Sunday, June 25, 2017

योग: कर्मसु कौशलम्- सौपा अर्थ.



बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते .
तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम् .
(भगवद्गीता. २/५०)


(सामान्य अर्थ:  बुद्धी वापरून कर्म करणारा व्यक्ती  चांगल्या आणि वाईट कर्मांपासून मुक्त होऊ शकतो. म्हणून योगयुक्त होऊन कौशल्याने कर्म केल्यास मनुष्य कर्मबंधनातून मुक्त होतो.)   

योगयुक्त होऊन कौशल्याने कर्म केल्यास मनुष्य कर्म बंधनातून मुक्त होऊ शकतो. योगयुक्त होणे म्हणजे काय? हा प्रश्न मनात आलाच. 

योग माणसाला पर्मार्थाशी जोडतो. म्हणून इशोपनिषदात काही मिळते का म्हणून ग्रंथ उघडून बघितला. ईशोपनिषदात भगवंत म्हणतात "पूर्णातून कितीही पूर्ण निघत गेले तरी शेवटी पूर्णच उरते. त्या साठी त्याग सहित उपभोग करावा लागतो". अर्थात जे घेतले आहे, ते परत करावेच  लागते. असे केल्याने पूर्ण पूर्णच राहते. (१-१=०). या पद्धतीने कर्म करणे म्हणजे योगयुक्त कर्म करणे. दुसर्या शब्दात कर्माचे चक्र पूर्ण करणे म्हणजे योगयुक्त कर्म. 

आपण सर्वांनाच माहित आहे, वाईट कर्मांचे वाईट फळ भोगावेच लागतात. त्या शिवाय मुक्ती नाही. कधी-कधी बुद्धी वापरून चांगले कर्म केले तरी माणूस कर्म बंधनातून मुक्त होत नाही. कसे काय? हा प्रश्न मनात आला. उदा:  एक कारपेंटर लाकडापासून आपले सर्व ज्ञान आणि अनुभव वापरून अतिशय सुंदर फर्निचर बनवितो. चांगले कर्म केले तरी तो कर्मबंधनातून मुक्त  होत नाही. कारण फर्निचरसाठी लाकूड लागते. लाकडासाठी झाड तोडावे लागते. असेच झाडतोड सुरु राहिली तर एक दिवस फर्निचर बनविण्यासाठी लाकूडच मिळणारच  नाही. अर्थातच त्याच्या कर्मावर बंधन आले. पुन्हा त्याला फर्निचर तैयार करता येणार नाही.  तोडलेल्या झाडांच्या जागी पुन्हा नव्याने झाडांची लागवड केल्याशिवाय कारपेंटरचे कर्म पूर्ण होणार नाही.  पूर्णापासून पूर्ण वेगळे केले तरी पूर्ण पूर्णच राहते.(झाडापासून फर्निचर बनले तरी झाड पूर्णच राहिले पाहिजे).    

एक प्रश्न पुन्हा मनात येतो, योगयुक्त होऊन कौशल्याने कर्म  कसे करता येईल?  

उदा: एक शेतकरी शेतात  गहू किंवा धान पिकवितो. काही स्वत: साठी ठेवतो, काही विकतो आणि काही पुढच्या वर्षी बियाण्यांसाठी ठेवतो. बियाणांसाठी धान्य वेगळे ठेवले नाही तर पुढच्या वर्षी पुन्हा पिक घेता येणार नाही, हे त्याला लक्षात ठेवावे लागते. (या साठी बुद्धी लागतेच). 

जनावर आणि माणसांनी खालेल्या अन्नाचा त्याग मल-मूत्र आणि शेण या मार्गाने होतो. अर्थात  शेतीतून मिळालेल्या अन्नाच्या अवशेषांचा त्याग मनुष्य आणि जनावरे करतात.  मल मूत्र आणि शेण पुन्हा खताचा माध्यमाने जमिनीला परत करणे म्हणजे "तेन त्यक्तेन भुञ्जीथा". जेवण रुपी कर्माचे चक्र पूर्ण करणे. शेतातील सर्व कचरा-कडबा जाळण्याजागी तो जमिनीला परत करायला पाहिजे तो माणसांच्या किंवा जनावरांचा उपयोगाचा नाही पण तो जमिनीतून मिळाला आहे, तो जमीनीला परत केलाच पाहिजेच.  त्या शिवाय शेतकर्याचे  कर्मचक्र पूर्ण होणार नाही. 
शेती जगविण्यासाठी पाणी पाहिजेच. ऋग्वेद काळात इंद्राने वज्राच्या सहाय्याने पर्वतांचे हृदय फोडून नद्यांना मुक्त केले. भगीरथाने गंगा पृथ्वीवर आणली.  कृष्णाने हि द्वापर युगात, ब्रज (जिथे दहा हजार गायी पाळल्या जातात) ९९ तीर्थांची स्थापना केली आणि इंद्राच्या लहरी (अतिवृष्टी आणि कमीवृष्टी) पासून गायींची आणि  ग्वालांची  रक्षा केली. आज हि सरकार पाणी अडवून, बंधारे बांधून आणि कालवे काढून शेतीसाठी पाण्याची व्यवस्था करते. शेतकरी हि शेतात विहीर आणि तलाव बांधून पाण्याची व्यवस्था करतो. जेवढे पाणी आपल्याला कालव्यातून मिळते, जेवढे पावसाचे पाणी विहिरीत आणि तलावात साठविल्या जाते, तेवढ्याच पाण्याचा उपयोग शेतकर्याने केला पाहिजे. जास्त केला तर पुढे शेतीसाठी पाणीच मिळणार नाही तो शेती करू शकणार नाही. खायला अन्न मिळणार नाही. कर्माचे चक्र तुटेल आणि शेतकरी कर्मबंधनात अटकेल. त्याचे फळ त्याला भोगावे लागेल. गेल्या दुष्काळात कर्मबंधनाची झळ मराठवाड्याने सोसली आहे, शेती तर सोडा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आगगाडीने करावी लागली. उपलब्ध पाण्याच्या कौशल्याने शेतीसाठी उपयोग करणे व पुन्हा तेवढेच पाणी साठविणे म्हणजे योगयुक्त रीतीने पाण्याचा उपयोग करणे.

वरच्या उदाहरणाने योगयुक्त कर्म म्हणजे काय. हे समजले असेलच. पुन्हा एक प्रश्न मनात आला.  श्रीकृष्णाने गीतेचा उपदेश करून अर्जुनाला युद्धासाठी का तैयार केले? एक सुदर्शन चक्र युद्धासाठी पुरेसे होते. पण श्रीकृष्णाने तसे केले नाही. कारण तसे केल्याने कुरुक्षेत्राच्या रणमैदानात सर्व योध्यांचे कर्मचक्र पूर्ण झाले नसते. कुणालाहि मुक्ती मिळाली नसती. 

No comments:

Post a Comment