Saturday, February 28, 2026

मन अधोमुख की उपराटी? सुखाचा आणि मुक्तीचा मार्ग

 
समर्थांनी वेद, उपनिषद आणि भगवद्गीतेचे गहन अध्ययन केले होते. या सर्व प्राचीन ग्रंथांचा सार समर्थांनी मनाचे श्लोक आणि दासबोध यांच्या माध्यमातून मराठीत सोप्या भाषेत लोकांसमोर मांडला. समर्थांनी धर्म आणि सत्यमार्गावर चालून ऐश्वर्यशाली जीवन जगण्याचा तसेच आध्यात्मिक उन्नती आणि मोक्षाचा मार्ग लोकांना दाखविला.
 
कबीरदास म्हणतात,मन तो रे उड़त पंछी जितना, उड़ि उड़ि जावै आकाश।मन हे उडणाऱ्या पक्ष्यासारखे आहे. जसे पक्षी आकाशात उंच उडत राहतो, तसे मनही सतत इकडून तिकडे भटकत राहते. ते कधी भूतकाळात जाते, कधी भविष्याची चिंता करते, तर कधी विषयसुखांच्या मागे धावते. या भटकणाऱ्या मनाला आवरणे अत्यंत आवश्यक आहे.
 
कठोपनिषदात सांगितले आहे की आत्मा हा रथाचा मालक आहे आणि शरीर हा रथ आहे. बुद्धी सारथी आहे, मन हे लगाम आहे आणि इंद्रिये घोडे आहेत. ज्याने हे सर्व नीट सांभाळले, तोच जीवनाचा खरा आनंद घेणारा आहे. आपण असे म्हणू शकतो की जसे एखादा रथ चालवण्यासाठी सारथी, लगाम आणि घोडे यांचे योग्य नियंत्रण आवश्यक असते, तसेच जीवनात आत्मा, बुद्धी, मन आणि इंद्रिये यांचे संतुलन राखणे गरजेचे आहे. ज्याने हे संतुलन साधले, तोच खऱ्या अर्थाने सुखी आणि यशस्वी ठरतो.
भगवद्गीतेत भगवान अर्जुनाला संबोधित करताना म्हणतात,
 
असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम्
अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण गृह्यते (अध्याय , श्लोक ३५)
 
हे महाबाहो अर्जुना, मन चंचल आणि आवरण्यास कठीण आहे, हे खरे आहे; पण अभ्यास आणि वैराग्य यांच्या साहाय्याने ते नियंत्रित करता येते. इथे अभ्यास म्हणजे निरंतर नियमित प्रयत्न आणि विषयांपासून अंतर ठेवण्याची वृत्ती म्हणजे वैराग्य. ज्या व्यक्तीला दोन्ही गोष्टी साध्य झाल्या, त्याला मनावर नियंत्रण मिळवता येते. संसारात आणि आध्यात्मिक क्षेत्रांत सफल होण्यासाठी मनावर नियंत्रण करणे आवश्यक आहे.
मनावर नियंत्रण कसे करावे हे सांगण्यासाठीच समर्थांनी मनाचे श्लोक रचले. समर्थ म्हणतात:
 
मन अधोमुख उपराटी केले पाहिजे। तरीच समाधान पाविजे।
नाही तरी मनाची गती। कधी रिघे हाती
(दासबोधदशक २०, समास , ओवी १९)
 
मन स्वभावतः अधोमुख असते, म्हणजेच मन विषय, वासना, लोभ, अहंकार आणि इंद्रियसुखांच्या शोधात भटकत राहते. अशा मनाला योग्य मार्गावर आणायचे असेल तर त्याची उपराटी करणे अत्यावश्यक आहे. उपराटी म्हणजे मनाच्या अधःप्रवृत्तीला थांबवून तिला विवेक, वैराग्य आणि आत्मचिंतनाकडे वळवले पाहिजे. समर्थ स्पष्ट करतात की मनाला मोकळे सोडले तर ते आपल्या हाती राहत नाही; ते सतत नवीन-नवीन इच्छांकडे धाव घेत राहते. अशा व्यक्तीला भौतिक सुख आणि संपत्ती मिळत नाही आणि आध्यात्मिक क्षेत्रांत सफल होण्याचा प्रश्नच येत नाही. असा माणूस फक्त अस्वस्थ, असंतुष्ट आणि दुःखी होतो. म्हणूनच समाधान हवे असेल तर मनावर नियंत्रण आवश्यक आहे. हे नियंत्रण दडपशाहीने नव्हे, तर आत्मजाणीव आणि विवेकाने करावे लागते.  मनाची दिशा बदलणे, हाच  उपराटीचे खरा अर्थ आहे.
 
आजचे उदाहरण घेऊन पाहूया: एखादा विद्यार्थी सतत मोबाईल, सोशल मीडिया किंवा क्षणिक करमणुकीत वेळ घालवत असेल तर समजावे की त्याचे मन अधोमुख झालेले आहे. तो एकाग्र चित्ताने अभ्यास करण्यास असमर्थ ठरतो आणि परीक्षेत नापास होतो. पण एकदा त्याला आपले मन भटकले आहे, ही जाणीव झाली की तो मोबाईल इत्यादींचा नाद सोडून नियमित आणि निरंतर अभ्यास करण्याचा प्रयत्न करू लागतो. काही दिवसांत त्याला ध्यान-वाचनाची सवय सहज लागते आणि परीक्षेत उत्तम गुण मिळविण्याचा प्रयत्न करू लागतो. शेवटी तो उत्तम गुण मिळवून परीक्षेत पास होतो. परीक्षा पास होण्याचे ध्येय पूर्ण झाल्यावर त्याला मानसिक शांती आणि समाधान निश्चित मिळते.
  
उपराटी केल्याशिवाय समाधान मिळत नाही.  उदाहरणार्थ, एखादा माणूस फक्त पैसा, प्रतिष्ठा किंवा भोग यांच्या मागे धावत राहिला, तर कितीही मिळाले तरी त्याचे मन तृप्त होत नाही. पण तोच माणूस विवेकाने गरज आणि लोभ यातील फरक ओळखून मनावर संयम ठेवत असेल, तर अल्पातही समाधान अनुभवतो.
 
सारांश: मन अधोमुख उपराटी केले पाहिजेही ओवी आत्मसंयम, मनोनिग्रह आणि अंतःशांतीचा मूलमंत्र सांगते. जर मन अधोमुख ठेवले, म्हणजे विषयसुख, लोभ आणि वासनांच्या मागे धावू दिले, तर माणूस दुःखी, असंतुष्ट आणि जीवनात असफल ठरतो. पण मनाची उपराटी केली, म्हणजे त्याला विवेक, वैराग्य आणि आत्मचिंतनाकडे वळवले, तर तो सुखी आणि समाधानी होतो. अशा व्यक्तीला संसारातील भौतिक सुखही मिळते आणि मुक्तीच्या मार्गावर चालण्यातही यश मिळते. हा समर्थांचा गूढ पण अत्यंत व्यावहारिक उपदेश आहे.

No comments:

Post a Comment