Sunday, September 27, 2026

अश्मन्वती नदी आणि जीवनाची नौका

 

अश्मन्वती नदी आणि जीवनाची नौका

 

वेदवाणी सांगते, "

 

अश्मन्वती रीयते सं रभध्वम् उत्तिष्ठत प्र तरता सखायः।

अत्रा जहाम ये असन्नशेवाः शिवान् वयमुत्तरेमाभि वाजान्॥"

(ऋग्वेद 10.53.8)

 

अडथळे कितीही आले, तरी प्रवाह पुढे वाहतो,

साथी हातात हात धरुनी, नवा प्रकाश जीवनात येतो।

दुर्गुण सारे दूर सारुनी, सत्यपथावर चालू या,

एकजुटीने विजय मिळवू, नवे जीवन घडवू या!

 

अर्थात दगडांनी भरलेली ही नदी वेगाने वाहत आहे. हे सख्यांनो! एकमेकांचा हात धरा, उठा, आणि हिला पार करा. हे केवळ एका भौतिक नदीचे वर्णन नाही, हे आपल्या जीवनाचेच प्रतीक आहे. खडकाळ नदीचा प्रवाह तीव्र आणि तीक्ष्ण असतो. तिला पार करताना पाय जखमी होतात, लोक जखमी होतात, आणि कधी कधी बुडून प्राणही गमावून बसतात.

 

अगदी असेच हे संसाररूपी नदी सुद्धा आहे. यामध्ये विषय-वासनारूपी दगड विखुरलेले आहेत. जो यांमध्ये गुंततो, त्याला सुख नाही, केवळ दुःखच हाती लागते. मोह, लोभ, अहंकार हे सर्व त्या नदीचे तीक्ष्ण दगड आहेत, जे प्रत्येक पावलावर आपल्याला रक्तबंबाळ करण्यास सज्ज असतात.

 

आपले जीवन एका नौकेसारखे आहे, आणि या नौकेत अनेक छिद्रे आहेत -,अधर्माचे छिद्र, अन्यायाचे छिद्र, छल-कपटाचे छिद्र, द्वेषाचे छिद्र, अत्याचाराचे छिद्र, विषय-वासनेचे छिद्र, मोह-माया आणि मत्सराचे छिद्र, लोभाचे छिद्र, अहंकाराचे छिद्र, क्रोधाचे छिद्र तसेच अज्ञानाचे छिद्र. आजच्या डिजिटल युगात तर एक नवीन छिद्र - क्षणिक टीआरपी आणि लाइक्स मिळवण्याच्या लोभापायी तरुण वर्ग खोट्या आणि शिवीगाळयुक्त पोस्ट सोशल मीडियावर करतो, ज्या समाजात द्वेष आणि भ्रम पसरवतात. काही दिवसांतच पोलिस केस दाखल होते, अटक होते आणि तुरुंगाच्या गजाआड जावे लागते. या क्षणिक मोहामुळे वर्षानुवर्षांच्या मेहनतीने घडलेले करिअर क्षणार्धात मातीमोल होते. हीच आजची छिद्रे आहेत, जी आपल्या जीवन-नौकेला हळूहळू बुडवत आहेत. जर ही छिद्रे वेळीच भरली गेली नाहीत, तर ही नौका मध्यभागीच बुडेल. जसे एक लहानसे छिद्रही मोठ्या नावेला बुडवू शकते, तसेच एकही दुर्गुण आपल्या संपूर्ण जीवनाला अंधारात ढकलू शकतो.

 

जीवनरूपी नौकेला या तीव्र प्रवाहातून कोणताही एकटा व्यक्ती पार लावू शकत नाही. ज्याप्रमाणे नदी पार करण्यासाठी एखाद्या अनुभवी नाविकाची किंवा मार्गदर्शकाची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे जीवनाची ही नदी पार करण्यासाठी मार्गदर्शक गुरूचा आधार अनिवार्य आहे. गुरूच्या मार्गदर्शनाशिवाय, आपण भरकटू शकतो, कोसळू शकतो, आणि कधीच पैलतीरी पोहोचू शकत नाही.

 

म्हणून वेद आपल्याला आवाहन करतात, "सं रभध्वम्": हात मिळवा, संघटित व्हा. "उत्तिष्ठत": आळस त्यागून उठून उभे राहा. "प्र तरत": आणि मिळून या जीवनरूपी नौकेला पैलतीरी न्या. एकटा व्यक्ती बुडू शकतो, परंतु संघटित समाज गुरूच्या मार्गदर्शनाखाली, दुर्गुणांचा त्याग करून, सत्य, धर्म, प्रेम आणि सहकार्याने या छिद्रांना भरू शकतो आणि आपली नौका सुदृढ बनवू शकतो. तेव्हाच आपली जीवनरूपी नौका निश्चितपणे पैलतीरी पोहोचू शकते, जिथे शांती आहे, सुख आहे आणि खरे जीवन आहे.

 

No comments:

Post a Comment