श्री सार्थ दासबोधात समर्थ म्हणतात,
"स्वयें आत्महत्या करणे, तो तमोगुण." (२.६.१०)
तम म्हणजे अंधार. अंधार हा निराशेचा आणि मृत्यूचा प्रतीक आहे. जेव्हा जगणे असंभव वाटते, तेव्हा निराश झालेला व्यक्ती आत्महत्येचा मार्ग निवडतो. भारतात दरवर्षी सुमारे पावणे दोन लाख लोक आत्महत्या करतात. त्यापैकी ८० टक्के साक्षर असतात. १५ ते ४० वयोगटात सर्वाधिक आत्महत्या होतात.
आत्महत्येची प्रमुख कारणे म्हणजे प्रपंचात अयशस्वी होणे, घरातील कटकटी, शिक्षणातील अपयश, प्रेमभंग, बेरोजगारी, अहंकाराला ठेस लागणे इत्यादी. आत्महत्येला प्रवृत करणारे तमोगुण - काम, क्रोध, निद्रा, आळस, अवास्तव अहंकार, मनात येईल तसे वागणे, "माझ्या हिशोबाने जगाने चालले पाहिजे" ही अपेक्षा, आणि दिवस-रात्र नकारात्मक विचार करत राहणे. या तमोगुणांच्या आहारी जाऊन माणूस भ्रमिष्ट होतो. आजच्या भाषेत सांगायचं तर तो डिप्रेशनमध्ये जातो आणि आत्महत्या करतो.
सोशल मीडिया आणि दृश्य माध्यमांमध्ये अपराध व आत्महत्येचे महिमामंडन किंवा त्यावर अनावश्यक चर्चा ही तरुणांच्या मनातील नकारात्मक विचारांना उत्तेजन देते. शैक्षणिक संस्थांमध्ये पसरलेली नकारात्मक विचारधारा हेही एक कारण आहे. तरुणांना वाटू लागते की आजच्या सामाजिक व्यवस्थेत त्यांच्यासारख्या तरुणांचे शोषण होत आहे. या काल्पनिक अन्यायाविरुद्ध लढण्याची शक्ती त्यांच्यात नसते, म्हणून त्यांना मरण अधिक सोयीचे वाटते. अशा नकारात्मक विचारधारेच्या आहारी जाऊन रोहित वेमुला यांसारखे शिक्षित तरुणही आत्महत्या करतात.
काही लोक दुसऱ्यांवर दोष टाकून आत्महत्या करतात. जीवंत असताना विरोधकाचे काहीही करू शकत नाहीत, पण कागदावर आत्महत्येसाठी त्याला दोष देऊन आत्महत्या करतात. “मी मरणार, पण दुसऱ्यालाही शांततेने जगू देणार नाही”- ही वृत्ती तमोगुणाचे निकृष्टतम उदाहरण आहे. आपला कायदा अशा लोकांची साथ देतो, त्यामुळे दुसऱ्यांना दोष देऊन आत्महत्या करण्याची प्रवृत्ती वाढत चालली आहे. आज हजारो आत्महत्या करणारे दुसऱ्यांना दोष देऊन आत्महत्या करतात. अश्या आत्महत्या रोखण्यासाठी कायद्यात बदल करणे पण आवश्यक आहे.
लाखो योनीतून भटकून नंतर मनुष्य जन्म मिळतो. मानव जीवनाचे सार्थक करण्याऐवजी आत्महत्या करून संपविणे निश्चितच उचित नाही. तमोगुणापासून मुक्त होण्यासाठी सात्त्विक विचारांचा अभ्यास, कर्मयोगी वृत्ती, आणि सकारात्मक संगत आवश्यक आहे. नियमित ध्यान, शारीरिक श्रम, आणि विवेकपूर्ण आचरणाने मन शुद्ध होते. त्यागसहित उपभोग आणि प्रामाणिक पुरुषार्थ यांचा अवलंब केल्यास माणूस अंधारातून प्रकाशाकडे जाऊन जीवन सार्थक करू शकतो.
No comments:
Post a Comment