Thursday, January 11, 2018

प्रदूषण (८) - वार्यावर स्वार - संजीवनी आणि स्मागी चेटकीण





वार्यावर पोहत  
संजीवनी आली
प्राण वाचले  
लक्ष्मणाचे 


वार्यावर पोहत 
स्मागी चेटकीण आली
प्राण हरले 
निष्पाप जनांचे.



Wednesday, January 10, 2018

प्रदूषण (७)- पूतना आणि मनुजपुत्र


कृष्ण प्याला 
 रक्त पूतनाचे
पूतना मेली.

 मनुजपुत्र प्याला 
 रक्त धरती मातेचे 
धरती मरणार 
आणि
  मनुजपुत्र ही मरणार. 

 धरती माता मनुजपुत्रांच्या सर्व आवशक्यता पूर्ण करण्यास समर्थ आहे. तरीही धरती मातेचे  वक्ष खोदून मानव तिचे रक्त पितो, परिणाम .....

Tuesday, January 9, 2018

प्रदूषण (६)- कर्मफळ




चित्रगुप्त ने आदेश दिला
गळा दाबून खून केला
कर्मफळ भोगायला
  धाडा याला  दिल्लीला।


त्या माणसाचा पुन्हा दिल्लीत नवा जन्म झाला. अस्थमा, कन्सर इत्यादी रोगांनी ग्रस्त होऊन, तडफडून तडफडून त्याच्या मृत्यू होणार. 

टीप: 2017 मध्ये फक्त 1 दिवस दिल्लीची हवा श्वासघेण्या लायक होती। 

Monday, January 8, 2018

प्रदूषण: कलियुगात दुर्योधनाचा दारूण अंत



कुरुक्षेत्रच्या रणांगणातून जीव मुठीत घेऊन दुर्योधन पळत-पळत २१व्या  शतकातल्या दिल्ली नगरीत युमुनेच्या काठावर असलेल्या निगमबोध घाटाकाठी येऊन पोहचला. समोर यमुनेचे अथांग काळे जळ बघून दुर्योधनाने सुटकेचा निश्वास टाकला, बचावलो एकदाचा. आता भीम, कृष्ण आणि पांडव माझे काहीही करू शकत नाही. त्यांना यमुनेच्या जळात मला शोधणे शक्य नाही. त्याने मागे वळून पाठलाग करत येणाऱ्या पांडवांकडे बघितले. 

नदीत उडी टाकण्याच्या तैयारीत असलेल्या दुर्योधनाकडे पाहून भीम जोरात ओरडला. भ्याडा तुझ्यासाठी प्राण अर्पण करणार्या भावंडांचा विचार कर. तुझा भित्रेपणा पाहून त्यांना स्वर्गात किती दुख होईल. तुझा नामर्दीणा पाहण्यासाठी का त्यांनी प्राण गमावले?  शरमेने मान खाली होईल त्यांची . महाराज धृतराष्ट्र यांचा खरा पुत्र असेल तर समोर ये. माझ्याशी युद्ध कर. जिंकला तर तुला राज्य मिळेल आणि हरला तरी स्वर्गात जाशील. कुरुवंशाला कलंकित करू नको. पण दुर्योधना वर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. शेवटी भीम रागाने म्हणाला, कदाचित तू धृतराष्ट्राचा खरा पुत्र नाही,  निश्चितच कुणा दासापासून पैदा झाला असेल.  

दुर्योधनाने तुच्छ नजरेने भीमाकडे बघितले आणि म्हणाला, मूर्खा तू किती हि टाकून बोलले तरी काही लाभ नाही.  मी यमुनेत उडी घेतो आहे, हिम्मत असेल तर तूही उडी टाक. माझा वध करण्याची प्रतीज्ञा पूर्ण कर. यमुनेच्या तळाशी आपण मल्ल युद्ध खेळू म्हणत दुर्योधनाने पाण्यात उडी घेतली. 

दुर्योधन यमुनेच्या तळाशी पोहचला. दुर्योधनापाशी पाण्यातून प्राणवायू शोषणाची सिद्धी होती. पाण्यात प्राणवायू असतो. त्या वर जलचर पाण्याच्या आत हि जिवंत राहतात. पण आजच्या २१ शतकात तर कालीयानागापेक्षा किमान १०० पट विषारी असे  रसायन व प्राणवायू रहित यमुना जळात सुश्म जलचर जीवांना हि जिवंत राहणे अशक्य तिथे मानवाची काय बिशाद.  तळाशी आल्यावर दुर्योधनाने श्वास घेण्याचा प्रयत्न केला. प्राणवायू रहित घातक विषारी पाणी नाकपुड्यांच्या वाटे त्याच्या शहरीरात शिरले.  दुर्योधनाचा पाण्यातच अंत झाला.  

यमुनेच्या काठी उभ्या भीमाला  पुढे काय करायचे सुचेनासे झाले. तेवढ्यात इतर पांडवांसोबत कृष्ण हि तिथे पोहचला. भीम कृष्णाकडे पाहत म्हणाला,त्या भ्याड्याने यमुनेत उडी टाकली. आता त्याला शोधणे अशक्यप्राय आहे. दुर्योधनाचा वध केल्याशिवाय युद्ध संपणार नाही. हे केशव आता पुढे काय करायचे तूच सांग.  कुणालाच काही करायची गरज नाही  मी काहीही हि करणार नाही, कृष्ण म्हणाला. दुर्योधनाने स्वत: मृत्यूला मिठी मारली आहे. थोड्या वेळात दुर्योधनाचे प्रेत वर येईल. सर्वांनी सांशक नजरेने कृष्णाकडे बघितले. कृष्ण म्हणाला या यमुनेच्या विषाक्त जळात कुणीही जिवंत राहू शकत नाही. पहाच थोड्या वेळात दुर्योधनाचे प्रेत वर येईल. भीम म्हणाला, माझ्या प्रतीज्ञेचे काय होईल. कृष्ण हसत म्हणाला, या कलयुगात प्रतीज्ञा किंवा आश्वासनाचे काडीचेही हि मूल्य नसते. 




Saturday, January 6, 2018

प्रदूषण (५) - दु:शासनाचा अंत - पूर्वी आणि आता



द्रोपदीची साडी ओढली 
विटंबना  तिच्या देहाची केली 
छाती फुटली ओकत रक्त  
मेला दु:शासन


मानवाने छिन्नविछिन्न केली 
हिरवी चोळी धरणी मातेची 
विटंबना  तिच्या देहाची  केली
ओकत रक्त मरणार 
आजचा दु:शासन.



Friday, January 5, 2018

प्रदूषण (४) - पूर्वी आणि आता - गंगाजळ



दोन थेंब गंगाजळ
मृत्युच्या दारी 
स्वर्गाचे तिकीट 

रोज पी गंगाजळ
त्वरित मिळेल 
स्वर्गाचे तिकीट. 


टीप: सरळ नदीचे  जीवघेण्या रसायन युक्त प्रदूषित पाणी पिल्यावर विभिन्न रोग राई होऊन माणूस शीघ्र स्वर्गात जाईल.

प्रदूषण क्षणिका (३) - वारे - पूर्वी आणि आता



मलयगिरीचे वारे
वासंतिक वारे 
चैतन्य नांदे
घर-अंगणी 

शहरी वारे 
स्मागी वारे 
मृत्यू नांदे 
घर-अंगणी. 

Thursday, January 4, 2018

प्रदूषण कविता(2)- जिन्न आणि अल्लादीन


जिन्न आणि अल्लादीन



प्रदूषणचा कर खात्मा
अल्लादीनने आदेश दिला
जिन्नने तत्क्षणी
त्याचाच गळा दाबला।

टीप: अल्लादीन म्हणजे मनुष्य जाती 

Wednesday, January 3, 2018

प्रदूषण- पाऊस (१) - पूर्वी आणि आता

(श्री सुभाष स नाईक यांची प्रेरणा घेऊन)


श्रावणात बरसल्या
अमृत धारा
उजळली कोख
धरती मातेची।


श्रावणात बरसल्या
तेजाबी धारा
वांझ झाली कोख 
धरती मातेची। 



Friday, September 8, 2017

एका प्यादा (कठपुतली/कठपुतला )ची जीवन गाथा




प्यादाला बोलवा 
प्यादाला न्हावू  घाला 
प्यादाला जेवू घाला
प्यादाला दक्षिणा द्या.


प्यादाचा वापर करा 
प्यादाला डोक्यावर बसवा 
काम झाले कि प्यादाला
पटावर शहीद करा.

मग
नावावर त्याच्या
मेणबत्या लावा
नावाने दुसर्यांच्या 
जोरात बोंबला.

(शेवटच्या क्षणी प्यादाला सत्य कळते, पण उशीर झालेला असतो) 
.


Wednesday, September 6, 2017

भू-भू भुंकणारे कुत्रे



कुत्र्यांची एक खासियत असते, कुणीही दिसले कि भुंकणे सुरु. एखादा हत्ती सारखा मोठा जनावर दुरून येताना दिसला कि यांचे भू-भू सुरु झालेच समजा. पण जसा-जसा तो जनावर जवळ येईल.  कुत्रे भुंकणे सोडून शेपटी टाकून दूर पळून जातात. कुत्र्यांचा स्वभावच दुसरे काय.  पण कधी एखादा हत्ती स्वकर्माने जमिनीवर पडला कि मग काय म्हणता राव झुंडीच्या झुंडी कुत्र्यांच्या एकत्र होऊन जमिनीवर पडलेल्या हत्ती वर तुटून पडतात. काही क्षणात  सर्व कुत्रे मिळून हत्तीच्या शरीराच्या चिंध्या-चिंध्या करतात. कुणाच्या हाती इवलासा मांसाचा तुकडा किंवा फक्त हाड हि लागले तरी जणू काही त्यानेच हत्तीची शिकार केली आहे असा अविर्भाव आणून जोरात वाघा सारखी डरकाळी फोडण्याचा प्रयत्न करतात. कितीही झाले तरी कुत्रा वाघ बनू शकत नाही. शेवटी तोंडातून भू-भूच निघणार. 

या झुंडीतल्या कुत्र्यांचे अनेक प्रकार असतात. काही कागदांवर भुंकतात. तर काही दृश्य आणि श्रव्य माध्यमातून भुंकतात. आपण हत्तीची कधी आणि कशी शिकार केली याचे रसभरून वर्णन करतात. दुसर्या कुत्र्यांचा झुंडींच्या हाती काही लागू दिले नाही किंवा ते कुत्रे हत्तीचीच मदत करत होते इतपर्यंत यांची मजल जाते. आपणच खरे हे दाखविण्यासाठी सोबत सबूत म्हणून मांसाचा तुकडा किंवा हाड हि दाखवितात.   

एक आणखीन हि प्रकार असतो, हे कुत्रे म्हणजे 'बेगानी शादी में अब्दुला दिवाना'.  फ़क्त वरील उल्लेखित कुत्र्यांचे  हत्तीच्या शिकारीचे वर्णन ऐकून, जणू काही आपणच हत्तीची  शिकार केली आहे असा आभास यांना होतो. हे पण शिकारीचे वर्णन आणि हत्तीच्या मांसाचे हाडाच्या स्वादाचे वर्णन एवढ्या खूबीने करतात कि दुसर्यानां वाटेल हेच कुत्रे प्रत्यक्ष घटनेच्या जागी होते आणि शिकार यांनीच केली. फरक एवढाच कि या कुत्र्यांनी कधी हत्तीला पाहिलेही हि नसते. मांसाचा किंवा हाडाचा तुकडा मिळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. असो. या आभासी जगात वावरणाऱ्या कुत्र्यांचा वापर कागदावर आणि दृश्य श्रव्य माध्यमात भुंकणार्या कुत्र्यांच्या झुंडी स्वत:च्या स्वार्थासाठी नेहमीच करतात. अफवांचे पिक पसरवण्यासाठी किंवा कुणाचे चारित्र्यहनन या कुत्र्यांच्या मदतीने सहज करता येते. फक्त ठिणगी सोडा आग हे लावतील. पण हे कुत्रे स्कड मिसाईल सारखे असतात, कुठेही जाऊन पडतात.  आपल्या मालकांना हि चावायला कमी करत नाही. असो. 

हा लेख कुत्र्यांच्या स्वभावावर लिहिला आहे, अन्यथा घेऊ नये. तरी हि सर्वांची माफी मागतो.  

Saturday, September 2, 2017

पोष्टिक थालिपीठ


काल संध्याकाळी लेकीचा फोन आला. बाबा आज आमच्या हॉस्पिटल मध्ये पोष्टिक पदार्थ बनविण्याची प्रतियोगिता झाली. मी बनविलेल्या थालीपीठला पहिला पुरस्कार मिळाला. मी भाग घेण्याचे ठरविल्या बरोबरच  थालीपीठ बनविण्याचचा निश्चय केला. पुरस्कार नाही मिळाला तरी मराठमोळ्या थालीपिठाबाबत सर्वांना कळेल तरी. आमची सौ. दिवाळीच्या आधी भाजणीचे पीठ तैयार करते, ते जवळ-सात ते आठ महिने चालते.  साहजिकच आमच्या लेकीने तिच्या आईला विचारले. भाजणीचे पीठ संपले हे कळल्यावर तिची निराशा झाली. पण तीही माझ्या सारखी जिद्दी (आमच्या पटाईत खानदानची विशेषता, एकापेक्षा एक जिद्दी आणि सनकी). थोडा गुण लेकीत हि उतरला आहे. थालीपीठ बनवायचे ठरविले म्हणजे ठरविले. प्रतियोगिताचा एक दिवस आधी संध्याकाळी घरी परतताना तिला एका किरणाच्या दुकानात पतंजालीचा नवरत्न आटा दिसला आणि तिच्या डोक्याची ट्यूब लाईट पेटली.  गहू ,ज्वार, बाजरा, जौ, मक्का, चणा, सिंघाडा, चौलाई आणि सोयाबीन या पासून तैयार झालेला नवरत्न आटा. आता तिने थालीपीठ कसे केले तिच्याच शब्दांत. 

दोन वाटी नवरत्न आटा घेतला. एका कढईत (लोखंडी) रवा भाजतो तसा हा आटा ३-४ मिनिटे परतला.  अर्धी वाटी बेसन हि घेतले, तेही ३-४ मिनिटे परतले. अश्या रीतीने भाजणी तैयार केली व परातीत टाकली. एक चमचा ओवा, एक चमचा जिरे, १०-१२ काळी मिरीची पूड हि तैयार केली.  त्या नंतर एक पाव पालक आणि २ हिरव्या मिरच्या कमी तिखटवाल्या  धुऊन कढई वर झाकण ठेऊन वाफवून घेतल्या. नंतर मिक्सरमध्ये पालक टाकून प्युरी तैयार केली.   भाजणीत पालकाची प्युरी, तैयार केलेली पूड, व अंदाजे मीठ टाकून पीठ मळून घेतले. पाणी गरजेनुसार टाकले.  गॅस वर तवा ठेवला. थोड्या मंद आंचेवर. तव्यावर अर्धा चमचा तेल लावून थालीपीठ थापून घेतले व २-३ मिनिटांसाठी झाकण ठेवले. पुन्हा परतून खरपूस भाजून घेतले. बाकी हास्पिटल मध्ये गेल्यावर सोबत टमाटो, काकडी, गाजर, ढोबळी मिरची पासून केलेली कोशिंबीरिची साईड डिश सोबत ठेवली.  एक आगळीवेगळी मराठमोळी व पोष्टिक डिश परीक्षकाला आवडली आणि तिला पहिले पारितोषिक मिळाले.










Monday, August 21, 2017

धूम्राक्ष : अग्नये स्वाहा. इदं अग्नये इदं न मम

मानव ऋषीने मोठ्या प्रयत्नाने दगडांना घासून अग्नी प्रज्वलित केली. अग्नीला प्रसन्न करण्यासाठी प्रार्थना सुरु केली. हे अग्नी, सर्व संसारिक सुख आम्हाला प्रदान कर, गाई- म्हशी, दूध-तूप, धन-धान्य प्रदान कर. आम्हाला त्रास देणाऱ्या शत्रूंवर विजय मिळवून दे.  "अग्नये स्वाहा. इदं अग्नये इदं न मम:". 'तथास्तु' एक आवाज ऐकू आला. मानव ऋषीने पाहिले, हवन कुंडातून एक धुम्र्वर्णी अशरीरी आकृती, हात जोडून उभी होती. मानव ऋषीने प्रश्नार्थक नजरेने बघितले. मी धूम्राक्ष, अग्निपुत्र. धूर हेच माझे भोजन आणि मानवाच्या इच्छा पूर्ण करणे, हाच माझा धर्म. आज्ञा करा, ऋषिवर. मानव ऋषीने सांशक होऊन विचारले, खरंच! तू सर्व इच्छा पूर्ण करू शकतो. धूम्राक्ष म्हणाला, प्रत्यक्षला प्रमाण कशाला. तुमच्या मनात मध खाण्याची इच्छा आहे, याच झाडावरच मधमाश्यांचा पोळआहे. 'नको रे, भयंकर दंश देतात मधु माश्या'.  आता  मधु-माश्यांची भीती नाही. मधाच्या पोळां खाली लाकडे जाळली, धूर निघाला, मानव ऋषी धुर्यामुळे खोकलू  लागले.  मधुमाश्या पोळ सोडून निघून गेल्या, मधुर मधु चाखायला मिळाले. मानव ऋषी आनंदी झाले. धूम्राक्ष हात जोडून मानव ऋषी समोर उभा राहिला पुढच्या आदेशासाठी. 

खांडववन जळत होते, आगीचे डोंब आकाशाला भिडत होते. काळाकुट्ट धूर सर्वत्र पसरला होता. अर्जुनाचा आवाज गुंजला, माणसाला त्रास देणारा एक हि हिंस्त्र पशु जिवंत राहिला नाही पाहिजे. धूम्राक्ष एक-एक करून वनातील सर्व जीव-जंतूंना गिळू लागला. प्राण कासावीस झाल्याने काही वनवासी वनातून बाहेर पडले.अर्जुनाला शरण गेले. बहुतेक जगातील पहिले विस्थापित. खांडववनाच्या राखेवर नवीन भव्यदिव्य विशाल इंद्रप्रस्थ नगर उभे राहिले. नवी मुंबई आणि अमरावती सारखे भव्य महानगर हि उभे राहिले. हिरोशिमा आणि नागासाकी वर अणुबॉम्ब टाकला. आग आणि धुर्यात गुदमरून लक्षावधी लोग मरण पावलें. धूम्राक्षाच्या मदतीने विजय हि मिळाला. माणसाची प्रत्येक इच्छा हा पूर्ण करता-करता, धूम्राक्ष धूर गिळत-गिळत एवढा मोठा झाला आहे, कि आज संपूर्ण पृथ्वी त्याच्या अशरीरी शरीराने झाकल्या गेली आहे.
  
काल संध्याकाळी गच्ची वर उभा होतो, दिसला मला तो धूम्राक्ष. विचारले, अरे तुझ्यामुळे प्राण कासावीस झाला आहें, श्वास हि घेता येत नाही आहे, दिवस रात्र खोकलत राहतो, अस्थमा झाला आहे, मला. तो म्हणाला मालक यात माझा काय कसूर. तुमच्या इच्छा पूर्ण करता करता मी एवढा मोठा झालो आहे. मला रागच आला, त्याचा, तुझ्या  कृत्यांना मी कसा काय दोषी. तो म्हणाला, घरात AC आहे का. मी म्हणालो, संपूर्ण घर ACच आहे. बाहेरची प्रदूषित हवा घरात येऊ नये म्हणून लावला. हो पण त्या AC साठी वीज कुठून येते. कोळसा जळतो, धूर निघतो, मग वीज मिळते, म्हणत धूम्राक्ष जोरात हसला. पुढे म्हणाला,मालक समोर पहा काय दिसत आहे, मी म्हणालो दूर मायापुरीतील कारखान्यांच्या धूर ओकणाऱ्या चिमण्या. तुझे सातमंजली घर मायापुरीतल्या लोखंडी सळ्यानींच बनले आहे. किती गाड्यला आहेत घरी? मी उतरलो, एक माझी, एक माझ्या सौची, एक चिरंजीवाची आणि एक मोठी कुठे बाहेर फिरायला जायचे असेल तर. तो म्हणाला, पेट्रोल जळते, धूर निघततो, मगच कार चालते. मी चिडून म्हणालो, माझ्या अस्थम्यासाठी  मीच दोषी आहें, हेच म्हणायचे आहे का तुला? मालिक चिडू नका शांत व्हा. सत्य तेच सांगतो आहे. बाकी मला काय, मी दास आहे, मानवाच्या आदेशाचे पालन करणें माझे कर्तव्य. आपण आदेश द्या. मी पुढे काही न बोलता गुपचूप खाली उतरलो. खोलीत येऊन AC सुरु केला. पण तरीही रात्री मला झोप आली नाही. 

अग्नये स्वाहा. इदं अग्नये इदं न मम. मंत्राचा अर्थच कळला नाही. सर्व मलाच पाहिजे. त्या साठी कितीही किमंत आपण मोजायला तैयार असतो. कदाचित मानवाच्या अपरमित इच्छांची पूर्ती करता-करता एक दिवस धूम्राक्ष मानवाला हि गिळून टाकेल.