Monday, June 30, 2014

पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगती अकबर बीरबल कहाणी


पंतप्रधान कार्यालयात मी ज्या केबिन मध्ये बसतो ती एका मोठ्या हाल मध्ये आहे. मधोमध दरवाजा आणि दोन्ही बाजूला साडेतीन फूट उन्च पार्टिशन असलेल्या सहा केबिन्स आहेत. त्यात सहा अधिकाऱ्यांचे निजी सचिव व अन्य कर्मचारी मिळून जवळपास २४-२५ स्टाफ बसतो. दरवाजा उघडल्या बरोबर समोर मी जिथे बसतो ती केबिन दिसते.  हालचा दरवाजा उघडा असेल तर माझ्या समोरच्या  केबिनचा काही भाग दरवाजाच्या मागे झाकला जातो, तिथे एक ३ फुट उंचीची अलमारी आहे. सहजासहजी कुणाला दिसत नसल्यामुळे, तिथला स्टाफ त्यांचे रिकामे चहाचे कप इत्यादी त्या अलमारीवर ठेवतो.  

त्या दिवशी दुपारचे साडेतीन झाले असतील, नुकतच सर्वांचा चहा झाला होता, अचानक दरवाजा उघडून एक कर्मचारी आत आला, कापऱ्या पण सर्वाना ऐकू येईल अश्या आवाजात म्हणाला, पंतप्रधान इकडेच येत आहेत. मी चमकलोच, गेल्या १७ वर्षांपासून पंतप्रधान कार्यालयात कार्य करतो आहे, या आधी पंतप्रधान तर सोडा कुणा वरिष्ठतम अधिकार्याने सामान्य कर्मचार्यांच्या केबिन मध्ये डोकावल्याचे मला आठवत नाही. कदाचित त्यांना त्याची गरज भासली नसेल. म्हणतात ना देवाच्या दर्शनासाठी मंदिरात जावे लागते, देव क्वचितच भक्तांना दर्शन देण्यासाठी त्यांच्या घरी येतो. सर्वांनीच लगबगीने आपला पसारा व्यवस्थित करणे सुरु गेले. पण कुणालाच वेळ मिळाला नाही. त्या कर्मचारीच्या पाठोपाठच पंतप्रधान नरेंद्र मोदी आत आले. साहजिकच होते, पहिलेच केबिन असल्या मुळे त्यांची प्रथम दृष्टी माझ्यावर गेली. कामाबाबत जुजबी माहिती विचारली. प्रत्येक केबिन समोर उभे राहून त्यांनी कर्मचार्यांची विचारपूस केली. सर्वात शेवटी, अर्थात माझ्या केबिनच्या समोरच्या केबिन मध्ये बसणाऱ्या स्टाफची विचारपूस केली. त्यांची दृष्टी अलमारीवर ठेवलेल्या ७-८ चहाच्या रिकामच्या कपांवर ही गेली.  त्यांनी मिस्कीलपणे, विचारले बहुत चाय पितो हो आप लोग. स्टाफ मधल्या एका कर्मचार्याने उत्तर दिले, सर, सारे कप हमारे नाही है और लोग भी अपने खाली कप यहाँ रख देते है. पंतप्रधान हसले आणि म्हणाले दोस्तों, पने अकबर बीरबल की कहानी सुनी है. आम्ही सर्व टक लाऊन त्यांच्या कडे बघू लागलो, पंतप्रधान काय म्हणतात ते ऐकायला कान टवकारले.  

त्यांनी अकबर बीरबलची कहाणी सांगायला सुरवात केली. (पुढची गोष्ट मला जितपत कळली मराठीत)  

एकदा अकबर बादशाह, बीरबलच्या घरी गेले, पाहतात काय, बीरबल आणि बिरबलाची  बेगम एका  मंचकावर बसून आंबे खात होते. आत येताच अकबर बादशाहचे लक्ष  आंबे खाऊन जमिनीवर टाकलेल्या आंब्यांच्या कोयींवर गेले. अकबर बादशाहने मनात विचार केला बीरबल स्वत:ला शहाणा समजतो, आज चांगला मौका आहे. बीरबलला दाखवायला पाहिजे कि बादशाह ही किती बुद्धिमान आहे. अकबर बादशाहने त्या कोयी मोजल्या.  अकबर बादशाह म्हणाला, बीरबल मी सांगू शकतो, माझ्या इथे येण्या अगोदर तुम्ही किती आंबे खाल्ले आहेत ते. अकबर बादशाहने मोजलेल्या कोयींच्या आधारावर खालेल्या आंब्यांची संख्या सांगितली. आपणास सर्वांना माहित आहे. बीरबल हा अत्यंत बुद्धिमान होता. बादशाहच्या मनात काय आहे, बीरबलने सहज ओळखले. तो मिस्कीलपणे म्हणाला, जहाँपनाह, आपण चुकत आहात, या खाली टाकलेल्या कोयी, मी खालेल्या आंब्यांच्या आहेत. माझी बेगम तर कोयीं समेत आंबे खाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी क्षणभर थांबले, आणि सर्वांकडे बघितले. त्यांचा बोलण्याचा आशय कळला. आम्ही ही मुक्तपणे हसलो. (कहाणीचा अर्थ मला जो अर्थ कळला- बीरबलले आपल्या चातुर्याने बेशक बादशाहला मूर्ख बनविले असेल, पण मला मूर्ख बनविण्याचा प्रयत्न करू नका, उगाच दुसर्यांचे नाव कशाला घेता हा सर्व चहा, तुम्हीच गटकला आहे).  

पंतप्रधान निघून गेले. पण कर्मचार्यां सोबत अश्यारितीने संवाद साधणारा आणि त्यांना अकबर बीरबलची कहाणी सांगणारा कदाचित हा पहिलाच पंतप्रधान असेल.





Sunday, June 22, 2014

शतशब्द कथा -विषकन्या


मुंबई-पुणे महामार्गावर लाल रंगाचे भडक आणि सौंदर्य खुलवून दाखविणारे वस्त्र परिधान केलेली ती  सुंदरी गाडीला टेकून पुस्तक वाचत उभी होती.

"च्यायला काय माल आहे, कदाचित कुणी नटी असावी!" पुटपुटत त्याने बाईकची स्पीड वाढवली आणि तिच्या नजरेला-नजर भिडताच एक हवाई चुंबन तिच्या दिशेने फेकले. तिने ही हसंत-हसंत, हाताने चुंबन हवेत उडवित प्रत्युत्तर दिले.

"च्यायला पोरगी पटली. ...अररे.रे..." समोर वळण आहे तो विसरला होता. वेगवान बाईकने समोरून येणाऱ्या ट्रकला धडक दिली.

किर्रर्र... माझ्याच गाडी खाली यायचं होत का, हरामखोराला? आता बोंबला -ट्रक ड्राईवर.

"आईग!" ती किंचाळली. हातातल्या पुस्तकाने तिने पटकन चेहरा झाकला. पुस्तकाच्या कवरवर मोठ्या अक्षरात लिहिले होते ‘विषकन्या'.
              

Wednesday, June 18, 2014

उत्तर सापडेना आज?

(अल्पवयीन मुलींवर बलात्कार आणि त्यांची निर्घुण हत्या होते. अश्या घटना देशात घटत आहेत.  मग दिल्ली असो किंवा बदायूँ. प्रश्न अनेक आहेत पण उत्तर सापडत नाही. कुठे चूक झाली आमच्या पिढीच्या हातून कि आजची तरुण पिढी वासनेच्या आहारी जात आहे)

 

कुणी पायदळी तुटवली  

एक  नाजूक कळी  आज?

मध्यान्हन उन्हाळी पसरली

का स्मशान शांतता आज?

 

ममतेचा कोखात निपजली

का रक्त पिशाचे आज?

माय बहिण भार्या नाती

का निरर्थक झाली आज?

   

वासनेच्या डोहात तरंगती

का नव तरुणाई आज?

काय जाहली चूक आमची

उत्तर सापडेना आज? 

Saturday, June 7, 2014

पडद्या मागची व्यथा


रंगविले मुखवटे अनेक
स्वत:चा चेहरा मात्र
रंगविला न कधी.


तालावर नाचविल्या
मंचावर  कठपुतळ्या
नाचायला मला
मिळालच नाही.


मान नटसम्राटाचा
मिळतो बाहुल्यांना
दंश पराजयाचा
मलाच का मिळावा.


पडद्या मागची व्यथा
कळेल का कुणाला
रंगमंचावर मिळेल का
कधी मान सूत्रधाराला.

Sunday, June 1, 2014

मी केलेली पोहे-मुरमुरे भेळ

   

 शनिवारी  संध्याकाळी आमचे चिरंजीव घरात आले, त्यांच्या हातात एक आलू भुजीयाचे पॅकट होते. आल्या बरोबरच, आई भूक लागली आहे, भेळ करून देत का?  शुक्रवारी सायंकाळी आलेल्या वादळ (हिंदीत– आंधी, या पूर्वी कधी न बघितलेली, १५-१६ तास वीज नव्हती, नुकतीच वीज आल्या मुळे सौ. आराम करायला पलंगावर पहडुली होती).  घरात मुरमुरे संपत आले आहे, शिवाय   काल भाजी बाजार ही लागला नव्हता, कोथिंबीर, लिंबू ही घरात नाहीत- सौ.  मी म्हणालो, मग दडपे पोहे कर. पोहे ही संपत आले आहे- सौ. सौ.चा मूड काही ठीक दिसत नाही. मी चिरंजीवाना म्हणालो, तुझ्या आईची तब्येत काही बरी दिसत नाही आहे.  मीच करतो काही तरी. स्वैपाक घरात गेलो. दीड एक वाटी मुरमुरे होते, शिवाय एका पकेट मध्ये दोन-एक वाटी पोहे ही होते.   पोहे आणि मुरमुर्यांची भेळ करायची कल्पना मनात आली.  फ्रीज उघडून बघितले. टमाटर,  खीरा(काकडी)  आणि मिरच्या होत्या, विनेगरची (सिरका)  बाटली ही होती. विचार केल्या लिंबू एवजी विनेगर वापरले तर काय फरक पडेल. तीन  टमाटर,एक काकडी, तीन कांदे, दोन मिरच्या मोठ्या घेतल्या. दोन चेमचे विनेगर एका वाटीत ओतले आणि मिरच्या कापून त्यात टाकल्या.  मिरच्या विनेगर मध्ये काही वेळ ठेवल्याने त्यांचा तिखट पणा थोडा कमी होत. एका वाटीत दोन चमचे तेल घेऊन त्यात २ छोटे चमचे तिखट टाकले. तेलात तिखट टाकल्याने भेल मध्ये मिसळताना तिखट व्यवस्थित रीतीने सर्वत्र मिसळता येते, शिवाय तिखटाचा जळजळ पणा ही थोडा कमी होतो. कांदे, टमाटर आणि खीरा, जमेल तेवढे छोटे चिरण्याचा प्रयत्न केला. गॅस वर कढई ठेवली. आधी मुरमुरे आणि नंतर पोहे त्यात थोड्या वेळ परतले. (भेळ किंवा दडपे पोहे बनविण्या आधी मुरमुरे आणि पोहे ५-७ मिनिटे कढईत परतून घेते. असे केल्याने पोहे/ मुरमुरे कुरकुरीत होतात. खाताना विशेषकर लहान मुलांना मजा येते. ओली चटणी किंवा चिंचेचे पाणी मिसळले तरी भेळ मिळमिळीत लागत नाही. शिवाय मुंबईत दमट वातावरण असल्यामुळे मुरमुरे किंवा पोहे पुष्कळदा आधीच नरम असतात, असे मुरमुरे वापरल्यामुळे भेळ जास्तीस मिळमिळीत होते, मुबईकरच्या घरी हा अनुभव आलेला आहे). थोडी बुंदी (रायात्यासाठी वापरतात ती)  घरात होती अर्धा वाटी ती ही घेतली. आता एक परात घेतली. त्यात पोहे, मुरमुरे, बुंदी, आलू भुजिया मिसळी. नंतर चिरलेले कांदे, काकडी, टमाटर मिसळले. शेवटी विनेगर सहित मिरच्या मिसळून, अंदाजे मीठ ही मिसळले. सर्वात शेवटी  तिखट तेल व्यवस्थित हाताने मिसळले. आणि त्वरित साबणाने हात धुतले. अश्या रीतीने झणझणीत पोहे आणि मुरमुर्यांची भेळ तैयार केली. भेळ खाल्यावर एक कडक चहा  सौ. तर्फे अस्मादिकास मिळाला-उपकार केले [अर्थात ती हे काही वाचणार नाही याची खात्री, नाहीतर चहाला ही मुकावे लागेल). भेळ चांगली झाल्याची पावती होती. शिवाय सुट्टीच्या दिवशी असले प्रकार तुम्हीच करत जा, तेवढाच  मला आराम मिळेल-सौ. आता काय बोलणार...