ऐन्द्रं सानसिं
रयिं सजित्वानं सदासहम्। वर्षिष्ठमूतये भर॥
(ऋषी: मधुच्छंदा वैश्वामित्र, देवता:
इंद्र, ऋग्वेद १.५.३)
हे इंद्रा, हे बलशाली परमेश्वरा!
आम्हांला असे धन प्रदान कर, जे केवळ संग्रहासाठी नसून आमच्या
रक्षणासाठी, पुष्टीसाठी, नित्य
उपयोगासाठी आणि उत्कर्षासाठी कारणीभूत ठरेल. ते धन शत्रूंचे आघात परतवणारे,
प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवून देणारे आणि जीवनाला वैभवाकडे नेणारे
असावे, अशी हृदयस्पर्शी प्रार्थना ऋषी मधुच्छंदा या ऋचेतून करतो.
केवळ तीन ओळींच्या या ऋचेत ऋषींनी धनाचे तत्त्वज्ञान अत्यंत मार्मिकपणे मांडले
आहे. धन म्हणजे नुसता आकडा नव्हे; ते रक्षण
(सुरक्षा), पुष्टी (आरोग्य), स्थैर्य
(सातत्यपूर्ण उपयोगिता) आणि समृद्धी (उत्कर्ष), या चार
स्तंभांवर उभे असले तरच त्याला खरा अर्थ प्राप्त होतो. हजारो वर्षांपूर्वीची ही
दृष्टी आजही तितकीच प्रस्तुत आहे, किंबहुना आजच्या
स्पर्धात्मक जगात अधिकच निर्णायक ठरते.
जगात धनवानालाच लोक कुलीन, विद्वान
आणि गुणवान समजतात. पण शास्त्र याहून खोल सत्य सांगते, "धर्मस्य मूलम् अर्थः, सुखस्य मूलं धर्मः।" अर्थ हा धर्माचा पाया आहे आणि धर्म हा सुखाचा
आधार. महाभारतातील विदुरनीतीही हेच अधोरेखित करते- निरुपयोगी धन हे भाराप्रमाणे
आहे; ते सत्कारणी लागले तरच त्याला अर्थ प्राप्त होतो.
म्हणूनच धनाचा तिरस्कार करणे जितके अज्ञानाचे लक्षण आहे, तितकेच
त्याचा अंदाधुंद संचय करणेही अधर्माचे लक्षण आहे. खरी शहाणपणाची कसोटी आहे — धन कशासाठी
आणि कसे वापरले जाते, हेच या ऋचेतून ऋषींनी स्पष्ट केले
आहे.
१. रक्षणासाठी धन- सुरक्षा हाच पहिला स्वधर्म: आचार्य चाणक्यांनी
अर्थशास्त्रात स्पष्टच म्हटले आहे, "कोशमूलो दण्डः", म्हणजे सामर्थ्यशाली सैन्य आणि दंडनीतीचे मूळ कोशातच
(राजकोषातच) असते. ज्या राष्ट्राकडे संपत्ती आहे पण संरक्षणसिद्धता नाही, ते राष्ट्र वैभवशाली दिसले तरी असुरक्षित असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी
स्वराज्याच्या तिजोरीतील मोठा वाटा जलदुर्ग, आरमार आणि
गडकोटांच्या उभारणीत गुंतवला. तीच
दूरदृष्टी आज 'सुरक्षा प्रथम' या
धोरणाचा पाया ठरते.
आधुनिक उदाहरण याहून बोलके आहे. आखाती अरब देशांनी तेलसंपत्तीतून अफाट वैभव
मिळवले, पण संरक्षण-सिद्धता व स्वदेशी
तंत्रज्ञानाकडे दुर्लक्ष केल्याने इराणसारख्या शेजाऱ्याच्या क्षेपणास्त्र
हल्ल्यांपुढे त्यांना हतबल व्हावे लागले. रोज
हजारो कोटींचे नुकसान सोसावे लागत आहे. उलट, इस्रायलने अल्प
भूभाग व मर्यादित साधनसंपत्ती असूनही आपले धन संशोधन, तंत्रज्ञान
आणि संरक्षणात गुंतवले आणि 'आयर्न डोम'सारख्या प्रणालींद्वारे अस्तित्व टिकवले.
भारतानेही हाच धडा आत्मसात केला आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली 'आत्मनिर्भर भारत' आणि 'मेक इन इंडिया' अंतर्गत स्वदेशी तेजस लढाऊ विमाने,
ब्रह्मोस क्षेपणास्त्रे, आकाश प्रणाली आणि
ड्रोन तंत्रज्ञानात मोठी गुंतवणूक झाली. याचे मूर्त फळ म्हणजे २०२५ मधील ऑपरेशन
सिंदूर— पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्याला उत्तर म्हणून
भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर केलेली निर्णायक कारवाई. यात नौदल, थलसेना आणि वायुसेना यांचा समन्वय, स्वदेशी
शस्त्रसज्जता आणि राजकीय इच्छाशक्ती स्पष्ट दिसली, आणि
भारताने अणुधमकीलाही बळी न पडता दहशतवादाविरोधात 'न्यू
नॉर्मल' धोरण जगासमोर मांडले.
२. पुष्टीसाठी धन- आरोग्य हीच खरी संपत्ती: संस्कृत सुभाषित
म्हणते, "शरीरमाद्यं
खलु धर्मसाधनम्", शरीर हेच सर्व साधनांचे मूळ साधन आहे. निरोगी प्रजा हीच
राष्ट्राची खरी संपत्ति आहे. कौटिल्याने अर्थशास्त्रात राजाचे प्रथम कर्तव्य 'योगक्षेम' (प्रजेचे कल्याण) सांगितले आहे. "प्रजासुखे
सुखं राज्ञः, प्रजानां च हिते हितम्", प्रजेच्या
सुखातच राजाचे सुख सामावलेले आहे. सम्राट अशोकाने आपल्या शिलालेखांतून मनुष्य आणि
पशूंसाठीही औषधालये, विहिरी व रस्ते उभारल्याचा उल्लेख आढळतो.
हे प्राचीन भारतातील 'पुष्टी'च्या तत्त्वज्ञानाचे मूर्त रूप होते.
आधुनिक भारतात याच परंपरेचा विस्तार दिसतो. आयुष्मान भारत योजनेद्वारे
कोट्यवधी गरीब कुटुंबांना मोफत आरोग्यसेवेची हमी मिळाली, नवीन वैद्यकीय महाविद्यालये आणि एम्ससारख्या संस्था उभ्या
राहिल्या, प्राथमिक आरोग्य केंद्रे बळकट झाली आणि डिजिटल
हेल्थ मिशनने आरोग्यसेवा तळागाळापर्यंत पोहोचवली. कोविड काळात भारताने स्वतःच्या
नागरिकांना लसीकरण देतानाच जगातील १०० हून अधिक देशांना 'वॅक्सिन
मैत्री' अंतर्गत मदत केली. हे दाखवते की योग्य दिशेने वापरलेले धन केवळ
स्वतःची नव्हे, तर संपूर्ण मानवतेची पुष्टी करते.
३. सातत्याने उपयुक्त ठरणारे धन- ज्ञान व तंत्रज्ञानातील गुंतवणूक: तक्षशिला
आणि नालंदा या प्राचीन विद्यापीठांत राजाश्रयाने उभारलेले ज्ञानभांडार शतकानुशतके
जगाला मार्गदर्शन करत राहिले. हे सिद्ध करते की ज्ञानात गुंतवलेले धन कधीही क्षीण
होत नाही, उलट पिढ्यानपिढ्या फळ देत राहते. आधुनिक
जगात जपानचे उदाहरण याहून समर्पक आहे. दुसऱ्या महायुद्धातील उद्ध्वस्ततेनंतरही
जपानने आपले उरलेसुरले धन उद्योग, संशोधन व शिक्षणात ओतले
आणि काही दशकांतच जगातील अग्रगण्य अर्थव्यवस्था म्हणून उभे राहिले.
भारतानेही डिजिटल इंडिया, स्टार्टअप
इंडिया, नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP २०२०) आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), सेमीकंडक्टर
मिशन, अंतराळ तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांत मोठी
गुंतवणूक केली आहे. चांद्रयान-३ च्या यशस्वी चंद्र-दक्षिण ध्रुव लँडिंगने हे सिद्ध
केले की मर्यादित खर्चातही योग्य नियोजनाने जागतिक स्तरावरचे तांत्रिक यश मिळवता
येते. यामुळेच भारत आज जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम आणि वेगाने
वाढणारी डिजिटल अर्थव्यवस्था बनला आहे। हे धन खऱ्या अर्थाने 'सदासहम्' म्हणजे सदैव उपयोगी ठरणारे आहे.
४. वाढ आणि समृद्धी आणणारे धन: चाणक्यांनी
अर्थशास्त्रात राजाला विद्या (शिक्षण), योगक्षेम (कल्याण) आणि दंड (सुरक्षा) या तीन आघाड्यांवर धन खर्च करण्याचा
उपदेश दिला कारण यातूनच राष्ट्राची खरी वाढ साधली जाते. गुरुकुल पद्धती, आयुर्वेद आणि राज्यसंरक्षण यांत गुंतवलेले धन हेच प्राचीन भारताच्या
समृद्धीचे रहस्य होते.
आजच्या भारताने या प्राचीन नीतीला आधुनिक चौकट दिली आहे. शिक्षणात NEP २०२०, आरोग्यात आयुष्मान भारत,
संरक्षणात आत्मनिर्भर भारत आणि तंत्रज्ञानात डिजिटल इंडिया व AI
मिशन. या चतुःसूत्रीतून लाखो युवकांना रोजगार, कोट्यवधी नागरिकांना आरोग्यसेवा आणि राष्ट्राला आर्थिक व सामरिक बळ मिळाले
आहे. मधुच्छंदा ऋषींनी जे धन "वर्षिष्ठम्" (अत्युत्तम) आणि उत्कर्षाला
नेणारे मागितले, त्याचेच प्रत्यंतर आजच्या भारताच्या
वाटचालीत दिसते.
ऋग्वेदातील ही ऋचा एक राष्ट्रनीतीच
आहे. रक्षण, पुष्टी, सातत्य आणि समृद्धी- या चार आधारस्तंभांवर उभे असलेले धनच खऱ्या अर्थाने "इंद्रदत्त"
ठरते. इतिहास साक्षी आहे, ज्या राष्ट्रांनी संपत्तीला केवळ उपभोगाचे साधन मानले, ती कालौघात लयाला गेली; आणि ज्यांनी
तिला रक्षण, आरोग्य, ज्ञान व समृद्धीचे
माध्यम बनवले, ती चिरकाल तेजाने तळपत राहिली. आजचा भारत
त्याच सनातन दृष्टिकोनाला आधुनिक तंत्रज्ञान व धोरणांची जोड देत, मधुच्छंदा ऋषींच्या त्या पुरातन प्रार्थनेला नवा अर्थ देत आहे.
No comments:
Post a Comment