Wednesday, August 26, 2026

राष्ट्रवैभवाचे द्विसूत्र : शस्त्र आणि शास्त्र

 

 
शस्त्रेण रक्षिते राष्ट्रे शास्त्रचिन्ता प्रवर्तते।
राष्ट्रे शास्त्रविहीने तु शस्त्रं नश्यति न संशयः॥ (महाभारत)
 
महाभारताच्या या श्लोकात 'शस्त्र' (संरक्षण, सैन्य, सामर्थ्य) आणि 'शास्त्र' (ज्ञान, विज्ञान, कला, संस्कृती, विवेक) यांचे महत्त्व आणि त्यांचा परस्परावलंबी संबंध अत्यंत नेमकेपणाने सांगितला आहे. जेव्हा एखादे राष्ट्र शस्त्राच्या बळावर म्हणजेच सक्षम लष्करी शक्ती, अंतर्गत सुव्यवस्था आणि बाह्य सुरक्षेमुळे सुरक्षित असते, तेव्हाच तेथे ज्ञान, विज्ञान, कला, साहित्य आणि विचार यांचा विकास होऊ शकतो. राष्ट्र सुरक्षित नसेल, तर लोकांचे संपूर्ण लक्ष केवळ अस्तित्व टिकविण्याकडे राहते आणि ज्ञान-विज्ञानाची प्रगती खुंटते.
 
परंतु दुसरीकडे, ज्या राष्ट्रात केवळ शस्त्रांचे सामर्थ्य असते आणि 'शास्त्र' म्हणजेच विवेक, नैतिकता, ज्ञान व नियम यांचा अभाव असतो, तेथे तीच शक्ती अखेरीस स्वतःच्याच विनाशाचे कारण बनते. म्हणूनच "शस्त्रेण रक्षिते राष्ट्रे शास्त्रचिन्ता प्रवर्तते" हा श्लोक राष्ट्रनिर्मिती आणि राष्ट्राच्या अस्तित्वाचा मूलभूत सिद्धांत मांडतो. कोणत्याही देशाच्या प्रगतीसाठी सुरक्षा (शस्त्र) आणि विवेकपूर्ण ज्ञान (शास्त्र) या दोन्हींचा समतोल तितकाच आवश्यक असतो.

वैदिक व उपनिषदिक दृष्टिकोन

भारतीय संस्कृतीने अनादी काळापासूनच 'शास्त्र' आणि 'शस्त्र' यांच्यातील समतोलाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. ऋग्वेदात बलाचा गौरव करताना त्याला नेहमी धर्माच्या अधीन ठेवले गेले आहे.  बल हे रक्षणासाठी असावे, विनाशासाठी नव्हे, असा संदेश वेदांमध्ये वारंवार येतो. कठोपनिषदात श्रेय आणि प्रेय यांच्यातील भेद स्पष्ट करताना सांगितले आहे की, क्षणिक मोह किंवा सत्तालालसेपोटी (प्रेय) घेतलेला मार्ग अखेर विनाशाकडे नेतो, तर विवेकाने (श्रेय) घेतलेला मार्गच कल्याणकारी ठरतो.  
 
इतिहासातील सुवर्णकाळ: शस्त्र आणि शास्त्र यांचा समन्वय
 
इतिहास साक्ष देतो की, जेव्हा जेव्हा एखादे राष्ट्र सामर्थ्यवान झाले, तेव्हाच तेथे ज्ञान आणि विज्ञानाची भरभराट झाली. भारताचा गुप्तकाल हा याचाच सुवर्णकाळ मानला जातो. सम्राट चंद्रगुप्त आणि समुद्रगुप्त यांनी प्रथम शस्त्राच्या बळावर विशाल, सुरक्षित आणि स्थिर साम्राज्य उभे केले. त्या सुरक्षित वातावरणातच आर्यभट्ट, वराहमिहिर, कालिदास यांसारख्या महान विभूतींना ज्ञान-विज्ञान, साहित्य आणि संस्कृतीचा अभूतपूर्व विकास घडवून आणता आला.
 
आजची अमेरिका आणि चीन यांनीही हाच मार्ग स्वीकारला. प्रथम त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा आणि लष्करी सामर्थ्य मजबूत केले आणि त्यानंतर आर्थिक, तांत्रिक व वैज्ञानिक महासत्ता म्हणून जगात स्थान निर्माण केले.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतही याच दिशेने वाटचाल करत आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर भारताच्या वाढत्या सामरिक क्षमतेची प्रचिती जगाला अधिक ठळकपणे आली. गेल्या १२ वर्षांत भारताने आर्थिक स्थैर्य आणि सर्वसमावेशक विकासाची उल्लेखनीय वाटचाल केली. सुमारे २५ कोटी नागरिक गरिबी रेषेबाहेर आले, ५५ कोटींहून अधिक जनधन खाती, ५० कोटींपेक्षा अधिक मुद्रा कर्जे आणि जगातील सर्वाधिक डिजिटल व्यवहार करणारी यूपीआय प्रणाली यांमुळे आर्थिक सक्षमीकरणाला नवी दिशा मिळाली. वीज, रेल्वे, महामार्ग आणि डिजिटल पायाभूत सुविधांतील अभूतपूर्व गुंतवणुकीमुळे उद्योग-व्यवसायांना गती मिळाली. याच कालावधीत भारताचे दरडोई राष्ट्रीय उत्पन्न सुमारे ८६ हजारांवरून २.१ लाखांहून अधिक झाले, ज्यातून देशाच्या वाढत्या आर्थिक सामर्थ्याची आणि सर्वसामान्यांच्या जीवनमानातील सुधारणेची स्पष्ट साक्ष मिळते.

शास्त्राच्या रक्षणासाठी शस्त्राची आवश्यकता

नालंदासारखे जगप्रसिद्ध विद्यापीठ हे शास्त्रज्ञानाचे अर्थात ज्ञान-विज्ञानाचे प्रतीक होते.  तेथे हजारो विद्वान, भिक्षू आणि ज्ञान विज्ञानाचे लाखो ग्रंथ होते. परंतु त्या ज्ञान भांडाराचे रक्षण करण्याइतके शस्त्रबळ नसल्याने बख्तियार खिलजीच्या आक्रमणात हे संपूर्ण ज्ञानकेंद्र भस्मसात झाले. मध्य अमेरिकेतील माया संस्कृतीनेही खगोलशास्त्र, गणित आणि स्थापत्यकलेत विलक्षण प्रगती साधली होती, पण  सामरिक सामर्थ्याअभावी ती सभ्यता परकीय आक्रमणे आणि अंतर्गत संघर्षांपुढे टिकू शकली नाही. यावरून स्पष्ट होते की, केवळ शास्त्र असून उपयोग नाही. त्याच्या रक्षणासाठी शस्त्रही तितकेच आवश्यक असते.

 
विवेकहीन शस्त्र प्रयोगाचे परिणाम
 
परंतु इतिहास हेही शिकवतो की, विवेकाशिवाय वापरलेले शस्त्र अखेरीस विनाशालाच आमंत्रण देते. आर्थिक आणि सामरिक शक्तीने प्रबळ झालेल्या जर्मनीने विवेक गमावून अहंकाराच्या भरात संपूर्ण जग जिंकण्याचा प्रयत्न केला. त्यातून दुसरे महायुद्ध घडले, लाखो निरपराध लोकांचे प्राण गेले आणि जर्मनी स्वतःही उद्ध्वस्त झाला. नेपोलियनचा पराभवही त्याच्या अतिरेकी महत्त्वाकांक्षेचा आणि अविवेकी शस्त्रप्रयोगाचाच परिणाम होता.
 
प्राचीन भारतीय इतिहासातही याची उदाहरणे आढळतात. रामायणातील रावण हा अमाप शक्ती, ज्ञान आणि वैभव यांचा स्वामी होता, परंतु अहंकार आणि अविवेकामुळे त्याने आपल्या शस्त्रबळाचा गैरवापर केला आणि अंततः संपूर्ण लंका तसेच स्वतःच्या कुळाचा नाश ओढवून घेतला. महाभारतातील दुर्योधनही याच मार्गाचे उदाहरण आहे. अपार सैन्यबळ आणि साधनसंपत्ती असूनही नीती व विवेकाचा त्याग केल्यामुळे कौरव कुळाचा समूळ विनाश झाला.
 
आजच्या जागतिक परिस्थितीत गाझा पट्टीतील संघर्ष हे याचे जिवंत उदाहरण आहे. अतिरेकी विचारसरणीने परिणामांचा कोणताही विवेक न ठेवता स्वतःपेक्षा अनेक पटींनी शक्तिशाली राष्ट्रावर आत्मघातकी हल्ला केला. योग्य शिक्षण, नैतिकता आणि दूरदृष्टी असती, तर असा निर्णय घेतला गेला नसता. या अविवेकी शस्त्रप्रयोगाचा परिणाम म्हणून आज गाझा मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त झाला असून हजारो निरपराध नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. हे सर्व प्रसंग स्पष्टपणे सिद्ध करतात की, 'शास्त्राच्या' (विवेकाच्या) मार्गदर्शनाशिवाय 'शस्त्राच्या' बळावर उभी राहिलेली शक्ती शेवटी स्वतःचाच विनाश करते.
 
 
याच तत्त्वाचा पुनरुच्चार श्रीमद्भगवद्गीतेच्या अखेरच्या श्लोकातही आढळतो:
 
यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः।
तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम॥
 
येथे श्रीकृष्ण हे ज्ञान, नीती, विवेक आणि शास्त्र यांचे प्रतीक आहेत; तर धनुर्धारी अर्जुन हा शौर्य, सामर्थ्य आणि शस्त्राचे प्रतीक आहे. जिथे या दोघांचा समन्वय असतो, तिथेच विजय, समृद्धी, सुशासन आणि शाश्वत विकास नांदतो.
 
निष्कर्ष

महाभारतापासून गीतेपर्यंत आणि गुप्तकालापासून आजच्या अमेरिका, चीन व भारतापर्यंत, इतिहास एकाच सत्याचा पुनरुच्चार करत आला आहे.  केवळ शस्त्र किंवा केवळ शास्त्र पुरेसे नाही. राष्ट्राच्या शाश्वत वैभवासाठी सामर्थ्य आणि विवेक यांचा समन्वयच आवश्यक आहे. जिथे शस्त्र शास्त्राच्या मार्गदर्शनाखाली चालते, तिथेच खरी सुरक्षा, प्रगती आणि चिरस्थायी विजय शक्य होतो; आणि जिथे शस्त्र विवेकाच्या नियंत्रणाबाहेर जाते, तिथे तेच सामर्थ्य स्वतःच्याच विनाशाचे कारण ठरते.
 

No comments:

Post a Comment