्रतिनिधी म्हणून निवडले आहे. वैदिक युगात प्रत्येक गण (कबीला) प्रजातान्त्रिक पद्धतीने आपल्या प्रमुखाची निवड करायचे. विभिन्न गणांचे प्रमुख मिळून इंद्राची निवड करायचे. असो.

आपल्या देशात गणराज्यांचे अस्तित्व बुद्धाच्या काळापर्यंत टिकून होते. मगधच्या राजा अजातशत्रू ने समस्त गणराज्यांच्या विनाश करून मगधचे विशाल साम्राज्य उभे केले.  १९४७ मध्ये भारताला स्वतंत्रता मिळाली आणि पुन्हा गणराज्य भारतात पुनर्जीवित झाले. आज देशात प्रधानमंत्रीच्या स्वरूपात आणि राज्यात मुख्यमंत्री गणाध्यक्ष- गणपती कार्यभार संभाळतात.

देशावर/ राज्यात शासन करणाऱ्या प्रमुखाच्या अंगी काय गुण असावे त्याचे स्वरूप म्हणजे बाप्पाची मूर्ती. बाप्पाची मूर्ती शासकाच्या अंगी काय गुण असावे याची आठवण आपल्याला करून देते. बापाचे विशाल मस्तक बुद्धिमत्तेचे प्रतीक आहे. शासक हा बुद्धिमान असावा. परिस्थितीचे विश्लेषण करणे आणि त्यानुसार निर्णय घेण्याची क्षमता शासकात असावी. अन्यथा काय होते, हे आपण गेल्या ५-७ वर्षांत आपण बघितलेच आहे. बाप्पाचे कान लांब आहेत आणि मुख लहान. अर्थात शासक मितभाषी अर्थात कमी बोलणारा असावा पण ऐकण्याची क्षमता त्याच्या अंगी असावी. वाचाळ लोक दुसर्याचे ऐकत नाही. अश्या लोकांना निवडण्यात काहीच अर्थ नाही. कारण ऐकण्याच्या क्षमतेशिवाय जनतेचे  विचार आणि मनोगत काय आहे शासकाला  कसे कळणार?  समर्थांनी ही म्हंटले आहे, ‘श्रवणें होये कार्यसिद्धीl श्रवणें लागे समाधीl श्रवणें घडे सर्व सिद्धीl समाधानासीl’(दा.बो. ७-८-८). बाप्पाला लंबोदर ही म्हणतात. बाप्पाचे उदर मोठे आहे. याचा अर्थ शासकाच्या अंगी सर्व काही पचविण्याची क्षमता असायला पाहिजे. एकी कडून मिळालेली बातमी दुसरीकडे सांगितली नाही पाहिजे. अन्यथा सहयोगी मध्येच आपसांत भांडणे होतील. आपले मनोगत मित्र असो वा शत्रू कुणाच्या ही समोर उघड केले नाही पाहिजे. प्रजेच्या कल्याणासाठी स्वत:चे मान-अपमान सर्व पचविण्याची क्षमता असली पाहिजे.  बाप्पाची सोंड हत्तीच्या सोंडीप्रमाणे मोठी आहे. आपल्याला माहितच आहे, हत्तीची सोंड मोठ्या मोठ्या वृक्षांना धाराशायी करू शकते त्याच प्रमाणे ती एक छोटी सुई सुद्धा उचलू शकते. तिची वास घेण्याची क्षमता  ही अदभूत असते.  राज्य प्रमुखाला देश्यात होणाऱ्या लहान-मोठ्या सर्व घटनांची, कुठे काय चालले याची माहिती असायला हवी. शिवाय शेजार-पाजारच्या देशांत आणि जगात काय चालले याची इत्यंभूत माहित ही असायला पाहिचे. अन्यथा केंव्हाही दगा होऊ शकतो. शिवाजीचे राजांचे गुप्तचर विभाग त्या काळी देशात सर्वश्रेष्ठ होते म्हणून ते आग्र्याहून सहज परत येऊ शकले. समर्थांनी म्हंटले आहे: ‘जो दुसर्यांचे अंत: कारण जाणे l देश काळ प्रसंग जाणेल त्या पुरुषा काय उणे l भूमंडळीl’ (दा.बो.१४-७-२७).



.....


  

Tuesday, August 26, 2014

मैत्रीण


 
(पात्र: ताई: उमेश ची मोठी बहिण, उर्मी: उमेशची बायको, उमेश)

उर्मी: वन्स, तुम्ही समजवा न उमेशला, तुमच ऐकेल तो. मी पुष्कळ प्रयत्न केला माझं  ऐकतच नाही. एकच रट लाऊन बसला आहे, पहिले मुलगा पाहिजे, मुलीचं नंतर बघू. वन्स, लग्नानंतर पहिल्यांदा गर्भार राहिली आहे मी. पहिले मुलगी झाली तर काय झालं. मी त्याला म्हंटले, पुन्हा गर्भात मुलगी आली तर मी नाही म्हणणार नाही गर्भपाताला. भावाला बहिण पाहिजेच. मग बहिण मोठी असेल तर काय फरक पडतो.

ताई: पुष्कळ फरक पडतो, तुला माहित आहे, बाबांनी माझ्यासाठी इंजिनिअर मुलगा बघितला. सालंकृत कन्यादान केल, सव्वा लाख हुंडा दिला वर २० तोळे सोन ही. त्याच वेळी उमेशला इंजिनीरिंग मध्ये अडमिशन साठी २ लाख पाहिजे होते. वडिलांनी नकार दिला. त्याच इंजिनीअर व्हायचं स्वप्न, स्वप्नच राहिलं. तू, तुझ्या जिद्दीपायी त्याच्या होणाऱ्या मुलाचं स्वप्न ही भंग करणार का? कदाचित त्याला मुलगी नकोच असेल. कालच उमेशचा फोन आला, होता. तुला समजवायला सांगितल आहे. तुला इथे सोडून,  तो वात्सल्य क्लिनिक मध्ये गेला आहे, अपॅाइंटमेन्ट घेण्यासाठी.

उर्मी: ताई मोठ्या आशेने मी इथे आले होते, पण तू सुद्धा, तुला पटतयं का, हे?. मी गर्भपात करणार नाही, माझा पक्का निश्चय आहे.

ताई: तुझ्या या जिद्दीपायी उद्या उमेशने तुला सोडून दिले तर तू काय करेल? आधी आपल्या आई-बाबांना विचार या बाबतीत.

उर्मी: (काहीच बोलत नाही)

ताई:  तू त्यांना विचारल असेलच. त्यांनीही तुला म्हंटल असेल, उगाच बाऊ करू नको, शुल्लक गोष्टीचा. अरे, संपूर्ण आयुष्याची कमाई खर्च करून त्यांनी तुझे लग्न लाऊन दिले. पुन्हा मुलगी, शुल्लक कारणावरून माहेरी आली, त्यांना कसं चालेल?

उर्मी: मी नौकरी करेन, कुणी आसरा नाही दिला तर एकटी राहेन. पण गर्भपात करणार नाही.

ताई: मूर्खासारखे बडबड करू नकोस. हे जग लांडग्यांनी भरलेल आहे, एकट्या स्त्रीला लोक फाडून खातात. असला विचार डोक्यात मुळीच आणू नको.

उर्मी: (मोठ्याने) ताई, तुला कळत कसं नाही, चार महिन्याची गर्भार आहे मी. तिची हालचाल पोटात जाणवते. रात्री स्वप्नात येऊन बोलतेय ही. कालच रात्री स्वप्न बघितल, ती विहरीत पडली आहे, आई वाचवा म्हणून हाक मारतेय. मी हात पुढे केला, सगळं पुसट झाल. दचकून उठले. घामाघूम झाले होते. मी कसं मरू देऊ आपल्या पोटच्या पोरीला. तुला कसं कळणार ताई, ज्याच्यावर वेळ येते. तोच सांगू शकतो. नुसत्या गर्भपात शब्द म्हंटला तरी अंग शहारून येत. मनाला किती यातना होतात तुला कसं कळेल.

(काही क्षण शांतता, ताई सोफ्यावर ठेवलेल्या बाहुली कडे बघते. हळूच अलगद बाहुलीला  कडेवर घेते, पुन्हा उर्मी कडे वळून)

ताई: उर्मी ही बाहुली बघ, अक्षय सहा महिन्याचा होता, तेंव्हा घेतली होती. खेळणं म्हणून. (चेहर्यावर हास्य आणत). तुला आमच एक गुपित सांगू, अजून कुणालाच नाही माहित. तुलाच सांगते, ही बाहुली नाही, माझी छकुली आहे. (बाहुली कडे बघत) आहे नं ग राणी,  मी किती धांटरट आहे, तुझी दुधाची वेळ लक्षातच नाही राहिली. सॉरी हं, बघ कोण आलंय आपल्या कडे, तुझी मामी आली आहे, गुड मार्निंग म्हण तिला. गुड मार्निंग मामी! (बाहुलीचा हात हलविते). उर्मी, आपण नंतर बोलू, छकुलीला भूक लागली आहे.

ताई सोफ्यावर जाऊन बसते आणि बाहुलीला मांडीवर घेऊन तिला पाजायचे नाटक करते. उर्मी स्तब्ध होऊन एकटक पाहतच राहते. ती भांबावून गेली आहे, काय बोलावे तिला काहीच कळत नाही. काही वेळ काही वेळ शांतता.   

ताई: (बाहुलीशी) पोटोबा भरलं वाटत, राणी साहेब झोपा आता आम्हाला जरा कामच बोलायचं आहे, तुझ्या मामीशी.  

(ताई बाहुलीला  अलगद सोफ्यावर निजवते).  

ताई: झोपली एकदाची, उर्मी तुला माहित आहे, कालच स्वप्नात आली होती. म्हणाली कशी, आई एवढचं प्रेम होत माझ्यावर तर मला का मारलं.  तिला कसं सांगणार, किती दुबळी आणि असहाय होते मी. वाचवू नाही शकले तिला. म्हंटल, छकुली, अपराधी आहे तुझी, तुला पाहिजे ती शिक्षा कर मला. ती काय म्हणाली, सांगू! आई, मी तर सुटले, मुक्त झाले, पण तू जन्मठेप भोगते आहे. तुझी दशा पाहून मला ही चैन मिळत नाही. या बाहुलीत माझा ही दम घुटमळतो. लवकर ये नं. उर्मी, तिला त्रास होत ग. पण मी कशी जाऊ  संसार सोडून.  नवरा आहे, पोटचा गोळा अक्षय आहे, त्यांच्या साठी जगावं लागणार. रोज रात्री गळ्यातगळे घालून आम्ही रडतो ग. झोपेच्या गोळ्या घेते आजकाल. या जगात स्त्रियांना भोग भोगावेच लागतात...

(ताई रडू लागते, उर्मी जवळ जाऊन ताईच्या खांद्यावर हात ठेवते. काय बोलावं तिला काहीच कळत नाही आहे,  तेवढ्यात  दारावरची वेळ वाजते, ताई डोळे पुसत, दरवाजा उघडते, उमेश आत येतो)  

उमेश: (उर्मीकडे पाहत) काय म्हणता बाईसाहेब! 

उर्मी: (काही क्षण चूप राहते), जशी, तुमची इच्छा.

उमेश: आनंदाने, देटस लाईक अ गुड गर्ल. (ताई कडे पाहत) मला माहित होत, ताई ही तुझ जरूर ऐकेल. थेक्स. (उर्मीकडे पाहत) तुझ्या जिद्दी मुळे आधीच उशीर झाला, आज सर्व निपटले पाहिजे

ताई: चहा घेणार का?

उमेश: नंतर कधी, आज आधीच उशीर झाला आहे, चल उर्मी निघू या.

उर्मी: ताई येते  हं(तिचा चेहरा भावशून्य आहे, एखाद्या कसाई कडे जाणार्या गाई सारखा) दोघ बाहेर पडतात, ताई दरवाजा बंद करते.     

ताई: (बाहुलीला हातात उचलत) छकुली, एक आनंदाची बातमी सांगू का तुला,  तुझी मामी, तुझ्याच सारखी बाहुली आणायला गेली आहे. छान, मस्त, मैत्रीण भेटणार आहे तुला, खेळण्यासाठी, हा! हा! हा!........