Tuesday, December 9, 2025

समर्थ विचार: इंद्रियांचे गुलाम नव्हे, मालक व्हा.


समर्थ रामदास म्हणतात — सृष्टीत अनंत जीव असून त्यांचे चार वर्ग आहेत: बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध. पहिला प्रश्न असा की बद्ध म्हणजे काय? बद्ध म्हणजे बांधलेला जीव. याचे उदाहरण समर्थांनी कुत्र्याच्या मालकाचे दिले आहे. मालकाने कुत्र्याला साखळीने बांधलेले असते, पण प्रत्यक्षात कुत्र्याच्या मोहात अडकून मालकच बद्ध होतो. त्याचप्रमाणे आपली इंद्रिये — नाक, कान, डोळे, स्वाद, स्पर्श, हात, पाय — ही कुत्र्यांसारखी आहेत. आपण जर त्यांच्या मोहात अडलो तर आपणच त्यांचे गुलाम होतो.
 
समर्थांनी आपल्या इंद्रिय रूपी कुत्र्यांना मोह-माया पासून दूर ठेवण्यासाठी बद्ध लक्षणांचे वर्णन केले आहे:

आता बद्ध तो जाणिजे ऐसा
अंधारींचा अंध जैसा.
चक्षुविण दाही दिशा.
शून्याकार.

ज्याच्या डोळ्यांसमोर सर्वत्र अंधार आहे, त्याला सारासार विचार कळत नाही. स्वधर्म, परोपकार, दानपुण्य, भक्ती, ज्ञान, वैराग्य, ध्यान, मोक्ष यांचा त्याला पत्ता नसतो. तो सतत काम, क्रोध, गर्व, मत्सर, असूया यात बुडालेला असतो. जसे एखादा विद्यार्थी मोबाईलवर गेम खेळण्यात इतका गुंततो की अभ्यास विसरतो, तसाच बद्ध जीव इंद्रियांच्या मोहात अडकून जीवनाचा खरा उद्देश विसरतो.
 
समर्थ म्हणतात असा जीव काया, वाचा, मनाने द्रव्याच्या भजनात गुंतलेला असतो. स्वार्थासाठी कपट, भ्रष्टाचार, हिंसा करतो. शेवटी कोर्ट, जेल, आजार यांचा भोग त्याला करावा लागतो. इंद्रिय सुखांचा अति उपभोग घेतल्याने शरीर-मन व्याधींनी ग्रस्त होते.
 
समर्थांनी साडे तीनशे वर्षांपूर्वी सांगितलेली बद्ध लक्षणे आजही दिसतात. आपण घर राहण्यासाठी नव्हे तर एसी, टीव्ही, फ्रिजसाठी सजवतो. अंघोळ सौंदर्यासाठी करतो, जेवण पोषणासाठी नव्हे तर स्वादासाठी करतो. पिझ्झा, बर्गर, चॉकलेट, एसी कार, स्टेटससाठी धडपड करतो. आई-वडील, मुलंही नकोसे वाटतात; कुत्रा पाळून हौस भागवतात.

आज अनेकजण सोशल मीडियावर "लाईक्स" मिळवण्यासाठी धडपडतात. पण शेवटी त्यातून समाधान मिळत नाही, उलट मानसिक ताण वाढतो. हेच बद्ध लक्षण आहे.
 
एकदा जर आपण इंद्रिय रूपी कुत्र्यांचे गुलाम झालो, तर त्याचे परिणाम शरीर आणि मन दोन्हीवर उमटतात. त्वचेचे रोग, अस्थमा, मधुमेह, हृदयविकार, कॅन्सर, लिव्हर-किडनीचे क्षय, डोळ्यांचे अंधत्व यामुळे जीवन खचते, आणि कमावलेला पैसा औषधांच्या ओझ्यात गडप होतो. मन नैराश्य, चिंता, अनिद्रा, व्यसनाधीनता यांत गुरफटते; काही जीव या वेदना सहन न करता आत्महत्येच्या मार्गावर जातात. वृद्धाश्रमात वाढणारी गर्दी ही तुटलेल्या नात्यांची साक्ष देते.
 
अति उपभोगाने पृथ्वीचे पर्यावरण विदीर्ण होते, हवा-पाणी विषारी होते, जंगल नष्ट होतात, ऋतूंचा ताल विस्कटतो. या लोभातून शासनाच्या साम्राज्यवादी प्रवृत्ती उगवतात, संसाधनांवर ताबा मिळवण्यासाठी युद्धे पेटतात, आणि मानवजातीला विनाशकारी परिणामांचा सामना करावा लागतो.

सारांश

बद्ध जीव संसारात अपेशी राहतो आणि परमार्थही साध्य करू शकत नाही. त्याची स्थिती धोबी का कुत्ता ना घर का, ना घाट का” अशी होते. समर्थांनी जवळपास १०० बद्ध लक्षणे सांगून सावध केले आहे. आपण इंद्रियांच्या मोहात न अडकता स्वतःचे मालक व्हावे — कुत्रे नव्हे.
 

No comments:

Post a Comment