Wednesday, December 27, 2023

इच्छापूर्ती

स्वामी त्रिकालदर्शी आपल्या गुहेत ध्यानस्थ बसले होते. २५ वर्षाचे युवा व्यापारी धर्मदेव स्वामींच्या दर्शनार्थ आले. आपली समस्या स्वामींच्या पुढे मांडत धर्मदेव म्हणाले, माझ्या वडिलांचा मृत्यू असमय झाला. त्यांची इच्छा व्यापारातून मिळालेल्या फायद्याचा अधिकांश भाग समाजसेवेसाठी खर्च करायची होती. पण गेल्या काही वर्षांपासून व्यापारात सतत तोटा होत असल्याने, ईच्छा असूनही ते समाजसेवा करू शकले नाही. वडिलांच्या मृत्यू  समयी  त्यांच्या समस्त इच्छा पूर्ण करण्याचे मी वचन दिले आहे. त्यांच्या एवढ्या इच्छा कश्या पूर्ण करू हेच मला कळत नाही. स्वामीजी धर्मदेव कडे पहात  हसत-हसत म्हणाले, त्यांच्या सर्व इच्छा तू सहज पूर्ण करू शकतो. स्वामीजींनी धर्मदेवला एक कान मंत्र दिला.

पुढील २० वर्षांत धर्मदेव यांनी वडिलांच्या स्मृतीत अनेक शाळा, कॉलेजेस अनाथाश्रम, वृध्दाश्रम बांधले. एक मोठे चॅरीटेबल हॉस्पिटल ही बांधले. कोट्यवधी  रुपये दरवर्षी ते यासाठी खर्च करतात. एकदा एका पत्रकाराने त्यांना याबाबत प्रश्न विचारला, तुम्ही कोणताही व्यापार, धंधा,  उद्योग करत नाही, मग हे सर्व तुम्हाला कसे काय जमते. धर्मदेव म्हणाले ही सर्व भगवंताची कृपा आहे. स्वामी महाराजांनी मला कान मंत्र दिला आणि हे सर्व साध्य झाले. पत्रकाराने विचारले स्वामीजींनी तुम्हाला कोणता कानमंत्र दिला होता. "स्वामीजींनी मला भगवंताचे भव्य मंदिर उभारण्याचा आदेश दिला आणि म्हणाले भगवंत तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील". आपली सर्व जमापूंजी आणि व्यापार विकून मी इच्छापूर्ती करणाऱ्या भगवंताचे भव्य मंदिर बांधले. मी भगवंताची सेवा करतो आणि भगवंताने माझ्या स्वर्गीय वडिलांच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या.  




No comments:

Post a Comment