Saturday, January 10, 2026

विषारी सरोवर : युधिष्ठिराची अखेर

बराच वेळ वाट पाहून अखेर युधिष्ठिर आपल्या भावंडांना शोधायला निघाला. दूर-दूर पसरलेल्या वाळवंटात एकही वृक्ष दिसत नव्हता. सूर्य आग ओकत होता. तहानेने त्याचा गळा कोरडा पडला होता. अखेर त्याला वाळवंटात दूर एक सरोवर दिसले. "आता पाणी मिळेल, तहान भागेल," या आशेने तो त्वरित सरोवराजवळ पोहोचला.
 
पाहतो कायभीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव सरोवराच्या काठावर निष्प्राण पडलेले! हे दृश्य पाहून युधिष्ठिर व्यथित झाला. त्रिलोक विजयी भीम आणि अर्जुनाची अशी अवस्था कुणी केली असावी? बहुतेक सरोवराचा रक्षक यक्ष असावा. त्याची आज्ञा घेता भावंडांनी पाणी प्यायले असावे, म्हणून यक्षाने त्यांना दंडित केले असावे.
 
युधिष्ठिराने यक्षाला पुकारले, “हे यक्षदेव, तुम्ही दयाळू आहात. या वाळवंटात पाण्याचे संरक्षण करून प्रवाशांची तहान भागविण्याचे पुण्यकार्य करत आहात. माझ्या भावंडांकडून चूक झाली, कृपया त्यांना क्षमा करा.”
 
युधिष्ठिराचा पुकारा ऐकून यक्ष प्रकट झाला. युधिष्ठिराने त्याला प्रणाम केला आणि भावंडांच्या प्राणांची भीक मागितली. यक्ष म्हणाला, “युधिष्ठिर, मी कोण क्षमा करणारा? तुझी तहानेने व्याकूळ भावंडे या सरोवरावर आली. त्यांनी पाणी पिण्याची माझी परवानगी मागितली. पण हे पाणी अत्यंत दूषित आणि विषारी आहे, म्हणून मी नकार दिला. त्यांनी माझे ऐकले नाही. पाणी प्राशन केले आणि मृत्यूमुखी पडले.”
युधिष्ठिराने पुन्हा हात जोडून विनंती केली, “हे यक्षदेव, आपण सर्वज्ञ आहात. यावर काही उपाय असेल का? पूर्वी हिमालयात संजीवनी बुटी मिळायची. तीच आणून हनुमानाने लक्ष्मणाचे प्राण वाचवले होते. पण आज हिमालयावर एकही वृक्ष नाही. संजीवनी मिळण्याचा प्रश्नच येत नाही.”
 
क्षणभर थांबून यक्ष म्हणाला, “जीवनाचे अंतिम सत्य काय आहे?”

युधिष्ठिर म्हणाला, “मृत्यू हेच जीवनाचे शेवटचे सत्य आहे.”

यक्ष अट्टहासाने हसत म्हणाला, “युधिष्ठिर, तुला जीवनाचे सत्य माहित आहे, हे चांगलेच. तुझे बंधू जिवंत होऊ शकत नाहीत. इथे दूर-दूर पिण्यालायक पाणीही नाही. तुझ्यासमोर दोनच मार्ग आहेतया सरोवराचे विषारी पाणी पिऊन काही क्षणांत मृत्यू स्वीकार किंवा तहानेने तडफडत मृत्यूला सामोरे जा.”
 
हे सांगून यक्ष अदृश्य झाला.
 
युधिष्ठिर काही वेळ विचारात गढून गेला. “मरण निश्चित आहे, तर भावंडांसोबत मेलेले बरे,” असा विचार करून त्याने विषारी पाणी प्राशन केले. तहान शांत झाली. काही क्षणांत तोही निष्प्राण झाला.
 
पाचही पांडव सरोवराच्या काठावर निष्प्राण पडले होते. महाभारताचा अवेळीच अंत झाला. सत्याचा विजय नव्हताप्रदूषणाचा मानवावर विजय झाला होता
 

No comments:

Post a Comment