Friday, May 22, 2026

धन्य तो दास सर्वोत्तमाचा : समर्थांच्या दृष्टीने खरा रामभक्त”

 

मनीं लोचनीं श्रीहरी तोचि पाहे।
जनीं जाणतां मुक्त होऊनि राहे॥
गुणीं प्रीति राखे क्रमू साधनाचा।
जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥ (मनाचे श्लोक ४७)
 
समर्थ रामदास स्वामी सांगतात की, ज्याच्या मनात आणि डोळ्यांत (अंतर्बाह्य)
सर्वत्र
श्रीहरी (श्रीराम) भरलेला असतो, त्यालाच तो सर्वत्र दिसतो. अंतर्बाह्य रामरूपाने भरलेल्या अशा व्यक्तीला ज्ञानीही म्हणता येईल आणि भक्तही म्हणता येईल. त्यालाजाणता भक्तम्हणणे अधिक योग्य ठरते. त्याच्या ठिकाणी ज्ञान आणि भक्ती एकरूप झालेली असते. तो पूर्ण ज्ञानी असूनही सगुण भक्तीचे प्रेम आणि साधनाचा क्रम दोन्ही राखून असतो. असा मनुष्य जगात धन्य आहे आणि तो श्रीरामाचा सर्वोत्तम दास होय.


समर्थ स्वतःला श्रीरामाचेदासम्हणवत असत. पण खरा दासजाणताकसा असावा, हा प्रश्न समोर येतो. केवळ रामनाम जपणे, माळ फिरवणे, देवळात जाणे किंवा व्रत-उपवास करणे याने कोणीश्रीरामाचा दासहोत नाही. उदाहरणार्थ, एखादा व्यक्ती सकाळी उठून रामनाम घेतो, सतत नामजप करतो, देवळात जातो आणि रामनवमीचा व्रत-भंडारा करतो, तरीही तो खरा भक्त ठरत नाही. कारण केवळ ध्यान किंवा पूजा-आराधना म्हणजे भक्ती नव्हे.

समर्थ स्पष्ट सांगतात; गुणीं प्रीति राखे क्रमू साधनाचा. जाणता भक्त केवळ पूजा-अर्चना करून थांबत नाही, तर प्रभू श्रीरामचंद्राने दाखविलेल्या मार्गावर चालतो. त्यांचे मनसा, वाचा, कर्मणा अनुकरण करतो. समर्थ रामदास स्वतः श्रीरामाने दाखविलेल्या मार्गावर संपूर्ण आयुष्यभर चालले आणि मनाचे श्लोकांच्या माध्यमातून तोच मार्ग आपल्या शिष्यांना दाखविला. आता प्रभू श्रीराम कसे होते? समर्थ सांगतात:-

नसे अंतरी काम नानाविकारी
उदासीन जो तापसी ब्रह्मचारी
निवाला मनीं लेश नाही तमाचा
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा (मनाचे श्लोक ५०)

ज्याच्या मनात कामवासना किंवा कोणतेही विकार नाहीत, जो संसारात उदासीन (विरक्त), तपस्वी आणि ब्रह्मचारी आहे, ज्याच्या मनात कोणत्याही विकाराला थारा नाही, तो जगात धन्य आहे आणि तो श्रीरामाचा सर्वोत्तम दास होय.

श्रीराम सर्व प्रकारच्या कामवासनांपासून मुक्त होते. ते परस्त्रीला मातेप्रमाणे मानणारे, सदा प्रिय आणि मधुर बोलणारे होते. ‘सदा सर्वदा सत्यवादी, विवेकी, बोले कदा मिथ्या वाचाअसे ते त्रिवाचा सत्यवादी होते. त्यांच्या नम्र आणि रुचकर वाणीने त्यांनी परशुरामांचा क्रोध शांत केला होता. माता-पिताच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी आनंदाने वनवास स्वीकारला. तारुण्यात दृढ निश्चयाने अरण्यवास पत्करला.

श्रीरामांच्या काळात गंगेच्या दक्षिणेकडून समुद्रापर्यंत रावणाचे राक्षसी राज्य होते. खेड्या-गावात आणि अरण्यात राहणारे दीन-दुबळे लोक शोषण आणि अत्याचार सहन करत होते. ऋषी-मुनींचे आश्रम नष्ट करणे, स्त्रियांचे अपहरण आणि बलात्कार हे रोजचे प्रकार होते. दंडकारण्यात आल्यावर श्रीरामांनी ही परिस्थिती पाहिली आणि सगुणांची सेवा हीच ईश्वरी सेवा मानून दीन-दुबळ्यांच्या दुःख निवारणाचा बीडा उचलला. शबरीचे उष्टे बोर खाऊन त्यांनी वनवासी समाजाला आपले मानले. सुग्रीवाला बंधू मानले. राक्षसांचा संहार करून वनवासी जनतेला मुक्त केले. शेवटी रावणाचा वध करून बिभीषणाला धर्मानुसार राज्य करण्यासाठी लंकेचे राज्य सोपविले. यात त्यांची कोणतीही स्वार्थबुद्धी नव्हती.

श्रीरामाचे चरित्र सांगते की, खरा रामभक्त हा केवळ रामनाम जपणारा किंवा मंदिरात पूजा करणारा नसतो, तर तो श्रीरामाच्या चरित्राचे अनुकरण करणारा असतो. त्याचे मन काम-विकारांपासून मुक्त, ब्रह्मचर्य आणि तपस्वी वृत्तीचे असते. तो अंतर्बाह्य श्रीराममय असतो. तो सत्यवादी, नम्र, मधुरभाषी आणि दृढनिश्चयी असतो. दीन-दुबळ्या, वनवासी आणि शोषितांच्या दुःख निवारणासाठी तो सतत कार्यरत राहतो. स्वार्थ सोडून सगुणांची सेवा करणे हेच त्याचे साधन असते. अशा जाणत्या भक्ताचेच जीवन धन्य ठरते आणि तो श्रीरामाचा सर्वोत्तम दास बनतो.

समर्थांच्या काळात महाराष्ट्रातही मोगल आणि आदिलशाही अत्याचारामुळे प्रजा त्रस्त होती. लोकांना आपल्या धर्मानुसार वागणे कठीण झाले होते. रामभक्तीमध्ये रंगलेल्या समर्थांनी महाराष्ट्रात रामराज्याचे स्वप्न पाहिले. त्यांनी हनुमानाला आपला आदर्श मानला. तुलसीदासांनी हनुमानाचे वर्णन केले आहे:-
 
बिद्यावान गुनी अति चातुर।
राम काज करिबे को आतुर॥
भीम रूप धरि असुर संहारे।
रामचंद्र के काज संवारे॥
 
हनुमंत खरे रामभक्त होते. समर्थांनी हंनुमंतपासून प्रेरणा घेतली. समर्थ लहानपणीच संन्यास घेऊन १२ वर्षे तप केले. शास्त्रांचा गहन अभ्यास केला आणि रोज १००८ सूर्यनमस्कार करून शरीर बलवान केले. ते मृदुभाषी, बोलण्यासारखे चालणारे आणि लोकांना ओळखून योग्य काम करवून घेण्यात चतुर होते. त्यांनी जाती-पातीचा भेद करता हजारो शिष्य घडविले. स्त्रियांनाही मठांचे दायित्व दिले. त्यांच्या मठांमध्ये कोणताही भेदभाव नव्हता. युद्धात जखमी मुस्लिम सैनिकालाही आश्रय मिळे. समर्थांच्या प्रयत्नांमुळे प्रजा गुणसंपन्न आणि बलवान झाली, ज्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेस मदत झाली. समर्थांनी आपल्या बोलण्यातून आणि वागण्यातून दाखवून दिले की, खरा रामदास कसा असावा. गुलामीच्या अंधारात खितपत पडलेल्या जनतेला त्यांनी स्वराज्याचा सूर्य दाखविला.
 
छत्रपती शिवाजी महाराजांनी बालपणीच स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि माता जिजाऊंच्या प्रेरणेने दीन-दुबळ्या रयतेच्या रक्षणासाठी सतत लढा दिला. त्यांनी जाती-पातीचा भेद करता सर्वांना सोबत घेतले. श्रीरामांनी रावणासारख्या राक्षसी शक्तीचा संहार करून धर्माची स्थापना केली, तसेच शिवरायांनीही मोगलांच्या अन्यायाविरुद्ध युद्ध करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. समर्थ रामदास स्वामींनी पाहिलेले स्वप्न- स्वप्नी जे देखिले रात्री ते ते तैसेची होतसे, बुडाला औरंग्या पापी, म्लेंच्छसंहार झाला-  हे शिवरायांनी प्रत्यक्षात पूर्ण केले. शिवाजी महाराज अत्यंत नम्र, धर्मनिष्ठ, दृढनिश्चयी आणि स्वार्थरहित होते. त्यांनी राज्य समर्थ रामदास स्वामींच्या चरणी अर्पण केले आणि स्वतःला केवळरामदासाचा दासम्हणवले. त्यांचा गेरुआ ध्वज हा रामभक्ती आणि संन्यासी वृत्तीचे प्रतीक होता.

समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज हे दोघेही खरे प्रभू श्रीरामांचे दास होते. श्रीरामाने दाखविलेल्या मार्गावर  म्हणजे धर्मरक्षण, दीनोद्धार, अन्यायाविरुद्ध लढा आणि स्वार्थत्याग- यावर  चालत त्यांनी रामराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचा पूर्ण प्रयत्न केला. समर्थांनी या मार्गाचे ज्ञान आणि प्रेरणा दिली, तर शिवरायांनी त्याचे कृतीत रूपांतर करून महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. दोघांनीही मनसा, वाचा आणि कर्माने श्रीरामाच्या आदर्शाचे अनुकरण केले आणि खऱ्याजाणत्या रामभक्ताचे उदाहरण घालून दिले.

No comments:

Post a Comment