Monday, September 21, 2026

अग्निमीळे पुरोहितम् : जीवनाचा रक्षक, ज्ञानाची अखंड ज्योत”



वेद हे फक्त धार्मिक ग्रंथ नाहीत, तर गहन वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या ऋषींची अनुभूत ज्ञानपरंपरा आहेत. त्यांनी सूक्ष्म संशोधन करून हे जाणले की हे जग काय आहे, कसे निर्माण झाले आहे आणि कोणत्या नियमांनी चालते. ऋषींनी केवळ सृष्टीचे रहस्य उघड केले नाही, तर मनुष्याने आपले संपूर्ण जीवन कसे जगावे आणि कोणत्या तत्वांचे रक्षण करून स्वस्थ, सशक्त व सार्थक अस्तित्व साध्य होईल हेही सांगितले.   आपण ऋग्वेदाच्या पहिल्या मंत्राचा विचार करणार आहोत. ऋषी मधुच्छंद यांनी दृष्ट केलेला हा मंत्र असा आहे

  ॐ अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य देवमृत्विजम्। होतारं रत्नधातमम्॥”

हा मंत्र केवळ धार्मिक उच्चार नाही, तर जीवनाचा मूलाधार सांगणारा उद्घोष आहे.

अग्निमीळे’  म्हणजे मी अग्निची स्तुती करतो. ही अग्नि फक्त भौतिक ज्वाला नाही, तर ज्ञानाची ज्योत आहे जी अज्ञानाचा अंधार दूर करते. जशी रात्रभर अंधारात दिवा लावला की मार्ग दिसतो, तशीच ही ज्ञानरूपी अग्नि काम, क्रोध, लोभ, मोह आणि अहंकार यांसारख्या चित्तातील सर्व विकारांना भस्म करून जीवनाला परमसत्याच्या प्रकाशाने उजळवते.”

पुरोहितम् म्हणजे पुराची रक्षा करणारा अर्थात शरीररूपी नगराचा रक्षक. आपले शरीरही कोशिकांनी बनलेले एक नगर आहे. या नगराच्या पुढे उभा राहून रक्षण करणारा तत्व म्हणजे अग्नि. जशी एखाद्या किल्ल्याच्या दरवाज्यावर पहारेकरी उभा राहतो, तशीच ही अग्नि आपल्या शरीराचे रक्षण करते.

आयुर्वेद सांगते की शरीरात तेरा अग्नि कार्यरत असतात, जठराग्नि, पाच भूताग्नि आणि सात धात्वाग्नि. या अग्नि अन्नाचे रूपांतर करून रस, रक्त, मांस, अस्थि, मज्जा आणि शुक्र यांचे पोषण करतात. जर ही अग्नि नीट काम करत असेल तर शरीर सशक्त राहते; जर ती मंद झाली तर रोग उद्भवतात.

अग्नि शिवाय जीवन अशक्य आहे. जसे वाहनात इंधन असूनही स्पार्क-प्लगची चिंगारी नसल्यास ते चालत नाही, तसेच शरीरात अग्नि नसल्यास कोणतीही क्रिया होत नाही. हृदयाची धडधड, कोशिकांना ऊर्जा मिळणे, विचारांची स्पंदने, हे सर्व अग्निवरच अवलंबून आहे. अग्नि शांत झाली की शरीर मृत घोषित होते.

ऋषींनी अनुभवले की सूर्यरूपी अग्नि आणि शरीरातील प्राणऊर्जा हीच जीवनाची मूळ शक्ती आहे. म्हणूनच त्यांनी ज्ञानपरंपरेची सुरुवात अग्निदेवतेपासून केली. आजही आपल्या गावात स्त्रिया पोळी  करताना पहिला तुकडा चुलीतील अग्निला अर्पण करतात. हेच वैदिक परंपरेचे जिवंत रूप आहे.  अन्न आधी अग्निला, मग आपल्याला.

ऋग्वेदातील ऋषींनी कधीही काल्पनिक गोष्टी सांगितल्या नाहीत, ते महान द्रष्टे आणि वैज्ञानिक होते. त्यांनी प्रत्यक्ष अनुभवातून जाणले की ब्रह्मांडात सूर्याच्या रूपाने, आणि मानव शरीरात प्राणऊर्जा व ऊष्मा यांच्या रूपाने, अग्निच जीवनाचे संचालन करते. अग्नि ही केवळ यज्ञकुंडात जळणारी बाह्य ज्वाला नसून, ती चेतना आणि ऊर्जा आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्या शरीररूपी ‘पुरा’चे रक्षण करत राहते.”सारांश असा की: अग्नि हीच जीवनाची रक्षक आहे. ती शरीराला पोषण देते, मनाला प्रकाश देते आणि आत्म्याला मार्गदर्शन करते. म्हणूनच ऋग्वेद म्हणतो,अग्निमीळे पुरोहितम्”,  मी त्या दिव्य अग्निची स्तुती करतो जी माझ्या जीवनाचा पुरोहित आहे.


।। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ।।

No comments:

Post a Comment