Tuesday, August 30, 2016

आई: प्राणापेक्षा प्रिय बाळ



लहानपणी एक बोध कथा वाचली होती. कथेचा सार होता, माणूस मुळातच स्वार्थी आहे.  आई सुद्धा आपले प्राण वाचवायला आपल्या बाळाची बळी देऊ शकते. कथा होती, एक माकडीण नदीच्या एका बेटावर होती. अचानक पाणी वाढू लागले. तिला काय करायचे हे उमजेना. तिने आपल्या पिल्याला उचलून काळजाशी धरले. पण पाणी सतत वाढतच होते. तिने माणसासारखे उभे राहून आपल्या पोराला डोक्यावर ठेवले. पण पाणी काही वाढायचे थांबेना. तिच्या डोक्यावरून पाणी जाऊ लागले. अखेर आपला जीव वाचविण्यासाठी तिने आपल्या पोराला  आपल्या पायाखाली ठेवले.  आपल्याच अपत्याचे बलिदान देऊन तिने आपला प्राण वाचविला. कथेचा सार होता, जेंव्हा प्राणावर बेतते, तेंव्हा आई सुद्धा आपल्या अपत्यांचा त्याग करते.  खंर म्हणाल तर मला हि कथा कधीच पटली नाही. 

थोडा मोठा झाले, डिस्कव्हरी वाहिनीवर जनावरांवर आधारित मालिका पाहताना कित्येकदा अनुभव आला, आपल्या पिल्लांना वाचविण्यासाठी लहानशी हरिणी सुद्धा हिंस्त्र पशूंची झुंज देते. एकदा तर एका डुक्करीने आपल्या अपत्यांना वाचविण्यासाठी, आपल्या प्राणांची  आहुतीही दिल्याचे बघितले.  काही लोकांचे म्हणणे आहे, जनावरांना बुद्धी नसते. जगण्याचा आनंद म्हणजे काय हे त्यांना माहित नसते म्हणून जनावरांची आई आपल्या पिल्लांच्या रक्षणासाठी कधीच स्वत:च्या प्रांणांची पर्वा करीत नाही. 

कधी-कधी वर्तमानपत्रांत वाचायला मिळते. आपल्या मुलांना विष देऊन आईने आत्महत्या केली. मानवीय आई तर जनावरांच्यापेक्षा जास्त बुद्धिमान. ज्या अपत्यांना स्वत:च्या गर्भात वाढविले आहे, ती त्यांचा  प्राण कसा घेऊ शकते. आईला तर तिचे बाळ प्राणापेक्षा प्रिय. काय कारण असेल? प्रत्येक माणसाला भविष्यात पुढे काय ठेवले आहे, याची थोडीफार कल्पना असतेच. आपल्या पोरांचे लालन-पालन करण्यास असमर्थ आईला, आपल्या मुलांना भुकेने तडफडताना बघविले नाही, किंवा हिंस्त्र मानवीय जगापासून आपल्या अपत्यांचे रक्षण करण्यास असमर्थ राहिल्यामुळे कदाचित तिने  हे टोकाचे पाऊल उचलले असेल. 

दोन दिवस आधी सोशल मिडीया वर एक आई आपल्या बाळाला  बदडते आहे, असा विडीयो फेसबुक इत्यादी वर दिसू लागला. माझा एक मित्र म्हणाला या कलयुगात आई सुद्धा दुष्ट असते. आई आणि दुष्ट, मला त्याचे विधान पटले नाही. मी त्याला म्हंटले, बहुतेक सासरच्या जाचांना कंटाळून, मानसिक संतुलन हरवलेली स्त्री असे करू शकते. अन्यथा कुठलीही आई आपल्या बाळाला मारू शकत नाही. 

कालच टीवीवर एक बातमी बघितली.  नौका विहार करताना, एका स्त्रीचा बाळ सरोवरात पडला. आपल्या बाळाला वाचविण्यासाठी तिने पाण्यात उडी घेतली.  स्वत: पाण्यात बुडाली, पण एक हात उंच करून कितीतरी वेळ तिने आपल्या बाळाला पाण्याच्या वर ठेवले.  तिचा बाळ वाचला, पण तिला वाचविता आले नाही. तिने स्वत:हून मृत्यला कवटाळले, आपल्या बाळाला वाचविण्यासाठी.  तिने पुन्हा सिध्द केले, आई जनावरांची असो वा माणसाची, आपल्या बाळाच्या रक्षणार्थ स्वत:च्या प्राणांची आहुती द्यायला सदैव तैयार असते. 

No comments:

Post a Comment