Monday, August 27, 2018

क्षणिका - प्रकृति



प्रेमिका वासंती
कृष्ण विहरणी
प्रेमात भिजलेली

शरदाची चांदणी 
 शेवटच्या क्षणाची
संगनी,प्रकृति.

 

Saturday, August 25, 2018

कविता: यात्री


धुक्यात उमटली 
चित्रे काही 
त्यास समजलो 
 नाती-गोती.

धुक्यातली नाती
धुक्यात विरली
जीवन यात्रा
एकट्याची.

Friday, August 24, 2018

मराठ्यानों आंदोलन नव्हे, प्रतियोगिता परीक्षांची तैयारी करा.


(इथे मराठा म्हणजे मराठीमाणूस) 

आज महाराष्ट्रात आरक्षण- आरक्षणचा आरडा-ओरडा सुरु आहे. जणू काही आरक्षण जाहीर होताच समाजातील सर्व तरुणांना सरकारी नौकर्या मिळणार. आरक्षण मिळाले तरी फक्त काही हजार लोकांनाच नौकरी मिळणार. ती पण त्यांनाच जे सरकारी नौकरी साठी तैयारी करतील.  हुशार तरुण डॉक्टर, अभियंता, आर्किटेक्ट इत्यादी बनतात. काही राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या प्रशासनिक सेवेची तैयारी करतात. सामान्यतः ५० ते ६०% टक्के  आणणारे सामान्य बुद्धीचे तरुण सरकारी नौकरी साठी प्रयत्न करतात.

आज सकाळी सहज केंद्र सरकारच्या CSSS (स्टेनो सर्विस- एकूण  संख्या ७०००, CSCS क्लरीकल सर्विस ५५०० च्या जवळ व CSS - 12000 च्या जवळपास, मराठी नावे शोधण्याचा प्रयत्न केला. देशात मराठी  बोलणार्यांची संख्या ८ टक्के असली तरी हि १ टक्क्याहून कमी मराठी भाषिक केंद्रसरकारच्या वरील नौकरींत आहे. आरक्षित आणि अनारक्षित दोन्ही श्रेणीत  दारूण परिस्थिती. १८ वर्षे प्रधानमंत्री कार्यालयात होतो, तिथे ६० च्या वर CSSS कॅडरचे कर्मचारी होते, त्यात मी एकटाच मराठी भाषिक या कालखंडात.  

इतर सरकारी नौकर्या, उदा. सरकारी बँक, रेल्वे, डिफेन्स, इत्यादी, तिथेही बहुतेक हीच परिस्थिती असणार. सर्व सरकारी क्षेत्र मिळून  दरवर्षी किमान ३० ते ४० हजार नौकर्या, (एमटीएस, क्लार्क, स्टेनो, डाटा एन्ट्री आॅपरेटर, पीए, ASO इत्यादी गैर-तकनिकी  पदांसाठी) निघत असेल. देशात राहणारा कुणी हि या परीक्षा देऊ शकतो.

काही सौपी असलेल्या परीक्षेंचे उदाहरण.  क्लार्कच्या परीक्षेचे घ्या - सामान्य ज्ञान, सामान्य बुद्धी, सामान्य गणित आणि सामान्य आंग्लभाषा. पास झाल्यावर टायपिंगचा पेपर, एवढेच. पगार हि  सुरवातीला  किमान 25 हजारापेक्षा जास्त. १२वीत जर जास्त मार्क्स आले नसेल तर कालेजच्या शिक्षणासोबत प्रतियोगी परीक्षांची क्लास लाऊन घ्या. (अधिकांश बिहारी तरुण हेच करतात). आज आनलाईन SSC परीक्षांची प्रश्नोत्तरे उपलब्ध आहेत. घरी हि अभ्यास करता येतो. नियमित वर्षांचे ३६५ दिवस  नौकरी लागेपर्यंत अभ्यास करा. कुठे न कुठे सरकारी नौकरी अवश्य लागेल, कुठल्याही आरक्षणाशिवाय. 

स्टेनोग्राफर- हि तर पास करायला सर्वात सौपी. फक्त सामान्य ज्ञान, सामान्य बुद्धी आणि सामान्य आंग्लभाषा. लिखित परीक्षा  हि  सौपी असते.  तृतीय श्रेणी साठी फक्त  ८० ची स्पीड  (सुरवातीचा पगार ३० हजारच्या जवळ) आणि श्रेणी 'बी'- सौपी लिखित परीक्षा + १००ची स्पीड (सुरवातीचा किमान पगार ४० हजार पेक्षाही जास्त). स्टेनोग्राफरची  परीक्षा पास होण्यासाठी फक्त चिकाटी लागते. या परीक्षेसाठी फक्त ज्या दिवसापासून स्टेनोग्राफी शिकणे सुरु  करणार ते जो पर्यंत नौकरी लागत नाही नियमित न चुकता अभ्यास करावा लागतो. आज अभ्यासासाठी आनलाईन  फ्री ड़िक्टेशन उपलब्ध आहेत. चिकाटीसाठी म्हणाल तर मला आठवते श्रेणी बीच्या विभागीय परीक्षेसाठी जून १९९३ मध्ये क्लास सुरु केली, पहिल्यावर्षी  ध्यान भंग झाल्यामुळे ड़िक्टेशन व्यवस्थित घेता आले नाही. दुसऱ्यावर्षी पास झालो.  स्कील परीक्षा  जून १९९५ मध्ये झाली. निकाल डिसेंबर १९९५ मध्ये आला तोपर्यंत क्लास सोडली नाही. सकाळी ६ ला घरून निघायचो, क्लास करायची, कार्यालयात रोज ओवरटाईम हि न चुकता करायचो व संध्याकाळी ९ नंतरच घरी. या काळात दिल्ली सोडून कुठेही गेलो नाही. आज राजपत्रित अधिकारी. तुम्हाला आंग्लभाषा येत नाही (मी तर ग्रेस मार्कांनी पास झालो होतो), सामान्य ज्ञान इत्यादी हि चांगले नाही. फक्त नियमित अभ्यास करा, सामान्य बुद्धीचा तरुण हि स्टेनोग्राफीचा पेपर सहज पास करू शकतो.

जन्मापासून दिल्लीत रहात असलो तरी महाराष्ट्रात जावेच लागतेच. एकदा नागपूरला गेलो असताना सहज नाक्यावर उभ्या काही तरुणांशी चर्चा केली.  बहुतेक मराठी तरुण सरकारी परीक्षांची तैयारी करतच नाही. काही तरुण  कालेजचे शिक्षण पूर्ण झाल्यावर, सरकारी नौकरीचा विचार करतात. फार्म भरल्यानंतर ३-४  महिन्यांच्या अर्धवट तैयारीवर, परीक्षा पास करण्याचे स्वप्न बघतात, जे संभव नाही. मग सुमार बुद्धीचे इतर भाषिक परीक्षा पास होतात आणि हुशार मराठी तरुण, पूर्ण व नियमित तैयारी नसल्यामुळे, असफल होतात. कारण स्पष्ट आहे, १२वी पासूनच प्रतियोगी परीक्षांसाठी नियमित अभ्यास केल्याने त्यांचे सामान्य ज्ञान व आंग्ल भाषेचे ज्ञान वाढले असते. आत्मविश्वास हि भरपूर  वाढलेला असतो. अधिकांश पहिल्या प्रयत्नांत पास होतात. बाकी तीन-चार प्रयत्नात सरकारी नौकरीचा पेपर पास करतातच. समजा सरकारी नौकरी नाही मिळाली तरी निजी क्षेत्रात त्यांना चांगल्या पगाराची नौकरी मिळतेच. 


सांगायचे एवढेच, आरक्षण असो किंवा नसो, जर सरकारी परीक्षेची तैयारीच कुणी करणार नसेल तर त्याला नौकरी कुठून लागणार. पण महाराष्ट्राचे दुर्भाग्य, कुठलाही नेता, तरुण मुलांना परीक्षेची तैयारी करण्याची प्रेरणा देत नाही. आंदोलनांवर पैसा खर्च करण्याएवजी चांगले कोचिंग क्लास्सेस उघडणे, परीक्षेसाठी तरुणांना नियमित अभ्यासाची प्रेरणा देण्याचे कार्य केले तरी दरवर्षी काही हजार मराठी तरुणांना सरकारी नौकरी निश्चित  मिळेल.

आता निवडणूक जवळ येत आहे. अनेक जातींचे नेता राजनीतिक पोळी भाजण्यासाठी, बेरोजगार तरुणांचा उपयोग करतील. तरुण मुले हि मूर्खान्सारखी त्यांच्या मागे धावतील.  पदरात काही पडणार हि नाही.

शेवटी माझे म्हणणे एकच आहे, १२वी होताच, नियमित ३६५ दिवस सरकारी नौकरींच्या परीक्षेची तैयारी करा. त्यासाठी सकाळी लवकर उठण्याची सवय लावावी लागेल.  सार्वजनिक उत्सवांमध्ये वाजवीपेक्षा जास्त भाग घेणे, विडी, तंबाकू इत्यादी नशापाणी हि सोडावे लागेल. आजच्या तरुणांचे मुख्य व्यसन फेसबुक व व्हाट्सअप इत्यादी पासून हि दूर राहावे लागेल. एवढेच केले तरी, ग्रेजुएट होताच पहिल्या काही प्रयत्नातच सरकारी नौकरी किंवा निजी क्षेत्रात जिथे ९० टक्के नौकर्या आहेत, चांगली नौकरी निश्चित लागेल. 


Thursday, August 23, 2018

हायकू:ऋतु



(सहाही ऋतु, हायकूच्या माध्यमांनी व्यक्त करण्याचा प्रयास केला आहे.)


 रात्र गोठली 
जागले उरी 
स्वप्न वासंती.

चैत्र अग्नीत 
जळाला देह 
पळसाचा.

रात्र विराणी
विरहाची
व्यथा मीरेची.

रात्र भिजली
यमुना तटी
प्रीतीची.

  शरद चांदणी
मोरपंखी
ऐश्वर्याची .

सुगंध पसरला
 पक्वफळांचा
पान गळतीचा.








Monday, August 20, 2018

शतशब्द कथा: जगण्याचे उद्दिष्ट

तहान, भूक, निद्रा विसरून आपल्याच तंद्रीत तो चालत होता.  त्याला रस्त्यात  अनेक यात्री भेटले. पण त्याने कुणाला ही आपल्या सोबत घेतले नाही. त्याने क्षणभराची विश्रांती ही घेतली नाही. एकटाच तो जिद्दीने चालत राहिला, अंतहीन रस्त्यावर.

अखेर सूर्यास्त हा झालाच. त्याचे गात्र झाले शिथिल झाले, डोळे जड झाले. त्याला आता चालणे  शक्य होत नव्हते. त्याने स्वत:लाच विचारले, सकाळ पासून आपण चालतो आहे, तरीही  आपल्याला लक्ष्य का भेटले नाही? काही चूक तर झाली नाही ना.  क्षणभरासाठी त्याने डोळे उघडले, संपूर्ण सृष्टी सोनेरी रंगात न्हात होती. अनादी काळापासून चालत आलेला  सुर्यास्ताचा उत्सव. अखेरचा श्वास घेताना त्याला उमगले, आनंदाचे सोनेरी रंग उधळत अंतहीन रस्त्यावर चालणे म्हणजेच जगण्याचे उद्दिष्ट. 

Friday, August 17, 2018

सबका साथ सबका विकासाचे आद्य पुरुष - स्वर्गीय अटलजी



मी भाग्यशाली होतो, १९९७ मध्ये प्रधानमंत्री कार्यालयात पोस्टिंग झाली. अटलजी प्रधानमंत्री झाले आणि कार्यालयात एक वेगळीच चेतना आली. कामाचा बोझा एकदम वाढलला. सरकारी दफ्तरात नूतन कल्पना साकारताना, भरपूर कागदी कार्य करावे लागतेच. सकाळी ९ ते रात्री ९ वाजायचे  कधी  कळायचे नाही. पण देशासाठी आपण काही ठोस कार्य करत आहोत या जाणीवेने त्या कामातहि आनंदच मिळत होता. 

सबका साथ, सबका विकास याचा अर्थ काय. स्व. अटलजींनी अनेक राजनीतिक दलांना आपल्या सोबत घेऊन सरकार चालवली म्हणजे विकास होतो. नाही. देशात विभिन्न राजनीतिक आणि धार्मिक समूहांना आरक्षण दिल्याने सर्वांचा विकास होतो. नाही. सरकारी नौकर्या फक्त ५ टक्के आणि भविष्यात कमी होणार. अर्थात आरक्षण देऊन विकास होणार नाही. स्वस्तात राशन दिल्याने विकास होणार, हे हि संभव नाही. मग सर्वांचा विकास कसा होणार? हा प्रश्न आहेच. 

मी १९९६ ला सेप्टेंबर अशोकनगर मध्यप्रदेशात फिरायला, सौ. आणि छोट्या मुलांसोबत, गेलो होतो. हा भाग शिंदे परिवारची पुश्तैनी जागीर. तरीही इथल्या रस्त्यांची अवस्था फार भयंकर होती. चंदेरी, थुबोन्जी (जैन मंदिर), विन्ध्यवासिनी देवी (एका गावात) व अनेक जुने मंदिर बघितले.  बाईक, जीप, ट्रक आणि ट्रैैक्टर शिवाय दुसरे वाहन रस्त्यावर चालणे अशक्यच होते. जीप मध्ये हि पोरांना धरून ठेवावे लागले होते.  बाजारात कांदे इत्यादी बाहेरून येणाऱ्या भाज्या नव्हत्या. फळे हि केळ, पेरू आणि पपीता ते हि एखाद्या दुकानात व महाग.  पुन्हा २०१७ मध्ये लेक-जावयासोबत हा भाग फिरलो. या वेळी रस्ते हिरोईनच्या गालासारखे होते. दिल्लीपेक्षा हि चांगले. रस्त्यांवर कार, स्कूटी सर्वच दिसत होते. अशोकनगरच्या भाजी बाजारात सेप्टेंबरच्या सुरवातीला हि भरपूर भाज्या दिसत होत्या. दिल्लीत दिसणारी फळे हि दिसत होती. काय बदलले. 

अटलजींनी जवळ दूरदृष्टी होती. जो पर्यंत ग्रामीण भागात मूलभूत सुविधा पोहचणार नाही. तो पर्यंत तिथे उद्योग-धंधा तर सोडाच, कृषी आधारित उद्योग हि लागू शकत नाही. एखाद्या भागात जास्त शेतमालाचे उत्पादन झाले तर माल रस्त्यावर फेकल्या जाणार, कारण  जिथे रस्तेच नाही किंवा अत्यंत खराब आहे, तिथे टेम्पो घेऊन कुणी  येणार नाही. २०-२५ किमी दूर हि भाजीपाला पाठविणे आर्थिक दृष्टीने संभव नव्हते. अन्न-धान्य हि शेतातच कमी दरात विकावे लागायचे.  राज्य सरकारांना ग्रामीण भागात रस्ते बनविणात रस हि नव्हता. ज्या देशात जाती आणि धार्मिक आधारावर जनतेला वोट मिळत असेल तर आधारभूत सुविधांचा विकास करायची गरज काय.  परिणाम ग्रामीण भागातून मुंबई, दिल्ली सारख्या मोठ्या शहरांत पलायन. कारण तिथेच वीज हि आहे आणि रस्ते हि.  दिल्ली NCR मध्ये  ८० टक्के लोक नरक सदृश्य जीवन जगतात मग ते कुठल्याही जाती, संप्रदाय आणि धर्माचे का असेना. गावांचा विकास अर्थात सर्वांचा विकास, हे अटलजींनी ओळखले होते आणि त्या साठी सर्वात आधी आधारभूत सुविधा ग्रामस्थांनी पोहचविण्याचे कार्य करणे गरजेचे . 

अटलजींनी संपूर्ण देश आपल्या पायाखाली तुटवला असल्यामुळे त्यांना ग्रामीण भागातील समस्यांची जाणीव होती. आपल्या देशात अधिकांश जनता ग्रामीण भागात राहते. ती मेहनती आहे. ग्रामीण भागात रस्ते, रेल्वे, वीज इत्यादी पोहचली तर गावांचा आपसूक विकास होईल. ग्रामीण भागातून पलायन कमी होईल.  ग्रामीण भागातील जनतेला देशांच्या इतर भागांपासून जोडण्यासाठी सन २००१ मध्ये प्रधानमंत्री  ग्राम सडक योजनेचे कार्यान्वन सुरु झाले. सुरवातीला १०००.पेक्षा जास्त आणि ५०० जास्त वनवासी बंधू राहत असलेल्या गावांना या योजनेंतर्गत जोडण्याचा निर्णय घेतला. आज देशात साडेपाच लक्ष किमी रस्ते या योजने अंतर्गत बनले आहे.  

राष्ट्रीय राजमार्ग देशातील सर्व मोठ्या शहरांना जोडतात. या महामार्गांवर जर माल घेऊन जाणारे ट्रक मुंगीच्या गतीने धावत असेल तर, ग्रामीण भागातून उत्पाद मोठ्या शहरांत वेळेवर पोचविणे अशक्यच. अश्या परिस्थितीत शहर सोडून ग्रामीण भागात उद्योग कोण लावणार. हि बाब लक्षात घेऊन स्वर्णिम चतुर्भुज योजनेचा शुभारंभ केला. यात ५८४६ राष्ट्रीय महामार्ग २ लेन जागी ४ आणि ६ लेन करण्याचा निर्णय घेतला होता.  योजना २००६ पर्यंत पूर्ण व्हायला पाहिजे होती. पण २०१२ पूर्ण झाली.  या रस्त्यांमुळे गाव आणि शहरांची दुरी कमी झाली. ग्रामीण भागात विकासाला प्रारंभ झाला. 

अटलजींनी २००३ मध्ये सागरमाला प्रकल्पाचा विचार सादर केला होता. पण   प्रत्यक्षात २०१५ मध्ये या योजनेवर कार्य सुरु झाले. २१ बंदरांना रेल्वेशी जोडणे. ७५०० किमी सागरमार्ग विकसित करणे, १४००० किमी नदीमार्ग विकसित करणे. या योजनेवर ४ लाख कोटी खर्च होणार. पण वेळ आणि वाहतूक खर्च वाचण्याने लाखो कोटींचा फायदा होणार. 

ग्रामीण भागात शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढावी म्हणून १९९९ मध्ये  नदी जोड प्रकल्प साकारण्यासाठी प्रयत्नसुरु झाले पण  दुर्भाग्यवश नवी सरकार येताच तो थंड्या बस्त्यात गेला. या घटकेला काही प्रकल्पांवर पुन्हा कार्य सुरु झाले आहे. असो. 

अटलजींनची प्रेरणा घेऊनच, विद्यमान प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी अटलजींचे स्वप्न पुढे नेले. भारतमाला प्रकल्पात ८६०००  किमी रस्ते ४ पदरी आणि ६ पदरी होणार आहेत. त्यातले ३४००० किमी २०२२ पर्यंत पूर्ण होतील.  रखडलेल्या डीएफसी हि वर वेगाने कार्य सुरु आहे. रेल्वेच्या पुनर्विकासासाठी ३ लाखाहून जास्त वित्तीय मदत दिल्या गेली. अनेक नवीन रेल्वे मार्ग बांधणे सुरु झाले.  गेल्या ४ वर्षांत वीज उत्पादन वाढवून खेड्या-पाड्यात वीज पोहचवून  ग्रामीण विकासाला चालना दिली.  ग्रामस्थांना बँक खाते मिळाले, स्वस्तात सुरक्षा विमा मिळाला. आता स्वास्थ्य विमा हि मिळणार. हे सर्व  खर्या अर्थाने सबका साथ सबका विकास आहे. 

ग्रामीण भागातील रस्ते, रुंद महामार्ग, जलमार्ग आणि विकसित बंदरे, देशातील सदूर भागातील ग्रामीण हि जगाशी जोडले जातील.  ग्रामीण भागात शेतमालावर आधारित उद्योग मोठ्या-प्रमाणात स्थापित होतील. तेथून पलायन थांबेल. महानगरांवरचा भार कमी होणार. काही वर्षांतच शेतातच तोडून स्वच्छ केली भाजी सरळ स्वैपाकघरात पोहचेल तेंव्हा या युगदृष्ट्या महापुरुषाचे स्मरण करायला विसरू नका. असो. 

Thursday, August 16, 2018

क्षणिका : घर



मातीच्या भिंतीत 
जन्माची शिक्षा
घर नावाच्या 
बंदीशाळेत.