Tuesday, October 27, 2026

दासबोधातील आचारधर्म आणि त्याचे महत्त्व



 
आचारभ्रष्ट होऊं नये । दिल्यां द्रव्य घेऊं नये ।

उणा शब्द येऊं नये । आपणावरी ॥ १४/७ ॥
 
 
श्रीसमर्थ रामदास स्वामी सांगतात की माणसाने आपल्या आचारापासून ढळू नये, कोणी द्रव्य देऊ लागले तरी ते घेऊ नये आणि आपल्यावर कुणालाही दोष देण्याची, बोल लावण्याची संधी येऊ देऊ नये.
 
आचार म्हणजे केवळ बाह्य कर्मकांड नव्हे; तर विचार, उच्चार आणि कृती यांतील सुसंगती होय. सत्य बोलणे, दिलेला शब्द पाळणे, कर्तव्यात कसूर न करणे, पदाचा गैरवापर न करणे आणि नियमांचे पालन करणे हा खरा आचार. जेव्हा माणूस स्वार्थासाठी या मूल्यांना मुरड घालतो, तेव्हा तो आचारभ्रष्ट होतो. भ्रष्ट म्हणजे योग्य मार्गापासून ढळलेला.
 
“दिल्यां द्रव्य घेऊं नये” म्हणजे लाच किंवा अनुचित लाभ स्वीकारू नये. लाच घेतली की माणूस देणाऱ्याचा ऋणी होतो; त्याचे निर्णय निष्पक्ष राहत नाहीत. एकदा घेतलेले पैसे की लोकांना कळून जाते की तुम्ही पैसे घेऊन काम करतात आणि हळूहळू ती सवय बनते. पुढे पकडले जाण्याची भीती, समाजातील अप्रतिष्ठा, नोकरीची हानी, कायदेशीर कारवाई आणि कुटुंबावर येणारी नामुष्की भोगावी लागते. पैशाने मिळालेले सुख क्षणिक असते, पण गेलेली विश्वासार्हता कायमची जाते.
 
‘उणा शब्द’ म्हणजे दोष, निंदा, बदनामी. आपल्या वागण्यामुळे लोकांना बोट दाखवण्याची संधी मिळाली की आपली प्रतिष्ठा ढासळते. याचा दुसरा पैलूही आहे: आपण दुसऱ्याला खोटा, अपमानकारक किंवा निराधार शब्द दिला, तर त्याचा परिणाम त्या व्यक्तीच्या मनावर, नोकरीवर, नात्यांवर आणि प्रतिष्ठेवर होतो; आणि शेवटी तो आपल्यावरच उलटतो. एकदा बोललेला शब्द परत घेता येत नाही.
 
एखादा सरकारी अधिकारी परवानगी देण्यासाठी पैसे घेतो, लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात अडकतो, निलंबित होतो आणि वर्तमानपत्रात त्याचे नाव झळकते. त्याच्या मुलांना शाळेत व समाजात लाज वाटते. ठेकेदाराकडून कमिशन घेऊन निकृष्ट रस्ता किंवा पूल मंजूर केला, आणि तो कोसळला, तर जीवितहानी होते व चौकशीत जबाबदारी निश्चित होते. भरती किंवा परीक्षेत पैसे घेऊन गुण वा नोकरी दिली की पात्र उमेदवारावर अन्याय होतो; पेपरफुटी, भरती घोटाळ्यांमुळे संस्थेवरील विश्वास उडतो. सोशल मीडियावर पडताळणी न करता एखाद्याबद्दल अफवा किंवा खोटी पोस्ट टाकली, तर त्या व्यक्तीची बदनामी होते व मानसिक त्रास सहन करावा लागतो. पोस्ट करणाऱ्यावर मानहानीचा खटला किंवा पोलीस कारवाई होते आणि त्याची स्वतःची विश्वासार्हता संपते. कार्यालयात सहकाऱ्याबद्दल खोटी तक्रार करून त्याची बढती अडवली, तर सत्य समोर आल्यावर तक्रारदारालाच सर्वांचा रोष सहन करावा लागतो.
 
समर्थांचा संदेश स्पष्ट आहे: चारित्र्य हेच सर्वात मोठे धन आहे. निर्लोभ राहून, शुद्ध आचार ठेवून आणि बोलण्यात संयम बाळगला, तर माणसाला मान, मनःशांती आणि लोकविश्वास लाभतो. आजच्या स्पर्धेच्या युगात हीच शिकवण व्यक्ती आणि समाज दोघांनाही स्वच्छ व सुरक्षित ठेवू शकते.

No comments:

Post a Comment