Saturday, June 27, 2015

रामायण कथा - वाली पत्नी तारा -एक कुशल राजनीतीज्ञ


वाली पत्नी तारा, रामायणातील एक प्रखर  व्यक्तित्व आहे. किष्किंधा नगरीची सम्राज्ञी तारा  सौंदर्यवती तर होतीच, पण त्याच बरोबर  वाकपटू आणि कुशल राजनीतीज्ञ ही होती. म्हणूनच वाल्मीकि ऋषींनी तिला रामायणातल्या सर्व स्त्रियांत  सर्वात जास्त महत्व दिले आहे. 


वानर समाज पुरुष प्रधान होता. स्त्रिया केवळ भोग्य वस्तू. पतीच्या मृत्यू नंतर, त्याच्या भावाची अधीनता स्त्रीला स्वीकारावी लागत असे.  इथे तर प्रत्यक्ष ज्या भावाने, तारेच्या पतीचा षड्यंत्र रचून वध केला, त्या सुग्रीवला पती म्हणून स्वीकारावे लागले. सुग्रीवची कनिष्ठ पत्नीचा दर्जा ही तिला स्वीकार करावा लागला.  तारेला किती मानसिक यातना  झाल्या असतील, याची कल्पना करवत नाही. तरी ही आपल्या पुत्राच्या भविष्यासाठी  आणि वानरांच्या हितासाठी तिने सर्व यातना आनंदाने सहन केल्या.  रामायणात तारे सारखी प्रखर स्त्री अन्य नाही.

तारा केवळ वालीची पत्नी आणि किष्किंधा नगरीची सम्राज्ञी नव्हती  अपितु राजकार्यात ही तिचा पर्याप्त  दखल होता. गुप्तचर तंत्राचा कसा वापर करावा हे ही तिला माहित होते. राज्यात आणि संपूर्ण भरतखंडातल्या घडामोडींचे त्याचे ज्ञान ही तिला होते. वालीपासून लपून राहणार्या  सुग्रीवने, वालीला द्वंद युद्धासाठी ललकारले आणि तो पराजित झाला. पण तारचे मस्तक ठणकले, सुग्रीवच्या असे दुस्साहस कारण काय, हे शोधून काढण्याचे  तिने ठरविले.  गुप्ताचरांकडून इत्यंभूत  माहिती मिळवली. त्याच दिवशी भरपूर मार खाऊन ही सुग्रीवने पुन्हा द्वंद युद्धासाठी वालीला ललकारले निश्चितच या मागे काही षड्यंत्र असणारच असे तारेला वाटलेतिने वालीला युद्धापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. तारेने वालीला किमान सकाळपर्यंत तरी थांबण्याचा सल्ला दिला. पण क्रोधग्रस्त वाली तिचे ऐकायला तैयार नव्हता. शेवटचा प्रयत्न म्हणून तारेने गुप्तचरांकडून मिळालेली सूचना आपल्या पतीला दिली.  इक्ष्वाकू वंशातील  श्रीराम आणि लक्ष्मण ज्यांनी दंडकारण्यातल्या खर दूषण सहित हजारों राक्षसांचा वध  केला आहे आणि दंडकारण्यातल्या जनतेची राक्षसी अत्याचारांपासून मुक्तता केली आहे. अश्या श्रीरामांशी सुग्रीवने मैत्री केली आहे आणि श्रीरामाने त्यांना किष्किंधाचे राज्य देण्याचे ही प्रलोभन दिले आहे. तारेने बालीला सल्ला दिला, परिस्थितीला ओळखा, या घटकेला श्रीरामासारख्या पराक्रमी व्यक्तीशी वैर पत्करणे हिताचे नाही. त्यांना शरण जा. सम्मानपूर्वक रुमाला सुग्रीवच्या स्वाधीन करून, त्याचा युवराज पदावर अभिषेक करण्याचा करा.  वालीला तिची सूचना आवडली नाही.  कदाचित् वालीला असे वाटले असेल, श्रीराम न्यायी आहेत दोन भावांच्या युद्धात ते पडणार नाही.  वालीने तारेच्या  सल्ल्याकडे लक्ष दिले नाही.  

वालीचे हितचिंतक वानरांनी वालीच्या मृत्यूची वार्ता तारेला कळवली आणि तिला अंगद सहित पलायन करण्याचा सल्ला दिला. पण तारेने ते मान्य केले नाही. ती  कुठे  ही पळून  गेली  नाही. अपितु  युद्धाच्या  जागी गेली. त्या परिस्थितीत ही आपला क्रोध आवरून, आपल्या पुत्राच्या हिताचे रक्षण केले.  वाली वधाचा  दोष तिने श्रीरामावर  लावला नाही. तारेला माहित होते इक्ष्वाकु कुलभूषण श्रीरामचंद्र हे न्यायी आहेत, ते कधी ही अन्याय करत नाही. जे काही घडले त्याला तिचा पतीच कारणीभूत आहे. तिने वाक्चातुर्य दाखवत श्रीरामाला तिचा ही वालीप्रमाणे वध करण्याची  विंनती केली. तिची मात्रा बरोबर लागू पडली. श्रीरामाने सुग्रीवचा किष्किंधा नगरीच्या राजपदावर अभिषेक केला आणि  वाली पुत्र अंगद याचा युवराज पदावर अभिषेक केला. अश्यारितीने  तारेने आपल्या पुत्राच्या हिताचे रक्षण केले. भविष्यात त्याचा राजा होण्याचा मार्ग मोकळा केला.

क्रोधीत लक्ष्मण नगरात आले. तेंव्हा सुग्रीव तारेच्या निवासी होते. या वरून कळते, तारेने सुग्रीवला ही आपल्या मुठीत ठेवले होते. लक्ष्मणाच्या येण्याची वार्ता ऐकून वानरराज सुग्रीव घाबरून गेले, या विकट परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सुग्रीवणे  तारेलाच  पुढे केले.  

वेळप्रसंग ओळखून ताराने  लक्ष्मणाची मनधरणी केली, हे वीर राजकुमार  ही क्रोध करण्याची वेळ नाही. सुग्रीवच्या मनात तुमचे कार्य करण्याची इच्छा आहे, काही चूक झाली असेल तर क्षमा असावी. क्रोधग्रस्त असल्यामुळे तुला कामासक्त माणसाच्या परिस्थितीची कल्पना नाही. कामासक्त होऊन वानरराज माझ्याकडे आले होते, कामाच्या अधीन झाल्यामुळे त्यांच्या हातून चूक झाली असेल, त्यांना आपला बंधु समजून क्षमा करावी. 

महर्षयो धर्मतपोऽभिकामाः
कामानुकामाः प्रतिबद्धमोहाः
अयं प्रकृत्या चपलः कपिस्तु
कथं सज्जेत सुखेषु राजा  
किष्किंधाकांड (३३/)
(तपस्यारत महर्षी ही कामाच्या अधीन होतात, सुग्रीव तर एक चंचल वानर आहे, तो  कामाच्या अधीन झाला, त्यात चूक काय).  

तारा पुढे म्हणाली, जरीही सुग्रीव  कामासक्त झाले असतील तरी ही त्यांनी आपले कार्यसिद्ध करण्याचा उद्योग सुरु केलेला आहे. लवकरच लाखोंच्या संख्येने वानर इथे येऊन पोहचतील आणि कार्याला सुरवात करतील.  अश्या रीतीने तारेने लक्ष्मणाचा क्रोध काही अर्थी शांत केला.

सुग्रीवला भेटल्यावर ही लक्ष्मणाचा क्रोध पुन्हा जागा झाला. लक्ष्मणाने अत्यंत कठोर शब्दात सुग्रीवची नालस्ती सुरु केली. या वेळी मात्र  ताराने  कठोर भूमिका घेतली.  तिने  कठोर शब्दात लक्ष्मणाला बजावले, सुग्रीव हे वानरांचे राजा आहेत. राजा समोर कटू बोलणे कुठल्याही परिस्थितीत उचित नाही. तिने लक्ष्मणाला सांगितले, सुग्रीव कृतघ्न  तर नाही, पण असत्य ही बोलत नाही. ते निश्चितच  अधम राक्षसांचा वध करून, सीतेला रावणाच्या तावडीतून मुक्त करतील. तारा पुढे म्हणाली वर्षोनुवर्षे दुखी असलेल्या माणसाला सुख मिळाले आणि  त्याचा उपभोग घेण्यात तो दंग झाला तर  त्यात गैर काय. थोडा उशीर झाला, म्हणून त्याच्याशी कठोर वागणे उचित नाही. तारेने लक्ष्मणा समोर श्रीरामाच्या न्यायाची प्रशंसा केली. तिने रावणच्या सैन्यबलाचे ही वर्णन करत लक्ष्मणाला स्पष्ट शब्दात बजावले:

ते शक्या रणे हन्तुमसहायेन लक्ष्मण:l
रावण: क्रूरकर्मा सुग्रीवेण विशेषत:l
(किष्किंधाकांड ३५/१७)

[
सारांश: कुणा एकट्याला  रावणाचा आणि राक्षसांचा वध करणे अशक्य आहे. वानरराज सुग्रीवची मदतची  श्रीरामाला ही तेवढीच  आवश्यकता आहे].

अश्यारितीने आपल्या वाक्चातुर्य आणि युक्तिवादाने तारेने लक्ष्मणाला  सत्य परिस्थितीची जाणीव करून दिली.  लक्ष्यात असू द्या, ज्या प्रमाणे  सुग्रीवला तुम्ही मदत केली, त्याच प्रमाणे सुग्रीवच्या मदतीची तुम्हाला  ही तेवढीच  गरज आहे. लक्ष्मणाला  तिचा युक्तिवाद पटला. त्याला सत्य परिस्थितीची जाणीव झाली. त्याचा क्रोध शांत झाला. अश्या रीतीने तारेने लक्ष्मणाच्या क्रोधापासून सुग्रीव  आणि वानरांचे रक्षण  केले. 

तारेचे प्रखरव्यक्तित्वाचा प्रभाव त्या वेळचा समाजावर पडला, म्हणून तारेला प्रात:स्मरणीय  पंच कन्येत  स्थान मिळाले. 

अहल्या द्रोपदी कुंती तारा  मंदोदरी तथा:l
पंचकन्यादस्मरेनित्यं महदपातक नाशनम् l


या पाच ही स्त्रियांनी अन्याय सहन केला नाही आणि आपले उद्दिष्ट साध्य केले. पण  तारा या पाच ही स्त्रियेत सर्वश्रेष्ठ आहे कारण तिने केवळ स्वत:चाच स्वार्थ नाही सिद्ध केला अपितु संपूर्ण वानरजातीचे ही हित साध्य केले.

Tuesday, June 23, 2015

फादर्स डे स्पेशल -मिक्स पनीर भाजी (झणझणीत नागपुरी स्टाईल)


रविवारचा दिवस होता तरी सकाळी योग पाहण्यासाठी सकाळी ६ वाजताच उठलो. योग संपण्याचा आधीच आमच्या भागात पाऊस सुरु झाला.  सकाळी ९ वाजता आमच्या चिरंजीवाने ‘हैप्पी फादर्स डे’ केले. संध्याकाळी बाजारातून २५०ग्रम पनीर घेऊन आलो होतो. आल्यावर सौ. ला म्हंटले आज फादर्स डे आहे. शाही पनीर करते का? सौ. उतरली, मिक्सर खराब झाले आहे. मोटर कामातून गेली आहे. गेल्याच वर्षी ठीक केली होती. आता नवीन ‘फूड प्रोसेसर’ घेऊन  मगच  अश्या ग्रेवीवाल्या भाज्या करायचा ऑर्डर करा.
च्यायला सौ.चा मूड पार बघडलेला पाहून, सौ.ला खुश करणे गरजेचे होते.  मी म्हणालो, आता पनीर आणले आहे, तर मीच करतो काहीतरी. फादर्स डेला फादरने काहीतरी केलेच पाहिजे. फ्रीज उघडला, त्यात शिमला मिरच्या (ढोबळी मिरची) होत्या  ४ उचलल्या (१५० ग्रम), थोड्या हिरव्या शेंगा (काय म्हणतात ते फ्रेंच बिन्स) उरलेल्या होत्या त्या सर्व घेतल्या. मला कधी-कधी कळत नाही, बायका थोडी भाजी उरवून का ठेवतात? चिरताना आळस येतो कि बायकांना अशी सवयच असते. कारण एक दिवस आधी फ्रेंच बिन्सची भाजी केली होती.  आकारानुसार हिरवी मिरची (३-४), टमाटर (३-४), लसूण (७-८ पाकळ्या), आले एक तुकडा आणि कांदा (२ मध्यम आकाराचे). आधी हिरवी मिरची, लसूण आले, बारीक चिरून घेतले. नंतर साबणाने हात धुऊन घेतला. हात नाही धुतले तर चुकून मिरचीचा हात डोळ्यांना हा लागतोच. (नवऱ्याच्या डोळ्यांतून अश्रू निघाले कि बायकांना खुश होण्याचा मौका मिळतो). हिरव्या शेंगा बारीक चिरून घेतल्या. जमेल त्या आकृतीचे कांदे, टमाटर आणि शिमला मिरची चिरून घेतली. आपल्यालाच भाजी खायची आहे कशीही चिरली तरी चालते.  
 

 आता झणझणीत नागपुरी स्टाईलची पनीरची भाजी बनविण्याचे ठरविले. चांगले ३-४ टेबल स्पून तेल कढ़ाईत टाकले,(तेल भरपूर टाकले कि भाजी आपसूक चांगली बनते, अनुभवाचे बोल आहेत हे, खास करून वांगे [मुटे साहेबांच्या शेतातले मिळाले तर अति उत्तम]).  तेल गरम झाल्यावर मोहरी टाकली, मोहरी फुटल्यावर,  तमालपत्र, दालचिनी आणि २ लवंग टाकल्या नंतर  बारीक चिरलेली मिरची, आले आणि लसूण टाकले. १-२ मिनिटे परतल्यावर ३ वाळलेल्या लाल मिरच्या टाकल्या (आमच्या साळीने खास मध्यप्रदेशातून पाठविलेल्या, भयंकर जळजळीत आहेत त्या मिरच्या). नंतर बारीक चिरलेल्या हिरव्या शेंगा टाकल्या. शेंगा तेलावर परतल्यामुळे भाजीत त्यांच्या स्वाद ही मस्त आला.  त्या थोड्या परतल्यावर, हळद, तिखट (झणझणीत पाहिजे असेल तर ३-४ चमचे ही चालतील), २ चमचे धने पूड, १ चमचा गोड  मसाला टाकला. नंतर बारीक चिरलेले टमाटर आणि पनीरचे तुकडे त्यात टाकले. (पनीरचे तुकडे कापत असताना ते ५० ग्रम कमी झाले, कसे कळले नाही).   चवीनुसार मीठ ही त्यात टाकले. गॅस मध्यम करून ४-५ मिनिटांसाठी झाकण ठेवले. नंतर त्यात शिमला मिरची मिसळी. पुन्हा २ मिनिटे झाकण ठेवले आणि गॅस बंद केला. (शिमला मिर्च जास्ती शिजवली तर तिचा स्वाद बिघडतो).

भाजी खरोखरच मस्त आणि झणझणीत झाली होती.  जेवण झाल्यावर चिरंजीवाने बाजारातून आणलेल्या खास अमूल मिक्स फ्रुट आईसक्रिमला कापून फादर्स डे साजरा केला. (अमूलच्या मिक्स फ्रुट आईसक्रिमचा स्वाद चांगला आहे, लहान मुलांना निश्चित आवडेल).

 

Saturday, June 20, 2015

मी आणि परी

गेल्या दोन-तीन महिन्यांपासून कार्यालयात घडणाऱ्या घटनांमुळे मी भयंकर तणावात होतो. कश्यात ही मन लागत नव्हते. प्रचंड उन्हाळ्यामुळे प्रकृती वर-खाली होत होती. निराशा मनात घर करू लागली होती. अचानक ती चिमुकली परी माझ्या आयुष्यात आली आणि सर्वच बदलले.  गेल्या महिन्याचीच गोष्ट, संध्याकाळी घरी आलो. उन्हाळा असल्यामुळे  सांयकाळी सात वाजता ही भरपूर उजेड होता.  तसे म्हणाल तर परी  आमच्या शेजारीच राहते.  आपल्या आई सोबत ती पहिल्यांदाच  घरी आली होती. मला  पाहताच त्या चिमुकलीने दादा  (आजोबा) म्हणून  हाक मारली. का कुणास ठाऊक. कदाचित! गतजन्मीचे ऋणानुबंध असतील. गंमत म्हणून तिला विचारले, अपने दादा के पास आओगी.  सहजा-सहजी कुणाकडे न जाणारी ती परी पटकन माझ्या कडेवर आली. तिच्या आईला ही आश्चर्य वाटले. 

आजकाल दररोज संध्याकाळ  सात- आठच्या सुमारास मी कधी ही घरी पोहचतो. मी घरी पोहचल्याच्या १५-२० मिनिटातच तिची दारावर थाप ऐकू येते.  मला ही आश्चर्य वाटते,  परीला  कसे कळते मी घरी पोहचलो ते. दार उघडल्या बरोबर आपल्या लटपटत्या पायांनी दुडदुड धावत  दादा-दादा म्हणत सरळ माझ्या अंगावर येऊन धड्कते. तिच्या पायातल्या पैजणांच्या रुणझुण आवाज ऐकल्यावर, माझ्या शरीरात ही एक चैतन्य संचारते. दिवसभराचा  थकवा आणि तणाव क्षणात दूर होतो.  माझा हात पकडून लटपटत जिने चढत मला गच्ची वर  घेऊन जाते. एकदा गच्ची पोहचल्यावर आमचा  चोर-शिपायाचा खेळ सुरु होतो.  दमल्यावर पुन्हा आम्ही जोडी खाली येते.  तिच्या साठी खास काजू आणून ठेवले आहे.  ते  काजू कुठल्या डब्ब्यात आहे. तिला पक्के ठाऊक झाले आहे. दादा खाऊ (तिच्या बरोबर मी मराठीतच बोलतो. आणि तिला कळते ही). डब्बा तिच्या जवळ दिल्यावर मोजून ४-५ काजू आपल्या हाताने काढून मला देते.  नखरेल एवढी कि एक-एक करून काजू तिला भरवावा लागतो.  तीही गुणी मुलासारखे  शांतीने काजू खाते. पण  शेवटचा काजू तिच्या तोंडात  भरवताना न चुकता ती खट्याळ, शैतान  आपल्या सळसळत्या दातांनी कडकडून चावा घेते.  तिच्याकडे डोळे वटारून बघितल्यावर,  आपले  डोळे बंद करून, नाक मुरडीत नुकतेच निघालेले दात दाखवत इतक्या  जोरात हसते.  काय म्हणावे, तिला रागवताच येत नाही.  आजकाल तर परीने माझ्या शरीरावरच  कब्जा केला आहे असे म्हंटले तरी गैर नाही.  कधी पोटावर बसून तबला वाजवते, तर कधी  पाठीवर चढून जोरात केस ओढते. रागवल्या बरोबर तिचे खट्याळ मुली सारखे हसणे. संध्याकाळचा तासभराचा वेळ कसा निघून जातो कळतच नाही. (त्या मुळे आजकाल लिहायला ही वेळ मिळत नाही).

गेल्या रविवारी सकाळी भुरका-भुरका पाऊस सुरु होता. नेहमीप्रमाणे आमची जोडी गच्ची वर पोहचली. परी प्रथमच वादळाने भरलेले आकाश पाहत होती. आकाशाकडे आश्चर्याने पाहत, आपल्या इवल्याशा हातात पावसाच्या छोट्या-छोट्या थेम्बाना गोळा करत आनंदाने खिदळू  लागली. माझ्या अवती-भवती  पाय जमिनीवर  आदळत परी  नृत्य करू लागली.  तिच्या पैंजणाचा रुणझुण आवाज, त्यात पावसाचा हलका मृदू स्वर.  स्वर्गीय दृश्य होते. तिचे ते नृत्य पाहून मोराला ही लाज वाटली असती.  खरंच! पाऊस आल्याबरोबर, सर्व सृष्टी आनंदित होते. सर्वत्र चैतन्याचा संचार होतो. परी ही त्याला अपवाद कशी ठरणार.  पावसाचा जोर थोडा वाढला. मी परीला कडेवर उचलले, आणि म्हणालो परी चला खाली, जास्त वेळ पावसात भिजलो आणि तुला सर्दी पडसे झाले तर तुझी ममा मला मारेल. ममा मारेल, हे शब्द ऐकल्यावर, ती इतक्या जोरात हसली कि काय सांगू, कदाचित कल्पना करत असेल, ममा, दादाला मारणार, कसे दृश्य असेल ते. 

 कधी कधी मला वाटते, निराशाच्या गर्तेतून मला बाहेर काढण्यासाठीच तर  देवाने  परी बरोबर माझी भेट घडविली असेल.  एखाद दिवस जर ती घरी आली नाही तर माझे मन बैचैन होऊन जाते. पण काही ही म्हणा, तिच्या संगतीत आजकाल  माझा वेळ मस्त जातो.  



एक दिवसाची गोष्ट - सोनेरी किरणे

अस्ताचालच्या सूर्याचे सोनेरी किरणे सर्वत्र पसरली होती.  मनात म्हंटले, उद्या उगविणाऱ्या सूर्याची किरणे ही सोनेरीच असणार.  संहार आणि सृजनाची दोन्हीची साक्षी ही सोनेरी किरणे