Tuesday, November 18, 2025

वैदिक साहित्य: ज्ञान प्राप्तीचा उद्देश्य

 
ज्ञान प्राप्ती हे मानवी जीवनातील सर्वोच्च आणि अत्यंत महत्त्वाचे ध्येय आहे, जे प्राचीन वैदिक काळापासून ते आधुनिक युगापर्यंत सांगितले गेले आहे. ज्ञान हे फक्त बौद्धिक माहिती गोळा करणे नव्हे, तर ते जीवनात उतरवून आत्मसाक्षात्कार, संसारिक यश आणि समाजकल्याण साधण्याचे साधन आहे. वैदिक परंपरेत ज्ञान प्राप्तीचा उद्देश अज्ञानाच्या अंधकारातून मुक्त होऊन सत्य, धर्म आणि मोक्षाकडे वाटचाल करणे हा आहे. उदाहरणार्थ, अथर्ववेदातील (..) एक ऋचा- 

ओम उपहूतो वाचस्पतिरुपस्मान्वाचस्पतिराविवशत् 
एषां श्रुतेन गमेमहि मा श्रुतेन वि राधिषी– 

आचार्य बालकृष्ण यांच्या व्याख्यानानुसार, (जशी मला समजली) हा मंत्र गुरु-शिष्य संबंधावर विशेष भर देतो. वेदवाणीचे विद्वान आचार्य शिष्यांनी विनम्रतेने आमंत्रित करावेत, अशी प्रार्थना या ऋचेत आहे. शिष्यांनी गुरूंना प्रेमपूर्वक जवळ बोलावून वेदज्ञान प्रदान करण्याची विनंती केली आहे. वेदज्ञ, म्हणजेच ज्ञानी गुरु, यांच्याकडून प्राप्त ज्ञानाचे सतत चिंतन-मनन करून आम्ही शिष्य ते कृतीत आणण्यासाठी निरंतर अभ्यास करू. अभ्यासात कधीही खंड पडू देणार नाही. गुरु-शिष्य कधीच एकमेकांपासून दूर होऊ नयेत आणि अध्ययन-अध्यापन अखंडपणे चालू राहो, हीच या मंत्रातील प्रार्थना आहे. वैदिक काळात ज्ञानप्राप्तीचा उद्देश केवळ जाणणे नव्हता, तर गुरूच्या सान्निध्यात राहून सतत अभ्यास करणे आणि ते जीवनात उतरवणे हा होता. यामुळे व्यक्ती आणि समाज दोघेही उन्नत होतात

वैदिक काळात ज्ञानप्राप्तीचे दोन प्रकार होते-अपरा विद्या (संसारिक कौशल्ये) आणि परा विद्या (ब्रह्मज्ञान), ज्यांचा उद्देश जीवनात संतुलन, मोक्ष आणि समाजोपयोगिता साधणे हा होता.   

द्वे विद्या वेदितव्ये इति  स्म यद् ब्रह्मविदो वदन्ति परा चैवापरा  तत्रापरा ऋग्वेदो यजुर्वेदः सामवेदोऽथर्ववेदः शिक्षा कल्पो व्याकरणं निरुक्तं छन्दो ज्योतिषमिति  अथ परा यया तदक्षरमधिगम्यते(मुंडक उपनिषद)

अपरा विद्या म्हणजे वेद, व्याकरण, ज्योतिष इत्यादी असून ती लौकिक यशासाठी उपयुक्त आहे, तर परा विद्या आत्मा-ब्रह्माची एकता जाणून मोक्ष प्राप्त करण्यासाठी आहे. छांदोग्य उपनिषदातील “तत् त्वम् असि” हे महावाक्य आत्मा आणि ब्रह्म एकच असल्याचे सांगते, तर ईशावास्य उपनिषदात “विद्या च अविद्या च...” या मंत्राद्वारे कर्माने दुःख ओलांडून आत्मज्ञानाने अमृतत्व प्राप्त करण्याचा मार्ग दिला आहे. अविद्या/अपरा विद्या  संसारात जगण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व ज्ञान. उदाहरण, जर तुम्ही आजारी पडला तर वैदयाकडे जावे लागेल. म्हणूनच तैत्तिरीय उपनिषदात सत्य, धर्म, स्वाध्याय, गुरुसेवा आणि समाजधर्म यांचा अभ्यास आवश्यक मानला आहे. समर्थ रामदासस्वामींच्या “ज्ञात्यावांचूनि नाहीं ज्ञानमार्ग” या ओवीतून गुरुच्या मार्गदर्शनाचे महत्त्व अधोरेखित होते, तर “संसारत्याग न करितां...” या विचारातून विवेकाने संसारातच सार्थकता साधण्याचा संदेश मिळतो. 

आधुनिक काळात स्वामी रामदेव यांनी योग-आयुर्वेदाचे प्राचीन ज्ञान समाजोपयोगी व्यवसायात उतरवून आरोग्य व रोजगार दिला, तर आचार्य बालकृष्ण यांचे अथर्ववेदातील गुरु-शिष्य बंधनाचे विवेचन आजच्या शिक्षणपद्धतीतही लागू होते. यावरून स्पष्ट होते की ज्ञानाचा खरा उद्देश आत्मिक उन्नती, जीवनातील संतुलन आणि समाजाची सेवा हा आहे. जो वैदिक आणि आधुनिक दोन्ही दृष्टिकोनांतून सुसंगत आहे. 

आजच्या डिजिटल युगात ज्ञान प्राप्तीचा उद्देश अधिक व्यापक झाला आहे. ज्ञान केवळ पुस्तके किंवा गुरूपुरते मर्यादित न राहता इंटरनेट, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि विज्ञानाद्वारे सहज उपलब्ध झाले आहे. एलन मस्क, सत्या नडेला यांसारखे नेते वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग करून जग बदलणाऱ्या संस्था चालवतात. पण हे ज्ञान नैतिकते शिवाय वापरले तर धोकादायक ठरू शकतेम्हणून वैदिक आणि दासबोधाचा संदेशविवेक आणि सदाचाराने ज्ञान वापरावेआजही प्रासंगिक आहे

शेवटी, ज्ञान प्राप्तीचा खरा उद्देश दोन्ही जगांचा समन्वय आहे.  संसारात यश मिळवून आध्यात्मिक मोक्षाकडे वाटचाल करणे. उपनिषदे आणि दासबोध सांगतात की ज्ञान हे अज्ञान नष्ट करून जीवन सार्थक करण्यासाठी आहे. जो व्यक्ती हे समजून ज्ञान प्राप्त करतो, तो ना केवळ स्वतः उन्नत होतो आणि समाजाचा उन्नतीत  योगदान देतो. अशा प्रकारे, ज्ञान हे मानवजातीचे खरे अमूल्य धन आहे, जे सतत अभ्यास, चिंतन, कर्म आणि गुरूशरणाने प्राप्त होते.
 
 

No comments:

Post a Comment