Wednesday, August 12, 2026

पतंगबाजी : दिल्लीच्या आकाशातील थरार



निरभ्र आकाश, थंडगार झुळझुळ वाहणारा वारा- पतंग उडवण्यासाठी आणखी काय हवे? देशातील इतर भागांप्रमाणे महाराष्ट्रातही मकरसंक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याची परंपरा आहे.

पण आम्हा दिल्लीकरांचे सगळेच काहीसे वेगळे असते. इथे उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि पावसाळाच म्हणजे पतंगबाजीचा हंगाम. या काळात बहुतांश वेळा आकाश ढगांनी भरलेले असते. कधीही अचानक पाऊस सुरू होतो आणि पतंगाबरोबरच मांजाही खराब होतो. तर कधी अचानक सुसाट वारे वाहू लागतात. अशा वेळी उस्ताद पतंगबाजांच्या मोठमोठ्या पतंगाही आकाशात तग धरू शकत नाहीत; त्या निष्प्राण होऊन जमिनीवर कोसळतात.

कधी-कधी वातावरण पूर्णपणे घुम्म असते- नाममात्रही वारा नसतो. अशा वेळी छोट्या-मोठ्या कोणत्याही पतंगाला आकाशात उड्डाण करणे जवळजवळ अशक्य असते. अशा पावसाळी मौसमात फक्त खरे उस्ताद पतंगबाजच टिकून राहतात. इथे पतंग फक्त उडवण्यासाठी नव्हे, तर पेच लढवण्यासाठी उडवले जातात. पतंगबाजांचा D-Day म्हणजे १५ ऑगस्ट. त्या दिवशी सकाळपासूनच "आई बो काटा!" ही विजयी आरोळी वातावरणात घुमत असते.

माझे बालपण जुन्या दिल्लीतच गेले. १९८० पूर्वी आम्ही ज्या वाड्यात भाड्याने राहत होतो, तो पूर्वाभिमुख होता. मध्ये मोठे अंगण आणि तिन्ही बाजूंनी बांधकाम. वर प्रशस्त गच्ची होती. पावसाळ्यात वारेही पूर्वेकडूनच वाहत असल्यामुळे आम्हाला भरपूर कटलेल्या पतंगा लुटायला मिळत. त्यामुळे पतंग विकत घेण्याची गरजच पडत नसे. याशिवाय गच्चीच्या मागे काबुली गेटची सरकारी शाळा होती. तिच्या गच्चीवर येणाऱ्या पतंगाही अनेकदा आमच्या नशिबी येत.

काबुली गेटचा उल्लेख निघालाच आहे, तर एक आठवण सांगावीशी वाटते. पूर्वी शाळेच्या जागी मोठे मैदान होते आणि त्याच्या पुढे काबुली दरवाजा उभा होता. पण १८५७ च्या स्वातंत्र्यसमरात इंग्रजांच्या तोफांच्या माऱ्याने तो उद्ध्वस्त झाला. या परिसरात भीषण युद्ध झाले होते. हजारोंच्या संख्येने दोन्ही बाजूंचे सैनिक आणि अधिकारी मारले गेले. काहींच्या मते, आजही अमावस्येच्या घनदाट अंधाऱ्या रात्री घोड्यांच्या टापांचे आवाज आणि सैनिकांचे विव्हळणे ऐकू येते.

आमच्या खोलीची खिडकी शाळेकडेच होती. आम्हाला मात्र असे काहीच कधी ऐकू आले नाही. हिवाळ्याच्या रात्री शाळेची इमारत माकडांच्या मुक्कामाची जागा असायची. त्यांच्या धिंगाण्यामुळे, तोडफोडीमुळे आणि दंगा-मस्तीमुळे लोकांना असे भास होत असावेत. असो.

मोठे पतंगबाज शर्त लावूनच पेच लढवतात. साधारणपणे ७०–८० गज उंचीवर पतंग गेल्यावरच पेच लागतो. अशी कटून आलेली पतंग लुटायला मिळाली की किमान १०० गज मांजा मुफ्त मिळायचा. आमच्यासारख्या मुलांसाठी तो पूर्ण हंगाम पुरायचा. हा मांजा इतका मजबूत असायचा की बोटे कापणे नित्याचेच. तरीही दररोज संध्याकाळी आम्ही आकाशाकडे नजर लावून बसायचो, कुठे एखादी कटलेली पतंग तरंगत येताना दिसते का, याची वाट पाहत.

दिल्लीत पतंग उडवणे म्हणजे खरोखर जिगरीचे काम. सर्वप्रथम पतंगाचे कन्ने बांधावे लागतात. त्यानंतर कन्न्याला मांजा बांधताना एक गाठ मारावी लागते आणि तीच पतंगाची सर्वांत कमजोर कडी असते. दिल्लीत घरे जवळजवळ असल्यामुळे एकाच वेळी आकाशात असंख्य पतंगा उडताना दिसतात.

पतंगबाजांची नजर अगदी बाज पक्ष्यासारखी तीक्ष्ण असते. आकाशात उडणारी एखादी पतंग अचानक खाली झेप घेऊन नुकतीच उडालेल्या पतंगाचे कन्ने कापणार, हे जवळजवळ ठरलेलेच. त्यामुळे संधी साधून, चौफेर नजर टाकत, अवघ्या पाच-दहा सेकंदांत स्वतःची पतंग ४०–५० गज उंच नेणे आवश्यक असते. एकदा पतंग ५०–६० गज उंच गेली की मग फारशी चिंता राहत नाही.

पेच लढवताना मी एकच नियम पाळायचो, समोरच्याला पेचासाठी लालच द्यायची, पण स्वतः त्याच्या जाळ्यात अडकायचे नाही. पेच लागताना ज्या दिशेने वारा वाहत असे, त्या दिशेच्या मध्यभागी स्वतःची पतंग ठेवायची. त्यामुळे स्वतःचा मांजा थोडा कमजोर असला तरी ९० टक्के वेळा समोरच्याची पतंग कापण्यात यश मिळायचे.

याउलट, जर पतंग वार्‍याच्या योग्य दिशेला नसेल, तर ती ९० टक्के वेळा कापली जाणे निश्चित. अर्थात, प्रत्येक वेळी हे गणित जुळतेच असे नाही. समोरच्याचा मांजा अधिक मजबूत असेल किंवा त्याची पतंग मोठी असेल, तर त्याचाच वरचष्मा राहतो.

दिल्लीचे पतंगबाज देशभर प्रसिद्ध आहेत. मात्र गुजरातचे पतंगबाजही काही कमी नाहीत. दिल्लीकरांना तोडीस तोड टक्कर देण्याचे सामर्थ्य त्यांच्यात आहे. संक्रांतीच्या दिवशी तिथेही दिल्लीप्रमाणेच रंगतदार पेच लढवले जातात.
पण आपले मुंबईकर मात्र पतंगबाजीत काहीसे फिसड्डीच. गज्जूभाई सहज त्यांच्या पतंगा कापतात.

एकदा एक नवखा पतंगबाज गुजरातमधील एका उस्तादाकडून पतंगबाजीचे धडे घेऊन मुंबईत आला. त्याने इथल्या भल्या-भल्या पतंगबाजांच्या पतंगा सहज कापल्या. आता मुंबईच्या आकाशात त्याच्याच पतंगाचे जणू एकछत्री राज्य आहे. असो.

No comments:

Post a Comment