वेद हे केवळ पंचमहाभूतांची उपासना करणारे कर्मकांडीय ग्रंथ
नाहीत. ते जड आणि चेतन अशा संपूर्ण सृष्टीविषयी समान भाव ठेवून, माणसाने सांसारिक तसेच आध्यात्मिक प्रगती
साधत राहावी असा गहन संदेश देतात. वेद
म्हणतात, माणसाचे जीवन हे
केवळ श्वास घेण्याचे यंत्र नसून, सतत
प्रगती आणि पुरुषार्थ साध्य करण्याचे एक महान साधन आहे. कितीही विघ्न-संकटे आली
तरी न थकता जीवनपथावर पुढे चालत राहणे म्हणजेच खरे आयुष्य होय. हाच भाव स्पष्ट
करताना अथर्ववेदातील ऋषी म्हणतात,
“आरोहणमाक्रममाणो जीवितो वितूय नाम्।” (अथर्ववेद ५/३०/७)
अर्थात, माणसाने निरंतर
वरच्या दिशेने (उन्नतीच्या मार्गावर) पाऊल टाकत राहिले पाहिजे. जीवन जगताना सर्व
प्रकारच्या अडथळ्यांना आणि आव्हानांना मागे सारून किंवा जिंकून पुढे जाणे म्हणजेच
खरे जीवन आहे.
'आरोहण' या शब्दाचा अर्थ सतत उन्नती करणे,
उंच शिखरांकडे वाटचाल करणे असा होतो. तसेच 'आक्रमण' किंवा पुढे जाणे म्हणजे कोणत्याही थिजवणाऱ्या परिस्थितीत न
थांबता प्रगतीच्या मार्गावर अविरत चालत राहणे. माणसाला कर्म करण्यापासून कधीही
विश्रांती मिळत नाही, कारण कर्म करणे हा मानवी जीवनाचा स्थायीभाव आहे. चालत राहणे म्हणजे जीवन आणि थांबणे किंवा अडकून पडणे
म्हणजे मृत्यूप्राय स्थिती होय.
संस्कृतमध्ये म्हटलेच आहे, "उद्योगिनं पुरुषसिंहमुपैति लक्ष्मीः", अर्थात उद्योगी, पराक्रमी आणि पुरुषार्थी पुरुषाकडेच लक्ष्मी स्वतः चालत
येते. कितीही विघ्न, संकटं आणि कष्ट आले तरी न खचता जीवनपथावर सतत पुढे चालले पाहिजे. नैराश्य,
भीती आणि दुर्बलता यांना आपल्या मनातून पूर्णपणे दूर सारून
अथांग पुरुषार्थ करणे हाच आर्य संस्कृतीचा आणि मानवाचा धर्म आहे. स्वामी रामदेव म्हणतात की कार्यसिद्धीसाठी अखंड आणि
प्रचंड पुरुषार्थ करावाच लागतो.” “ते रोज
सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठतात आणि रात्री उशिरापर्यंत अखंड कार्यरत राहतात.”
अनेकदा असे होते की लोक मोठी स्वप्ने पाहतात आणि काम
करण्याचा संकल्पही करतात. पण प्रत्यक्षात कृती करण्याची वेळ येते तेव्हा काही लोक
काहीही न करता हात हलवत बसतात, तर काही जण थोडे काम करून ते अर्धवट सोडून देतात. याउलट,
खऱ्या जिद्दीची माणसे कितीही मोठी विघ्न आली तरी आपले ध्येय
गाठल्याशिवाय आणि कार्य पूर्ण केल्याशिवाय राहत नाहीत.
उदाहरण, एडिसन यांनी विजेचा दिवा शोधताना तब्बल १०,००० हून अधिक वेळा अपयशाचा सामना केला.
प्रत्येक वेळी प्रयोग अयशस्वी ठरले तरी त्यांनी हार मानली नाही. अनेकांनी त्यांना
वेडा ठरवले, काम सोडण्याचा सल्ला दिला; पण त्यांनी नैराश्याला कधीही वश होऊ दिले नाही. एका मुलाखतीत ते म्हणाले
होते, “मी १०,००० वेळा अपयशी झालो नाही, तर १०,००० अशा गोष्टी शोधल्या आहेत ज्या काम करत नाहीत.” त्यांच्या अखंड पुरुषार्थ, कष्टाची तयारी आणि न थांबणाऱ्या वृत्तीमुळेच जगाला दिव्याचा
प्रकाश मिळाला.
आपल्या कर्माचे फळ मिळवण्याविषयी रामायणात अत्यंत सुंदर श्लोकआहे
"शुभेण पुरुषार्थेन शुभमासादयते फलम्"
अर्थात शुभ आणि निष्ठावान पुरुषार्थामुळेच मानवाला उत्तम
फळाची प्राप्ती होते. म्हणूनच, शेवटच्या श्वासापर्यंत आपला शारीरिक,
आत्मिक,
बौद्धिक,
शैक्षणिक,
आर्थिक,
धार्मिक आणि सामाजिक
विकास आपण आशा, उमेदीने आणि उत्साहाने करत राहिला पाहिजे. सर्वांगीण उत्कर्ष साधणे म्हणजेच खऱ्या अर्थाने
मनुष्यजन्म सार्थकी लावणे होय.
भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे जीवन ही अखंड पुरुषार्थ आणि शुभकर्माचे जिवंत उदाहरण आहे.
रामेश्वरमच्या हलाखीच्या परिस्थितीत वृत्तपत्रे विकून त्यांनी आपला प्रवास सुरू
केला. आर्थिक अडचणी, शैक्षणिक
टंचाई आणि अपयशाचे डोंगर असूनही त्यांनी कधीही हार मानली नाही. देशसेवा, विज्ञान आणि तरुण पिढीच्या घडणुकीसाठी त्यांनी आयुष्य समर्पित केले.
त्यांच्या अविरत प्रयत्नांमुळे ते भारताचे "मिसाइल मॅन" आणि राष्ट्रपती
झाले. त्यांचे जीवन हे स्पष्ट दाखवते की, विषम परिस्थितीतही
सातत्यपूर्ण कर्म आणि शुभ पुरुषार्थ करणाऱ्याला यशाची शिखरे गाठण्यापासून कोणीही
रोखू शकत नाही.
ही उदाहरणे आपल्याला शिकवततत की
जीवनात अपयश किंवा विघ्न येणे म्हणजे प्रवास संपणे नव्हे. जो मनुष्य अथर्ववेदाच्या
या मंत्राप्रमाणे सतत 'आरोहण' करत राहतो, तोच जीवनाच्या वाटेवर यशस्वी होतो. त्यामुळे नैराश्याला
रामराम ठोकून, प्रत्येक
नवीन दिवसाची सुरुवात एका नव्या संकल्पाने आणि उत्साहाने करूया,
जेणेकरून आपला जीवनप्रवास निरंतर प्रगतीपथावर राहील.
No comments:
Post a Comment