Saturday, September 12, 2026

गणपती: प्रजासत्ताकाचा नायक ते अग्रपूजेचा देव

 

गणेशोत्सव अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. घराघरांत लाडक्या बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरू झाली असून, पुढील दहा दिवस आपण सर्वजण अत्यंत भक्तिभावाने गणपतीची पूजा-अर्चा करणार आहोत. पण कोणत्याही शुभकार्याची सुरुवात सर्वप्रथम गणपतीच्याच पूजेने का केली जाते, याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? आजच्या चिकित्सक तरुण पिढीच्या मनात हा प्रश्न स्वाभाविकपणे डोकावतो, आणि या परंपरेमागचा नेमका इतिहास जाणून घेण्याची त्यांची उत्सुकताही रास्तच आहे.

 

ऋग्वेदात गणपतीचा उल्लेख करताना ऋषी म्हणतात,


गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम् ।
ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आ नः शृण्वन्नूतिभिः सीद सादनम् ॥ (ऋ.२/२३/१)
 

अर्थात, "हे ब्रह्मणस्पते, तुम्ही सर्व गणांचे (समूहांचे) नायक आहात, म्हणून आम्ही तुमचे आवाहन करतो. तुम्ही ज्ञानी जनांत श्रेष्ठ द्रष्टे असून तुमची कीर्ती अतुलनीय आहे. आमच्या प्रार्थना ऐकून आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आमच्या यज्ञस्थानी विराजमान व्हा." या ऋचेत ऋषींनी गणाध्यक्ष निवडीची पात्रताच स्पष्ट केली आहे,  तो सर्वांत ज्ञानी, द्रष्टा (कवी) आणि श्रेष्ठ कीर्तीचा असावा.

 


प्राचीन वैदिक काळात भारतात विविध जनसमूह एकत्र येऊन आपापले संघ अथवा 'गणराज्य' चालवत असत. एका विशिष्ट भौगोलिक क्षेत्रातील नागरिक शासन, कायदा आणि सुरक्षेसंबंधी निर्णय घेण्यासाठी प्रजातांत्रिक पद्धतीने एकत्र येत आणि आपापसांत चर्चा करून योग्य नेत्याची 'गणाध्यक्ष' किंवा 'गणपती' म्हणून निवड करत. या गणप्रमुखाच्या संमतीनेच समाजकल्याणाचे महत्त्वाचे निर्णय आणि सामूहिक कार्ये पार पडत.

 

ही संकल्पना आजच्या आधुनिक प्रजासत्ताक व्यवस्थेशी विलक्षण साधर्म्य दाखवते. आजही आपण लोकसभा, विधानसभा किंवा ग्रामपंचायतीसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकप्रतिनिधी निवडतो, आणि त्यांच्या संमतीनेच धोरणे व सामूहिक निर्णय राबवले जातात. लोकशाहीचा हाच गाभा सामूहिक सहमतीने नेतृत्व निवडणे, हजारो वर्षांपूर्वीच्या गणराज्य पद्धतीतही दिसतो. वेळ बदलली, राजेशाही आली-गेली, तरी लोकशाही मूल्यांचे व सामूहिक ऐक्याचे प्रतीक असलेला 'गणपती' गाणाध्यक्ष  जनमानसाच्या हृदयातून कधीच पुसला गेला नाही.



लोकांनी आपल्या या लाडक्या लोकनायकाला ईश्वराचे रूप मानून पूजनीय स्थान दिले. समाजहिताचे प्रत्येक कार्य गणाध्यक्षाच्या अनुमतीने सुरू करण्याची हीच प्राचीन परंपरा पुढे धार्मिक स्वरूपात आपल्या संस्कृतीत रुजली. म्हणूनच आजही कोणत्याही शुभकार्याचा प्रारंभ करताना आपण सर्वप्रथम गणपतीची पूजा करून त्याला अग्रपूजेचा मान देतो,  एका प्राचीन लोकशाही परंपरेचा हा जिवंत वारसा आहे.

मी ज्ञान से जीवन चॅनलची सुरुवात केली आहे. या  चॅनलचा उद्देश्य वेद, उपनिषद आणि भगवद्गीतेतील शाश्वत विचार आधुनिक जीवनाच्या संघर्षात प्रत्येकाला योग्य दिशा देणारे ठरतील. भगवद्गीतेच्या मार्गदर्शनाने मानवी मनातील संभ्रम दूर करून प्रत्येक व्यक्तीला कर्तव्याची आणि कर्माची अचूक जाणीव करून दिली जाईल. अतीताच्या समृद्ध वारशाला वर्तमानकाळाशी जोडून आत्मविश्वासाने भारलेली एक विवेकी, विचारशील आणि सुसंस्कृत पिढी घडवणे हे यामागचे ध्येय आहे. या ज्ञानाच्या प्रकाशझोतातून वैयक्तिक प्रगती साधत राष्ट्रउभारणीच्या आणि समाजहिताच्या कार्यात प्रत्येक नागरिकाचे सकारात्मक योगदान सुनिश्चित केले जाईल. 

चॅनल लिंक  (2) ज्ञान से जीवन - YouTube

 

No comments:

Post a Comment