सदा देवकाजी झिजे देह ज्याचा ।
सदा रामनामें वदे नित्य वाचा ।
स्वधर्मेंचि चाले सदा उत्तमाचा ।
जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ (म.श्लोक 48)
समर्थ रामदासांनी या श्लोकात खऱ्या भक्ताचे चित्र उभे केले
आहे. समर्थ म्हणतात, ज्याचे
शरीर नेहमी देवाच्या कार्यासाठी झिजते, ज्याची वाणी नेहमी
रामनाम घेते आणि जो नेहमी स्वधर्माने वागतो, तो या जगात धन्य
होय. असा माणूस सर्वोत्तम परमेश्वराचा दास आहे. येथे "दास" हा शब्द
लाचारी दाखवत नाही. तो समर्पणाचे आणि जबाबदारीचे प्रतीक आहे. ज्याने स्वतःचे जीवन
देवाच्या कार्याला वाहिले, त्याला समर्थ "धन्य"
म्हणतात.
या श्लोकातील पहिला महत्त्वाचा शब्द "देवकाजी"
हा आहे. देवाचे कार्य म्हणजे फक्त मंदिरात जाणे, पूजा करणे किंवा उपवास करणे नव्हे. समर्थांच्या दृष्टीने
देवाचे कार्य दोन प्रकारचे आहे. पहिले म्हणजे मनाची सेवा. यात मन शुद्ध ठेवणे,
अहंकार, काम, क्रोध आणि
लोभ यांवर विजय मिळवणे आणि नामस्मरण व भक्ती टिकवणे येते.
दुसरे म्हणजे समाजकार्य, यात अन्यायाचा विरोध करणे, दुष्टांचे दमन करून सज्जनांचे रक्षण करणे आणि दीनदुबळ्यांना
आधार देणे येते. समर्थांनी स्वतः हे दोन्ही केले. त्यांनी रामनामाचा जप केला,
आणि त्याचबरोबर बलोपासना व मठांच्या जाळ्यातून समाजाला जागे केले.
म्हणूनच "देह झिजवणे" म्हणजे केवळ कष्ट करणे नाही. आपला वेळ,
श्रम आणि सामर्थ्य देवाच्या कार्यासाठी लावणे हा त्याचा खरा अर्थ
आहे.
दुसरी ओळ सांगते की अशा भक्ताच्या वाचेत नित्य रामनाम असते.
नाम हे मनाला स्थिर ठेवणारे साधन आहे. कष्ट करताना किंवा समाजात वावरताना नामस्मरण
चालू राहिले, तर मन भरकटत नाही
आणि अहंकार वाढत नाही. त्यामुळे कर्म आणि नाम हे दोन्ही एकत्र चालतात.
तिसरी ओळ "स्वधर्मेंचि चाले" ही
स्वधर्माबद्दल आहे. स्वधर्म म्हणजे जात, पूजापद्धती, रीतिरिवाज किंवा कुळाचार यांचे पालन
करणे नव्हे. त्यांचा अभिमान बाळगणे म्हणजेही धर्म नव्हे. स्वधर्म म्हणजे माणसाने
धारण केलेल्या धर्माचे जे दहा गुण आहेत, ते त्याच्या अंगी
दिसणे आणि त्याच्या वर्तनात उतरणे. मनुस्मृतीत हे गुण सांगितले आहेत: धृती (धैर्य),
क्षमा, दम (मनाचा संयम), अस्तेय (चोरी न करणे), शौच (शुद्धता), इंद्रियनिग्रह, धी (विवेकबुद्धी), विद्या, सत्य आणि अक्रोध. हे गुण ज्याच्या अंगी आहेत,
त्याच्याजवळ स्वधर्म आहे. भगवद्गीतेत भगवंत सांगतात, अद्वेष्टा
सर्वभूतानां मैत्रः करुण एव च,(12/13) जो
कोणाचा द्वेष करत नाही, जो
सर्वांचा मित्र आणि करुणामय आहे, तो देवाला प्रिय आहे. भगवंत पुढे
सांगतात, "श्रेयान्स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात्"(18/47)
म्हणजे, स्वधर्माचे
पालन अपूर्ण राहिले तरी ते परधर्माच्या परिपूर्ण आचरणापेक्षा श्रेष्ठ आहे अर्थात स्वतःच्या कर्तव्याचे पालन करताना काही त्रुटी राहिल्या किंवा पूर्ण
यश मिळाले नाही, तरी स्वतःच्या स्वभावानुसार आणि धर्मानुसार निर्धारित
केलेले कर्म करणाऱ्या मनुष्याला पाप लागत नाही.
स्वधर्म नीट समजण्यासाठी स्वतःचे स्वरूप जाणणे आवश्यक आहे.
आपण केवळ देह नाही. आपण देहात राहणारा आत्मा आहोत. म्हणजे जो परमात्मा माझ्यात आहे, तोच इतरांतही आहे. या ज्ञानानंतर कोणीही
परका उरत नाही. त्यामुळे समस्त जीवांवर प्रेम आणि दया करणे हाच आपला खरा धर्म
ठरतो. या शिवाय समस्त मानवजातीच्या रक्षणासाठी अधर्माचा विरोध करणेही आवश्यक आहे.
धर्माच्या रक्षणासाठी अर्जुनाने शस्त्र उचलले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची
स्थापना केली. सारांश, अन्यायाचा विरोध आणि दुष्टांचे दमन हीदेखील ईश्वराची भक्ती आहे. समर्थांनी
अश्या व्यक्तीसाठी "धन्य" तो दास सर्वोत्तमाचा" म्हंटले आहे.
No comments:
Post a Comment