Tuesday, August 30, 2016

आई: प्राणापेक्षा प्रिय बाळ



लहानपणी एक बोध कथा वाचली होती. कथेचा सार होता, माणूस मुळातच स्वार्थी आहे.  आई सुद्धा आपले प्राण वाचवायला आपल्या बाळाची बळी देऊ शकते. कथा होती, एक माकडीण नदीच्या एका बेटावर होती. अचानक पाणी वाढू लागले. तिला काय करायचे हे उमजेना. तिने आपल्या पिल्याला उचलून काळजाशी धरले. पण पाणी सतत वाढतच होते. तिने माणसासारखे उभे राहून आपल्या पोराला डोक्यावर ठेवले. पण पाणी काही वाढायचे थांबेना. तिच्या डोक्यावरून पाणी जाऊ लागले. अखेर आपला जीव वाचविण्यासाठी तिने आपल्या पोराला  आपल्या पायाखाली ठेवले.  आपल्याच अपत्याचे बलिदान देऊन तिने आपला प्राण वाचविला. कथेचा सार होता, जेंव्हा प्राणावर बेतते, तेंव्हा आई सुद्धा आपल्या अपत्यांचा त्याग करते.  खंर म्हणाल तर मला हि कथा कधीच पटली नाही. 

थोडा मोठा झाले, डिस्कव्हरी वाहिनीवर जनावरांवर आधारित मालिका पाहताना कित्येकदा अनुभव आला, आपल्या पिल्लांना वाचविण्यासाठी लहानशी हरिणी सुद्धा हिंस्त्र पशूंची झुंज देते. एकदा तर एका डुक्करीने आपल्या अपत्यांना वाचविण्यासाठी, आपल्या प्राणांची  आहुतीही दिल्याचे बघितले.  काही लोकांचे म्हणणे आहे, जनावरांना बुद्धी नसते. जगण्याचा आनंद म्हणजे काय हे त्यांना माहित नसते म्हणून जनावरांची आई आपल्या पिल्लांच्या रक्षणासाठी कधीच स्वत:च्या प्रांणांची पर्वा करीत नाही. 

कधी-कधी वर्तमानपत्रांत वाचायला मिळते. आपल्या मुलांना विष देऊन आईने आत्महत्या केली. मानवीय आई तर जनावरांच्यापेक्षा जास्त बुद्धिमान. ज्या अपत्यांना स्वत:च्या गर्भात वाढविले आहे, ती त्यांचा  प्राण कसा घेऊ शकते. आईला तर तिचे बाळ प्राणापेक्षा प्रिय. काय कारण असेल? प्रत्येक माणसाला भविष्यात पुढे काय ठेवले आहे, याची थोडीफार कल्पना असतेच. आपल्या पोरांचे लालन-पालन करण्यास असमर्थ आईला, आपल्या मुलांना भुकेने तडफडताना बघविले नाही, किंवा हिंस्त्र मानवीय जगापासून आपल्या अपत्यांचे रक्षण करण्यास असमर्थ राहिल्यामुळे कदाचित तिने  हे टोकाचे पाऊल उचलले असेल. 

दोन दिवस आधी सोशल मिडीया वर एक आई आपल्या बाळाला  बदडते आहे, असा विडीयो फेसबुक इत्यादी वर दिसू लागला. माझा एक मित्र म्हणाला या कलयुगात आई सुद्धा दुष्ट असते. आई आणि दुष्ट, मला त्याचे विधान पटले नाही. मी त्याला म्हंटले, बहुतेक सासरच्या जाचांना कंटाळून, मानसिक संतुलन हरवलेली स्त्री असे करू शकते. अन्यथा कुठलीही आई आपल्या बाळाला मारू शकत नाही. 

कालच टीवीवर एक बातमी बघितली.  नौका विहार करताना, एका स्त्रीचा बाळ सरोवरात पडला. आपल्या बाळाला वाचविण्यासाठी तिने पाण्यात उडी घेतली.  स्वत: पाण्यात बुडाली, पण एक हात उंच करून कितीतरी वेळ तिने आपल्या बाळाला पाण्याच्या वर ठेवले.  तिचा बाळ वाचला, पण तिला वाचविता आले नाही. तिने स्वत:हून मृत्यला कवटाळले, आपल्या बाळाला वाचविण्यासाठी.  तिने पुन्हा सिध्द केले, आई जनावरांची असो वा माणसाची, आपल्या बाळाच्या रक्षणार्थ स्वत:च्या प्राणांची आहुती द्यायला सदैव तैयार असते. 

Sunday, August 28, 2016

थोडी गूढ कथा -पिकनिक




मनोज आणि मोनिका व त्यांची दोन मुले,  राहुल वय साडेतीन वर्ष आणि रोहित २ वर्ष. एक छोटासा सुखी महानगरीय परिवार.  पण मोनिकाला एकच खंत होती. गेल्या चार वर्षापासून एकदाही मनोज आणि मोनिकाला एकत्रित सिनेमा पाहायला किंवा कुठे फिरायला जाणे जमले नव्हते. दिल्लीतल्या त्या प्रसिद्ध मल्टीप्लेक्स सैराट हा सिनेमा लागला होता. मनोजला कसे हि करून बायको सोबत सिनेमा बघायचा होता. कारण एकच, दोघांचाहि घरच्यांच्या इच्छे विरुद्ध प्रेम विवाह होता. 

म्हणतात न "जहाँ चाह वहाँ राह". गेल्या रविवारची गोष्ट. मनोज मोनिकला म्हणाला. आज आपण सिनेमा बघायला जाऊ. मोनिका, या दोन शैतानांचे काय करायचे,  सिनेमा बघू देतील हे.  मनोज: आपण दोघे राजाराणी सारखे मस्त सिनेमा बघू. राहुल आणि रोहितची काळजी तू करू नको. मी बघून घेईन. 

ऑटोत बसून मनोज परिवारासह त्या प्रसिद्ध माॅल वर पोहचला. मॉल मध्ये असलेल्या मल्टीप्लेक्स वर सैराट लागलेला होता. त्याच फ्लोर वर एक बालवाडी होती. तिथे लहान मुलांचे भरपूर खेळणे होते. घोडागाडी, गाडी, कार, घसरगुंडी, विडीओ गेम्स, टीवी वर सुरु असलेल्या कार्टून फिल्म्स अर्थात लहानमुलांना आवडणाऱ्या सर्व गोष्टी होत्या. स्कर्ट घातलेल्या सुन्दर सुन्दर दीदी ही होत्या. हे सर्व पाहून राहुल जाम खुश झाला. मनोज राहुलला म्हणाला, आम्ही परत येत पर्यंत तू आणि रोहित मस्त पैकी इथे खेळ. भूक लागली कि दीद खायला हि देईल. तो पर्यंत आम्ही फिरून येतो. बाबा तुम्ही का नाही इथे थांबत राहुल म्हणाला. बेटा इथे फक्त लहान मुलेच खेळू शकतात. तुला गाडी चालवायची होती न. आपल्या घरात तर जागा नाही. तू इथे मनसोक्त गाडी चालव. रोहितवर हि थोड लक्ष ठेव. काही लागल कि  या दीदीला  सांग. आम्ही येतोच. 

मुलाना बालवाडीत सोडून मनोज आणि मोनिकाने सैराट सिनेमाचा आनंद घेतला. घरी परतल्यावर, मनोज, मोनिकाला म्हणाला, बघ तुझ्या नवर्याची शक्कल. आता तर म्हण, हुशार आहे तुझा नवरा. मोनिका हि गालात हसली. आपल्या बायकोला खुश पाहून मनोज म्हणाला, पुढच्या रविवारी आपण बुद्ध गार्डनला जाऊ, लग्नापूर्वीच्या गमती-जमती करू. मोनिका: तुझ्या जिभेला काही हाड आहे कि नाही. मनोज: लग्नाआधी तूच म्हणायची 'देखने वाले जलते हैं तो जलते रहे'.  तेंव्हा तर लग्न हि नव्हते झाले, आता तर लायसेन्स आहे. मला सध्या तुझ्याशी बोलायला वेळ नाही, म्हणत मोनिका स्वैपाकघरात घुसली. मनोज मात्र जाम  खुश होता. मुलांना बालवाडीत खेळण्यासाठी सोडून आपण मौज करू शकतो. हे त्याला कळले होते. 

रात्रि मोनिकाने बघितले, राहुल झोपताना कण्हत होता. काय झाले राहुल, तिने विचारले.  राहुलने आपल्या पायाकडे बोट दाखविले.  त्याच्या पायावर सूज आलेली होती. राहुल घसरगुंडीवरून पडला होतो. मोनिकाने विचारले, राहुल आधी का नाही सांगितले, बालवाडीवाल्यांना जाब विचारला असता. राहुल उतरला, आई, तिथली दीदी  म्हणाली, तुझ्या आई-बाबांना सांगू नको, नाही तर ते तुला इथे खेळायला येऊ देणार नाही. आई मला गाडी चालवायला आवडते. आता मोनिका का काय बोलणार. तिला सिनेमा बघायचा होता, मौज करायची होती म्हणून तिने मुलांना खेळाचे लालच दिले होते.????? 


टिप: पात्र कळले तर गूढ  हि कळेल. 


Saturday, August 20, 2016

एका चिमण्याची गोष्ट.


(काही दिवसांपूर्वी वादळी वार्यासह झालेल्या पाऊसात एक झाड जमिनीवर उन्मळून पडलेले दिसले. सहज निरखून पहिले, एक चिमणा हि जमिनीवर पडलेला दिसला. मनात विचार आला, कसे गेले असेल त्याचे आयुष्य .... 



वासंतिक वार्यात एका अनामिक गंधाने बैचैन होऊन चिमण्याणे घरट्यातून उड्डाण भरली. आकाशात विहरताना त्याला  त्याची चिवताई भेटली. दोघांनी एका दुसर्याकडे पहिले. चिमण्याला पाहून चिवताई गालात हसली. जणू जादूच  झाली. क्षणभरातच  ते  जगाला विसरले.  एका दुसर्याच्या पंखात पंख घालून आकाशात विहार करू लागले.  आकाशात विहरताना त्यांना  एक वडाचे झाड दिसले.  वडाच्या झाडने हि पाने हलवीत त्यांचे स्वागत केले. वडाच्या झाडाच्या एका फांदीवर त्यांनी एक घरटे बांधले.  अश्यारितीने चिमणा चिमणीचा  संसार सुरु झाला.

पण संसार काही पोरखेळ नव्हे. कित्येकदा वादळामुळे त्यांचे घरटे नष्ट झाले. चिवताईने दिलेली अंडी नष्ट झाली. तर कधी-कधी आकाशात उडणार्या ससाण्याची नजर त्यांच्या घरट्यावर पडली. डोळ्यांदेखत त्यांच्या छोट्या पिल्लांची कत्तल झाली. सर्व संकटांमध्ये एका-दुसर्याची साथ देत मोठ्या जिकरीने चिमणा संसाराची गाडी पुढे रेटू लागला. शेवटी त्यांच्या प्रयत्नांना यश आले. चिमण्याचे घरटे पिल्लांच्या चिव-चिवने गुंजायमान झाले. चिमणा दूर-दूर जाऊन पिल्लांसाठी जेवण घेऊन येत असे.  घरट्यात चिवताई हि  डोळ्यांत तेल घालून पिल्लांची देखरेख करीत असे.  पिल्लांच्या लालन-पालन करण्यात त्यांचा वेळ कसा गेला त्यांना हि कळले नाही. काळ पुढे सरकत गेला. त्यांची पिल्ले मोठी झाली. त्यांना पंख फुटले.  शेवटी त्यांच्या अथक कष्टाचे फळ त्यांना मिळाले, असे चिमण्याला वाटले. 

असेच एका वासंतिक दिवशी त्यांची पिल्ले  घरटे सोडून नेहमीसाठी  उडून गेली.  आता घरट्यात चिमणा आणि चिवताई दोघेच उरले.  संसाराच्या कडू आणि गोड त्यांच्या सोबत होत्या. एक दिवस अचानक चिवताई हि चिमण्याला नेहमीसाठी सोडून गेली. 

वडाचे झाड हि आता म्हातारे झाले होते. झाडाचा बुंधा हि वाळवींनी पोखरून टाकला होता. उरल्या होत्या फक्त काही वाळक्या फांद्या. सर्व पक्षी झाडाला सोडून निघून गेले होते.  फक्त चिमणाच त्या झाडावर उरला होता.  एक दिवस वडाचे झाड चिमण्याला म्हणाले, तू हि येथून निघून जा, माझा काही भरवसा नाही. पावसाळा जवळ येऊन ठेपला आहे, आकाशात विजा चमकतात आहे.  या वयात  वादळ-वार्या समोर माझा टिकाव लागेल, काही सांगता येत नाही. चिमणा म्हणाला, याच झाडावर माझी पिल्ले लहानाची मोठी झाली. झाडाच्या फांदी-फांदीवर  संसाराच्या आठवणी दडलेल्या आहेत. चिवताईच्या सोबत घालविलेल्या सुखद आठवणी... कसा सोडून जाऊ मी तुला. 

त्याच रात्री जोरात वादळ आले, मुसळधार पाऊस सुरु झाला. झाड उन्मळून खाली पडले.  त्या सोबत चिमणा हि  खाली पडला.  त्याने डोळे बंद केले. दूर आकाशात चिमण्याची चिवताई  त्याला बोलवीत होती. किती वाट पहिली तुझी.... चिमणा तिच्याकडे बघून हसला आणि त्याने डोळे बंद केले.  काही क्षणात दोघे पुन्हा एका दुसर्याच्या पंखात पंख घालून आकाशात विहार करू लागले. कधी न विलग होण्यासाठी.....

Wednesday, August 17, 2016

सुवर्ण (पदक) मोह नसे आम्हासी -माया महा ठगनी हम जानी


(लेखाचा उद्देश्य कुणाच्या भावना दुखविण्याचा नाही. निखळ मनोरंजन म्हणून हा लेख वाचवा. )


संत कबीर दास यांनी म्हंटले आहे 'माया महा ठगनी हम जानी'. माया निरनिराळे मोहंक रूप घेऊन लोकांना ठगत राहते.  सुवर्ण तर मायाचे सर्वात मोहक आणि भयंकर रूप.  आपली सीता मैया बेचारी सुवर्ण मृगाच्या मोहात अटकली. बेचार्या रामाने कितीही समजावले तरी तिने ऐकले नाही (बायका कधी नवर्याचे ऐकतात का?).  लंकेचा राजा रावण हि सोन्यासारखी सुंदर स्त्री अर्थात सीता मैयाला पाहून मोहित झाला. परिणाम सुवर्ण लंका जाळून खाक झाली. हजारोंच्या संख्येत राक्षस, वानर मारल्या गेले. रामाने हि राक्षसांच्या संहार करून परत मिळविलेल्या सीतेला वनात सोडून दिले. कुणाच्याच हाती काही लागले नाही.  झाला फक्त विनाश. 

अर्जुन रथारूढ होईन कुरुक्षेत्रच्या मैदानात उतरला. दूरवर पसरलेले शत्रू सैन्य दिसत होते. या सैन्याचा संहार करून अर्जुनाला सुवर्णजडित सिंहासनावर बसायला मिळणार होते. अर्जुनाने बाण धनुष्यावर चढविला, अचानक त्याच्या मनात विचार आला, खरंच सुवर्ण सिंहासन एवढे महत्वपूर्ण आहे कि ज्यासाठी आपल्याला बंधू-बांधव सहित अक्षोहणी सैन्याचा संहार केला पाहिजे.  अर्जुनाची सद्विवेक बुद्धी जागृत झाली, तो मोहापासून दूर झाला. त्याने धनुष्य जमिनीवर ठेवले.  द्वारकेचा राजा कपटी कृष्ण हा अर्जुनाचा सल्लागार होता. त्याने अर्जुनाला म्हंटले, राज्य मिळाले तर शरीरावर सुवर्ण हि धारण करायला मिळेल. सुवर्णासाठी आप्त असो वा बंधू त्यांना मारण्यात काहीच गैर नाही.  भौतिक जगात सुवर्णच हे सत्य आहे.  तू याच  सुवर्ण धर्माचे पालन कर आणि पृथ्वीवर राजसी सुख भोग. अर्जुन पुन्हा सुवर्णाच्या मोहात अटकला. आपल्या तीक्ष्ण बाणांनी लक्षावधी शत्रू सैन्याला यमसदनी पाठविले.  म्हणतात १८ अक्षोहिणी सैन्य युद्धात मारल्या गेल. शेवटी पांडव सुवर्ण परिधान धारण करून सुवर्णजडित सिंहासनावर आरूढ झाले. सुवर्णाच्या मोहापायी १८ अक्षोहिणी सैन्याचे रक्त पृथ्वीवर सांडले. लाखों स्त्रिया विधवा झाला. एका संपूर्ण पिढीचा विनाश झाला. भारतातील इतिहासातला महाभयंकर विनाश. 

रामायण आणि महाभारत काळापासून हजारों वर्ष लोटली, तरीही आपण भारतीय अजूनही सुवर्णाच्या मोहातच अटकलेले आहोत. जगातील सर्वात जास्त सुवर्ण भारतातच आहे. या साचलेल्या सुवर्णापायीच विदेशी लुटेरे भारतात आले. अमानुष अत्याचार येथील जनतेवर केला. जर सुवर्ण नसते, तर लुटेरे इथे कशाला आले असते. एवढे असूनही आपला सुवर्ण मोह काही कमी होत नाही. प्रधान मंत्री म्हणतात, सुवर्ण बँकेत ठेवा, बँक व्याज हि देईल. तरी हि कुणी सुवर्ण बँकेत ठेवायला तैयार नाही. प्रत्येकांनी सुवर्ण आपल्या छातीशी कवटाळून धरले आहे. घरात चिल्ला-पिल्ल्याना प्यायला दूध नसेल, पण शरीरावर सुवर्ण पाहिजे.   

रियो ऑलम्पिक मध्ये आपली नेमबाज कुमारी धनुष्यावर बाण चढवून सज्ज होती. नेम भेदला कि सुवर्ण मिळणार. अचानक अर्जुनाप्रमाणे तिची सद्विवेक बुद्धी जागृत झाली. तिच्या मनात प्रश्न आला, खरंच सुवर्ण जिंकणे महत्वपूर्ण आहे का? काय मिळणार हे सुवर्ण पदक जिंकून. आधीच भारतभूमीवर भरपूर सुवर्ण आहे. आणखीन जिंकून काय करायचे. सुवर्णापायीच युद्ध होतात. विनाश होतो. सुवर्ण पदकाच्या मोहात पडले नाही पाहिजे. या कलयुगात तिला पुन्हा सुवर्णाच्या मोहात पाडू शकेल, असा गीतोपदेश देणारा कृष्ण हि  नव्हता. सामाजिक न्यायावर विश्वास करणाऱ्या भरतखंडात तिचे लालन पालन झाले होते. तिने विचार केला, या छोट्याश्या सुवर्ण पदकाची आपल्यापेक्षा इतर देशांना जास्त गरज  आहे. तिने सुवर्णाचा मोह टाळला. एका स्थितिप्रज्ञ प्रमाणे जय-पराजया पासून ती विरक्त झाली. लोक म्हणतात तिचा नेम चुकला, तिला सुवर्ण पदक मिळाले नाही. तरीही आपली नेमबाज आनंदी होती. अर्जुनाप्रमाणे ती मोहात अटकली नाही. तिचाच आदर्श डोळ्यांसमोर ठेऊन, आपल्या स्थितिप्रज्ञ खेळाडूंनी सुवर्ण पदकांचा मोह टाळला. मोह आणि प्रसिद्धीच्या मायावी जाळ्यात ते अटकले नाही. असो. 


माया महा ठगनी हम जानी
तिरगुन फांस लिए कर डोले 
बोले मधुर बानी.

Saturday, August 13, 2016

भगवान बुद्ध, राजू गाईड आणि ईरोम शर्मिला




(नुकतीच बातमी वाचली, ईरोम शर्मिलाने १६ वर्षांपासून सुरु असलेले उपोषण तोडले. तिच्या घरच्यांनी आणि  तिच्या चाह्त्यांनीच  तिचा विरोध केला. अचानक मला गाईड सिनेमातल्या राजू गाईडची आणि भगवान बुद्धाची आठवण आली )

ज्ञान प्राप्तीसाठी भगवान बुद्ध कठोर तपस्या करत होते. उग्र तपस्येमुळे त्यांचे शरीर हाडांचे पिंजर झाले.  पण त्यांना ज्ञान प्राप्ती झाली नाही. वीणेची झंकार ऐकून त्यांना जगण्याचा मार्ग सापडला. सुजाताच्या हातची खीर प्रश्न करून ते ध्यानमग्न झाले. त्यांना ज्ञान प्राप्त झाले.  ज्ञानप्राप्ती साठी आणि ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी शरीर हे गरजेचेच. म्हणूनच म्हंटले आहे, 'शरीर माध्यम खलु धर्म साधनं'. भगवान बुद्धाचे शिष्य प्रज्ञावान होते, तपस्या अर्धवट सोडली म्हणून त्यांनी आपल्या गुरुचा बहिष्कार नाही केला,अपितु गुरु कडून प्राप्त झालेल्या ज्ञानाचा प्रकाश  जगभर पसरविला. असो. 

राजू गाईडच्या अंगावर भगवे वस्त्र पाहून, भोळ्या-भाबड्या ग्रामस्थांनी त्याला महात्मा समजून त्याचे स्वागत केले. शहरी जीवनातले छक्के-पंजे जाणणारा राजू , ग्रामस्थांच्या नजरेत एक ज्ञानी महात्मा ठरला.  दूर पर्यंत त्याची प्रसिद्धी पोहचली. राजू मुफ्तचा  माल उडवीत मजेत जगत होता. पण 'जगात काहीच मुफ्तमध्ये मिळत नाही, एक दिवस त्याची किंमत मोजावीच लागते'. गावात दुष्काळ पडला, भयंकर दुष्काळ. गावात पूर्वी हि एकदा असा असा भयंकर दुष्काळ पडला होता, तेंव्हा एका महात्म्याने इंद्रदेवाला प्रसन्न करण्यासाठी उग्र तपस्या केली होती.  आपले महात्मापण टिकविण्यासाठी राजूला हि तपस्येला बसावे लागले. भुकेने त्याचा जीव कासावीस झाला, पळून जाण्याची इच्छा झाली. पण ज्या प्रमाणे कोळीच्या जाळ्यात अटकलेला कीटक तडफडून मरतो, तसेच आपल्याच महात्म्या रुपी प्रभामंडळात अटकलेला राजू हि उपासमार होऊन मरतो. सिनेमाच्या शेवटी पाऊस पडतो. पण  प्रत्यक्षात असे होत नाही. कित्येक बळीराजांनी आत्महत्या केली तरी इंद्र्देवाचे  हृदय पाझरताना कधी बघितले नाही. कुणी तपस्या केली कि इंद्रदेव प्रसन्न होत नाही, त्या साठी गोवर्धन पर्वतच उचलावे लागते

आपले निश्चित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ईरोम शर्मिला हि १६ वर्ष आधी उपोषणाला बसली. तिला उपोषणाची प्रेरणा महात्मा गांधींपासून मिळाली होती. पण तिला एक माहित नव्हते. महात्मा गांधी एक चतुर राजनेता होते. उपोषण त्यांचे एक शस्त्र होते.  या उपोषण रुपी शस्त्राचा किती आणि कसा वापर करायचा याची त्यांना चांगली कल्पना होती. त्यांनी या शस्राचा वापर नेहमीच योग्य रीतीने केला आणि आपले हेतू साध्य केले. पण ईरोम ठरली भोळी-भाबडी. तिचा वापर करणार्यांनी तिच्या भोवती एक प्रभामंडळ तैयार केले.  ती त्या प्रभामंडळात अटकली. 

आता एकच प्रश्न डोळ्यांसमोर येतो. कुणी १६ वर्ष उपाशी राहू शकतो का? उत्तर नाही. सरकारने तिला इस्पितळात बंदिस्त ठेवले होते.  तोंडाच्या जागी नाकातून तिला अन्नद्रव्य दिले जात होते.(तांदूळ, भाज्या, डाळ इत्यादी). रुग्णांसाठी असलेली सुविधा तिच्यावर वापरल्या जात होत्या. अर्थात ती उपाशी नव्हती. तिला जिवंत ठेवण्यासाठी सरकारचा भरपूर पैसा हि बरबाद झाला.  तिच्या उपोषणातला फोलपणा निश्चित ईरोमला  हि कळत असेलच.  पण ती हि राजू गाईडप्रमाणे स्वत:निर्मित प्रभामंडळ रुपी जाळ्यात अटकलेली होती आणि तिला त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग सापडत नव्हता. इस्पितळात राहून नाकाने अन्नद्रव्य ग्रहण करण्या अतिरिक्त ती काहीही करू शकत नव्हती. शेवटी हिम्मत करून तिने आपल्या भोवती असलेले प्रभामंडळ तोडले. नाकाच्या जागी तोंडातून जेवण घेण्याचा निश्चय केला. पण घरी आणि गावात तिचे कुणीच स्वागत  केले नाही. कारण तिचा वापर करणारे तिच्या विरुद्ध झाले होते .  तरीही मी तिची हिम्मतीची प्रशंसा करेल. अन्यथा असेच तडफडत तिचे जीवन व्यर्थ गेले असते. 

भगवान बुद्धाने देशभर भ्रमण करून, आपल्या शिष्यांना दूरदेशी पाठवून, धर्माचा प्रसार केला होता.   ईरोम शर्मिला हि या  १६ वर्षांत देशभर फिरून ASFPA (अफ्सपा) विरुद्ध जनजागृती करू शकत होती.   कदाचित  तिच्या प्रयत्नांना यश हि आले असते.   १६ वर्ष तिने व्यर्थ घालविले.   पण म्हणतात ना 'देर आये दुरुस्त आये'.  भारतीय प्रजातान्त्रिक व्यवस्थेवर विश्वास ठेऊन तिने निवडणूक लढविण्याचा निश्चय केला  आहे.  तिचा हा निर्णय निश्चितच योग्य आहे. 















Thursday, August 11, 2016

अंधविश्वास भाग (४) सुखाचा शोध




अंधविश्वास - (भाग १) -अंधविश्वास म्हणजे काय?


समर्थांनी  म्हंटले  आहे  'जगी सर्व सूखी असा कोण आहे, विचारे मना तूचि शोधून पाहे'. तरी हि प्रत्येक व्यक्ती सुखाचा शोधात असतो. कधी कधी सुख मिळविण्यासाठी तो शार्टकट मारण्याचा प्रयत्न करतो आणि 'अंधविश्वासाच्या' जाळ्यात अटकतो.

सामान्य माणसाची सुखाची कल्पना - इच्छित वस्तू मिळाली पाहिजे, घरात लक्ष्मी आली पाहिजे इत्यादी इत्यादी. अगदी छोट्या छोट्या. सदाशिव अर्थात सदूला हि आर्ची आवडायची आणि आर्चीला परश्या. आता आर्चीला परश्यापासून दूर करून तिला कसे पटवायचे याच विचारात सदू सदैव मग्न राहायचा.  सदूला पोहता येत नव्हते, परश्या सारखी विहरीत उडी मारून आर्चीला इम्प्रेस करणे त्याला शक्य नव्हते. झिंगाट डान्स हि त्याला येत नव्हता.  घरात कार असती तर सदूने आर्चीला म्हंटले असते 'आजा मेरी गाडी में बैठ जा'. पण काय करणार घरात गाडी तर सोडा दुचाकी हि नव्हती. एक दिवस त्याने वर्तमान पत्रात जाहिरात पाहिली 'वशीकरण मंत्र देणारे बंगाली बाबा'. कशीबशी ५०० रुपयांची व्यवस्था करून  बंगाली बाबाला पाठविले. एक पुडा त्याचा घरी पोस्टाने पोहचला. सदूने उघडून बघितले त्यात एक पुडी होती. सोबत एका कागदावर लिहिले होते, यातला अंगारा इच्छित मुलीच्या डोक्यावर घालून मंत्र म्हणा, ती मुलगी तुमच्या मागे धावत येईल. मैत्रिणींच्या घोळक्यात आर्ची उभी होती, सदू जवळ गेला हिम्मत करून अंगारा तिच्या डोक्यावर फेकला आणि ओम फट स्व:हा म्हंटले. हा विचित्र प्रकार पाहून, आर्चीचा पारा चढला. सदू सटकण्या आधीच तिने सदूला धरले आणि एक जोरदार थापड त्याच्या मुस्कटात हांडली. दुरून परश्या आणि त्याच्या मित्रांनी हा प्रकार पहिला. आर्चीला इम्प्रेस करण्याचा हाच  मौका. परश्याने हि सदूला यथेच्छ धुतला. बिस्तारावर पडल्या-पडल्या सदू बंगाली बाबाला शिव्या मोजतो आहे, पण आता त्याचा काय फायदा. सदूची  कालेजमध्ये  "नाक तर कापल्या गेलीच शिवाय तो करमणुकीचा विषय हि झाला".  वशीकरण मंत्र असो किंवा जारण-मारण मंत्र शेवटी याचा खरा फायदा बंगाली बाबांनाच होतो. याचा वापर करणाऱ्यांची दशा एक तर सदू सारखी होते किंवा प्रकरण जास्त बिघडले तर गजाआड हि जावे लागते. असो. 

पैश्या सोबत समाजात प्रतिष्ठा हि मिळते. आता पैसा कमविण्याचे दोन मार्ग आहेत. एक वाममार्ग- अर्थात चोरी-चकारी, दरोडा, लोकाना लुबाडणे इत्यादी. पण या मार्गात जान जोखीम मध्ये टाकावी लागते. पकडल्या गेल्यावर जेलची हवा हि खावी लागते. दुसरा मार्ग नौकरी-धंधा जे काही करायचे आहे त्याचे ज्ञान प्राप्त करणे आणि लक्ष्य प्राप्तीसाठी  अविरत मेहनत करणे. सदू सारख्या लोकांना यातले काहीच जमत नाही. मग तो पैश्यांचा पाउस पाडणाऱ्या बाबांच्या चक्कर मध्ये पडणारच आणि स्वत:चे नुकसान करून घेणार.    

समाजात चांगले सुशिक्षित लोक हि अंधविश्वासी असतात. फरक एवढाच हे लोक बंगाली  बाबांच्या एवजी  'जोतिष शास्त्रावर' विश्वास ठेवतात. असाच एक किस्सा आठवला. सरकार-दरबारात नौकरी करणार्या एका अत्यंत सज्जन शाकाहारी दाक्षिणात्य ब्राह्मणला आपल्या लग्नायोग्य मुलासाठी सुंदर, सुशिक्षित, नौकरी करणारी मुलगी पाहिजे होती. या माणसाचा जोतिष शास्त्रावर प्रचंड विश्वास. राहू कालात सरकारी फाईल हि बघायचा नाही. आता जी मुलगी मुलाला पसंद येत होती, तिच्या मार्गात राहू-केतू, शनी-मंगळ यायचे. असेच काही वर्ष निघून गेले. कंटाळून  मुलाने स्वत: मुलगी पटवली आणि कुणालाही न सांगता कोर्टात लग्न केले, ते हि परप्रांतीय आणि दुसर्या जातीच्या अखाद्य पदार्थ भक्षण करणार्या मुलीशी. आता तो मुलगा बापापासून वेगळा राहतो. ग्रह नक्षत्रांच्या चक्कर मध्ये मुलगा बापापासून नेहमीकरता  तुटला. 

सुखाचा शोध माणसाने घेतला पाहिजे. पण योग्य मार्गाने. अन्यथा  सदू सारखी गत होणारच. लक्ष्मी हि उद्यम प्रिय आहे. जो उद्यमी आहे त्यालाच ती प्राप्त होते. अन्य मार्गाने तिची प्राप्ती अशक्य आहे. वाममार्गाने हि तिची प्राप्ती होते, पण त्यासाठी कधी कधी मोठी किंमत हि मोजावी लागते. आर्चीचे परश्यावर प्रेम आहे. हे माहित असूनही सदूला  आर्ची हवी होती. हा सदूचा मूर्ख पणाच. सदूला जर माहित असते, जगात कुणाच्याच सर्व इच्छा कधीच पूर्ण होत नाही. हेच जगाचे सत्य आहे. सदूने आर्चीचा नाद सोडला असता.  

 

Monday, August 8, 2016

आवारा कृष्णमेघ आणि दिल्लीचे रस्ते


(मराठी सृष्टीत पूर्वप्रकाशित हि कथा अजून ब्लॉगवर अजून टाकली नव्हती. या पावसाळ्यात दिल्लीच्या रस्त्यांची दशा आणि देश्यात इतरत्र घडलेल्या घटना पाहून या लेखाची आठवण झाली. कथा काल्पनिक आहे, वास्तवाची काही एक संबंध नाही). 


दरवर्षी श्रावणात कृष्णमेघ  येतो व आपल्या प्रेमजलधारानी धरतीला गाढ़ आलिंगन देऊन चिम्ब भिजवितो. कृष्ण मेघाने धरतीला तसे वचनच दिले आहे. सुन्दर युवतीही या कृष्ण मेघाच्या प्रेमात पडतात आणि श्रावणी जलधारांचा मनसोक्त आनंद घेतात. जलधारांत भिजलेल त्यांच सौन्दर्य आणि गालात पडलेली खळी पाहून तरुणांचे ह्रदय घायाळ होणारच मग ते साठीचे असो वा सोळाचे.  असा हा मायावी कृष्णमेघ. 



हे नेहमीचेच आहे, दिल्लीत पोहचल्यावर कृष्णमेघ, जसे निवडणूक जिंकल्यावर दिल्लीचे नेता आपले 'वादे'  विसरतात, तसेच हा आवारा कृष्णमेघ दिलेले वचन सहजपणे विसरून जातो. 

"दिल्ली की बरसात
नेताओं के वादों की तरह
गरजते हैं मेघ
लेकिन बरसते नही हैं".

पण या वर्षी नवल घडल. श्रावणात दिल्लीत क्वचितच बरसणारा असा हा दगाबाज आवरा कृष्णमेघ या वर्षी भरभरून बरसला. कारण हि तसेच होते. रस्ते हि  महागडे सोंदर्य प्रसाधने वापरणाऱ्या षोडशी अप्सरे समान सुन्दर दिसत होते. अश्या सुंदर रस्त्यांना पाहून श्रावणातला आवारा कृष्णमेघ सुन्दर व नाजुक रस्त्यांच्या  प्रेमात पडला तर यात  आश्चर्य काय!  नावातच कृष्ण, सुंदर गोपिकांना आपल्या जाळ्यात ओढणारच. कृष्णमेघाने आपल्या प्रेमाचा वर्षाव रस्त्यांवर सुरु केला.या प्रेम वर्षावात भिजून  रस्तेही आनंदित झाले. ते लज्जेने चूर-चूर झाले. लज्जेमुळे  त्यांच्या सुन्दर मुलायम गालांवर खळ्या पडल्या (जागो-जागी खड्डे पडले). मग अश्या सुंदर खळ्या पडलेल्या खड्ड्यांना पाहून  रस्त्यांवरून जाणारी वाहने ही या खड़यांच्या प्रेमात पड़ले तर नवल काय! कित्येक वाहने घायाळ झाली आणि हॉस्पिटल (वर्कशॉप') मधे पोहचली. कित्येक नेहमी करता कामातूनच गेली. वाहनांना घायाळ करणार असं हे रस्त्यांच आणि कृष्णमेघाच प्रेम!

दिल्लीत कॉमनवेल्थ होणार आणि रस्त्यांवर खड्डे!  शासनाची झोप उडाली. एक चौकशी समिति नेमल्या गेली. चौकशी समितीने निष्कर्ष काढला - श्रावणातल्या  आवरा कृष्णमेघाच्या प्रेमात पडल्यामुळे रस्ते निकामी झाले. त्यात बांधकाम विभागाचा काही एक दोष नाही. रस्त्यांना  श्रावणातल्या या आवारा कृष्णमेघापासून दूर ठेवण्याची गरज आहे.

महाराष्ट्रात नदीवरचा पूल वाहून गेला- कृष्णमेघाचे कारस्थान.....

Saturday, August 6, 2016

एक आगळीवेगळी मुलाकात - डास राणी सोबत


दिनांक ५.८.२०१६  रात्रीचे दहा वाजले होते. रियो ऑलम्पिकचा उद्घाटन समारोह उद्या सकाळी चार वाजता आहे, म्हंटले जरा लवकर झोपावे.  पण माझ्या मनात एक तर नियतीच्या मनात काही वेगळेच असते.  अचानक वीज गेली. आमचे इमानदार सत्यवादी मुख्यमंत्री म्हणतात दिल्लीत विजेची कमतरता नाही.  पण  जो पर्यंत नमो प्रधानमंत्री आहे, दिल्लीची जनता चैनीत झोपू हि शकणार नाही. नमोच्या इशार्यावर BSESवाले  अशी बदमाशी करतात. आपल्या इमानदार माणसाच्या म्हणण्यावर विश्वास ठेवलाच पाहिचे. 

वीज गेली. पंखा हि बंद झाला.  इमरजेन्सी लाईट लाऊन वीज येण्याची वाट पाहू लागलो.  एक तर पावसाळी महिना आणि त्यात भरपूर उमस. सौ. ने दरवाजे खिडक्या उघडल्या वारा आत येण्यासाठी. अचानक उजव्या हातावर खाज सुटल्या वाटले. बघितले एक डास हातावर बसून माझे रक्त पिण्यात मग्न होता.  मनात विचार आला, नर डास मानवाचे रक्त पीत नाही. बहुतेक हि मादी असावी. आता रक्त पितेच आहे, तर पोटभरून पिऊ द्या. एक दोन रक्त्याच्या थेंबानीं आपले काय बिघडणार. अचानक थांक्यु आवाज ऐकू आला, कोण थांक्यु म्हणाले म्हणून इकडे तिकडे पाहू लागलो. अरे इकडे तिकडे का पाहतो आहे, मी डासांची राणी तुला थांक्यु म्हणते आहे. मी विचारले, थांक्यु कशाला राणी साहिबा? डासांची राणी म्हणाली तू पहिलाच मानव आहे, ज्याने मला पोटभरून रक्त पिऊ दिले, हाकलण्याचा प्रयत्न केला नाही.  मी तिला विचारले, मी तुला रक्त पिऊ दिले, बदल्यास तू काय देणार मला, डेंगू कि मलेरिया. हा!हा! हा!  चक्क हासली ती आणि म्हणाली, आम्ही डास काही डेंगू, मलेरिया पसरवित नाही, ते कार्य परजीवी/ विषाणूंचे आहे. मी म्हणालो तेच ते, तुम्ही डास त्यांना आपल्या शरीरात आश्रय देतात आणि आमच्या शरीरात सोडतात. आम्ही आजारी पडतो. लाखोंच्या संख्येने दरवर्षी लोक मरतात. डासराणी हि चिडून म्हणाली, तुम्ही माणसे हि काही कमी क्रूर नाही.  रासायनिक पदार्थांचा वापर करून अब्जावधी डासांची कत्तल करतात. त्याचा सूड म्हणून आम्ही डासांनी काही लक्ष मानवांना परजीवींचा उपयोग करून मारले तर त्यात गैर काय. 

डासराणीला चिडलेले पाहून मी विषय बदलत म्हणालो, तू माझे रक्त प्याली त्याचे मला काही वाटत नाही. पण मी आजारी पडलो, मला ताप आला तर उद्या सकाळचा रियो ऑलम्पिकचा भव्यदिव्य कार्यक्रम बघता येणार नाही. डास राणी कानाजवळ येऊन हळूच पुटपुटली, भव्यदिव्य, अSSच्छा, अर्धनग्न सांबा नर्तकी पाहता येणार नाही, याचे दुख होते आहे का? थेरड्या कुठला काही वयाचा विचार कर? च्यायला हिला माझ्या मनातले कसे कळले, मी निरुतरच राहिलो. डासराणी सांत्वना देत म्हणाली, अरे शंभर एक माणसांचे रक्त पिल्यावर एखाद-दुसरा आजारी पडतो. काही एक होणार नाही तुला  उद्या सकाळी उठून खुशाल बघ त्या नागड्या नर्तिका. मी चिडून  म्हणालो काही हाड आहे का तुझ्या जिभेला. डास राणी मिस्कीलपणे म्हणाली, माणसांच्या जिभेला नसते, तर आमच्या जिभेला कुठून येणार. एवढीच सुंदर स्त्रियांना पाहण्याची इच्छा असेल तर आज संध्याकाळीच मी गल्लीतल्या डबक्यात अंडी दिली आहे. तुला माहित असेलच जास्तीस्जास्त एका आठवड्याचे आमचे आयुष्य. उद्या संध्याकाळी पर्यंत अंड्यातून निघालेल्या माझ्या कन्या काय म्हणतात ते, तुमच्या मानवांच्या भाषेत षोडशी रूपवती होतील. पाठवून देईन त्यांना उद्या रात्री तुझ्या गालाचे मुके घ्यायला. क्षणभरातच माझ्या डोळ्यांसमोर गालावर जागोजागी डासांनी चावल्याचे व्रण दिसू लागले. जोरात ओरडलो, दुष्टा चूक झाली माझी, तुला हातानी चिरडून टाकायला पाहिजे होते. तुला काय माहित आम्ही माणसे काय चीज आहोत ते, आमच्याशी पंगा महागात पडेल, पहाच एक दिवस जगातले सर्व डास नाहीसे होतील. तिने रावणा सारखा अट्टाहास केला व म्हणाली, तुम्ही मूर्ख मानवानी आम्हा डासांना मारण्यासाठी काय काय उपाय केले आहे, सर्व माहित आहे मला. पहिले कासव छाप आणली. आमचे काही बिघडले नाही.तुम्हीच खोकलू लागला. मग goodnight आणली आम्हाला दूर ठेवण्यासाठी. काही उपयोग झाला का?  धूरवाली गाडी आणली.  धूर पाहताच आम्ही धूम ठोकून देतो. त्या रासायनिक धुर्याचा त्रास तुम्हालाच होतो. बाकी एक मला कळत नाही?  

मी स्वत:ला वाद विवादात प्रवीण समजत होतो,पण या घटकेला डासराणी समोर पूर्णपणे निशस्त्र झालेलो होतो, मरगळलेल्या आवाजात म्हणालो, काय कळत नाही.  डासराणी म्हणाली,  हेच ते जागो जागी पाणी साचवून, डबके निर्माण करून तुम्ही माणसे आमच्या साठी घरे बांधतात. आमची पैदास वाढली कि आम्हाला मारण्याचे प्रयत्न करतात, या मूर्खपणाला काय म्हणावे. आत्ताच रियोचे घ्या मी ऐकले आहे, तिथे अब्जावधी डासांना यमसदनी पाठविले आहे. पण आमचे बंधू हि काही कमी नाही. त्यांनी हि निश्चय केला आहे याच मौक्याचा फायदा घेऊन जिका नावाच्या दुष्ट परजीवीला जगभर पोहचविण्याचा. किती मजा येईल ना, तुला जिका झाला तर. आता मात्र हद झाली, पाणी डोक्यावरून गेले होते, त्या दुष्ट राणीला  सबक शिकविण्यासाठी मी ताडकन बिस्तारावरून उठलो, बघतो काय समोर टीवी सुरु होता, एक-एक करून विभिन्न देशांचे खेळाडू मैदानात प्रवेश करत होते. सौ. शांतपणे बसून टीवी पाहत होती. माझे डोके सटकले, तिच्यावर डाफरलो. मला का उठविले नाही.  सौ. मिस्कीलपणे म्हणाली, अहो, किती प्रयत्न केला तुम्हाला उठविण्याचा. ज्या वेळी सांबा नर्तकी येत होत्या, तुम्हाला चिमटा हि काढला होता उठविण्यासाठी. मी आश्चर्याने विचारले, तर तू चिमटा काढला होता तर, मला वाटले....  सौ: काय वाटले.... अहो पण तुमच्या गालावर हे काय. डास चावला वाटतो. मी नकळत म्हंटले, डास नाही डासराणी चावली. सौ.: काय काय स्वप्न बघता तुम्ही, काहीच कळत नाही. मी समोर टीवी कडे बघितले, स्क्रीनवर एक डास दिसत होतो, जवळ गेलो निरखून बघितले, मानवी रक्ताने त्या डासाचे शरीर फुगलेले होते. मनात विचार आला, चिरडून टाकले पाहिजे याला, पण थांबलो, कदाचित हीच डासांची राणी असेल. स्त्रियांवर हात उगारणे पुरुषांना शोभत नाही. शिवाय एका राणीने डासांची का होईना माझ्या सारख्या सामान्य माणसाच्या गालाचा मुका हि घेतला होतता..... 

मनात गुणगुणत हात तोंड धुवण्यासाठी  वाशबेसिन जवळ गेलो.

जगू द्या सर्वांना
डास असो वा माशी 
मच्छरदाणी पांघरून 
शांत झोपतो आम्ही. 



दोन क्षणिका -साजण/ सजणी (१) डास/ (२) वीज
















Tuesday, August 2, 2016

मॅडम आणि गाय



(भारताच्या एका राज्यातल्या एका  छोट्या नगरात घडलेली काल्पनिक घटना

पावसाळा नुकताच संपलेला होता. एक गाय रस्त्याच्या किनार्यावर उगवलेले गवत खात होती. अचानक तिचे लक्ष्य एका बंगल्याच्या उघड्या गेट कडे गेले.  तिला बंगल्याच्या आवारात सुंदर हिरवेगार गवत दिसले. ती बंगल्यात घुसली आणि हिरवे गवत चरू लागली. बिचार्या गायीला काय माहित होते डेप्युटी कलेक्टरच्या बंगल्यात घुसण्याचा परिणाम काय होतो. डेप्युटी कलेक्टर मॅडमचे लक्ष गायीकडे गेले, ती शिपायावर जोरात डाफरली, नालायक कहाँ घोड़े बेच के सो रहा है, देख गाय ने बगीचे का  सत्यानास कर दिया. एवढ्यावरच ती थांबली नाही, एक दगड उचलून गायीवर भिरकावला. गाय घाबरून गेटकडे पळाली. मॅडमची ओरड  ऐकून शिपाई घाबरून उठला. त्याने जवळ ठेवलेला डंडा उचलला आणि गायीच्या पायावर जोरात डंडा  हांडला. 

गायीच्या मालकिणीचे घर मॅडमच्या घराजवळच होते. तिने गायीला मॅडमच्या बंगल्यात घुसताना पहिले. ती धावत-धावत बंगल्याजवळ पोहचली. तिने शिपायाला गायीला डंडा मारताना पाहिले. ती त्याच्यावर ओरडली, गायीला डंडा का मारला. बघ कशी लंगडून चालते आहे. तिची आवाज मॅडमने ऐकली. मॅडमचा पारा चढला ती गायीच्या मालकिणीपेक्षा दुप्पट आवाजात ओरडली. एवढे ओरडायला काय झाले 'गायीला डंडाच मारला आहे, काही गाडी खाली नाही घातले'. मॅडमचे उद्गार ऐकून, गायीच्या मालकिण हि चिडली आणि त्वेषाने ओरडली, हिम्मत असेल तर आत्ताच गौमातेला गाडी खाली चिरडून दाखव, डायन कहीं की.  मॅडम: हो, मी डायन आहे, गायी सोबत तुलाही गाडी खाली चिरडून टाकली तरी कुणी वाकडे करू शकत नाही माझे. गायीची मालकीण: इथेच उभी आहे, हिम्मत असेल घाल गाडी अंगावर. आता मॅडम थोडी गांगरली, पवित्रा बदलत म्हणाली, सिपाही भगा इस बत्तमीज औरत को. गायीच्या मालकिणीकडे पाहत म्हणाली, खूप माज चढला आहेना तुला. आता पहाच. तू स्वत:हून आज रात्रीच थुक चाटायला येईल माSSझी. 

गायीच्या मालकिणीचा नवर्याची छोटीसी कपड्यांची दुकान होती.  दुपारी तो घरी जेवायला आला. तेंव्हा त्याच्या बायकोने सकाळी घडलेला प्रकार सांगितला. तिचा नवरा म्हणाला जे घडले ते ठीक झाले नाही. मोठ्या लोकांशी जबान लढवली नाही पाहिजे.   

तिच्या नवर्याची आशंका खरी ठरली. संध्याकाळी  त्याच्या दुकानात  एक शिपाई निरोप घेऊन आला. आपको दरोगाजीने थाने बुलाया है.  एक दोन शेजारच्या दुकानदारांना  घेऊन तो   पोलीस ठाण्यात पोहचला.  दरोगाजी त्याची वाटच पाहत होते. त्याला पाहून म्हणाले, तुझ्या विरुद्ध शिकायत आहे, आज सकाळी सरकारी कर्मचार्यावर हल्ला आणि मारपीट करण्याची.  मी तर सकाळी दुकानात होतो. दरोगाजी म्हणाले, ते मला माहित आहे, पण डेप्युटी कलेक्टर मॅडमच्या शिपायानी तुमच्या विरुद्ध लेखी तक्रार दिली आहे. आता एकच उपाय आहे, आपल्या बायकोला घेऊन मॅडमच्या घरीजा जा, तिच्या समोर नाक घासा किंवा  तिची थुक चाटा, काहीही करा, पण मॅडमला प्रसन्न करा, त्या शिवाय तिचा शिपाई तक्रार मागे घेणार नाही. अन्यथा मला सरकारी नौकाराला मारहाण करण्याच्या आरोपात तुझ्या विरुद्ध गुन्हा दाखील करावाच लागेल. मालकिणीचा नवरा म्हणाला फक्त माझा प्रश्न असता तर मी बंगल्यावर जाऊन मॅडमची थुक हि चाटली असती. पण माफ करा, माझी बायको हे करणे शक्य नाही. तिने काही गुन्हा केलेला नाही. मी तिला असे करायला सांगू शकत नाही. या शिवाय  आमच्या गायीच्या पायाला जबर मार लागला आहे. ती लंगडून चालते आहे.  सत्य काय तुम्हाला माहित आहेच. त्यावर दरोगा म्हणाला मॅडमचा हुकुम आहे.  लिखित तक्रार आहे. एफ आई आर दाखील करावीच लागेल आणि तुला बंद हि करावेच लागेल. माझा नाईलाज आहे. 

दोन-चार दिवसांनी त्या दुकानदाराला जमानत मिळाली. जमानत वर बाहेर आल्याक्षणी त्याने गायीला विकून टाकले.  सुमार १०-१२ वर्ष हा खटला चालला आणि दुकानदाराची निर्दोष मुक्तता झाली. 

बिचार्या गायीने एका सरकारी अधिकार्याच्या बंगल्यात घुसण्याची घोडचूक केली. गायीने थोडे बहुत गवत हि खाल्ले असेल.  त्याची शिक्षा म्हणून गायीला मार हि खावा लागला आणि तिच्या मालकाला १०-१२ वर्षे मनस्ताप भोगावा लागला. 

ब्रिटिशांकडून विरासतमध्ये मिळालेली नौकरशाही (IAS) नावाची संस्था , सेवक कमी, क्षत्रपच जास्त  निर्माण करते.  हेच आजचे सत्य आहे.