Sunday, October 30, 2016

काहीच्या काही - मधु आणि मधुमाशी


मला मधुमाश्यांची भयंकर भीती वाटते. कारण हि तसेच आहे, बालपणीची गोष्ट १२-१३ वर्षांचा असेल. दिल्लीच्या बिर्लामन्दिराच्या मागे असलेल्या जंगलात मित्रांसोबत फिरत होतो. अचानक समोरून मधुमाश्यांचे भले मोठे सैन्य चालून येताना दिसते.  कुणीतरी बहुधा त्यांची खोड काढली असावी. पण मधुमाश्यांच्या न्यायच अजब, गुन्हेगार कुणी का असेना, जो समोर दिसेल त्याला डसा. जीव मुठीत घेऊन पळालो. बहुधा उसेन बोल्टचा रिकार्ड सुद्धा मोडला असेल. ओलम्पिक असते तर नक्कीच सुवर्णपदक मिळाले असते. तरीही शरीरावर कित्येक ठिकाणी मधुमाश्यांच्या चुंबनांचे वेदानामयी काटे उमटलेच.  या घटनेनंतर एखाद दुसरी मधुमाशी दिसली तरी अंगावर काटे येतातच. 

कालचीच गोष्ट सकाळी-सकाळी अंगणातल्या झेंडूंच्या फुलांना पाहत होतो. एक मधुमाशी चेहऱ्याजवळ घोंघावत आली चक्क मानवी आवाजात म्हणाली, 'ए थेरड्या' बघतोस काय, समोरची बादली उचल आणि फुलांवर पाणी घाल. क्षणभर मी गोंधळलोच, काय करावे सुचेनासे झाले. ती पुन्हा ओरडली 'मुकाट्याने पाणी फुलांवर टाकतो, कि दाखवू इंगा'. बालपणीची आठवण जागी झाली. दचकून म्हणालो, घालतो बाबा, पण एक सांग फुलांवर पाणी कशाला घालायचे. मुर्खा एवढे कळत नाही, फुल पाण्यात भिजले कि त्यातले परागकण हि भिजतील. भिजलेले पराग पियुन मला 'पातळ आणि भरपूर मधु' बनविता येईल.  स्वस्त असे पातळ मधु विकून आमचा मालक हि चांगली कमाई करेल. 

काही इलाज नव्हता, मुकाट्याने फुलांवर पाणी घालू लागलो. अचानक दुसर्या दिशेने दुसरी मधुमाशी वेगाने येताना दिसली. जवळ येऊन तीही ओरडली, पांढरेकेस वाल्या, ते पाणी घालणे थांबव आधी. मला काही समजेनासे झाले, पहिल्या मधुमाशी कडे बघितले, दुसरी जोरात ओरडली, 'कळत नाही का, फेक ती बादली. मी चुपचाप पाण्याची बादली खाली ठेवली. हिम्मत करून तिला विचरले,  ती फुलांवर  पाणी घालायला सांगते आणि तू पाणी घालू नको म्हणते, का? हा काय प्रकार आहे.  दुसरी मधुमाशी म्हणाली, वाळक्या फुलांच्या पराग पिऊन मी चांगले घट्ट असे मध बनविते. हिच्या सारखे, मधात पाण्याची भेसळ नाही करीत. आमचा मलिक दर्जेदार घट्ट मध विकतो. मी फुलांना पाणी घालणे थांबविले आहे, हे पाहून पहिल्या मधुमाशीला राग आला, ती माझ्यावर जोरात डाफरली, फुलांच्या वर पाणी घालतो कि नाही थेरड्या कि तुला शिकवू धडा? दुसरी तेवढ्याच त्वेषाने ओरडली, तिचे ऐकू नको, माझ्या दंश तिच्यापेक्षा जालीम आहे. काय करावे मला सुचले नाही, शेवटचा मार्ग पाण्याची बादली खाली ठेऊन खोलीच्या दिशेने धूम ठोकली. कानावर फक्त ऐकू आले, पळतो आहे हरामखोर, सोडणार नाही तुला. 

आई...ई, करत जोरात ओरडलो. डोळे चोळीत उठलो. सौ. पण  दचकून जागी झाली. काय झाले?  मी म्हणालो, बहुतेक मधुमाशी डसली वाटते. सौ.ने काही नाराजगीने माझ्याकडे बघितले आणि म्हणाली, इथे बंद खोलीत कुठून मधुमाशी येणार, डास चावले असतील. काहीच्याबाही विचार करत राहतात आणि असले भुक्कड स्वप्न तुम्हाला पडतात. माझी हि झोपमोड होते. बाय द वे चावली कुठे? मी म्हणालो, चावली नाही ग. गालाचे चुंबन घेतले. सौ. पुढे काही बोलली, नाही चुपचाप अंगावर पांघरून घेऊन, पाठ फिरवून झोपून गेली. स्वत:ला मनोमन दाद दिली, बायकांची बोलती बंद करायचा चांगलाच अनुभव आहे, अस्मादिकांना. 

सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे फिरायला गेलो. येताना ओळखीच्या किरणाच्या दुकानासमोर थांबलो. समोर रेकवर मधाच्या बाटल्या ठेवलेल्या दिसत होत्या, चाचपत-चाचपत हळूच त्याला विचारले, हे मध पातळ वाले आहे, कि घट्टवाले?  त्याने विचित्र नजरेने मजकडे पाहिले आणि तेवढ्याच हळू आवाजात विचारले, अंकल, आज सुबह सुबह ही.... डोक्यावर हात मारला..च्यायला मधुमाशींच्या चक्करमध्ये येऊन मद्य.ssपी ठरलो (काका, मद्याला शिवत सुद्धा नाही, हे आता कुणाला खरे वाटेल). 

डिस्क्लेमर: या कथेचा विज्ञापनांशी काही एक संबंध नाही. 

अवध कुमार (आजचा राम) आणि क्षत्रिय धर्म



अवधी भाषा म्हणजे, आदर, आतिथ्य आणि विनम्रतेची लखनवी तहजीब. 'पहले आप म्हणत' गाडी निघून गेली तरी चालेल. पण दुसर्याला महत्व देण्यात लखनवी माणूस कधीच कमी पडणार नाही. ज्या अवधमध्ये पराया लोकांना एवढा मान दिला जातो, तिथे वडिलधार्यांची विनंती म्हणजे जणू देवाचीच आज्ञा.  संत तुलसीदासांनी श्रीरामाचे चरित्र याच अवधी भाषेतच लिहिले. वडीलधार्यांची आज्ञा 'प्राण जाये पर वचन न जाये' या परंपरेला अनुसरून श्रीरामांनी आनंदाने वनवास स्वीकारला. पण तो काळ त्रेता युगातला होता. 

आज कलयुग आहे, आजचा राम वडिलधार्यांच्या आदेशाचे पालन करेल का?  श्रीराम काही विरोध न करता गुपचूप  वनात  का निघून गेले? कुणी त्यांना अन्यायचा विरोध करण्यासाठी प्रवृत्त का नाही केले? इत्यादी अनेक प्रश्न मनात आले. रामायण उघडून बघितले, त्या वेळीही श्रीरामांचे हितचिंतक सल्लागार होते. त्यांनी श्रीरामाला अन्यायाचा विरोध करण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला. या सल्लागारांचे म्हणणे होते,  वृद्धावस्था प्राप्त झाल्यावार राजाने आपल्या ज्येष्ठ पुत्राचा राज्याभिषेक करून वनात निघून जावे हाच क्षत्रिय धर्म आहे.  ज्येष्ठ पुत्र जर क्षत्रिय धर्मानुसार वागत नसेल तरच कनिष्ठ पुत्राचा सिंहासनासाठी विचार केला पाहिजे. श्रीरामाने असला कुठलाही अपराध केला नाही, सदैव क्षत्रिय धर्माचे पालन केले.  केवळ कनिष्ठ पत्नी कैकयी मध्ये आसक्त होऊन, तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी ज्येष्ठ पुत्र श्रीरामांना वनात धाडणे म्हणजे अधर्मच. क्षत्रिय धर्म म्हणतो, अधर्माने वागणाऱ्या म्हातार्या बापाला कारावासात बंदिस्त करणे किंवा त्याचा वध करण्यात काहीच गैर  नाही. श्रीरामांनी क्षत्रियधर्म काय सांगतो, याचा यत्किंचित हि विचार केला नाही. सहर्ष  वनवास स्वीकारला.   

आज पुन्हा अवधचा राजकुमार धर्मसंकटात पडलेला आहे. म्हातारा झालेला बाप आणि वडीलधारी मंडळी ज्येष्ठ पुत्राला त्याच्या इच्छेनुसार राज्य करू देत नाही आहे. राजाच्या राजकारभारात ढळवा-ढळवी करणे, क्षत्रिय धर्मानुसार अधर्मच. प्रश्न एकच आजचा राजकुमार श्रीरामांप्रमाणे वडीलधार्यांच्या आदेशाचे पालन करेल कि अन्यायाविरुद्ध विद्रोह करेल. 

त्रेता युगानंतर, द्वापर युग झाले. द्वापरयुगात कृष्णाने अर्जुनाला गीतोपदेश करताना म्हंटले, क्षत्रिय धर्म रक्षणासाठी, अधर्मी स्वकीयांचा वध करणे म्हजे धर्म. श्रीकृष्णाचा उपदेशाला अनुसरून अर्जुनाने तीक्ष्ण बाणांनी स्वकीयांचा वध केला. क्षत्रियधर्माचे रक्षण केले अर्थात राजपद प्राप्त केले. 

आज अवधकुमारच्या एका हातात रामायण आहे आणि दुसर्या हातात महाभारत. एक मार्ग गादीपासून दूर करणारा, काही वर्षांसाठी वनवासात जाण्याचा आणि  दुसरा मार्ग  राजपद प्राप्ती साठी रस्त्यात येणाऱ्या समस्त कंटकांना दूर करण्याचा, त्यात स्वकीय हि आलेच. 

अवधकुमार पुढे काय करणार यावर सर्वांची नजरे आहेत. रामायणाचा आदर्श कि महाभारतातल्या अर्जुनाचा आदर्श. वडीलधार्यांची आज्ञा पालन करणे अथवा क्षत्रिय धर्माचे पालन.   किंवा ते असे काहीतरी करतील ज्याने कवींना कलयुगात नवीन ग्रंथाची रचना करण्याची प्रेरणा मिळेल. 

Thursday, October 20, 2016

हिमाचली पदार्थ - भटुरे (कणकीचे भटुरे)



भटुरे नाव ऐकल्यावर  मैद्याचे  छोले भटुरे आठवतील. पण हिमाचलच्या मंडी जिल्ह्यात सक्रेणादेवीच्या मंदिराजवळ असलेल्या गावात भटुरे बनविण्यासाठी  मैद्याच्या जागी कणकीचा वापर होतो. बहुतेक सकाळी नाश्त्यासाठी हे भटुरे केले जातात.  या भटुरर्यांचे वैशिष्ट्य म्हणजे  हे भटुरे तळून किंवा तव्यावर भाजून केले जातात.  (भटुरे बनवितानाचे फोटो खाली दिलेले आहे, कुणाचा चेहरा दाखविणार नाही या अटीवर फोटो काढले होते). मैद्याच्या भटुरर्या सारखे हे भटुरे पण फुलतात. आपल्या मराठमोळ्या पोळी एवढे मोठे पण दुप्पट जाड नक्कीच असतात. आपण आपल्या पद्धतीने भटुर्यांचा आकार निश्चित करू शकतो. चित्रावरून भटुरे कसे बनतात याचा अंदाज घेता येईल. 



साहित्य: एक पेला कणिक, अर्धी वाटी उडीत डाळ, अर्धी वाटी चणा डाळ, आले १/२ इंच, लसूण १०-१२ पाकळ्या, मिरची २-३, अर्धा चमचा काळी मिरी, १/२ चमचा जीरा पावडर. स्वादासाठी *कोथिंबीर आणि मीठ. गोडे तेल आवश्यकतानुसार. हिमाचल मध्ये सरसोंचेच तेल वापरतात (*या भागात भाबरी नावाची झुडूपा सारखी वनस्पती असते. भाबरीला कढीपत्या सारखे छोटी-छोटी पाने असतात. भाबरीच्या पानांना एक प्रकारचा सुगंध असतो. भाबरीचा प्रयोग चटणी सारखा किंवा पकौडे इत्यादींचा स्वाद वाढविण्यासाठी केला जातो. भाबरीच्या काळ्या रंगांच्या बियांचा हि वापर स्वादासाठी केला जातो. गावात खालेल्या भटूर्यात भाबरीच्या पानांचा आणि बियांचा वापर केला  होता. शहरात भाबरी बाजारात मिळणार नाही.  त्या जागी कोथिंबीर वापरता येईल). 

कृती:   उडीत डाळ आणि  चणा डाळ, रात्रीच भिजवून ठेवायची.  सकाळी कणिकत खमीर मिसळून कणकीला भरपूर मळावे किमान दहा एक मिनिटे. नंतर मळलेल्या कणकीला खमीर उठण्यासाठी एक ते दीड तास झाकून ठेवा.  


सारण बनविण्यासाठी मिक्सरमध्ये, रात्र भर  भिजलेली  उडीत डाळ, चणा डाळ आले, लसूण, मिरची, काळी मिरी, जीरा पावडर टाकून जाडसर पिसून घ्या. स्वादानुसार मीठ. (पाटा-वरवांट्यावर जाडसर पिसल्या जाते). खाताना आल आणि लसणाच्या तुकड्यांचा स्वाद जिभेला आला होता. 

कढईत तेल गरम झाल्यावर. कणकीच्या गोळ्यांची पारी करून त्यात सारण टाकून हाताने, किंवा पोळी सारखे लाटून भटुरा तैयार करून, मध्यम आचेवर तेलात तळून घ्या. ज्यांना तळलेले चालत नाही. एका तव्यावर थोडे तेल लाऊन मध्यम आचेवर वर भटूरे दोन्ही बाजूनी भाजून घ्या. हे भटुरे छोल्या सोबत खायला चांगले लागतात.  (हे भटुरे डाळींएवजी पनीर इत्यादी टाकून हि आपण करू शकतो. सारणात काय टाकायचे हे सर्वस्व आपल्यावर आहे.  कृतीत परंपरागत पद्धत दिली आहे).

(भाबरी)

हिमाचली पदार्थ - पोष्टिक आणि स्वास्थ्यवर्धक - झोल



सक्रेणादेवीचा फोटो 


Monday, October 17, 2016

चिव काऊची खोट्टी-खोट्टी गोष्ट


एक होती चिवताई इटुकली-पिटुकली. चिव-चिव करत आंगणात यायची, चिवताई ये दाणा खा, पाणी पी आणि भुर्रर्र उडून जा. आजी! चिवताई खरंच असते का? कशी दिसते?  हुशार ग माझी सोनुटली, तुझ्या  बाबांना सांगते, चिवताईचा फोटू आणायला.... एक होता काऊ, काळाकुट्ट, मोठे मोठे पंख, नेहमी चिवताईला त्रास द्यायचा. हा! हा! हा!, आजी किती ग!खोट्ट-खोट्ट बोलते तू, काऊ असते व्हाईट-व्हाईट, लांग-लांग टेल, मोठी-मोठी शिंग. बाबा म्हणतात, काऊचे दूध हेल्दी-हेल्दी, गोडंगोड. बाबा माझ्या साठी काऊचे दूधच आणतात. आजी ग, खोट्ट बोलणार्याला गाॅड, पनीशमेंट देतो. एक विचारू आजी, गाॅडने तुझे दात तोडले का? म्हणत सोनुटली तिथून पसार झाली. काहीही म्हणा, आमची सोनुटली भारी खोडकर, भारी हुशार. तिला मूर्ख बनविणे सौपे नाही, आजी मनातल्या मनात पुटपुटली. 

आजीने डोळे बंद केले. गावातले घर.. सोनुटली, आजीच्या मांडीवर बसलेली, चिव-चिव करीत आंगणात चिवताई आल्या, दाणे टिपू लागल्या. चिवताई ये दाणा खा, म्हणत सोनुटलीने हात उघडला, एक चिवताई आली, तिने सोनुटलीच्या तळहातावरचा दाणा टिपला आणि भुर्रर्र उडाली. आजी-आजी, चिवताईने दाणा टिपला म्हणत सोनुटलीने उडड्या मारीत जोरात टाळ्या वाजविल्या, आंगणातल्या चिमण्या चिव-चिव करीत उडाल्या. घाबरट कुठल्या, सोनुटली जोरात हसली.   

आजीने डोळे उघडले. ACवाल्या फ्लेटचे दार-खिडक्या सदैव बंद असतात. आंगणच नाही, तर चिवताई कुठून येणार... गोष्ट अर्धवटच राहिली. 

एक होती चिव, एक होता काऊ.  चिवचे घर होते मेणाचे, काऊचे घर होते शेणाचे, (असे फक्त गोष्टीतच असते).  एकदा काय झाSSले... जोरात पाऊस आला. काऊचे घरटे वाहून गेले .... मोठ्या शहरात वाहून गेली,... चिव-काऊची खोट्टी-खोट्टी गोष्ट .... 

Thursday, October 6, 2016

डॉक्टर ए.आर. शहाणे आणि श्राद्धाचा ब्राम्हण




नुकताच गेलेल्या  पितृपक्षातली गोष्ट. बर्याच महिन्यांनी मला माझा एक जुना मित्र भेटला. डॉक्टर ए.आर. शहाणे त्याचे नाव.  नावाप्रमाणेच अत्यंत हुशार. विषय कुठलाही असो, ज्ञान पाजायला नेहमीच उत्सुक. पण या वेळी त्याचा चेहरा  मरगळलेला होता.  मी विचारले कसली चिंता करतो आहे. तो म्हणाला तुला माहितच आहे, दरवर्षी मी पितरांना प्रसन्न करण्यासाठी ब्राम्हणाला घरी जेवायला बोलवितो, दान-दक्षिणा देतो. मी म्हणालो, त्यात एवढे उदास असण्याचे कारण काय. तो म्हणाला, गेल्या वर्षी हा ब्राम्हण पितृपक्षात घरी आला होता, जेवण झाले, दक्षिणा दिली. त्या वर त्याचे समाधान झाले नाही. जाताजाता माझ्या ५ वर्षाच्या मुलाच्या नाकावर मुक्का मारला आणि म्हणाला या वर्षी तुझ्या मुलाचे  नाक तोडले आहे पुढच्या वर्षी तुझ्या  मुलाची तंगडी तोडणार आहे.  मी म्हणालो, एक मुस्कटात का नाही लावली त्याला? तो उतरला, एक तर अतिथी आणि त्यात ब्राम्हण. कसा मारणार त्याला. मुलाला डॉक्टरकडे घेऊन गेलो, नाकाचे हाड तुटले होते, सर्जरी करावी लागली. मी म्हणालो, झाले गेले विसरून जा. आता त्या ब्राम्हणाला पुन्हा घरी बोलवू नको, इतरांना हि तसे करायला सांग.  चांगली अद्दल घडव त्याला. त्या वर तो म्हणाला, असे कसे करू शकतो, जुने संबंध आहेत, त्याच्या सोबत. त्याला वाळीत टाकणे केंव्हाही उचित नाही. येत्या रविवार मी त्यालाच घरी बोलविणार आहे. 

आता काय म्हणणार, अश्या उच्च शिक्षित विद्वान माणसाला. मी कपाळावर हात मारला, डोळ्यांसमोर, पायाला प्लास्टर बांधलेल्या अवस्थेत त्याच्या मुलाचा चेहरा डोळ्यांसमोर तरळला. 


टीप: ब्राम्हण  ???

Saturday, October 1, 2016

आतंकवाद अणि कठपुतली बाहुल्या (फ़िल्मी सितारे)


मला आठवते १९८०-९० दशकात मुंबईतल्या सिनेसृष्टीत '"दाऊद के इशारे के बिना यंहा पत्ता भी नहीं हिलता" अशी वाच्यता होती.  तस्करी आणि उगाही (वसूली)चा पैसा दाऊद सिनेसृष्टीच्या माध्यमातून दुसर्या धंद्यात वळवायचा. दाऊद सारख्या तस्कारांमुळे आपल्या देश्यातील कोटीपेक्षा जास्त तरुण नशेच्या आहारी गेले, हजारोंच्या संख्येने  अपराधी बनले, हे वेगळे. तरीही सिनेसृष्टीने दाऊदचे स्वागत केले. मोठे-मोठे मल्टी स्टारर् सिनेमे बनू लागले, त्यांत बहुतेक वसुली आणि तस्करीचा पैसाच लागत असे, अशी वाच्यता होती. नट आणि नट्यांना दाऊदच्या चरणी सर्वस्व अर्पित केल्याशिवाय सिनेसृष्टीत काम मिळत नाही, अश्या आशयाच्या गाॅसिप सिने पत्रिकांमध्ये वाचायला मिळायचे 

१९९३ साली मुंबईत बॉम्बस्फोट झाले. शेकडोंच्या संख्येत मुंबईत लोक मारल्या गेले. दाऊद फरार झाला.  आता वाटले होते, सिनेसृष्टीत दाऊदचा प्रभाव कमी होईल. पण तसे घडले नाही. दाऊदची पकड सिनेसृष्टीवर अधिक मजबूत झाली. देशप्रेम, स्वाभिमान इत्यादी विसरलेले, केवळ पैश्यांसाठी नट आणि नट्या परदेशात असलेल्या  दाऊदच्या चरणी नाक घासण्यात आणि दरबारात  ठुमके धन्यता मानू लागले. 

आता प्रश्न येतो आपली जनता आणि सरकार काय करत होती. दुसरा कुठलाही देश असता, तर अश्या कलाकारांवर सिनेसृष्टीत काम करण्यावर कायम बंदी टाकली असती किंवा आतंकवादीशी संबंध ठेवण्यासाठी त्यांना जेलमध्ये धाडले असते. (आपली सरकारने अश्या कलाकारांवर का कार्रवाई केली नाही, हेच समजत नाही).  जनतेने हि  अश्या कलाकारांचा बहिष्कार केला पाहिजे होता. पण असे घडले नाही. मुंबईचे वाघ म्हणविणार्या नेत्यांनी अश्या कलाकारांचा बहिष्कार करण्याच्या धमक्या वैगरे दिल्या होत्या असे ऐकिवात आहे.  बहुतेक त्यांच्या धमक्यांना दाऊद समर्थित सिनेसृष्टीने 'कुत्र्यांचे भुंकणे' याहून जास्त भाव दिला नसावा. ज्या मुंबईत शेकडों लोक मृत्युमुखी पडले, त्याच मुंबईत अनेक नेता किंवा दरबारात ठुमके लावणारे दाउदच्या आशीर्वादाने निवडणूक जिंकले अश्याही वाच्यता आहेत. (उत्तर प्रदेशातील  गवर्नर श्री  राम नाईक यांनी तर उघडपणे आरोप लावले आहेत).  

यानंतर हि मुंबईत अनेक आतंकवादी घटना  घडल्या.  २००८च्या हल्ल्यात जनतेसोबत अनेक पोलीस अधिकारी हि मारल्या गेले. तरीही कराचीत बसलेल्या दाऊदचे नियंत्रण आपल्या सिनेसृष्टीवर कमी झाले नाही. आता तर पाकिस्तानी कलाकार हि सिनेसृष्टीत दिसू लागले.  पण भारतात काम करीत असताना, इथे घडणाऱ्या आतंकवादी घटनांचा विरोध त्यांनी कधीच केला नाही.  विषयांतर होईल, पण मला आठवते, अलिबाबा चालीस चोर मधले चोर हि ज्या घरात दरोडा टाकायचा असेल त्या घरातले मीठ खात नसे. इथले  मीठ खाऊन हि, इथल्या आतंकवादी घटनांचा जर पाकी कलाकार  विरोध करीत नाही,  तर त्यांना इथे काम देण्यात काय अर्थ. खरे म्हणाल तर सिनेसृष्टीने जी मुंबईमध्ये आहे निदान त्यांनीतरी पाकी कलाकारांवर १९९३ नंतरच बहिष्कार टाकायला पाहिजे होता. आपल्या दुर्दैवाचे कारण असलेल्या दाऊदच्या कठपुतली कलाकारांना डोक्यावर घेऊन नाचणारी मुंबईकर/ देशातील सिनेप्रेमी जनतेला काय म्हणावे.   

आज काश्मिरात आपले सैन्याचे जवान शहीद झाले.  आपल्या देशाचे मीठ खाणार्या पाकी कलाकारांनी या घटनेची निंदा केली नाही. उलटपक्षी पाकिस्तानांत परतून, आपल्या देशाची निंदाच केली, असे ऐकिवात आहे. अश्या पाकी कलाकारांचा बहिष्कार करण्याएवजी, सिनेमा सृष्टीतील सर्व मोठे कलाकार, पाकिस्तानी कलाकारांचे समर्थन करीत आहे. कारण स्पष्ट आहे, हे सर्व कलाकार आतंकवादी मालकाच्या इशार्यावर नाचणाऱ्या बाहुल्या आहेत. पाकी कलाकारांसोबत अश्या बाहुल्यांचा हि बहिष्कार आपल्या सिनेसृष्टीने/ आपण केला पाहिजे, हीच आपल्या शहीद  सैनिकांना खरी श्रद्धांजली असेल.