मानव ऋषीने दगड घासून अग्नी प्रज्वलित केला. अग्नीला प्रसन्न करण्यासाठी प्रार्थना केली “हे अग्नी, सुख-समृद्धी दे, शत्रूंवर विजय मिळवून दे.” त्याने उच्चारले: “अग्नये स्वाहा. इदं अग्नये इदं न मम.”
तेवढ्यात हवनकुंडातून एक धुरकट अशरीरी आकृती प्रकट झाली. हात जोडून उभी. ती म्हणाली, “मी धूम्राक्ष, अग्निपुत्र. धूर हेच माझं भोजन. मानवाच्या इच्छा पूर्ण करणं, हाच माझा धर्म.”
ऋषीने मधमाश्यांच्या पोळ्याचं मध मागितलं. धूम्राक्षने धूर निर्माण केला, मधमाश्या निघून गेल्या. ऋषीला खोकला आला, पण मधुर मध चाखायला मिळाला. धूम्राक्ष पुन्हा आदेशाच्या प्रतीक्षेत उभा राहिला.
काळ पुढे सरकतो.अर्जुन धूम्राक्षला खांडववन जाळण्याचा आदेश देतो. धूम्राक्ष अग्नीच्या साहाय्याने वनातील जीव जंतु आणि वनस्पतींना गिळतो. जीव कासावीस झाल्यावर काही वनवासी जंगलातून बाहेर येऊन अर्जुनाला शरण येतात.
ते जगातील पहिले विस्थापित झाले. खांडववनाच्या राखेवर इंद्रप्रस्थ उभं राहतं. धूम्राक्षच्या मदतीने
आज मुंबई, नोयडा सारखी शेकडों महानगरे उभी राहिली आहे. माणसाची प्रत्येक इच्छा हा पूर्ण करता-करता, धूम्राक्ष धूर गिळत-गिळत एवढा मोठा झाला आहे, कि आज संपूर्ण पृथ्वी त्याच्या अशरीरी शरीराने झाकल्या गेली आहे.
काल संध्याकाळी मी गच्चीवर उभा होतो. धूम्राक्ष दिसला. मी म्हणालो, “तुझ्यामुळे मला अस्थमा झाला आहे.” तो शांतपणे म्हणाला, “मालक, मी तुमच्या इच्छांमुळे वाढलो आहे. बिना धुराच्या मदती शिवाय गाड्या, इमारती आणि एसी निर्मित होऊ शकत नाही. वातावरणात धूर पसरणार त्याचे फळे ही तुलाच चाखावे लागणार. मी गप्प झालो. खोलीत आलो. AC सुरू केला. पण झोप आली नाही.
शेवटी एक विचार मनात आला. आपण यज्ञात आहुति देताना "इदं न मम" म्हणतो पण प्रत्यक्षात प्रत्येक वस्तु स्वत साठी मागतो. यातूनच धूम्राक्ष जन्म घेतो.
कदाचित मानवाच्या अपरिमित इच्छांची पूर्ती करता करता, एक दिवस धूम्राक्ष मानवालाच गिळून टाकेल.
No comments:
Post a Comment