Tuesday, September 15, 2026

दुर्वा : गणेशाच्या चरणी वाहिलेलं अमरत्वाचं वरदान



गणपतीला दुर्वा का वाहावी,  हा प्रश्न आजच्या पिढीच्या मनात नेहमी येतो. याचे उत्तर शोधताना यजुर्वेदातील एक श्लोक सापडला, 

काण्डात्काण्डा प्ररोहन्ती परूष: परूषस्परि।
 
एव नो दुर्वे तनु सहस्रेण शतेन च॥ (यजुर्वेद १३.२०)

अर्थातहे दुर्वे, तू प्रत्येक पेरातून, प्रत्येक गाठीतून शेकडो-हजारो अंकुरांनी चहुबाजूंनी पसर आणि आम्हा प्रजाजनांना समृद्ध कर.

या एका श्लोकातच दुर्वेचे खरे महत्त्व दडलेले आहे. माणूस स्वार्थी असतो, निव्वळ प्रिय आहे म्हणून कुणाला काही वाहत नाही. गणपतीला दुर्वा वाहण्यामागेही काही ठोस कारणे आहेत, ती अशी, 
 
१. औषधीय उपयोग 'दुर्व' या धातूचा अर्थच 'नष्ट करणे'. दुर्वा त्रिदोषनाशक आहे, वात, पित्त व कफ हे तिन्ही दोष संतुलित करते. वैदिक ऋषींपासून आजच्या आयुर्वेदिक व नैसर्गिक उपचार पद्धतींपर्यंत दुर्वेचा औषध म्हणून वापर होत आला आहे.

२. पर्यावरणीय महत्त्व दुर्वा मातीला घट्ट धरून ठेवते, त्यामुळे पर्वत आणि नदीकिनारे ढासळत नाहीत. ती पाणी निर्मळ ठेवते आणि सूर्यप्रकाशात प्राणवायू सोडते. हिरवीगार कुरणे डोळ्यांना शीतलता देतातच, शिवाय पर्यावरणाचा समतोलही राखतात.

३. आर्थिक कारण वैदिक काळात गाय, बैल, घोडे, शेळ्या-मेंढ्या हे मानवी जीवनाचा आधार होते, दूध-तूप, शेती, प्रवास, युद्ध, वस्त्र, मांस या सगळ्यासाठी. हे सर्व पशु दुर्वेवरच पोसले जात. राज्यात दुर्वायुक्त कुरणे भरपूर असतील, तर पशुधन समृद्ध आणि पर्यायाने प्रजाही समृद्ध होई. आजची गोबरधन योजना पशुधनावर आधारित आहे,  प्रदूषणमुक्त वीज निर्मिती सोबत मोठ्या प्रमाणावर  सेंद्रिय खतनिर्मितीही होणार  आणि ग्रामीण विकासाला गती मिळणार.  पण हे सगळं शक्य होणार ते दुर्वेमुळेच, कारण दुर्वेवर पोसलेलं पशुधनच या योजनेचा पाया आहे.

४. अमरत्वाची इच्छा मृत्यूचे भय आणि अमर होण्याची आस माणसाला आदिकाळापासून आहे. तो ती आपल्या संततीतून पूर्ण करू पाहतो. उन्हाळ्यात वाळलेले रान पावसाच्या पहिल्याच सरीत हिरवेगार होते; शेकडो वर्षे सुप्त राहिलेले दुर्वांकुरही क्षणात उगवतात. या अखंड पुनर्जन्माचे प्रतीक असलेली दुर्वा वाहून माणूस स्वतःसाठीही तेच अमरत्व मागतो.

दुर्वा गणपतीलाच का?

गणपती म्हणजे 'गणाचा अध्यक्ष', म्हणजे राजा. राज्यातील कुरणे हिरवीगार व सुरक्षित राहिली, तरच प्रजा समृद्ध राहणार, कारण त्या काळचे संपूर्ण जीवनचक्र गवतावरच अवलंबून होते. म्हणून या कुरणांचे शत्रूंपासून रक्षण करणे ही गणाध्यक्षाची जबाबदारी मानली जाई. देवाला सव्वा रुपया वाहून लाखांची कामना करावी, तसेच शेतकरी-गोपालक उत्पन्नाचा सहावा हिस्सा राजाला अर्पण करत. दुर्वायुक्त कुरणांच्या रक्षणासाठी. त्याच परंपरेचे प्रतीक म्हणजे आजची दुर्वा-अर्पण पूजा.

आजच्या काळात याचा अर्थ:  आजही देशातील बहुतांश शेती बैलांवर अवलंबून आहे; दूध-दही-तूप गाई-म्हशींपासून मिळते; शेळ्या-मेंढ्या मांसासाठी पाळल्या जातात. आणि हे सर्व पशु दुर्वेवरच पोसले जातात. पण अनियंत्रित वापरामुळे कुरणे नष्ट होत आहेत, रान-माळ उजाड होत आहेत. परिणामी पावसाळ्यात डोंगर ढासळतात, नद्या किनारे तोडतात, सुपीक माती वाहून जाते आणि तापमानवाढीलाही हातभार लागतो.

आज गणपतीसारखा राजा नाही; लोकशाहीत ही जबाबदारी आपली सर्वांचीच आहे. यंदा गणपतीला दुर्वा वाहताना, ही हिरवी कुरणे जपण्याची जबाबदारी आपण स्वतः ओळखली, तरच ती खरी गणेशपूजा ठरेल.

मी ज्ञान से जीवन चॅनलची सुरुवात केली आहे. या  चॅनलचा उद्देश्य वेद, उपनिषद आणि भगवद्गीतेतील शाश्वत विचार आधुनिक जीवनाच्या संघर्षात प्रत्येकाला योग्य दिशा देणारे ठरतील. भगवद्गीतेच्या मार्गदर्शनाने मानवी मनातील संभ्रम दूर करून प्रत्येक व्यक्तीला कर्तव्याची आणि कर्माची अचूक जाणीव करून दिली जाईल. अतीताच्या समृद्ध वारशाला वर्तमानकाळाशी जोडून आत्मविश्वासाने भारलेली एक विवेकी, विचारशील आणि सुसंस्कृत पिढी घडवणे हे यामागचे ध्येय आहे. या ज्ञानाच्या प्रकाशझोतातून वैयक्तिक प्रगती साधत राष्ट्रउभारणीच्या आणि समाजहिताच्या कार्यात प्रत्येक नागरिकाचे सकारात्मक योगदान सुनिश्चित केले जाईल. 

चॅनल लिंक  (2) ज्ञान से जीवन - YouTube


No comments:

Post a Comment