Thursday, July 31, 2014

सोनेरी फुलं आणि म्हातारा

हिरव्यागार गवतावर म्हातारा आडवा पहुडलेला होता. जवळच क्यारीत सोनेरी फुलं वार्या सोबत डोलत होती. म्हातारा रोज पहाटे बगीच्यात यायचा आणि सोनेरी फुलांबरोबर बोलायचा. फुलांनो कसे आहात तुम्ही? छान !. बासुरी ऐकायला आवडेल का, चौरसिया यांची आहे. काय मस्त आहे न! म्हणत मोबाइलचा आवाज वाढवायचा. कधी फुलांना बांसुरी तर कधी गाणे ऐकवायचा. कधी-कधी किस्से-कहाण्या हि सांगायचा. त्याची स्वत:शीच चाललेली अखंड बडबड ऐकून सकाळी बगीच्यात फिरायला येणारे लोक हसायचे ही. पण म्हात्याराला त्याची परवा नव्हती. तो वेगळ्याच दुनियेत हरवलेला होता.

एक दिवस नेहमी प्रमाणे म्हातारा, पहाटे बगीच्यात आला. पाहतो काय, क्यारीतली फुलं कुणी उपटलेली होती. म्हाताऱ्याच्या काळजात धस्स झाल. तो मटकन खाली बसला. बहुतेक क्रिकेट खेळणाऱ्या द्वाड मुलांचे काम असेल. त्यांना मनातल्या मनात असंख्य शिव्या मोजल्या. एक कोमजलेले निर्जीव सोनेरी फुल उचलून आपल्या काळजापाशी घट्ट धरले, अचानक म्हातार्याला छातीत कळ जाणवली.

आजोबा, कसं वाटतंय आता, एका सोनेरी फुलाच्या आवाजाने म्हात्याराने डोळे उघडले, समोर क्यारीत सोनेरी फुलं मस्त वाऱ्यावर डोलत होती. आपण स्वप्न तर नाही पाहत आहोत, म्हातार्याच्या मनात विचार आला. म्हाताऱ्याने, आपल्या प्रेमळ हाताने फुलांना गोंजारले आणि खात्री केली. नेहमीप्रमाणे फुलांना विचारले, कसे आहात बाळांनो? एका फुलाने उत्तर दिले, आम्ही, मस्त आहोत आजोबा, आता कसलीच काळजी नाही, इथे कुणी आम्हाला त्रास देणार नाही. तुम्ही थकले असाल आजोबा, फार लांबचा प्रवास झाला ! जरा निवांत पडा, तुम्हाला आवडणारी बासुरीची टेप लाऊन देतो. नंतर आपण निवांत बोलू, भरपूर वेळ आहे, आपल्याकडे. म्हाताऱ्याने समाधानाने डोळे मिटले. दूर अवकाशात बासुरीचे बोल घुमत होते.

No comments:

Post a Comment