Wednesday, November 25, 2015

सकाळचा नाश्ता : अरबी(अळू) परांठा, स्पेशल रेड सूप आणि आंवळा चटणी




काल संध्याकाळी लेक माहेरी आली.   तिचे सासरे नुकतेच हिमाचलच्या आपल्या गावातून दिल्लीला परतले होते. लेकी सोबत एक पिशवीभर अरबी आणि आले (त्यांच्या सीढ़ीदार शेतातले– शुद्ध नेसर्गिक) पाठविले होते. आज सकाळी उठल्यावर ती म्हणाली आज सकाळचा नाश्ता मी बनविणार. (लेकी माहेरी आराम करायला येतात, पण माहेरी आल्यावर काम करायचा उत्साह का संचारतो, कधीच कळत नाही) असो. पराठा, सूप आणि चटणी असे करायचे ठरले.




घरात दुधी होती, टमाटर महाग असल्यामुळे १/२ किलोच आणले होते. पण लाल सुर्ख लौह तत्वाने भरपूर बिट्स हि घरात होते. सूप म्हंटले कि लाल रंग हा पाहिजेच.  तिने सर्व वस्तू एकदम बनवायला सुरुवात केली (कसे जमते तिला, मला कधीच कळले नाही) .


आंवळा चटणी (साहित्य): साहित्य  आंवळे ५-६, कोथिंबीर, हिरवी मिरची २, आले  १/ इंच, लसूण ५-६ पाकळ्या, जिरे १/२ मोठा चमचा, १/२ काळीमिरी पूड, हिंग १/२ लहान चमचे, गुळ एक लहान तुकडा, ओले खोबरं २ चमचे आणि मीठ स्वादानुसार.


प्रथम आवळ्यांच्या बिया काढून चिरून घेतले. नंतर  खोबर, कोथिंबीर, आले, लसून, चिरे, हिंग, गुळ आणि मीठ इत्यादी सर्व साहित्य मिक्सर मधून काढून घेतले.  आवळ्याची चटणी तैयार झाली.



स्पेशल रेड सूप (साहित्य): अर्धा किलो दुधी भोपळा, १/२ बिट्स (चुकुंदर), २ टोमाटो, २ आवळे, गाजर २ लहान. या शिवाय  आले १/२ इंच, (१/२ चमचे जिरेपूड, १/२ चमचा काळी मिरी पूड, हिंग १/२ छोटा चमचा, मीठ स्वादानुसार.


कृती: दुधी भोपळा, गाजर, बिट्स, आवळा, टमाटरचे तुकडे करून १ गिलास पाणी टाकून कुकर मध्ये शिजवून घेतले. कुकरचे झाकण उघडून त्यात १ गिलास थंड पाणी टाकले. घरी हाताचे मिक्सर असल्यामुळे कुकरमध्येच फिरवून घेतले.  सूप जास्त पातळ करायची गरज नाही किंवा गाळून घेण्याची हि नाही. नंतर त्यात आले किसून जिरे, काळी मिरी आणि हिंगाची पूड हि टाकून कुकर गॅस वर ठेऊन एक उकळी काढून घेतली.   

अरबी परांठा (साहित्य): अर्धा किलो अरबी, १/२ बिट्स (चुकुंदर),२ कांदे, ५-६ लसणाच्या पाकळ्या, ३-४ हिरव्या  लसणाच्या दांड्या, कोथिंबीर  १/२ जुडी, ३-४ हिरव्या मिरच्या  (मोठा चमचा: १/२ चमचे जिरे, १ ओवा, १०-१५ काळीमिरी दाणे यांची पूड करून घेतली), १ चमचा धने पूड, १ चमचा अमचूर, २ चमचे चाट मसाला, १/२ चमचे हळद, १/२ चमचे तिखट  आणि मीठ स्वादानुसार.

शिवाय तीन वाटी कणिक. पराठ्यांसाठी.          

कृती: (पराठ्याचे सारण): प्रथम गॅस वर अरबी उकळून घेतली. थंड झाल्यावर अरबीचे साल काढून, अरबी किसून घेतली. बिट्स हि किसून घेतले. कांदा, कोथिंबीर, हिरवे लसूण, लसणाच्या पाकळ्या आणि हिरवी मिरची बारीक चिरून घेतली. सर्व मिश्रण एकत्र करून त्यात धने, अमचूर, चाट मसाला, जिरे-ओवा-काळीमिरीची पूड आणि  हळद टाकून मिश्रण एकजीव केले.  (तिखट खाणारे  जास्त तिखट हि टाकू शकतात).  हे झाले पराठ्याचे सारण.



आता जसे बटाट्याचे पराठे करतो त्याच प्रमाणे कणकीच्या गोळ्यात भरपूर सारण भरून, पोळी लाटून तव्यावर तेल/ तूप सोडून खरपूस परांठे भाजून घ्या. 



Saturday, November 21, 2015

वंदन भक्ती आणि पुणेरी षड्यंत्र

समर्थ रामदास म्हणतात 

करावें देवासी नमन I  संत साधू आणि सज्जन I नमस्कारीत जावे I
नमस्कारें सख्य घडे I नमस्कारें मोडली जडती I समाधानें I

समर्थ म्हणतात वंदन भक्ती सर्वात सौपी आणि सरळ आहे. वंदन करण्यासाठी  एक दमडी सुधा  लागत नाही.   काही साधन सामग्री ही लागत नाही.  कुणालाहि हात  जोडून आदराने नमस्कार केल्याने  आपण त्याला प्रिय होतो. बिघडलेले कार्यहि मार्गी लागते. 

आपण रोज पाहतोच, आपण जेंव्हा कुणाला नमस्कार करतो, त्याचा चेहरा आनंदाने उजळतो. प्रतिउत्तर म्हणून तोहि आपल्याला नमस्कार करतो. दोघेही प्रसन्न होतात.   आपण कुणाला नमस्कार केला आणि त्याने प्रतिउत्तर दिले नाही  तर  पुढच्या वेळी आपण त्याला नमस्कार करणार नाही. किंबहुना तो व्यक्ती जर समोरून येत असेल तर आपण त्याची नजर चुकवून पुढे निघून जाऊ. सरकारी कार्यालयात असे दृश्य नेहमीच दिसते. कर्मचार्यांच्या नमस्काराला उत्तर न देणाऱ्या अधिकार्याला  समोरून येताना पाहून कर्मचारी मार्ग बदलतात किंवा त्याची नजर चुकविण्याचा प्रयत्न करतात.   कर्मचार्यांचे सख्य किंवा निष्ठा या अधिकारीला प्राप्त होत नाही. तसेंच जो कर्मचारी कुणालाहि नमस्कार करीत नाही किंवा नमस्काराला प्रतिउत्तर देत नाही, त्याच्या बरोबर अन्य कर्मचारी बोलणे सोडून देतात. काही काळाने अशी परिस्थिती येते कि हा कर्मचारी आपल्या विभागात कार्यरत आहे, अधिकांश सहकर्मीनां माहितच नसते. 

एक प्रश्न आपल्या डोक्यात आला असेलच, वंदन भक्तीचा पुणेरी षड्यंत्रशी काय संबंध? 

 माझा एक पुणेरी मित्र दिल्लीत काही कामासाठी आला होता, हक्काने घरी उतरलादिनांक  १.११.२०१५ वेळ संध्याकाळची, सात वाजून काही मिनिटे. संध्याकाळी चहा पिता- पिता  घरगुती  गप्पा गोष्टी सुरु झाल्या.  काळ, वेळ न बघता, मला काय वाटेल याचा विचार न करता,  माझ्या मराठीतील चुका दाखविण्याचे कार्य माझा हा मित्र नेहमीच  न चुकता करतो.  पण त्या दिवशी सहज बोलता-बोलता म्हणाला विवेक तुझ्या मराठीत बरीच सुधारणा झाली आहे.   कुणी आपली प्रशंसा केली तर आपण प्रसन्न होतोच आणि त्यातूनहि कुणी पुणेकराने प्रशंसा केली तर काय म्हणावे, हवेवर तरंगूच लागलो. नसलेली  छाती ५६ इंच फुलवत तरichआजकाल आमी नुसतेच बोलत नाहीत, मराठीत लिवू बी लागलो आहे. तो लगेच सावध झाला आणि म्हणाला लिहिणे वाचणे हे रिकामटेकडे लोकांचे काम, आमच्या सारख्यांजवळ टाईम कुठे, मराठी लिहिण्या वाचण्यासाठी.  मी लगेच उतरलो, अब नमक खा ही रहे हो, तो अपुन का ब्लॉग भी देखना पड़ेगा.  कम्प्युटर उघडून आपला ब्लॉग आणि मिसळपाव दाखविले. सहज  त्याचे लक्ष्य 'तुम्हाला मिपावरचा कुठला आयडी आवडतो आणि का?' या लेखावर गेले.  च्यायला अंतर्जालावर लोक डुप्लिकेट नावांनी लिहितात, प्रतिसाद हि  डुप्लिकेट नावांनी देतात. मी म्हणालो असे नव्हे, लोक खर्या नावांनी हि लिहितात.  काही लोक खर्या आणि डुप्लिकेट दोन्ही आयडीने लिहितात. शिवाय आपले विचार निर्भिकपणे मांडण्यासाठी हि काही लोक डुआयडी घेतात. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तो विचित्र हसत म्हणाला 'तुझ्याहि दोन-चार डुआयडी असतीलच'.  त्यांच्या वापर कर.  तुला आवडणाऱ्या  १५-२० आयडी टंकून टाक, त्यात तुझे नाव पण टाक. कुणी न कुणी परतफेड  म्हणून  तुझे नाव हि त्याच्या आवडत्या आयडीत टंकेल. मी शांतपणे म्हणालो, मला दुहरेपणाने जगता येते नाही. माझी कुठलीही डुआयडी नाही. मग  ३०-४० आयडी आवडल्या म्हणून टंकून टाक, दोन-चार लोक तरी तुला लाईक करतील', नाहीतर  तुझ्या सारख्या बकवास लेखकाला कोण लाईक करेल.  मी रागानेच म्हणालो तू कधी माझा कुठला लेख किंवा गोष्ट वाचली आहे का? 'नाही  म्हणूनच तर म्हणतो, कशाला नाराज होतो, साधा व्यवहार आहे, अहो रूपं अहो गान गाढवाने केली कावळ्याची प्रशंसा. कशी वाटली तुकबंदी. 'अंतर्जालावर तुम्ही एका दुसर्याची पाठ थोबडून घेणार'.  (सौ. नेहमीच म्हणते, तुझे  सगळे मित्र एकापेक्षा एक दिव्य आत्मा आहेत, कुठे भेटतात तुला असली भुते, काय म्हणणार, एकेकाचे नशीब).   त्याला अक्षरश: हात जोडत म्हणालो, बाबारे मी कुठल्याहि आयडीला लाईक करणार नाही. तो म्हणाला, मग तुला हि कुणी लाईक करणार नाही. हा मानवीय स्वभाव आहे.   या वर हि कुणी तुला लाईक केले तर म्हणता येईल. तुझ्या लेखनात काही दम आहे. हं! आणखीन एक,  पुढच्या १०-१२ दिवस मिसळपाववर फिरकू पण नको.  नाही तर दोन-चार न कळणाऱ्या कविता टंकशील, वाचून कुणीतरी तुला लाईक करेल.   मी उतरलो, उद्या पासून घरात डागडुजी, रंग-रोगन, सफेदीचे काम सुरु करणार आहे. नंतर दिवाळी. मिसळपाव तर सोडा, पुढे १०-१५ दिवस अंतर्जालावर हि फिरकायला वेळ मिळणार नाही. नरक चतुर्थी पर्यंत घरात काम सुरु होते.  तरीही मित्राला दिलेला शब्द पाळला अंतर्जालावर फिरकलो हि नाही.   दिवाळी नंतर  हळूच मिपावर डोकावून आयडीवाला लेख बघितला.मित्राचे म्हणणे खरेच होते. 

आज दिनांक २१.११.२०१५,  त्याचा फोन आला, विवेक हा! हा! हा! हा!  गाढवा सारखा  'हसतोस कशाला'. अरे आज मिसळपाव उघडून आयडी वाला लेख वाचला, हा!हा! हा!  कुणाला हि तुझी आयडी आवडलेली नाही. मूर्ख लेकाचा, स्वत:चे नाक कापून घेतले. हा! हा! हा! अरे आम्ही पुणेकर म्हणजे काय चीज आहे, माहित नाही का तुला? एक नंबरी चिक्कू, कुणी दहा वेळा आमची प्रशंसा केली तर आम्ही एकदा करू. उगाच माझे ऐकले. वाईट वाटते रे, तुझ्या सारख्या महान, विद्वाआआन, लेखकूला कुणीच ओळखत नाही रे.  मरगळलेल्या आवाजात त्याला म्हणालो,   मीहि कुणाला लाईक केले नाही म्हणून दुसर्यांनी हि माझे नाव घेतले नाही. त्यात एवढे वाईट वाटण्यासारखे काय. 'कुठेतरी जळण्याचा वास येतो आहे', म्हणत त्याने फोन ठेवला. मनातल्या मनात त्याला शिव्या देत कम्प्युटर उघडला. मिपावर आयडीवाला लेख वाचला, पण कुणीही चुकून सुद्धा आपले नाव घेतलेले नाही, हे लक्ष्यात आले. रेकवर ठेवलेल्या दासबोधाच्या पुस्तकाकडे लक्ष गेले. माझ्या प्रिय (?) मित्राने मला हातोहात बनविले होते. आता तिखट मीठ लाऊन हि कथा आणखीन दहा मित्रांना सांगणार. माझा सनकी स्वभाव मला भोवला आणि त्याच्या जाळ्यात सहज अडकलो. पण 'अब पछताए हॉट क्या जब चिड़िया चुग गई खेत'.
   
समर्थ म्हणतात नमस्कारें सख्य घडे I नमस्कारें मोडली जडती I समाधानें I  जो नमस्कार करणार नाही त्याला कुणी विचारणार नाही.   हेच खरे.