Thursday, August 27, 2015

सयाना (मांत्रिक इ.) आणि फेसबुक (मिडिया इ.)


(या लेखाचा उद्देश्य घटनेची सत्य/ असत्यता पडताळणे नव्हे तर लोकांच्या मनोवृतीवर प्रकाश टाकण्याचा आहे)

मागासलेली गरीब अनाडी जनता आपल्या समस्या सोडविण्यासाठी  गावातल्या सयाना (मांत्रिक म्हणा, ओझा म्हणा ) कडे जाते.  या सयानाचे  सरळ देवा सोबत कॅनेक्शन असते. भूत, प्रेत, हडळ, चुड़ैल या सर्वाना  काबूत ठेवण्यात तो समर्थ असतो.  गावात किंवा पंचक्रोशीत काहीही वाईट घडले असेल, कुणाचा अकाल मृत्यू झाला असेल किंवा कुणाचे नवजात मुल दगावले असेल. तर कुणाच्या करणी मुळे असे झाले हे सयाना बरोबर हुडकून काढतो.  एकदा जादू टोना, करणी करणार्या हडळ / चुड़ैल  कोण  आहे  हे कळले कि मग काय विचारावे.   लोक त्या  हडळीला  पकडून आणतात, तिची गावातून धिंड काढली जाते, त्या स्त्रीला हाल हाल करून मारले जाते.  कुणी हि त्या  स्त्रीची   बाजू ऐकून घेण्याच्या भानगडीत पडत नाही.  

आता फेसबुक वर येऊ या.   फेसबुक हा जागतिक महासागर आहे, त्याच्या पुढे सयानाला  'कुएं का मेंढकच' म्हणावे लागेल. फेसबुक वर येणारे लोक सुशिक्षित  अतिविद्वान आणि विचारवंत असतात, असे समजले  जाते.  पण या फेसबुक वर  कुणाला ही जगातून उठविण्यासाठी फ़क्त एक पोस्ट प्रकाशित करायची गरज आहे. एक फोटो टाकला की त्या व्यक्तीच्या अब्रूचे  धिंडवडे सुशिक्षित लोक उडवू लागतील.  सत्य शोधण्याचा किंवा दूसरी बाजू पहाण्याचा प्रयत्न कुणी ही करणार  नाही.  

उदाः आत्ताच दिल्लीत घडलेली एक घटना. इथे फेसबुक वर पोस्ट टाकणारी आणि पोलिसात शिकायत करणारी एक तरुण, सुंदर स्त्री होती. आता शिकायत करणारी जर स्त्री  त्यात हि तरुण स्त्री असेल तर तपास करायची काय गरज.  पहिल्या २४ तासांत फेसबुक आणि  मिडिया  वर सर्वांनी त्या मुलाच्या अब्रूची लक्तरे उडविली. पोलीसने हि एकीकडे शिकायत दर्ज केली आणि दुसरीकडे  पुरस्कार  घोषित केला.  पोलिसांना ही पुरस्कार देण्याच्या आधी घटनास्थली असलेल्या लोकांची विचारपूस करून  सत्यता तपासायची  गरज वाटली नाही. मग  मुख्यमंत्री ही  मागे का राहणार त्यानी पोलिसपेक्षा जास्त पुरस्कार घोषित करून टाकला.  थोडक्यात  फेसबुक, मिडिया, पोलीस आणि नेता सर्वांनीच वाहत्या  गंगेत हात धुऊन घेतले.

हे सर्व पाहताना एकच विचार मनात आला एकीकडे सयाना आणि दुसरीकडे फेसबुक व मिडिया. माणसाला जगातून उठविण्याचे कार्य दोघेही व्यवस्थित बजावतात.  एका पक्षाला दोषी ठरवून त्याच्या आयुष्याची राख रांगोळी करतात.  फरक एकच आहे सयाना वर विश्वास ठेवणाऱ्या  लोकांना आपण  अडाणी, अंधविश्वासी इत्यादी म्हणतो. फेसबुक व मिडीयावर होणार्या चर्चांवर विश्वास करणार्याना काय म्हणावे .....


Friday, August 21, 2015

विरोध शिवाजी राजांना होता, पुरंदरेना नव्हे


(एक गैर मराठी माणूस या घटनेकडे कसे पाहतो.  हे हि लोकांना कळले पाहिजे.  म्हणून हा लेख).
 
दिल्लीची मेट्रो अजब-गजब आहे, इथे नानाविध लोक भेटतात. कालचीच गोष्ट संध्याकाळी सीपी स्टेशनहून  मेट्रो घेतली. मेट्रोत डोक्यावरचे पांढरे केस पाहून हि सहजा-सहजी कुणी बसायला जागा देत नाही. उभा असतानाच सौ.चा फोन आला. फोनवर अर्थातच मराठीत बोललो. समोर बसलेल्या माणसांनी अंकल आप बैठीये म्हणून  जागा दिली.  मी धन्यवाद म्हंटले (मला जागा देणारे लोक मला देवासारखेच वाटतात). त्याने मला विचारले, अंकल आप महाराष्ट्रीयन हो. मी हो म्हंटले. त्याने आपला परिचय दिला, तो काही वर्षांपासून मुंबईत राहतो. काही कामासाठी दिल्लीत आला होता.  थोडी बहुत मराठी हि त्याला कळते. त्याने मला विचारले बाबासाहेब पुरंदरेना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला आहे, माहित आहे का? त्या बाबत काय म्हणायचे आहे. त्याने  जाणता राजा पाहिल्याचे हि सांगितले.  मी म्हणालो, पुरंदरे यांचे शिवचरित्र फार ३०-३५ वर्षांपूर्वी वाचले होते. आता काही विशेष आठवत नाही. राजनैतिक कारणांमुळे त्यांना पुरस्कार देण्याचा विरोध होतो आहे. एवढेच टीवी पाहून कळते. 

तो खळखळून हसला. मला म्हणाला विरोध पुरंदरे यांना नाही, अपितु  हिंदवी स्वराज्य स्थापन करणाऱ्या शिवाजी महाराजांचे गुणगान करणाऱ्या शाहिराला देण्याचा होतो आहे.  विरोध शिवाजी राजेंना आहे, पुरंदरे याना नाही.  शिवाजी राजांचे गुणगान धर्मनिरपेक्ष लोकांना आवडत नाही.

च्यायला त्याच्या या जावई शोधामुळे माझी विकेटच उडाली. मी त्याला विचारले, या विधानाला काही पुरावा आहे का?  तो म्हणाला शाहिरांचे नाव घेतल्या बरोबर लोकांना शिवाजी राजा आठवणार, मुघलांचे अत्याचार आठवणार, अफजलखान आणि शाहिस्तेखान आठवणार. भूषण हि आठवणार, शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी हे हि आठवणार.  औरंगजेबाचे संपूर्ण भारताचे इस्लामीकरण करण्याचे स्वप्न महाराष्ट्रात भंगले. हिंदवी साम्राज्याची घुड दौड उत्तरे पर्यंत पोहचली.  अहल्याबाई होळकर समेत अनेक मराठा सरदारांनी उत्तरेतल्या हजारो मंदिरांचा जीर्णोद्धार केला.....इत्यादी.  एका रीतीने हिंदवी साम्राज्याचे स्वप्न साकारल्या गेले.  सारांश शिवाजी राजेंमुळे देशाचे इस्लामीकरण करण्याचे  औरंगजेबाचे स्वप्न भंग झाले. सत्य हेच आहे, आजच्या अल्पसंख्यक नेत्यांना  शिवाजी आवडत नाही.  त्यांना प्रसन्न करण्यासाठी  शाहिरांना पुरस्कार देण्याचा  विरोध करणे आवश्यक होते. 

मी त्याला विचारले विरोध करण्याने शरद पवारांना काय फायदा होणार? तो म्हणाला  कांग्रेसने ब्राह्मण+ दलित + मुस्लीम गठ्जोडची राजनीती करून देशावर शासन केले. वीपी  सिंग यांनी कांग्रेसच्या  राजनीतीला सुरंग लावला.  ओबीसी + मुस्लीम गठ्बंन पुढे आणले.  मायावतीने दलित+ मुस्लीम आणि ब्राह्मण कार्ड खेळले.  तसेच बिहार मध्ये लालूने हि मुस्लीम + यादव कार्ड खेळले.  या सर्वांना सत्ता मिळाली. दोन्ही राज्यात अल्पसंख्यक आणि दलित कॉंग्रेस पासून दूर गेले. बाकी उरलेले भाजपात गेले. दिल्लीत  ही लोकसभेच्या निवडणूकीत हिंदुवादी  भाजप जिंकली कॉंग्रेसचा दारूण पराभव झाला. केजरीवाल यांनी या मौक्याचा फायदा घेतला.  दिल्लीतलली ८०% अल्पसंख्यक मते आपकडे वळवली. भारी बहुमताने विधान सभा निवडणूक जिंकली.  मुख्यमंत्री केरीवाल यांनी नौटंकी सोडून व्यवस्थित राज्य केले तर  कॉंग्रेस दिल्लीत  हि  संपुष्टात येईल.

महाराष्ट्रात हि जर अल्पसंख्यक मते राष्ट्रवादीकडे वळली, तर शरद पवारांची बल्लेबल्ले होईल. ज्या शरद पवारांनी कित्येकदा शाहिरांचा सम्मान केला, त्यांचे अनुयायी विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरले. त्यांच्या  आदेशनुसार हे सर्व घडले.  बाकी कांग्रेसचे म्हणाल तर वरून काही हुकुम  आला नाही.  विरोध कि समर्थन काय करायचे त्यांना कळले नाही.  

त्याचे इतिहास ज्ञान पाहून मी विचारले आपने इतिहास पढ़ा है क्या? और एक बात क्या आप पूर्वांचली हो क्या?  किसी भी बात में राजनीती ढूंढकर उसका  गहरा विश्लेषण कोई पूर्वांचली हि  कर सकता है. पण एक प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. संभाजी ब्रिगेडवाले तर शिवाजी राजेंना आपला आदर्श मानतात. त्यानी का विरोध केला. तो म्हणाला, मी पूर्वांचली आहे, मला  बीए मध्ये इतिहास हा एक विषय होता. आयुष्यात त्याचा कही उपयोग झाला नहीं हे वेगळे. बाकी संभाजी ब्रिगेडचे  म्हणाल तर,  रस्त्यावर दंगामस्ती, तोडफोड करणार्या छुटभैये नेत्यांना आपल्या राजनीतिक आकाना प्रसन्न करून  राजनीतिक जीवनाची सुरुवात करायची असते. वरिष्ठ नेता प्रसन्न झाले तर निदान 'वार्ड' ची तरी निवडणूक  लढायला मिळू शकेल, हि अपेक्षा.  बाकि इतिहास वैगरेह किंवा पुरंदरे यांच्या लेखानाबाबत त्यांच्या पैकी अधिकांश लोकांना  काही माहिती ही असेल मला नाही वाटत. असली तरी हि, राजनीतिक उद्देश्य साधण्यासाठी त्याच्या कडे दुर्लक्षच करतील.   

तेवढ्यात माझे स्टेशन आले, मी मेट्रोतून उतरलो. घरी येता येता विचार करू लागलो. त्याच्या बोलण्यात हि तथ्य होते. महाराष्ट्रात विशेषकरून मुंबईत पूर्वांचली (भैयांची) लोकांची  संख्या भरपूर आहे. ते हि निवडणूकीत मते देतात. एक गैर मराठी माणूस या घटनेकडे कसे पाहतो. हे हि लोकांना कळले पाहिजे.  म्हणून हा लेख.

Monday, August 17, 2015

नामाची महिमा न्यारी


नाम संकीर्तन साधन पैं सोपे
जळतील पापें जन्मांतरीची.
(संत. तुकोबाराय)

 
शेक्सपिअर म्हणतो नावात काय आहे? अरे पण नाव नसते तर शेक्सपिअरला  कोणी ओळखले असते. नावाच मुळे शेक्सपिअरला लोक आज ही ओळखतात. नावाची महीमाच न्यारी आहे. व्यक्तीपेक्षा त्याचे नाव मोठे असते.  समुद्रावर सेतू बांधताना, राम नाव लिहिलेले पाषाण समुद्रावर तरंगत होते. पण भगवंतानी आपल्या हाताने समुद्रात टाकलेला दगड समुद्रात बुडाला कारण त्या दगडावर राम नाम लिहिलेले नव्हते. भगवंतापेक्षा, त्यांचे नाव जास्त परिणामकारक होते.

दिल्लीत प्रतिनियुक्तीवर आलेला एक सरकारी अधिकारी आपले विजेचे बिल ठीक करण्यासाठी DESUच्या कार्यालयात गेला.  तिथल्या बाबूला आपले नाव आणि पद सांगून बिल ठीक करण्यास विनंती केली.  च्यायला आपल्या पदाचा रौब दाखवितो, बाबू भडकला, इथे सर्वच मोठे अधिकारी येतात, आधी बिल भरा, अप्लिकेशन द्या, मग काय करायचे ते बघू. अधिकारी हात हलवीत कार्यालयात परतला. त्याने आपल्या पीएला, घडलेला प्रकार सांगितला. त्याच्या पीए म्हणाला ‘साब इतनी सी बात के लिये आपने क्यों तकलीफ ली’.  त्याने साहेबांकडून बिल घेतले, लगेच DESUतल्या मोठ्या अधिकाऱ्याला फोन लावला, मी अमुक अधिकार्याच्या पीए बोलतो आहे, साहेबांच्या बिलात समस्या आहे, सिपाहीला पाठवीत आहे. अर्थातच दोन तासांत बिल ठीक झाले.  आता हे ही समजले असेल, अधिकांश अधिकारी आपल्या घरची सर्व कामे अर्थात वीज, पाण्याची बिले, प्रापर्टी टेक्स, इन्कमटॅक्स,  बेंकेच कामे इत्यादी आपल्या व्यक्तिगत स्टाफ कडून का करवून घेतात.

देवळात हि सतत प्रभूचे नाव घेणाऱ्या सेवकांचीच चलती असते.  दिल्लीत दर मंगळवारी श्री रामाच्या मंदिरा एवजी हनुमान मंदिरातच भक्तांची भीड जास्त असते.  भक्त रामनाम जपणार्या हनुमन्ताला त्यांच्यावर आलेले संकट दूर करण्याची विनंती करतात. हनुमंताला प्रसन्न करण्यासाठी त्याला नेवेद्य हि अर्पित करतात.   श्रीरामाला कुणी विचारात सुद्धा नाही. तसेच शिवाच्या मंदिरात नंदीला आणि गणपतीच्या मंदिरात उन्दिराला हि अनन्य महत्व आहे.  प्रभूचे हे सेवक हि भक्तांच्या हाकेला धावून येतात आणि त्यांचे संकट दूर करतात.  म्हणूनच तुलसीदासांनी म्हंटले आहे,  
 


संकट कटै मिटै सब पीरा,जो सुमिरै हनुमत बलबीरा.

अर्थात जे भगवंताला शक्य नाही ते कार्य हि भगवंताचे नामस्मरण करणारे भक्त सहज करू शकतात.  आपण आज पाहतोच भगवंताचे नाव घेणारे लोक किती हि पाप करत असतील तरी ते  भगवंताच्या कृपेने सुखी आणि समृद्ध होतात. साक्षात लक्ष्मी त्यांच्या घरी पाणी भरते. महापापी सुद्धा पवित्र होतात. म्हणूनच समर्थांनी म्हंटले आहे. 

नामें पाषाण तरले.
असंख्यात भक्त उद्धरिले.

महापापी तेची जाले.
परम पवित्र
.



Wednesday, August 12, 2015

आजची ज्वलंत चर्चा - सुरेल कोण ?

 
दूरदर्शन वाहिन्यांवर, ज्वलंत आणि गंभीर मुद्यांवर चर्चा कश्या रंगतात....

हात हलवीत हातवारे आले, हा! हा! हा!. आज रंगणार सुरांची चर्चा, माऊ, कुत्रा, कोकीळ, कावळा, कोण सुरेल तुम्हीच ठरवा. (मनातल्या मनात इथे माझाच  निर्णय अंतिम असतो)  हा ! हा! हा!.उडी मारुनी मनी आली बारीक आवाजात हलकेच म्हणाली, हातवारे भाऊ, आवाज आहे माझा गोड, सदा गाते म्याऊ म्याऊ म्याऊ.तेवढ्यात ओरडला दादा कुत्रा, हळवा-बुजरा गळा तुझा, खर्जातला बघा सूर माझा, भों भों भों भों भों.

ना सुरांचे ज्ञान तुम्हास्नी, ना तालाचे भान, रडत असतील पूर्वज सारे, ऐकून तुमचे गान. परंपरेचे मला ज्ञान, संगीताची मीच आहे राणी, पंचम सूर हा ऐका माझा, कुह कुह कुह कुह.

ह: ह: ह: ह:, जुनाट बूर्ज्वा सूर तुझा, आज जमाना रेपचा, पुरोगामी या कावळ्याचा, रेप रेप रेप रेप, कांव कांव कांव कांव.

कोण बूर्ज्वा, तू हलकट, नालायक, चुडेल-डाकिन तू,  कुह कुह, कांव कांव. म्याऊ म्याऊ, भों भों भों, हातवारेचा हा! हा! हा!.

ज्वलंत चर्चा रंगली अशी, कान लाउनी ऐकती सारी, ज्ञानी अज्ञानी प्रतीगामी, ऐकू आले केवळ, ढेन्चू, ढेन्चू, ढेन्चू गर्दभ गान.

आजची चर्चा इथेच संपली, आपण उद्या पुन्हा भेटू, नवीन विषय पण ओरड तीच,  ढेन्चू, ढेन्चू ढेन्चू.

कुणाला काही कळले का?  नसेल तर उद्या पहा ‘आजची ज्वलंत चर्चा’

Saturday, August 8, 2015

सत्य कथा - रुपयाचे कांदे वीस पैश्यात


सीपी ते उत्तम नगर, ३५ मिनिटांचा मेट्रो प्रवास.  माझ्या जवळ बसलेला  एक मेट्रो प्रवासी सहज म्हणाला 'प्याज फिर महंगा हो गया है, सरकार को नतीजा  भुगतना पड़ेगा.' 'कोण म्हणतो कांदा महाग झाला' एक पांढरे केस वाला वयस्कर ग्रामीण (चौधरी) उतरला. त्यावर तो प्रवासी म्हणाला, चौधरीजी मालूम है, आज प्याज का भाव ५० रुपया किलो है.  कांद्यामुळे सरकार पडते, १९९८ मध्ये दिल्लीत काय घडले होते माहित आहे का?

चौधरी उतरला,  चांगले माहित आहे, त्या वेळी हि कांद्याचा  भाव ५० रुपये किलो झाला होता.  पण त्याला १७ वर्षे झाली. त्या वेळी बसचे भाडे ३ रुपये होते, आज १५ रुपये आहे. मेट्रोत तर आणखीन जास्त लागतात.  माझ्या गळ्यात लटकलेले आय कार्ड पाहून, मला उद्देश्यून म्हणाला, या कालावधीत सरकारी  बाबूंचे पगार तर ५-७ पट नक्कीच वाढले असतील.  मी काय चूक बोलतो आहे. मी म्हणालो चौधरीजी आपले म्हणणे खरे आहे. आपण शेतकरी आहात का? 

चौधरी पुढे म्हणाला, माझी राजस्थान मध्ये शेती आहे, कांद्याच्या शेतीत कितीतरी वेळा नुकसान झाले आहे. मी तर शेतात कांदे लावणे सोडून दिले आहे.  सरकार कुठली हि आली तरी तिला शेतकर्यांची पर्वा नाही. तुम्हीच सांगा, महागाई शेतकर्याला हि आहे कि नाही, १९९८ च्या हिशोबाने आज सीजनमध्ये कांद्याला एका किलोचा ५०-७० रुपये आणि अगस्त-सेप्टेम्बरमध्ये किमान १००-१५० रुपयांचा भाव मिळाला  पाहिजे.   पण आज ऑगस्टच्या महिन्यात हि किलोला भाव फक्त ५० रुपये आहे.  सीजनमध्ये तर कांद्याचा भाव केवळ १० रुपये होता.  आज  जर किलोचा  भाव २५० रुपये असता तर कांदा महाग झाला म्हणता आले असते. सच तो यही है, गेल्या १७ वर्षांत कांद्याचा भाव १ रुपया वरून २० पैश्यावर आलेला आहे. त्याचा ह्या बोलण्यावरून मेट्रोत जोरदार हशा उमटला. एक प्रवासी उद्गरला,  लगता है, बुढापे में चौधरीजी  का दिमाग चल गया है.   

तेवढ्यात उत्तम नगरचे स्टेशन आले. घरी जाताजाता चौधरीजी जे म्हणाले त्यात किती सत्य आहे याचा विचार करू लागलो. चौधारीजींचे म्हणणे खरेच होते. खरोखरच गेल्या वर्षांत कांद्याची किंमत घसरत घसरत  रुपयावरून वीस पैश्यांवर आली आहे.


Wednesday, August 5, 2015

शतशब्द कथा - स्वाभिमानी मुलगा



गजाभाऊ काय करतो रे मुलगा तुझा?

फारेनला आहे आजकल.

कुठे दुबई ला

आपली छाती ३६ इंचाची छाती ५६ इंची फुलवत गजा म्हणाला, छे छे, साहेब, कनाडात सेटल झाला  आहे.

काय करतो तिथे?

"मजे मारतो आहे तिथे, रहायला एसी जागा आहे. सकाळचा नाश्ता, लंच, डिनर सर्व टाइम-टू-टाइम मिळते. मेडिकल फेसिलिटी पुण्या-मुंबईपेक्षा ही बेस्ट आहे".

अस होय, मग लग्न वैगरेह झाल असेल त्याच?

"छे हो, स्वाभिमानी मुलगा आहे, म्हणतो करेल तर मराठी मुलीशीच, आता साहेब तुम्हीच सांग, तिथे जेल मध्ये मराठी मुलगी कुठे मिळणार?"

आ!!!

Monday, August 3, 2015

आनंदाचा क्षण आणि ....



त्याचा आईचा फोन आला, तू बाप झाला, मुलगी  झाली आहे. हि आनंदाची बातमी कळताच तो तडक दिल्लीला निघाला. दुसर्या दिवशी सकाळीच आपल्या नवजात परीला बघायला तो बी एल कपूर हॉस्पिटल वर पोहचला.  

त्याला बघताच बायकोच्या चेहर्यावर मंद स्मित पसरले, तिने पाळण्याकडे इशारा केला. पाळण्यात ती चिमुकली परी शांत झोपलेली होती. त्याने अलगद त्या चिमुकल्या परीला उचलले. अचानक त्याला हसू आले. असे हसता काय, बायकोने विचारले. तो हसतच म्हणाला कशी डोळे वटारून पाहते आहे अगदी तुझ्या सारखी. आता तुला मैत्रीण मिळाली, तुम्ही दोघी मिळून माझ्या डोक्यावर किती मिरे वाटणार या कल्पनेनेच मला हसू आले.  बायको म्हणाली,  तुमच्या जिभेला काही हाड... 'नाहीच आहे, हो न परी', म्हणत तो जोरात खळखळून हसला.  त्याचा आयुष्यातला सर्वात मोठा आनंदाचा  क्षण. 

तो बेंच वर वार्डच्या बाहेर बसला होता. एक वयस्क बाई त्याच्या शेजारी येऊन बसली. तिने त्याला विचारले, क्या हुआ 'काके'. 'लक्ष्मी आई है घर में', तो उतरला. ते ऐकून तिचा चेहरा काळवंडला, त्याच्या पाठीवर हात फिरवत  सांत्वन करत म्हणाली,  चिंता मत कर काके, अगली बार लड़का होगा.  तिचे सांत्वन करणारे शब्द ऐकून त्याचे डोके सटकले 'मला  मुलगी झाली, मी खुश आहे, हिला कशाचे दुःख'.  चांगले सुनावले पाहिजे हिला. पण तो थबकला. दोन दिवस अगोदरच त्या बाईच्या मुलीला, मुलगी झाली होती.  अद्याप हि सासरहून कुणी ही भेटायला आले नव्हते, तिचा नवरा सुद्धा.. ..

काके  = पोरा (मुलगा) 

मी आणि परी



Saturday, August 1, 2015

मोड आलेल्या मूग आणि मोठ यांचे घावन (धिरडे)


रात्री मूग आणि मोठ भिजायला टाकले होते. सकाळी कपड्यात बांधून ठेवले. वातावरण ढगाळ व थोडे थंड  असल्यामुळे  संध्याकाळ पर्यंत जास्ती अंकुरण झाले नव्हते. मोड थोडी बहुत आली होती. संध्याकाळचे ५ वाजले होते. बाहेर पाऊस सुरु होता. अश्यावेळी चटक-मटक खाण्याची  इच्छा होणे स्वाभाविक आहे. घरात आम्ही दोघेच होते. मी सहज सौ.ला म्हणालो भूक लागली आहे, पटकन काही चटक-मटक खायला करून देते का? सौ.ने विचारले, मुगाचे आणि मोठ्चे धिरडे चालतील का पटकन हेच बनविता येतील?  मी हो म्हणालो.

साहित्य:  एक एक वाटी मूग आणि मोठ, शिवाय २ मोठे तांदुळाची पिठी , हिरव्या मिरच्या ३-४, लसून ४-५ पाकळ्या, हळद १/२ चमचे, तिखट १-२ छोटे चमचे (स्वादानुसार), धने पूड १ मोठा चमचा, जिरे पूड १ छोटा चमचा आणि मीठ चवीनुसार.  तेल आवश्यकतानुसार

कृती: मिक्सरमध्ये मोठ, मूग, हिरवीमिरची, आले लसून टाकून आणि अर्धीवाटी पाणी घालून पेस्ट तैयार करून घ्या. एका भांड्यात पेस्ट टाकून त्यात हळद,  तिखट, धने आणि जिरे पूड आणि मीठ घालून फेटून घ्या. 


गॅस लाऊन त्यावर तवा ठेवा. तवा थोडा गरम झाल्यावर चमच्याने त्यावर थोडे तेल पसरवून मग एका मोठ्या चमच्याने  मिश्रण  तव्यावर पसरवून, दोन्ही बाजूनी धिरडे व्यवस्थित भाजून घ्या.  

टमाटरची चटणी: आपण नेहमीच धिरडे, चटणी किंवा टमाटरच्या सॉस सोबत खातो. पण  पावसाळ्यात कोथिंबीर सहज मिळत नसते.  घरात टमाटर होते. २-३ मध्यम आकाराचे टमाटरची मिक्सरमध्ये पेस्ट केली. एक लहान कढई गॅसवर ठेवली, १ मोठा चमचा  तेल टाकले, अर्धा चमचा मोहरी टाकली. मोहरी तडतडल्यावर त्यात १ चमचे तिखट टाकले. नंतर टमाटर पेस्ट टाकून एक उकळी येऊ दिली. नंतर एक लहान तुकडा गुळाचा टाकला आणि थोडे मीठ त्यात घातले. दोन एक मिनिटांनी गॅस बंद केला. ४-५ मिनिटात टमाटर सॉसचा स्वादिष्ट  विकल्प तैयार झाला.

केवळ १५ मिनिटात दोन्ही वस्तू तैयार झाल्या.  रिमझिम पाउस आणि सौ. सोबत धिरडे खाण्याची मजा काही औरच. नंतर गरम-गरम चहा  हि मिळाला.