Thursday, May 4, 2023

वार्तालाप (11) नामाची महिमा

  
अखंड नामस्मरण जपत जावे, 
नामस्मरणे पावावें समाधान.

समर्थ रामदासांनी श्रीसार्थ दासबोधात चौथ्या दशकातील तिसर्‍या समासात नामाच्या माहिमेचे वर्णन केले आहे. समर्थ म्हणतात नामस्मरणाचा अधिकार लहान थोर सर्वांना आहे.भगवंताचे नामस्मरण केल्याने मूढ व्यक्ति संसाररूपी समुद्र सहज पार करून जातो. सांसारिक समस्यांचे समाधान ही नाम स्मरणाने सहज होते. प्रभू श्रीरामाने समुद्रात टाकलेला दगड पाण्यात बुडून गेला. वानरांनी राम नाव लिहून टाकलेले दगड पाण्यावर तरंगत राहिले. ही आहे नामाची महिमा. एक जुनी आठवण. एकदा आमच्या मंत्रालयात आलेल्या नव्या अधिकार्‍याला कारचे लाईसेन्स बनवायचे होते. तो दिल्लीच्या एका आरटीओत गेला. तिथे काउंटर वर असलेल्या कर्मचार्‍याला त्याचा परिचय दिला. पण तो कर्मचारी त्याच्या कडे दुर्लक्ष करत म्हणाला, तुमच्या सारखे भरपूर साहेब इथे येतात, जाऊन लाइनीत उभे रहा. तिथली भीड पाहून अधिकारी कार्यालयात परतला. त्याने आपल्या पीएला समस्या सांगितली. पीए म्हणाला चिंता करू नका उद्या तुमचे काम होईल. पीएने  साहेबांचे नाव घेऊन आरटीओच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या स्टाफची बोलणी केली. साहेबांची अपाइंटमेंट फिक्स केली. दुसर्‍या दिवशी साहेब पुन्हा आरटीओ गेले. अर्ध्या तासात साहेबाला लाईसेन्स मिळाले. जे साहेबाला जमले नाही त्यांच्या पीए ने साहेबांचे नाव घेऊन सहज केले. मोठ्या लोकांचे नाव घेऊन संकटातून सहज मुक्ति मिळते असा अनुभव आयुष्यात सर्वांनाच येतो. तसेच आपण कितीही पापी असलो तरी भगवंताचे नाव घेऊन सहज संसार चक्रातून अजामीळ प्रमाणे मुक्त होऊ शकतो. 

No comments:

Post a Comment