Friday, August 29, 2014

गणपती पूजेच्या मागची अवधारणा


आज गणेश चतुर्थी, आज बाप्पा आपल्या घरी येतात. १० दिवस आपण बाप्पाची पूजा अर्चना करतो. अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाचे विसर्जन करतो. आपण बाप्पाची पूजा का करतो या मागची अवधारणा काय? हा प्रश्न मनात येतोच. 

गणपती किंवा गणाध्यक्ष याचा अर्थ गणांचा अधिपती सोप्या शब्दात म्हणावे तर कुळ, जाती, बिरादरी, राज्याचा किंवा देशाचा प्रमुख म्हणजे गणपती ज्याला जनतेने आपले प्रतिनिधी म्हणून निवडले आहे. वैदिक युगात प्रत्येक गण (कबीला) प्रजातान्त्रिक पद्धतीने आपल्या प्रमुखाची निवड करायचे. विभिन्न गणांचे प्रमुख मिळून इंद्राची निवड करायचे. असो.

आपल्या देशात गणराज्यांचे अस्तित्व बुद्धाच्या काळापर्यंत टिकून होते. मगधच्या राजा अजातशत्रू ने समस्त गणराज्यांच्या विनाश करून मगधचे विशाल साम्राज्य उभे केले.  १९४७ मध्ये भारताला स्वतंत्रता मिळाली आणि पुन्हा गणराज्य भारतात पुनर्जीवित झाले. आज देशात प्रधानमंत्रीच्या स्वरूपात आणि राज्यात मुख्यमंत्री गणाध्यक्ष- गणपती कार्यभार संभाळतात.

देशावर/ राज्यात शासन करणाऱ्या प्रमुखाच्या अंगी काय गुण असावे त्याचे स्वरूप म्हणजे बाप्पाची मूर्ती. बाप्पाची मूर्ती शासकाच्या अंगी काय गुण असावे याची आठवण आपल्याला करून देते. बापाचे विशाल मस्तक बुद्धिमत्तेचे प्रतीक आहे. शासक हा बुद्धिमान असावा. परिस्थितीचे विश्लेषण करणे आणि त्यानुसार निर्णय घेण्याची क्षमता शासकात असावी. अन्यथा काय होते, हे आपण गेल्या ५-७ वर्षांत आपण बघितलेच आहे. बाप्पाचे कान लांब आहेत आणि मुख लहान. अर्थात शासक मितभाषी अर्थात कमी बोलणारा असावा पण ऐकण्याची क्षमता त्याच्या अंगी असावी. वाचाळ लोक दुसर्याचे ऐकत नाही. अश्या लोकांना निवडण्यात काहीच अर्थ नाही. कारण ऐकण्याच्या क्षमतेशिवाय जनतेचे  विचार आणि मनोगत काय आहे शासकाला  कसे कळणार?  समर्थांनी ही म्हंटले आहे, ‘श्रवणें होये कार्यसिद्धीl श्रवणें लागे समाधीl श्रवणें घडे सर्व सिद्धीl समाधानासीl’(दा.बो. ७-८-८). बाप्पाला लंबोदर ही म्हणतात. बाप्पाचे उदर मोठे आहे. याचा अर्थ शासकाच्या अंगी सर्व काही पचविण्याची क्षमता असायला पाहिजे. एकी कडून मिळालेली बातमी दुसरीकडे सांगितली नाही पाहिजे. अन्यथा सहयोगी मध्येच आपसांत भांडणे होतील. आपले मनोगत मित्र असो वा शत्रू कुणाच्या ही समोर उघड केले नाही पाहिजे. प्रजेच्या कल्याणासाठी स्वत:चे मान-अपमान सर्व पचविण्याची क्षमता असली पाहिजे.  बाप्पाची सोंड हत्तीच्या सोंडीप्रमाणे मोठी आहे. आपल्याला माहितच आहे, हत्तीची सोंड मोठ्या मोठ्या वृक्षांना धाराशायी करू शकते त्याच प्रमाणे ती एक छोटी सुई सुद्धा उचलू शकते. तिची वास घेण्याची क्षमता  ही अदभूत असते.  राज्य प्रमुखाला देश्यात होणाऱ्या लहान-मोठ्या सर्व घटनांची, कुठे काय चालले याची माहिती असायला हवी. शिवाय शेजार-पाजारच्या देशांत आणि जगात काय चालले याची इत्यंभूत माहित ही असायला पाहिचे. अन्यथा केंव्हाही दगा होऊ शकतो. शिवाजीचे राजांचे गुप्तचर विभाग त्या काळी देशात सर्वश्रेष्ठ होते म्हणून ते आग्र्याहून सहज परत येऊ शकले. समर्थांनी म्हंटले आहे: ‘जो दुसर्यांचे अंत: कारण जाणे l देश काळ प्रसंग जाणेल त्या पुरुषा काय उणे l भूमंडळीl’ (दा.बो.१४-७-२७).



.....


  

Tuesday, August 26, 2014

मैत्रीण


 
(पात्र: ताई: उमेश ची मोठी बहिण, उर्मी: उमेशची बायको, उमेश)

उर्मी: वन्स, तुम्ही समजवा न उमेशला, तुमच ऐकेल तो. मी पुष्कळ प्रयत्न केला माझं  ऐकतच नाही. एकच रट लाऊन बसला आहे, पहिले मुलगा पाहिजे, मुलीचं नंतर बघू. वन्स, लग्नानंतर पहिल्यांदा गर्भार राहिली आहे मी. पहिले मुलगी झाली तर काय झालं. मी त्याला म्हंटले, पुन्हा गर्भात मुलगी आली तर मी नाही म्हणणार नाही गर्भपाताला. भावाला बहिण पाहिजेच. मग बहिण मोठी असेल तर काय फरक पडतो.

ताई: पुष्कळ फरक पडतो, तुला माहित आहे, बाबांनी माझ्यासाठी इंजिनिअर मुलगा बघितला. सालंकृत कन्यादान केल, सव्वा लाख हुंडा दिला वर २० तोळे सोन ही. त्याच वेळी उमेशला इंजिनीरिंग मध्ये अडमिशन साठी २ लाख पाहिजे होते. वडिलांनी नकार दिला. त्याच इंजिनीअर व्हायचं स्वप्न, स्वप्नच राहिलं. तू, तुझ्या जिद्दीपायी त्याच्या होणाऱ्या मुलाचं स्वप्न ही भंग करणार का? कदाचित त्याला मुलगी नकोच असेल. कालच उमेशचा फोन आला, होता. तुला समजवायला सांगितल आहे. तुला इथे सोडून,  तो वात्सल्य क्लिनिक मध्ये गेला आहे, अपॅाइंटमेन्ट घेण्यासाठी.

उर्मी: ताई मोठ्या आशेने मी इथे आले होते, पण तू सुद्धा, तुला पटतयं का, हे?. मी गर्भपात करणार नाही, माझा पक्का निश्चय आहे.

ताई: तुझ्या या जिद्दीपायी उद्या उमेशने तुला सोडून दिले तर तू काय करेल? आधी आपल्या आई-बाबांना विचार या बाबतीत.

उर्मी: (काहीच बोलत नाही)

ताई:  तू त्यांना विचारल असेलच. त्यांनीही तुला म्हंटल असेल, उगाच बाऊ करू नको, शुल्लक गोष्टीचा. अरे, संपूर्ण आयुष्याची कमाई खर्च करून त्यांनी तुझे लग्न लाऊन दिले. पुन्हा मुलगी, शुल्लक कारणावरून माहेरी आली, त्यांना कसं चालेल?

उर्मी: मी नौकरी करेन, कुणी आसरा नाही दिला तर एकटी राहेन. पण गर्भपात करणार नाही.

ताई: मूर्खासारखे बडबड करू नकोस. हे जग लांडग्यांनी भरलेल आहे, एकट्या स्त्रीला लोक फाडून खातात. असला विचार डोक्यात मुळीच आणू नको.

उर्मी: (मोठ्याने) ताई, तुला कळत कसं नाही, चार महिन्याची गर्भार आहे मी. तिची हालचाल पोटात जाणवते. रात्री स्वप्नात येऊन बोलतेय ही. कालच रात्री स्वप्न बघितल, ती विहरीत पडली आहे, आई वाचवा म्हणून हाक मारतेय. मी हात पुढे केला, सगळं पुसट झाल. दचकून उठले. घामाघूम झाले होते. मी कसं मरू देऊ आपल्या पोटच्या पोरीला. तुला कसं कळणार ताई, ज्याच्यावर वेळ येते. तोच सांगू शकतो. नुसत्या गर्भपात शब्द म्हंटला तरी अंग शहारून येत. मनाला किती यातना होतात तुला कसं कळेल.

(काही क्षण शांतता, ताई सोफ्यावर ठेवलेल्या बाहुली कडे बघते. हळूच अलगद बाहुलीला  कडेवर घेते, पुन्हा उर्मी कडे वळून)

ताई: उर्मी ही बाहुली बघ, अक्षय सहा महिन्याचा होता, तेंव्हा घेतली होती. खेळणं म्हणून. (चेहर्यावर हास्य आणत). तुला आमच एक गुपित सांगू, अजून कुणालाच नाही माहित. तुलाच सांगते, ही बाहुली नाही, माझी छकुली आहे. (बाहुली कडे बघत) आहे नं ग राणी,  मी किती धांटरट आहे, तुझी दुधाची वेळ लक्षातच नाही राहिली. सॉरी हं, बघ कोण आलंय आपल्या कडे, तुझी मामी आली आहे, गुड मार्निंग म्हण तिला. गुड मार्निंग मामी! (बाहुलीचा हात हलविते). उर्मी, आपण नंतर बोलू, छकुलीला भूक लागली आहे.

ताई सोफ्यावर जाऊन बसते आणि बाहुलीला मांडीवर घेऊन तिला पाजायचे नाटक करते. उर्मी स्तब्ध होऊन एकटक पाहतच राहते. ती भांबावून गेली आहे, काय बोलावे तिला काहीच कळत नाही. काही वेळ काही वेळ शांतता.   

ताई: (बाहुलीशी) पोटोबा भरलं वाटत, राणी साहेब झोपा आता आम्हाला जरा कामच बोलायचं आहे, तुझ्या मामीशी.  

(ताई बाहुलीला  अलगद सोफ्यावर निजवते).  

ताई: झोपली एकदाची, उर्मी तुला माहित आहे, कालच स्वप्नात आली होती. म्हणाली कशी, आई एवढचं प्रेम होत माझ्यावर तर मला का मारलं.  तिला कसं सांगणार, किती दुबळी आणि असहाय होते मी. वाचवू नाही शकले तिला. म्हंटल, छकुली, अपराधी आहे तुझी, तुला पाहिजे ती शिक्षा कर मला. ती काय म्हणाली, सांगू! आई, मी तर सुटले, मुक्त झाले, पण तू जन्मठेप भोगते आहे. तुझी दशा पाहून मला ही चैन मिळत नाही. या बाहुलीत माझा ही दम घुटमळतो. लवकर ये नं. उर्मी, तिला त्रास होत ग. पण मी कशी जाऊ  संसार सोडून.  नवरा आहे, पोटचा गोळा अक्षय आहे, त्यांच्या साठी जगावं लागणार. रोज रात्री गळ्यातगळे घालून आम्ही रडतो ग. झोपेच्या गोळ्या घेते आजकाल. या जगात स्त्रियांना भोग भोगावेच लागतात...

(ताई रडू लागते, उर्मी जवळ जाऊन ताईच्या खांद्यावर हात ठेवते. काय बोलावं तिला काहीच कळत नाही आहे,  तेवढ्यात  दारावरची वेळ वाजते, ताई डोळे पुसत, दरवाजा उघडते, उमेश आत येतो)  

उमेश: (उर्मीकडे पाहत) काय म्हणता बाईसाहेब! 

उर्मी: (काही क्षण चूप राहते), जशी, तुमची इच्छा.

उमेश: आनंदाने, देटस लाईक अ गुड गर्ल. (ताई कडे पाहत) मला माहित होत, ताई ही तुझ जरूर ऐकेल. थेक्स. (उर्मीकडे पाहत) तुझ्या जिद्दी मुळे आधीच उशीर झाला, आज सर्व निपटले पाहिजे

ताई: चहा घेणार का?

उमेश: नंतर कधी, आज आधीच उशीर झाला आहे, चल उर्मी निघू या.

उर्मी: ताई येते  हं(तिचा चेहरा भावशून्य आहे, एखाद्या कसाई कडे जाणार्या गाई सारखा) दोघ बाहेर पडतात, ताई दरवाजा बंद करते.     

ताई: (बाहुलीला हातात उचलत) छकुली, एक आनंदाची बातमी सांगू का तुला,  तुझी मामी, तुझ्याच सारखी बाहुली आणायला गेली आहे. छान, मस्त, मैत्रीण भेटणार आहे तुला, खेळण्यासाठी, हा! हा! हा!........







Saturday, August 23, 2014

कामधेनु

 

 

जुलै महिन्यात हॉस्पिटलच्या बेड वर  मनात आलेले विचार....

हक्काची गाय आणली
पुढ्यात चारा टाकला
तिने भरपूर दूध दिले.
सखी, भार्या, माता
कर्तव्य चोख बजावली.

चाऱ्याच्या बदल्यात कर्तव्य
त्यात कसले आले प्रेम
माझा शुद्र पुरुषी विचार.

त्या दिनी हॉस्पिटल मध्ये
दोन्ही हातानी मला
बेड वर बसविले.
डोकावुनी तिच्या डोळ्यांत पाहिलं
तिथे दिसले केवळ
निखळ निरागस प्रेम.

स्वत:ची लाज वाटली
का ओळखू नाही शकलो
प्रेम तिचे?

थरथरत्या हातानी
तिचा हात घट्ट पकडला
कापऱ्या आवाजात म्हणालो
भीती वाटते मला.

खंबीर आवाजात ती म्हणाली
काही नाही होणार तुम्हास्नी
मी आहे ना.

त्या क्षणी  ती मला
यमराजाशी झुंज देणारी
सावित्री सम भासली.


प्रेमाच्या  माणसांसाठी
सर्वस्व अर्पण करणारी
संसारात सुखाचे
रंग भरणारी.
खरोखरीची
कामधेनूच ती. 


Friday, August 22, 2014

कापूसकोंड्याची खरी गोष्ट


फार पूर्वी विदर्भ देशात आटपाट नगर होते, नगरच्या वेशीवर धनाजी नावाचा शेतकरी आपल्या बायको आणि एकुलत्या एक छकुल्या सोबत सुखाने नांदत होता. आपल्या शेतात तो कधी ज्वारी, तर कधी तूर, भुईमूग इत्यादी पिक घेत होता.  वरुण राजाच्या लहरीपणाचा फटका विदर्भाला नेहमीच बसतो. धनाजी सारख्या शेतकरीच्या भाग्यात लक्ष्मी नव्हती पण दुर्भिक्ष पडले तरी उपासमार व्हायची नाही. पोटाचा खड्डा अर्धा तरी भरल्या जात असे.
    
एक दिवस धनाजी शेत नागरत होता. अचानक शुभ्रवेशधारी लांब-लचक रेषे असलेला कापूसकोंडा त्याचा शेतात उतरला. कोण ग पावण, कुठून आलात, धनाजीने विचारले. मी दूरदेशी पाताळातून आलो. मला मय दानवाने पाठविले आहे, तुझा उद्धार करायला. तुझ्या येण्याने माझा उद्धार कसा काय होईल,धनाजीने पुसले.  त्यावर कापूसकोंडा म्हणाला, मी कसा पांढरा  शुभ्र, रोप्या सारखा, मला तुझ्या शेतात राहायला जागा दे. माझी लागवड कर पांढरी  शुभ्र कापसी तुझ्या शेताची शोभा वाढवेल, रोप्याच्या नाण्याची बरसात होईल. धनाजीने विचारले, खरंच असं होईल का?  मी का खोटं बोलेल, एकदा बघ कि माझ्याकडे, कापूसकोंडा म्हणाला. धनाजी ने कापूसकोंड्या कडे पुन्हा एकदा टक लाऊन बघितले. रोप्यासारखा पंधरा शुभ्र लांब-लचक रेषांचा कापूस जर शेतात लावला तर नक्की रोप्याच्या नाण्यांची बरसात होईल. पण कुठली ही गोष्ट फुकट नाही मिळत हे ही धनाजीला माहित होते. त्याने कापूस कोंड्यास विचारले, माझ्या शेतात राहण्याचे तू काय घेईल. कापूस कोंडा म्हणाला मला काहीच नको, अट एकच, एकदा मी या शेतात आलो कि नेहमी साठीच  इथे राहणार. शिवाय  मला लावण्या आधी दरवर्षी मय दानवाची पूजा बांधावी लागेल, त्या साठी मोजावे लागतील १०० रोप्यांचे नाणे रोख. भरपूर पाणी, खत आणि विष ही मला पाजावे लागेल.  कबूल असेल तर मी इथे थांबतो. रोप्यांचे नाण्याचे स्वप्न बघत धनाजीने कापूसकोंड्यास शेतात राहण्याची विनंती केली. वरुण राजाची कृपा झाल्या मुळे त्या वर्षी धनाजीच्या शेतात भरपूर कपाशी लागली. खरं म्हणाल तर आटपाट नगरीच्या चहूकडे रोप्या सारखा शुभ्र कापूसच-कापूस  दिसत होता. कपाशीचे भरघोस पिक पाहून राजाचे मन चलबिचल झाले. राज्याची रिकामी तिजोरी भरण्याचा हीच वेळ. राजाने कपासिला आटपाट नगरच्या बाहेर विकण्यास प्रतिबंध लावला. स्वस्तात सर्व कापूस खरेदी केला.  कुठे धनाजी रोप्यांच्या नाण्यांचे स्वप्न पहात होता, कुठे त्याच्या नशीबी तांब्यांची नाणी आली. भरघोस पिक घेऊन ही त्याचे नुकसान झाले. आपल्या भाग्याला दोष देत, शेतात येऊन तो कापूसकोंड्यास म्हणाला, तुझ्या मुळे मला पहिल्यांदाच नुकसान झाले, तू येथून निघून जा, अन्यथा माझ्या बायको मुलावर उपाशी राहण्याची पाळी येईल.  त्या वर कापूसकोंड्याने  राक्षसा सारखा अट्टहास केला आणि म्हणाला धनाजी, अट आठव, मी आता येथून जाणार नाही. तू सावकाराकडे जा, शेत गहाण ठेव, १०० रोप्यांची नाणी आण, पुन्हा मय दानवाची पूजा बांध आणि माझी पेरणी कर. धनाजी जवळ दुसरा पर्यायच नव्हता, त्याने शेत गहाण ठेवले, १०० रोप्यांची नाणी आणली आणि मय दानवाची पूजा बांधली.

पण त्या  वर्षी वरुण राजाने विदर्भ देशावर पाउस पाडलाच नाही. पाण्या अभावी धनाजीचे शेत सुकून गेले. आता मात्र धनाजीचे डोके फिरले, तो कापूसकोंड्यास म्हणाला, तुझ्या नादी लागून माझा सत्यानास झाला. आता सावकाराचे कर्ज कसे फेडणार, बायको-मुलाला काय खाऊ घालणार? कापूसकोंडा हसत म्हणाला, मूर्ख, पाताळातले राक्षस आम्ही, माणसांचे रक्त पिणारे, आमच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला. रोप्याची नाणी पाहिजे होती न तुला, आता भोग आपल्या कर्मांचे फळ. जा त्या पिंपळाच्या झाडावर चढून गळफास लाव, आत्महत्या कर. हाच एक मार्ग तुझ्या साठी शिल्लक आहे. धनाजीने गळफास लाऊन आत्महत्या केली. त्या रात्री कापूस कोंड्याने राक्षसी वेश धरण करून त्याचे रक्त प्राशन केले.

अवसेची रात्र होती, घरात चूल्हा थंड पडलेला होता. छकुला अर्धपोटी अणि माय उपाशी होती. कुणाला ही झोप येत नव्हती. दोघे ही जागे होते. छकुल्याने विचारले आई, बाबा कुठे गेले? माय काय सांगणार. छकुल्याचे लक्ष दुसरीकडे  वेधण्यासाठी, ती म्हणाली, बाळ, तुला कापूसकोंड्याची गोष्ट सांगू. पण ती तरी कशी सांगणार, कापूसकोंड्याच्या नादी लागून त्याच्या बापाचे प्राण गेले, शेत गेल, उपासमार नशिबी आली. काय-काय सांगणार. माय चूप झाली. कापूस कोंड्याची गोष्ट अशीच अधुरी राहिली. तेंव्हापासून विदर्भात कुणीच कापूसकोंड्याची गोष्ट सांगत नाही.

टीप: कापूसकोंडा: बीटी कॅाटन

मय दानव: अमेरिकन बीज कंपनी....

Wednesday, August 20, 2014

सदू भारतीय क्रिकेट टीम मध्ये?


श्रीयुत सदानंद सुखात्मे उर्फ सदू, खरा मुंबईकर. सचिवालयात कार्यरत. मुंबईत सध्या अच्छे दिन आल्या नसल्याने, सदूची सुखाची नौकरी सुरु आहे. सकाळी ९ वाजता सदू घर सोडतो आणि सांयकाळी ५.३० वाजता पुन्हा घरात. अशी ८ तासाची सुख-चैनीची सरकारी नौकरी. खरोखरंच सदू नावाप्रमाणे सुखात्मे अर्थात सुखी आहे. सचिवालयातल्या इतर बाबूंप्रमाणे सदूला ही क्रिकेटचा भयंकर शौक. क्रिकेट वर  ‘एक्स्पर्ट कॉमेन्ट’ देण्यात सदू स्वत:ला पटाईत समजत होता. कुठल्या खेळाडू ने कसे खेळले पाहिजे त्याचे विशद वर्णन तो करत असे. इंग्लंड सिरीजमध्ये भारतीय टीमची दुर्दशा पाहून इतरांप्रमाणे तो ही दुखी होता. त्या दिवशी रात्री ११ वाजता नेहमीप्रमाणे सदू झोपायला बिस्तारावर पडला. तेवढ्यात त्याचा मोबईल वाजला. ‘च्यायला रात्रीच का लोकांना फोन करायची आठवण येते, मनातल्या मनात दोन शिव्या हाणत त्याने फोन उचलला’, दुसरी कडून आवाज आला, मी भारतीय क्रिकेट बोर्डाचा सचिव बोलतो आहे, अभिनंदन सुखात्मे, भारतीय क्रिकेट टीम मध्ये प्रारंभिक फलंदाज म्हणून पहिल्या वन डे मॅच साठी तुमचे सिलेक्शन झाले आहे.  ‘रात्री-अपरात्री थट्टा-मस्करी करायला आणिक कोणी सापडलं नाही का’? सदू ओरडला. ‘शांत व्हा, थट्टा-मस्करी करायला मला वेड नाही लागले आहे आणि मजजवळ तेवढा वेळ ही नाही. विश्वास नसेल तर टीवी उघडून बघा, तो पर्यंत मी होल्ड करतो. सदूने टीवी उघडला, ब्रेकिंग न्यूज सुरु होती. भारतीय क्रिकेट बोर्डचा नवा अभिनव  प्रयोग. देशातील लोकांचे मोबईल कम्प्युटर मध्ये फीड करून, एक नंबर काढला, तो मुंबईचा सदानंद सुखात्मे यांचा आहे, त्यांची निवड इंग्लंड विरुद्ध पहिल्या मॅच साठी झाली आहे. त्यांना या एका मॅच साठी १ कोटी रुपये पारिश्रमिक ही मिळेल. पाहू या ते भोपळा फोडण्यात यशस्वी होतात कि नाही. बातमी पाहताच सदूची बोबडीच वळली, बेंबीच्या देठाने सर्व बळ एकत्र करून एका दमात ओरडला, 'अहो, मला क्रिकेट खेळता येत नाही. चेंडूची ही भीती वाटते, उगाच हात-पाय तुटले माझ जे होईल ते होईल पण जग तुमच्यावर हसेल, एक कोटी ही पाण्यात जातील.  शिवाय माझ्या जवळ पासपोर्ट वैगरे ही नाही. त्या साठी सरकारी परमिशन घ्यावी लागते'. (च्यायला, सदूची मराठी मानसिकता बाहेर पडलीच, एखादा पंजाबी माणूस असता, तर १ कोटी साठी मंगळावर ही जायला तैयार झाला असता, ते ही कुठला प्रश्न न विचारता). दुसरी कडून आवाज आला, ‘तुमची भीती व्यर्थ आहे सुखात्मे साहेब, चेंडू लागला तरी तुम्हाला इजा होणार नाही याची खात्री देतो. कोट्यावधी रुपये घेऊन स्टार खेडाळूना भोपळा फोडता आला नाही ही सद्य परिस्थिती आहे, तुम्ही निश्चित त्यांच्यापेक्षा चांगले खेळाल, पासपोर्ट विजा सर्वांचा बंदोबस्त आम्ही बघून घेऊ. उद्या संध्याकाळची फ्लाईट आहे. तुम्ही फक्त तैयार राहा’ आणि त्याने फोन खाली ठेवला. अश्यारितीने सदू इंग्लंड विरुद्ध पहिली मॅच खेळण्यासाठी सज्ज झाला.

भारताने नाणेफेक (टॅास) जिंकली. धोनीने पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शिखर धवन सोबत आपला सदू मैदानात उतरला. पहिला ओवर त्याला खेळायचा होता तो ही एन्डरसनचा. खरं म्हणाल तर, सदूचे सर्वांग थरथर कापत होते, मनोमन रामरक्षा म्हणत सदू एन्डरसनचा पहिला चेंडू खेळण्यास तैयार झाला. एन्डरसनने पहिला चेंडू फेकला. सदूने डोळे बंद केले आणि बॅट हवेत फिरवला. चेंडू बॅटचा कार्नर वर लागला आणि स्लीपच्या वरून बाउन्डरीच्या बाहेर गेला. दुसर्या चेंडू वर ही असेच झाले.  एन्डरसनने रागाने एक बाउन्सर टाकला. चेंडू सरळ येताना पाहून सदूने डोळे बंद करून संगकारा जसा बॅट वर करून खेळतो जवळपास तशीच  बॅट सदूने वर केली. चेंडू बॅट वर लागला आणि विकेटकीपरच्या डोक्या वरून ६ रन साठी बाउन्डरीच्या बाहेर गेला. पहिला ओवर संपला. तीन चौकार आणि एक षटकार असे १८ रन सदूच्या खात्यात जमा झाले. एन्डरसनला एवढा मार कधीच पडला नसेल. दैवाला दोष देण्या व्यतिरिक्त तो काही ही करू शकत नव्हता.  दुसर्या ओवर मध्ये शिखर धवन ने ही जोश मध्ये येऊन दोन चौकार हाणले. तिसरा ओवर सुरु झाला, पुन्हा एन्डरसन समोर होता. पहिला चेंडू नेहमीप्रमाणे ऑफ स्टंप वरून बाहेर उसळला, बाहेर जाणारा चेंडू बॅट लागला आणि दोन स्लीपच्या मधून मैदानाबाहेर गेला. कप्तान कुकने एन्डरसनला काही निर्देश दिले. दुसरा चेंडू त्याने इनस्वींगर टाकला, चेंडू आपल्या दिशेने यातना पाहून भीतीने सदूने बॅट समोर केली, एक जोरदार झटका त्याला लागला, चेंडू बॅटला लागून पुढच्या पायाच्या चाटून  फाईनलेगच्या दिशेने मैदानाच्या बाहेर गेला. तिसरा चेंडू  एन्डरसनने ऑफ स्टम्पच्या दिशेने सरळ फेकला, साहजिक सदू लेग साईडला मागे सरकला पण त्याच्या बॅटला चेंडूचा स्पर्श झाला, चेंडू हवेत उडाला पण विकेटकीपरच्या मागे एक टप्पा पडून चेंडू पुन्हा मैदाना बाहेर गेला. सदूच्या खात्यात आतापर्यंत ३० रन जमा झाले. हा प्रकार बघून एन्डरसन भयंकर वैतागला होता. म्हणतातना ‘बकरे कि माँ कब तक खैर मनाएगी’. आता त्याने सरळ स्टंपच्या दिशेने यार्कर फेकला. चेंडूने सदूचा त्रिफळा उडविला. एन्डरसन आणि सदू दोघांनी सुटकेच्या निश्वास टाकला. सदू पेवेलीअन मध्ये परतला. सर्वांनी टाळ्या वाजवत त्याचे स्वागत गेले. इंग्लंड मध्ये पहिल्यांदाच भारतीय टीमला एक चांगली सुरुवात मिळाली होती. पेवेलीअन मध्ये बसून मॅच पाहणारा भारतीय संघाचा एक अधिकारी दुसर्याला म्हणाला, हा प्रयोग तर यशस्वी झाला. आता सिलेक्शन क्राईटेरीयात थोड बदल करू या. लोकांकडून मोबाइलवर मेसेज मागवू, जे मेसेज पाठवतील त्यांचे नाव सिलेक्शन करता कन्सिडर करू. रेट १० रु. प्रती मेसेज ठेऊ या. सहज २०-२५ कोटी रुपये एकत्र होतील. चांगला आईडिया आहे, दुसरा अधिकारी उतरला.

 नेहमीप्रमणे  भारतीय स्टार क्रिकेटपटू, मैदानात उतरण्याची रस्म अदायगी करून भोपळा न फोडताच पेवेलीअन मध्ये परतले. १०० रनांच्या टीम ऑल ऑउट झाली. सदू सर्वात जास्त रन बनविणारा क्रिकेटवीर ठरला. आता इंग्लंडची टीम मैदानात उतरली. सदू विकेट कीपर धोनी जवळ पहिल्या स्लीप वर उभा होता. भुवनेश्वर कुमारने टाकलेला पहिलाच चेंडू इंग्लंडच्या खेडाळूच्या बॅटच्या बाह्य किनार्याला लागून सरळ सदूच्या दिशेने उसळला. चेंडूला आपल्या दिशेने येताना पाहून सदू भीतीने किंचाळला.  अहो, केवढ्या जोरात ओरडता, दोन थेंब पाणीच तर अंगावर टाकले, काही स्वप्न वैगरेह पाहत होता काय? सौ.चा आवाज ऐकून, सदू ताडकन बिछान्यावरून उठला. डोळे चोळून समोर पहिले, सौ. समोर उभी होती. सदूचे स्वप्न भंग झाले होते. तो चिडून म्हणाला, सकाळी-सकाळी तुझ्या मुळे किती नुकसान झाले आहे, माहित आहे का? तब्बल एक कोटी रुपयांचे. सौ. आ! वासून सदू कडे पाहतच राहिली.