Monday, July 22, 2019

क्षणिका : चेहरा


 
सभ्यतेचा मुखवटा 
तार-तार फाटला 
दर्पणात  दिसला 
विद्रूप माझा चेहरा.

हडळी ने घेतले 
सोंग सुंदरीचे 
दर्पणाने दाविले 
खरे रूप तिचे.





















Wednesday, July 3, 2019

कविता आणि मीटर


माझ्या एका मित्राचे म्हणणे आहे, कवी आणि शायर यांच्या घरी पाहुणे आल्यावर त्यांना अत्यंत आनंद होतो. बहुतेक कविता ऐकायला एक बऱ्यापैकी बकरा सापडला याचा. काही दिवसांपूर्वी माझा एक मित्र भेटावयास घरी आला होता. मित्र आला मलाहि ‘आनंद’ झाला. चहा-पाण्या नंतर हळूच कवितेचा विषय काढला, आजकाल आमी बी कविता करू लागलो आहे, असे म्हणत कवितेची चोपडी त्याच्या हातात दिली. (आधीच माहीत असते तर इथे टपकलोच नसतो, असा काहीसा भाव त्याचा चेहऱ्यावर उमटला). पण प्रत्यक्षात, वा-वा, छान, लेका तू पण कवी झालास तर???  असे म्हणत ‘मजबूरी का नाम महात्मा गांधी’ या धर्तीवर’ तो कवितेची चोपडी चाळू लागला. मीहि कान टवकारून, त्याच्या प्रतिक्रियेची वाट पाहू लागलो. थोड्या वेळानी तो उद्गारला, लेका, कविता छान आहेत, आवडल्या (?). पण! एक ही कविता मीटरमध्ये नाही. तू माझा मित्र आहे म्हणून सांगतो, बिना मीटरच्या कवितांची मार्केट वेल्यू नसते. कवीला प्रतिष्ठा मिळत नाही आणि  मोबदलाहि मिळत नाही. असे म्हणत एखाद्या खलनायका प्रमाणे माझ्याकडे पाहत, तो खदा-खदा हसू लागला. त्यावेळी त्याचा चेहरा मला चक्क ब्रूटस सारखा वाटला, ‘ब्रुटस तुम भी’ एवढेच म्हणायचं काय ते राहिल. पण एक मात्र खरं त्याचा घाव जिव्हारी लागला. त्या दिवसापासून एक ही कविता सुचली नाही.


कवितेच मीटर म्हणजे काय, हा एकच प्रश्न सतत डोक्यात घोळू लागला. गेल्या रविवारी कुठे बाहेर जायचे होते, गल्लीत एक आटोरिक्षा उभा होता. आटोरिक्षावाल्याला विचारले, तो म्हणाला साहब मीटर खराब है. मीटर ठीक होने तक सवारी नाही बिठा सकता.  मी म्हणालो बिना मीटर के चल. त्याने उत्तर दिले, साहब, ‘बिना मीटर के में मुफ्त में भी किसी को नही ले जा सकता, चलान कट जायेगा’. माझ्या डोक्यात ट्यूबलाईट पेटली. प्रकाश पडला.  मीटर नसेल तर आटोरिक्षा ही रस्त्यावर धावू शकत नाही. ‘मीटर असेल तरच मोबदला मिळतो’. मीटर वेगाने पळत असेल तर मोबदला हि जास्त मिळतो.
 
डोक्यात गोंधळ माजला, अनेक प्रश्न उभे राहिले, विवेक पटाईत तुम्ही मीटर मध्ये कविता लिहू शकतात का?  हृदयातून उत्तर आले - शक्यच  नाही. बिना मीटरच्या कवितेला बाजारात किंमत नाही. ज्याची किमत नाही त्याचे नाव होत नाही. त्याला प्रतिष्ठाहि मिळत नाही. प्रतिष्ठा व नाव नसलेल्यांना कवी संमेलनात कुणी बोलवतो नाही. कुणी त्यांची कविता छापत नाही. माझ्या एका दिल्लीकर कवी मित्राने स्वत:च्या खर्चाने नागपूरहून आपले दोन-तीन कविता संग्रह प्रकाशित केले आहे (५००च्या आवृतीचे, १५ ते वीस हजार खर्च येतो असे तो म्हणाला होता). पुस्तके किती विकल्या गेली त्यास माहीत नाही. कारण रॉयल्टी त्याला कधीच मिळाली नाही.


आपण काय विचार करतो आहे, या विचाराने मला माझेच हसू आले. तुलसीदासाला कुठल्या ही राजाच्या दरबारी ‘राजकवीचे’ पद सहज मिळाले असते. पण तुलसीदासाने काशीच्या घाटावर, स्वांत सुखाय ‘रामचरितमानस रचले’ होते, कुठल्या ही मोबदल्याचा विचार न करता. त्यावेळी आत्मशून्य झालेल्या जनतेला राक्षसी शक्तींविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणे हाच रामचरितमानस रचण्याचा कदाचित त्यांच्या उद्देश्य असेल. शेवटी स्वत:लाच म्हणालो, विवेक पटाईत, आजचे प्रश्न कवितेच्या माध्यमातून उभे करण्यात थोडे यश मिळाले, तर काही मिळविण्याचे समाधान नक्कीच मिळेल. मग कविता मीटर मध्ये असो किंवा नसो.

Monday, July 1, 2019

क्षणिका: पाऊस


पाऊस पडला
सुगंध मातीचा
दरवळला
गावात.

पाऊस पडला
दुर्गंध घाणीचा
पसरला
नगरात.  

मुंबईकरांना पहिल्या पावसाच्या दुर्गंधीचे स्वागत केले. आम्ही दिल्लीकर अजूनही  रोगराई पसरविणाऱ्या पावसाळी दुर्गंधीच्या  प्रतीक्षेत.

Friday, June 28, 2019

मेघ आणि यक्षप्रिया


मेघांचा गडगडाट ऐकून यक्षप्रिया इमारतीच्या गच्चीवर आली. प्रियतमाच्या संदेशाने भिजलेल्या पहिल्या पावसात ती मनसोक्त भिजली. पण हे काय अचानक तिच्या अंगाची लाही-लाही होऊ लागली. पहिल्या पावसाच्या तेजाबी जलधारांनी तिचा चेहरा जाळून टाकला होता. तिचे सौंदर्य नष्ट झाले होते.  

एका इमारती कडे मेघाचे लक्ष गेले, एक स्त्री रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडलेली होती. तिचा चेहरा नुकताच तेजाबी पावसात भिजल्यामुळे कुरूप झालेला होता. लोक कुजबुज करत होते, आषाढच्या मेघ वरून सर्व काही बघत होता. यक्षप्रियेचा असा अंत पाहून त्याला अतीव दुख झाले. या सर्वाला आपणच जवाबदार आहोत, असे त्याला वाटले. आता परतताना रामगिरी वर यक्षप्रियेचा संदेशाची वाट पाहणाऱ्या यक्षाला काय सांगणार. काही क्षण मेघ तिथेच थबकला. मनात विचार आला उदरातील पाणी घेऊन परत फिरावे व समुद्रात रिकामे करावे.  पण त्याला वरूण राजाचा आदेश आठवला. जमिनीवर काय घडत आहे, याची चिंता न करत दिलेले पूर्वनिर्धारित कर्तव्य पूर्ण केले पाहिजे. मेघ दोन अश्रू गाळुन पुढच्या प्रवासाला निघाला.