Monday, September 4, 2023

वार्तालाप (२९): बिना हिशोबाचा व्यापार


लिहणें न येंता व्यापार केला. 
कांही एक दिवस चालिला.
पुसतां सुरनीस भेटला.
तेव्हां खोटे.

समर्थ रामदास म्हणतात व्यवसाय करताना त्याचा लिखित हिशोब ठेवला नाही तर व्यवसाय फक्त काही दिवस चालेल. जेंव्हा सुरनीस (हिशोब तपासनीस) हिशोब तपासायला येईल तेंव्हा व्यवसाय तोट्यात चालला आहे, हे कळेल. ही ओवी वाचल्यावर आपल्याला हेही कळते त्याकाळी ही समर्थांना व्यवसायांची आर्थिक हिशोब लिखित ठेवण्याचे महत्त्वही माहीत होते.

सरकार असो किंवा मोठे व्यवसाय हिशोब तपासणी ठेवतातच, त्या शिवाय त्यांना गत्यंतर नाही. पगारदार आणि छोट्या व्यवसाय करणाऱ्यांना ही स्वतः हिशोब ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्याला सर्व जमा-खर्च लक्षात राहतो या मानसिकतेतून मुक्त होणे गरजेचे आहे.  एखाद्याने गल्ली-बोळ्यात जरी दुकान उघडले तरी त्याला किमान ५० ते  १०० वस्तू  विकायला ठेवावी लागतात. जर दुकानदार प्रत्येक वस्तूचा खरीद- विक्रीचा हिशोब ठेवणार नाही तर किती माल दुकानात भरायचा आहे हे  कळणार नाही. दुकानातील कर्मचारी/ ग्राहकांनी चोरी केली तरी कळणार नाही. काही वस्तू दुकानात एकत्र होत राहतील आणि त्यांची एक्सपायरी डेट निघून जाईल. हिशोब न ठेवण्याने खर्चावर नियंत्रण राहणार नाही. व्यवसायातील नफा-तोटा करणार नाही. घर खर्चासाठी किती पैसा दुकानातून घ्यायचा हेही कळणार नाही. गल्ली-बोळ्यात नवीन उघडलेली किमान अर्धी दुकाने वर्षाच्या आत बंद होतात त्याचे मुख्य कारण लिखित हिशोब न ठेवणे आहे. 

पगारी नोकरदारालाही खर्चाचा हिशोब ठेवावा लागतो. त्यानुसार महिन्याचे बजेट बनवावे लागते. तो तसे करणार नाही तर महिना पूर्ण होण्या आधीच पगार संपून जाईल. दुकानदाराची उधारी करावी लागेल. मित्रांकडून पैसे उसने घ्यावे लागतील. मित्रांनी मना केल्यावर सावकार कडून व्याजावर पैसे उसने घ्यावे लागतील. क्रेडिट कार्डचा हिशोब चुकता करणे अशक्य होईल आणि पठाणी व्याज द्यावे लागेल. महिना दर महिना हे कर्ज वाढतच जाईल.  त्याला कर्जातून बाहेर पडणे शक्य होणार नाही आणि शेवटी त्याला घरदार ही विकावे लागेल.
 
आजच्या ऑनलाईन आणि क्रेडिट खरिदीच्या जमान्यात जमा-खर्चाचा लिखित हिशोब ठेवणे अत्यंत गरजेचे आहे कारण तसे नाही केले तर दोन-चार महिन्यातच तुम्ही कर्जाच्या जाळ्यात अटकणार, हे निश्चित. असो.


No comments:

Post a Comment