Monday, February 29, 2016

दंगा कथा - छोटू


बालपणाची गोष्ट. माझे वय १२-१३ वर्षांचे असेल. आमची शाळा पहाडगंज येथे होती. शाळा सकाळची असल्यामुळे आम्ही ७-८ सहपाठी एकत्रच शाळेत जाण्यासाठी घरून पाईच निघत असू. नया  बाजार, कुतुब रोड, सदर बाजार, बारा टूटी, मोतियाखान असा शाळेत जाण्याचा मार्ग.  शाळेत पोहचायला पाऊण एक तास लागायचा. रोज सकाळ -दुपार जवळपास ३-३  किलोमीटर पाई चालण्यामुळे  चप्पल आणि  जोड्यांचे बारा वाजयचेच.  मोतियाखानच्या भागात पटरीवर एक चांभार बसायचा. ५-१० पैश्यात तो जोडे आणि चप्पला दुरुस्त करून द्यायचा. छोटू त्याच्या मुलाचे नाव. त्याचे वय हि आमच्याच जेवढेच होते. तो सरकारी शाळेत शिकायचा. दिल्लीत मुलांची सरकारी शाळा दुपारची असते. सकाळी गर्दीच्या वेळी अर्थात ७-८ च्या दरम्यान तो आपल्या वडिलांची कामात मदत करायचा. चप्पला आणि जोड्यांची छोटी-मोठी मरम्मत तोच करायचा.  

त्या काळी जुन्या दिल्लीत वर्षातून दोन-चार दंगे हे व्हायचेच. आमच्या दृष्टीने दंगा म्हणजे बनियांच्या दुकानांची जाळपोळ आणि लूट-पाट.  असाच एक दंगा सदर बाजार येथे  झाला. त्या दंग्यात कपड्यांची बरीच दुकाने लुटल्या गेली. बहती गंगेत, अनेक गरिबांनी हि आपले हात धुऊन घेतले. शाळेत फाटके कपडे घालून येणारी अनेक मुले नवीन कपड्यात दिसू लागली. त्या वर्षी कित्येक मुलांची ईद आणि दिवाळी नवीन कपड्यात साजरी झाली. पण प्रत्येक नाण्याचे दोन पहलू असतातच.

दंग्याचा १५-२० दिवसानंतरची गोष्ट. शाळा सुटल्यावर दुपारी १ वाजता आमची चौकडी घरी जायला निघाली. एका मित्राचा जोडा फाटला. त्या दिवशी छोटू मळलेल्या शाळेच्या गणवेशात आपल्या फुटपाथी दुकानात बसलेला दिसला. मनात विचार आला, या वेळी  हा शाळा  सोडून इथे का बसला आहे? कदाचित याचा वडिलांची तब्येत खराब असेल. जोड़ा शिवायला १५-२० मिनिटांचा वेळ लागणार होताच. मनातील शंका दूर करण्यासाठी विचारले, अब्बू की तबियत ख़राब है क्या?  छोटू म्हणाला, स्कूल छोड़ दिया है. अब दुकान में हि बैठूंगा. मी विचारले, का? तो निर्विकारपणे म्हणाला, अब्बू जेल में है. क्यों???

तो म्हणाला, उस दिन तडके,अम्मीने अब्बू को उठाया, कहा सदर में दुकाने लुट रही है. पड़ोस का नानके दो-चार  कपडे के थान उठा के लाया है. मोहल्ले के बाकि मर्द भी वहीं गयें है और तुम हो की सो रहे हो. अब्बू उठला, मनात विचार केला हे ठीक नाही. पण त्याने कित्येक वर्षांपासून मुलांसाठी नवीन कपडे घेतले नव्हते. इथे तर संपूर्ण मोह्ल्लाच हिंदू असो वा मुसलमान दुकाने लुटायला निघाला होता. अब्बू पण त्या भीड़चा हिस्सा बनला. सदर मध्ये एका दुकानातून लोक कपड्यांचे थान डोक्यावर लादून बाहेर पडत होते. अब्बू हि त्या दुकानात घुसला. लालच बुरी बला होती है हि म्हण उगाचच नहीं. शरीराला पेलवत नव्हते तरी हि ३-कपड्यांचे थान डोक्स्यावर लादून अब्बू दुकानातून बाहेर पडला. अचानक आवाजे आली, पुलिस पुलिस. अब्बू घाबरला. त्याचा  तोल गेला. तो रस्त्यावर पडला. चोट तर लागलीच पण  पोलिसांनी हि त्याला रंगे हाथ पकडले. अश्यावेळी काय म्हणावे हे कळण्या सारखे वय नव्हते तरी हि मी हिम्मत करून  विचारले, कोई वकील किया है क्या? हां, एक वकील केला आहे, पण तो म्हणतो अब्बू के खिलाफ पक्के सबूत है, काही वर्ष  तरी अब्बूला जेल मध्ये काढावी लागतीलच. छोटू पुढे म्हणाला उस दिन अब्बू से गलती हो गयी. किस्मत खराब थी, और क्या.  खरोखरच!  किस्मतची मार छोटू वर पडली होती. त्याचे शिक्षण सुटले. लहान वयातच  घराचा संपूर्ण  गाडा त्याच्या खांद्यावर आला होता.
   
त्या वर्षीची ईद आणि दिवाळी कित्येकांच्या घरात अंधार ही घेऊन आली होती.  

Saturday, February 27, 2016

माझी बोली भाषा



एका संकेत स्थळाने बोली भाषेत साहित्य पाठवण्याची सभासदांना विनंती केली. संदेश मिळाल्यावर विचारात पडलो माझी बोली भाषा कुठली. घरात हि हिंदी आणि मराठी मिश्रित भाषा बोलली जाते.  एकांतात विचार सुद्धा कधी हिंदीत तर कधी मराठीत करतो.  शालेय शिक्षण हिंदीत आणि पुस्तके वाचून शिकलेली मराठी. या दोन्ही निश्चित माझ्या बोली भाषा नाही. कारण मला हिंदीतली कुठली हि बोली भाषा अवगत नाही. मराठीतील बोली भाषेचा प्रश्नच येत नाही.  

आमचे आजोबा दिल्लीत स्थायिक झाले होते. वडिलांचे शिक्षण हि दिल्लीतलेच. आमच्या वडिलांची भाषा म्हणजे उर्दू, हिंदी, मराठीचे मिश्रण. जुन्या दिल्लीत ज्या वाड्यात आम्ही भाड्यावर राहायचो तिथे पंजाबी, गुजराती, बंगाली, हिंदी भाषी आणि मराठी भाषी असे ८-९ भाडेकरू होते. शेजार बनिया आणि मुसलमान. आमचे घरमालक कडक शिस्तीचे होते. वाड्यात राहणाऱ्या कुणा मुलाच्या तोंडून ‘साला’ शब्द जरी बाहेर पडला तर श्रीमुखात फडकावयाला कमी करत नसे. संध्याकाळी वडील घरी आल्यावर तोंड-हात धुवायचे आणि नंतर आई देवासमोर दिवा लावायची. रामरक्षा आणि शुभंकरोती म्हणायचो. (आंम्हाला तीच मराठी वाटायची, नंतर कळले रामरक्षा,  स्त्रोते इत्यादी  संस्कृत भाषेत असतात).   
  
जुन्या दिल्लीत मराठी परिवार हि होते. रविवारच्या दिवशी सर्व मराठी मुले, महाराष्ट्र समाजात खेळायला जमत असू. आपसांत बोलताना सुरुवात मराठीतून  व्हायची आणि नंतर केंव्हा हिंदीत बोलू लागू कळत नसे. कुणी मोठ्यानी टोकले ‘जरा मराठीच बोला’ तेंव्हा लक्ष्यात यायचे. अश्यारितीने अधकचरी मराठी बोलायला शिकलो.  माझ्या बोली भाषेवर- उर्दूची अदब आणि तहजीब, शुद्ध हिंदी (शालेय शिक्षक) आणि घरची मराठी या सर्वांचा परिणाम झाला. वर्ष-दोन वर्षांनी उन्हाळ्याच्या सुट्ट्यात आम्ही नागपूरला जायचो. तिथे गेल्यावर वाटायचे इथली मुले किती असभ्य. यानां बोलण्याची तमीज सुद्धा नाही. मोठ्याशी हि अरे-तुरे करतात. तिथे आमची, “काका आपल्या साठी पाणी आणू का?(चाचाजी आपके लिये पानी लाऊं क्या).” काका वैतागून म्हणायचा हे काय आप, आपण लावून ठेवले आहे, अरे मला तू म्हणत जा. पण मला, आपल्यापेक्षा मोठ्यांना तर सोडा, लहान मुलांना  हि, ‘तू’ म्हणणे आजगयात जमले नाही.  

आई भंडार्याची होती. लहान असताना उन्हाळ्याच्या सुट्ट्यात एक दोन वेळा आजोळी गेलो होतो. तेही ८-१०  वर्षाचा होतो तेंव्हा. एवढे आठवते, आम्हा भावंडांचे बोलणे ऐकून, तुम्ही मुसलमान आहात का? अशी विचारणा केल्या गेली. नंतर एकदा लहान मामाच्या मुलीच्या लग्नात गेलो होतो.  नुसती मुंडी हलविण्याचे काम केले, कारण लोक काय बोलत आहे काहीच कळत नव्हते.  असो.

पुन्हा प्रश्न आलाच माझी बोली भाषा कुठली. मला आठवले, एकदा माझ्या भावाला एक शेजारच्या मुलाने शिवी दिली, दगड हातात उचलीत तो म्हणाला, “मनोजजी, इज्जत से बात कीजिएगा, आइन्दा बत्तमीजी की तो हमसे बुरा कोई नहीं होगा, हमारा निशाना सटीक है, तुम्हारा डोक फोड़ दूंगा. समझे.”  बहुधा हीच माझी बोली भाषा. कारण भांडताना आपण आपली खरी भाषा लोकांसमोर उघडी करतो.

Wednesday, February 24, 2016

बिलिंदर राणी


 लेक  लेकीची
बिलिंदर राणी
पंधरा दिवसाची छकुली
शोभते सर्वांची  नानी.

मोठे-मोठे डोळे तिचे
पोपटासारखे नाक
हिमाचली चेहरा तिचा
गोरे गोरे गाल.

सकाळी सकाळी
गोड -गोड झोपते
आपल्या नानाला
किसी किसी देते.

आत्या म्हणते
गुडीया प्यारी
मावशी म्हणते  
बाळ गुणी.

शेजारी म्हणती
किती -किती शांत
लोभस गोंडस
पटाईतांची नात.

डिप्लोमेट
राणी गालात हसते
सर्वांना अशी
मूर्ख बनविते.


रात्र झाली कि
खरे दात दाखविते
आईला आपल्या
रातभर जागविते .

कुशीत नानीच्या 
घरभर फिरते
जरा थांबता
टाहो फोडते.

मला पाहून ती
डोळा मारते
माय लेकींची
कशी जिरवली.

लबाड आमची 
बिलिंदर राणी  
नानांची तिची 
गट्टी जमली.



Wednesday, February 17, 2016

बोध कथा - उंदीर आणि बिल्ली मौसी


स्वामी त्रिकालदर्शी समाधीतून उठले, त्यांनी माझ्याकडे बघितले आणि विचारले बच्चा कुठल्या विचारात आहे. मी म्हणालो  स्वामीजी, आज इन्द्रप्रस्थ नगरीच्या गुरुकुलात जे काही घडत आहे, त्याचा मतितार्थ काय?   माझ्या सारख्या अल्पबुद्धी व्यक्तीला काहीच उमगत नाही. स्वामीजी म्हणाले, बच्चा तुला मी उंदीर आणि बिल्ली मौसीची गोष्ट सांगतो. फारपूर्वी नंदन वनात जमिनी खाली उन्दिरांची मोठी वसाहत होती. उन्दिरांच्या म्होरक्यांनी, तिथे राहणार्या उन्दिरांच्या सुरक्षेसाठी काही नियम बनविले होते. उदाहरणत: दूर कुठे  बिल्ली मौसी दिसतास उन्दिरांनी शीघ्र बिळात आले पाहिजे आणि तत्काळ बिळाचा दरवाजा बंद केला पाहिजे. बिल्ली मौसी उन्दिरांच्या बिळाच्या दरवाज्या  समोर येऊन  कितीही गोड बोलली तरी उन्दिरांनी तिच्या बोलण्यावर विश्वास ठेऊ नये. एवढेच नव्हे तर बाहेर जमिनीवर तिच्या विष्ठे जवळ हि उन्दिरांनी फिरकू नये. तिच्या विष्ठेत अशी काही जादू आहे कि एकदा उंदराने तिचा वास घेतला कि तो पुन्हा बिळात परत येत नसे. 

असेच एकदा बिल्ली मौसी उन्दिरांच्या बिळाच्या दरवाज्या समोर आली. गोड स्वरात गाणे म्हणू लागली. 

नंदन वन के सब जानवर
शेर-बकरी, चूहा बिल्ली 
एक घाटपर पिए पानी.

 चूहों का म्होरक्या मुर्दाबाद

बिल्ली मौसी जिंदाबाद.

माझ्या प्रिय उन्दिरांनो, तुम्हाला माहित नाही, तुमच्या म्होरक्यांनी तुम्हाला जमिनीखाली अंधार्या जगात डांबून ठेवले आहे. इथे बाहेर बघा, सूर्य प्रकाश आहे, प्रसन्न वातावरण आहे. माझ्याशी मैत्री करा, तुम्हाला कुणाचेच भय राहणार नाही. मधुर फळांच्या रस आणि गोड फळे तुम्हाला खायला मिळतील.  म्होरक्याची पर्वा करू नका, चला बाहेर या, माझ्या सोबत मौज करा, अंधाराच्या राज्याचा नाश करा.  उन्दिरांनो  बोला बुर्ज्वा म्होरक्या मुर्दाबाद, बिल्ली मौसी जिंदाबाद.  

आजाद नावाच्या उन्दिर, म्होरक्यांच्या जाचक नियमांना त्रासून गेलेला होता. त्याला बिल्ली मौसीचे म्हणणे खरे वाटू लागले. पण बिल्ली मौसीची भीतीही वाटत होती. स्वभावाप्रमाणे बिल्ली मौसी, बिळाबाहेर विष्ठा करून गेली. बिल्ली मौसी दूर जाताच आजाद नावाचा उंदीर बिळाबाहेर आला. बिल्ली मौसीच्या  विष्ठे जवळ जाऊ लागला, दुसर्या उन्दिरांनी त्याला मना केले, पण त्याने ऐकले नाही. बिल्ली मौसीच्या विष्ठे जवळ येऊन, त्याने त्या विष्ठेचा वास घेतला. विष्ठेत असलेल्या  परजीवींनी लगेच आजादच्या शरीरात प्रवेश केला. त्या परजीवींनी आजादच्या डोक्याचा ताबा घेतला. आजादची विचार शक्ती नष्ट झाली. आता आजाद परजीवींच्या इशार्या वर नाचू लागला. आजादला वाटले, बिल्ली मौसी खरेच म्हणते, नंदनवनातल्या सर्व प्राण्यांनी एकत्र राहिले पाहिजे. अर्धवट आणि अतिशहाणे  उन्दिरांचे म्होरके आपल्या स्वार्था साठी बिल्ली मौसी  विरुद्ध आमच्या डोक्यात विष कालवितात जेणेकरून त्यांचे राज्य अबाधित  राहो. त्याने जोरात नारा लावला, उन्दिरांच्या राज्याचा नाश होवो, बिल्ली मौसी जिंदाबाद म्हणत आजाद बिल्ली मौसीच्या शोधात निघाला. बिल्ली मौसी एका झाडाखाली बसलेली होती, ती आजाद सारख्या मूर्ख उन्दिराचीच वाट पाहत होती. बिल्ली  मौसीच्या जवळ येऊन  आजाद म्हणाला मौसी मी त्या मूर्खांचे राज्य सोडून आलो आहेत, उन्दिरांचा म्होरक्या म्हणतो बिल्ली मौसी उन्दिरांना  खाते, खोटे बोलतो ना तो. बिल्ली मौसी गालात हसली, तिने अलगद आजादला  आपल्या पंज्यात पकडले आणि त्याला म्हणाली, मूर्खा तुमचा म्होरक्या खरेच म्हणतो, मी तुझ्या सारख्या कोवळ्या उन्दिराना आनंदाने खाते, असे म्हणत तिने आजादला गटकले.

स्वामीजी बोलता बोलता थांबले, पुन्हा माझ्याकडे पाहत म्हणाले, बच्चा, ज्याला उंदीर, परजीवी आणि बिल्ली मौसीचा अर्थ कळेल, त्याला आज काय चालले आहे, हे हि कळेल. स्वामीजी पुन्हा समाधीत गेले.  मला काही गोष्ट कळली नाही, तुम्हाला कळली का.

टीप:  उंदीर म्हणजे  कन्हैया  सारखे  मूर्ख मुले.  

Thursday, February 4, 2016

स्त्री - काल आणि आज


पूर्वी चार भिंतींमध्ये 
जखडलेली स्त्री होती.
रांधा वाढा उष्टे काढा
आयुष्य ती  जगत होती. 

कावळा तिला शिवत होता 
चार दिवसाची हक्काची 
सुट्टी तिला मिळत होती. 

स्त्री आज स्वतंत्र आहे 
घरा बाहेर पडली आहे. 
ऑफिसात जात आहे 
धंधा हि पाहत आहे.

मुलांना शिकवत आहे 
स्वैपाक हि करीत आहे. 
थकलेल्या शरीराने 
अहोरात्र खटत आहे.

कावळा आज  शिवत नाही 
हक्काची चार दिवसाची 
सुट्टी हि  मिळत नाही.